तक्रारदार स्वत:
अॅड राहूल गांधी जाबदेणारांतर्फे
द्वारा- मा. श्री. व्ही.पी.उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 2/जुलै/2014
प्रस्तूतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार बांधकाम व्यावसायिका विरुध्द सेवेतील त्रुटी संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार हे एरंडवणे, पुणे 4 येथील रहिवासी असून जाबदेणार बांधकाम व्यावसायिक आहेत. जाबदेणार यांनी मौजे एरंडवणे येथील सिटी सर्व्हे नं 30 या जागेवर गार्डन व्हू अपार्टमेंट ही इमारत बांधलेली आहे. त्या इमारतीमधील पूर्वी तक्रारदार यांच्या ताब्यात असलेली भाडयाची जागा जाबदेणार यांनी खरेदी केली. तक्रारदार यांनी या इमारतीमधील सदनिका क्र 2 ए विंग क्षेत्र 589 व टेरेस क्षेत्र 62.8 चौ.फूट एकूण सेलेबल 620 चौ.फुट कार्पेट पैकी तक्रारदारांचे भाडेहक्काने ताब्यात असलेले क्षेत्र 101 चौ.मि. कार्पेट वजा जाता सेलेबल बिल्टअप क्षेत्र 648 चौ.फुटाची सदनिका नोंदणीकृत करारनामा दिनांक 16/1/2009 नुसार खरेदी केली. करारनामा करण्यापूर्वी तक्रारदार हे मुळ मिळकतीमधील मुळ मालक श्रीमती शालिनी खिलारे व इतर यांचेकडे भाडे हक्काने रहात होते. जाबदेणार यांनी सदर जागेवर बांधकाम करावयाचे होते. त्यावेळी जाबदेणार यांनी पर्यायी रहाण्याच्या व्यवस्थेसाठी दरमहा रुपये 4000/- भाडे देण्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे नव्याने होणा-या इमारतीमध्ये दिनांक 9/6/2006 पर्यन्त सदनिका दिली जाईल असे कबूल केले होते. जाबदेणार यांनी 620 चौ.फुट क्षेत्राची सदनिका देण्याचे मान्य केलेले असतांनाही प्रत्यक्षात 560 चौ.फुट क्षेत्राची सदनिका दिली. त्याचप्रमाणे सदर सदनिकेतील किचन ओटयाचे चूकीचे काम जाबदेणार केले आहे. ओटयाचे पाणी उलट बाजूला जात होते. त्यासाठी तक्रारदारांना दुरुस्ती करावी लागली व रुपये 15,000/- खर्च करावा लागला. इमारतीलमधील जिन्याची संरक्षित भिंतींची उंची काही ठिकाणी दोन फुट तर काही ठिकाणी अडीच फुट आहे. त्यामुळे जिन्यातून तोल जाऊन पडण्याचा धोका आहे. जाबदेणार यांनी दुरुस्ती करुन दिलेली नाही. तक्रारदारांकडून ट्रान्सफॉरमर, लाईट मिटर व मेंन्टेनन्स यासाठी एकूण रुपये 64,500/- जाबदेणार यांनी घेतलेले आहेत. परंतू पैशाचा हिशेब दिलेला नाही. तक्रारदारांनी एम.एस.ई.बी कडून माहिती घेतली असता विद्युत मिटर व कनेक्शनसाठी फक्त रुपये 1121/- खर्च जाबदेणार यांना ओला आहे. सबब जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून घेतलेल्या रक्कम रुपये 64,500/- पैकी ट्रान्सफॉरमर साठी झालेला खर्च व मेंटेनन्स इ. साठी झालेला खर्च वगळता उर्वरित रक्कम तक्रारदार परत मिळण्यास पात्र आहेत. जाबदेणार यांनी ट्रान्सफॉरमर अद्यापही बसविलेला नाही. ट्रान्सफॉरमरचे बांधकाम जाण्यायेण्याच्या जागेत केलेले आहे. जाबदेणार यांनी सदनिकेचा ताबा दिल्यानंतर अद्यापही सदनिकेमध्ये पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांना गेली दोन वर्षे पिण्याची पाणी खालून आणावे लागते. जाबदेणार यांनी पर्यायी जागेची सोय न केल्यामुळे, तक्रारदार यांना पर्यायी जागेसाठी एजंटला कमिशन पोटी रुपये 6000/- रक्कम अदा करावी लागली आहे. जाबदेणार यांनी नोव्हेंबर 2008 पर्यन्त भाडे तक्रारदार यांना दिलेले आहे. परंतू डिसेंबर 2008 व जानेवारी 2009 दोन महिन्यांचे भाडे रक्कम रुपये 8000/- दिले नाही ते मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. जाबदेणार यांनी सोसायटी स्थापन केलेली नाही, त्याचप्रमाणे हस्तांतरण पत्रही दिलेले नाही, ग्रिलचे रंगकाम करुन दिलेले नाही, निकृष्ट दर्जाचे नळ बसविलेले आहेत इ. त्रुटी बांधकामात आहेत. