::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 21.01.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. अर्जदार हिने तीचे जुने घर जटपुरा वार्ड क्र.1 येथील घरासाठी पाण्याचीसोय म्हणून 2 नळ कनेक्शन घेण्यात आले होते. नळ कनेक्शन ग्रा.क्र.9627 व 226/14360 असे होते. पाण्याचा पुरावठा गैरअर्जदार क्र.1 करीत होते. सन 2007 मध्ये अर्जदार हिने नवीन घर बांधल्यानंतर ती नवीन घरामध्ये राहायला आली आणि जुन्या घरामध्ये कोणीराहात नसल्यामुळे त्या घरामध्ये पाण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे नळ कनेक्शन बंद करण्याकरीता दिनांक 21.12.2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे अर्ज केला. त्यानंतर 30.3.2010, 25.5.2010 वेळोवेळी त्यांना नळ कनेक्शन कपात करण्याबद्दल अर्ज केले, परंतु गैरअर्जदारांनी अद्यापपावेतो नळ कनेक्शन कापलेले नाही. अर्जदाराने नळ कनेक्शनचेपूर्ण पाण्याचे देयक डिसेंबर 2009 पर्यंत भरलेले आहे व गैरअर्जदार क्र.1 चे म्हणण्याप्रमाणे नळ कनेक्शन बंद करण्याची मजुरी खर्च रक्कम रुपये 350/- पावती क्र.22267 दिनांक 24.12.2009 ला गैरअर्जदार क्रमांक 1 चे कार्यालयात जमा केलेले आहे. तरी सुध्दागैरअर्जदार क्र.1 यांनी अद्याप पावेतो पाणी पुरवठा बंद केलेला नाही. ही बाब गैरअर्जदाराचे सेवेत न्युनता आहे आणि ती अर्जदाराला ञास देण्यासाठी जाणून-बुजून पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला नाही.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी प्रार्थना केली आहे की, अर्जदाराचा नळ कनेक्शन त्वरीत बंद करावा, तसेच गैरअर्जदाराने नुकसान भरपाई म्हणून व विनाकारण अर्जदार यांना ञास दिल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम रुपये 50,000/- व नोटीस खर्च रुपये 1500/- देण्यात यावे अशी प्रार्थना केली.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदारांनी सदर नोटीस मिळाल्यानंतर मंचात सदर प्रकरणात हजर झाले व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी निशाणी क्रमांक 34 वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी निशाणी क्रमांक 16 वर त्यांचे लेखीउत्तर व निशाणी क्रमांक 17 वर 5 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी निशाणी क्रमांक 19 वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी निशाणी क्रमांक 35 वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले.
4. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी निशाणी क्रमांक 34 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात कथन केले की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे तक्रारीत गैरअर्जदाराविरुध्द लावलेले आरोप खोटे असल्यामुळे नाकबूल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखीउत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराच्या नावाने नळ कनेक्शन क्रमांक 9627 आणि 226/14360 आहे यात वाद नाही. अर्जदाराने दिनांक 29.12.2009 रोजी फक्त नळ कनेक्शन क्रमांक 9627 बंद करण्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे अर्ज केला होता. त्याअनुषंगाने गैरअर्जदार क्रमांक 1 चे कर्मचारी नळ कनेक्शन बंद करण्याकरीता गेला असता दोन्ही नळ कनेक्शन शिलाताई अर्जूनराव बाळबुध्दे गैरअर्जदार क्रमांक 3 च्या वापरीत होते आणि त्यांनी नळ कनेक्शन कपात करण्याबाबत मज्जाव केला होता म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 चे कर्मचारी तेथून परत आले. लगेच दिनांक 3.4.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी वकीलांमार्फत नोटीस पाठवून सदर मालमत्ते संबंधी दिवाणी मु.क्र.26/2008 न्यायालयात प्रलंबीत असल्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 ला कळविले व गैरअर्जदार क्रमांक 1 कडे त्यांनी पाणी पुरवठ्याचे बिल भरण्याची तयारी दर्शविली होती. त्याला दिनांक 12.4.2010 रोजी उत्तर देवून गैरअर्जदार कोर्टाच्या आदेशाचे पालन करतील असे कळविले होते. अर्जदाराने दि.25.5.2010 रोजी दोन्ही नळ कनेक्शन बंद करण्याबाबत विनंती केली. अर्जदाराने गैरअर्जदार क्रामांक 1 च्या कार्यालयातील अधिका-यांची दिशाभुल करुन कनेक्शन क्रमांक 9726 कपात करण्याबाबत रुपये 350/- पावती क्रमांक 22267 व्दारा जमा केले व पावती सोबत घेवून गेले. गैरअर्जदार क्रमांक 1 च्या असे लक्षात आले की, गैरअर्जदार क्रमांक 3 ही घराची मालक असून कब्जात आहे व अर्जदार ही सुढ बुध्दीने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे नळ कनेक्शन कपात करण्याबाबत तकादा लावत आहे. जरी नळ कनेक्शन अर्जदाराच्या नावाने असलेतरी त्याचा उपयोग गैरअर्जदार क्रमांक 3 करीत आहे व ती फायदेशीर उपयोगकर्ती आहे. अर्जदाराने कोणतेही कारण नसतांना गैरअर्जदार क्रमांक 1 ला या मामल्यात खोटे अडकवीले आहे. तरी गैरअर्जदाराला होणा-या ञासाकरीता रुपये 25000/- नुकसान भरपाई करीता गैरअर्जदार क्रमांक 1 पासून असून अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.
5. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी निशाणी क्रमांक 16 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात कथन केले की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे तक्रारीत गैरअर्जदाराविरुध्द लावलेले आरोप खोटे असल्यामुळे नाकबूल केले आहे. अर्जदाराचे नावाने नळ कनेक्शन घेण्यात आले होते वअर्जदार घर सोडून गेल्यानंतर सुध्दा शिला बाळबुधे सदरहू घरात राहत असल्यामुळे व तिला पाण्याची आवश्यकता असल्यामुळे तीने नळ पुरवठ्याची आवश्यकता ती रक्कम वेळोवेळी नियमीतपणे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे जमा केल्यामुळे संबंधीत नळ कनेक्शन कापण्यात आलेले नाही. नागरीकांना पाणी पुरवठा करणे हे नळ योजनेचे उद्दीष्ट आहे. नळ कापण्याचे पैसे ह्या गैरअर्जदाराकडे जमा करण्यात आलेले नाही. याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 कडून गैरअर्जदार क्रमांक 2 ला सुचना देण्यात आलेली नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 चे सेवेत कोणत्याही प्रकारची न्युनता नाही. दोघी बहीणीचे संबंधात वितुष्ट आल्यामुळे अर्जदाराने हा अर्ज दाखल केल्याचे गैरअर्जदारास चौकशीअंती समजले. सबब, अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावा.
6. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी निशाणी क्रमांक 19 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात कथन केले की, अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 3 ह्या सख्या बहीणी असून त्यांचे पती सुध्दा सख्खे भाऊ आहेत. मौजा चंद्रपूर, नझूल मोहल्ला, जटपुरा वार्ड, चंद्रपूर येथे प्लॉट नं.111, सध्याचा सी.एस.टी.नं.690, शीट नं.5, ब्लॉक नं.19 हा प्लॉट दोघींच्या वडीलांची वडीलोपार्जीत इस्टेट होय. या प्लॉटवर संयुक्त उत्पन्नातून तळमजला 1989 मध्ये बांधला व 1990 मध्ये त्यावर पहिला मजला गैरअर्जदार क्र.3 चे पतीने कर्ज घेऊन बांधला. त्या घरात दोन नळ कनेक्शन घेतले आहे. 2007 मध्ये अर्जदार संयुक्त कुटूंबातून तीचे नव-याने दे.गो.तुकूम येथे नवीन घर बांधले त्या घरात राहण्यासाठी गेले. दोन्ही नळ कनेक्शनचे चार्जेस 2006 पासून गैरअर्जदार क्रमांक 3 संबंधीत कार्यालयात जमा करीत आहे व पुढे ही गैरअर्जदार क्रमांक 3 दोन्ही नळ कनेक्शन चार्जेस भरण्यास तयार आहे. अर्जदाराने तिच्या वकीलामार्फत गैरअर्जदार क्रमांक 3 ला कोणताही नोटीस दिला नाही. अर्जदाराची तक्रार कालाबाह्य आहे. तिच्या तक्रारीप्रमाणे दिनांक 21.12.2009 ला कारण घडले व 2 वर्षानंतर तक्रार पेश केली म्हणून ही तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
7. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी निशाणी क्रमांक 35 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात कथन केले की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे तक्रारीत गैरअर्जदाराविरुध्द लावलेले आरोप खोटे असल्यामुळे नाकबूल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखीउत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदार कंपनीने 1 ऑक्टोंबर 2011 पासून गैरअर्जदार क्रमांक 2 सोबत चंद्रपूर शहराचा पाणी पुरवठा, त्याची देखभाल, इत्यादी काम करण्याचा करार केलेला आहे. अर्जदाराचे दस्ताऐवजानुसार अर्जदाराचा पाणी पुरविण्याचा करार गैरअर्जदार क्रमांक 1 च्या कालावधीतच संपुष्टात आल्याचे दिसते. त्यामुळे अर्जदार व या गैरअर्जदाराचा अर्जदाराशी ग्राहक व सेवा पुरविणारा असा संबंध नाही वादातील नळ कनेक्शन क्रमांक 9627 हे गैरअर्जदार क्रमांक 1 चे कालावधीतच बंद करण्यात आले आहे. अर्जदार त्यांचे नातेवाईकांच्या आपसी वादामध्ये गैरअर्जदारांना ओढून नाहक ञस्त करीत आहे असे दिसते. अर्जदार या नळ कनेक्शन क्रमांक 9627 च्या संदर्भात या गैरअर्जदाराचा ग्राहक नाही व म्हणून गैरअर्जदार अर्जदाराला कोणतीही सेवा देण्याचा प्रश्न नाही व सेवेत ञुटी असण्याचाही प्रश्न नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार दंडासह खारीज होण्यास पाञ आहे.
8. अर्जदार व गैरअर्जदाराचे तक्रार व जवाब, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
कारणे व निष्कर्ष
9. अर्जदार ही गैरअर्जदार क्रमांक 2 कडून नळ कनेक्शन घेतले होते, त्याकरीता अर्जदार यांनी निशाणी क्रमांक 4 वर दस्त क्रमांक 5 ची पडताळणी करतांना असे दिसले की, गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाणी ‘कर’ भरत होते. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे पाणी घेण्याकरीता कोणतेही शुल्क भरण्याबाबत रसीद दाखल केलेली नाही.
मा.राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिवाडानुसार
REVISION PETITION NO. 933 OF 2008
(From the order dated 08.01.2008 in First Appeal No. 248/07 of the Chhattisgarh State Consumer Disputes Redressal Commission, Raipur)
Commissioner, Nagar Nigam,
Versus
P.S. Chauhan
PRONOUNCED ON 18th February, 2014
This provision clearly reveals that OP imposed tax & cess on the owners of the buildings for the purposes mentioned in Clause (b) to Clause (e) of Section 132. Learned Amicus Curiae for the complainant frankly admitted that tax cannot be equated with fees and merely by paying tax complainant does not obtain any service from the OP and complainant does not fall with the purview of consumer. We agree with the submissions made by learned Amicus Curiae and hold that tax cannot be equated with fees and as OP has not charged any fees for providing any service as such, complainant does not fall within the purview of consumer and learned State Commission has committed error in holding that complainant falls within the purview of consumer under the C.P. Act.
वरील नमूद असलेल्या न्यायनिवाड्याचा आधार घेता, अर्जदार हे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे पाणीकरीता कोणतेही शुल्क भरत नसल्याने, अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मधील संबंध ग्राहक आणि विक्रेताचा नव्हता असे सिध्द होते. सबब, त्यावरुन नळ कापण्याकरीता उद्भ्वीत असलेला वाद हा ग्राहकवाद नाही असे मंचाचे मत ठरले आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) उभय पक्षांनी आप-आपला तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
4) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 21/1/2016