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून 60 चौ.फुट क्षेत्राबद्यल बाजारभावाप्रमाणे रुपये 2,04,000/- ही रक्कम मिळावी, अशी विनंती केली आहे, तसेच दोन महिन्यांच्या भाडयापोटी रुपये 8000/-, एजंट कमिशन रुपये 6000/-, किचन ओटयाच्या कामापोटी केलेला खर्च रुपये 15,000/- मिळावेत अशीही मागणी केलेली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून ट्रान्सफॉरमर, विज मिटर व कनेक्शन, मेंटेनन्स इ. साठी घेतलेली रक्कम रुपये 64,500/- पैकी रुपये 1121/- व मेंटेनन्स रुपये 12,000/- एकूण रुपये 13,121/- वजा जाता रुपये 51,379/- मिळावेत, नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा अशीही विनंती तक्रारदार करतात. तसेच जाबदेणार यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सदनिकेतील दुरुस्तीची कामे करुन दयावीत, अशी विनंती केली आहे.
2. या प्रकरणात जाबदेणार यांनी आपले लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदार यांना ताबा पावती देईपर्यन्त दरमहा रुपये 4000/- प्रमाणे भाडे दिलेले आहे व वादग्रस्त मिळकतीचा ताबा दिनांक 30/11/2008 रोजी दिलेला आहे. तिथपासूनचे भाडे देण्याचे नाकरलेले आहे. जाबदेणार यांनी सदर बांधकामात काही त्रुटी असल्याबाबतचे कथन नाकारलेले आहे. त्याचप्रमाणे वादग्रस्त मिककतीचे क्षेत्र 60 चौ.फुट कमी आहे व त्याची किंमत रुपये 2,04,000/- आहे ही बाबही जाबदेणार यांनी नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी किचन ओटयाच्या दुरुस्तीचा खर्च रुपये 15,000/- केल्याचे जाबदेणार यांनी नाकारलेले आहे. बांधकामातील त्रुटी संदर्भात जाबदेणार यांचे असे मत आहे की, सदरचे प्लॅन पुणे महानगर पालिकेने मंजूर केलेले होते व त्याप्रमाणे बांधकाम केलेले आहे. तक्रारदार यांनी करारामध्ये ट्रान्सफॉरमर बसविण्यासाठी, सोसायटी स्थापनेसाठी व कायदेशीर खर्चासाठी रक्कम देण्याचे मान्य केले होते व त्याप्रमाणे हा खर्च आकारलेला आहे. जाबदेणार यांचे असेही कथन आहे की, सदरचे बांधकाम प्रलंबित असतांना श्री.शिवाजी बी. बराटे व श्री. सुधिर के. बराटे यांनी पुणे महानगरपालिके कडे बांधकाम थांबविण्यासाठी अर्ज केलेला होता व त्यासंबंधी पुणे महानगर पालिका कोर्टामध्ये दिवाणी दावा 289/2010 दाखल केला होता. त्यामुळे ताबा देण्यास उशीर झालेला आहे. सबब तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार यांनी केलेली आहे.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्रे व युक्तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरील मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | वादग्रस्त मिळकतीचे क्षेत्र 60 चौ.फुट कमी असल्याचे तक्रारदारांनी सिध्द केले आहे का? | होय |
2 | सदनिकेच्या किचन ओटयासाठी तक्रारदार यांनी रुपये 15000/- खर्च केले आहेत हे तक्रारदारांनी सिध्द केले आहे का ? | नाही |
3 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्याकडून ट्रान्सफॉरमर, एम.एस.ई.बी, लिगल चार्जेस, सोसायटी स्थापना इ. साठी घेतलेली रक्कम जादा दराने घेतली हे तक्रारदारांनी सिध्द केले आहे का ? | |
4 | जाबदेणार हे घरभाडयाची रक्कम, एजंट कमिशन देण्यास बांधील आहेत का ? | नाही |
5 | अंतिम आदेश ? | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे-
मुद्या क्र 1 ते 5-
4. या प्रकरणात दोन्ही पक्षकारांनी लेखी पुरावा दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे शपथपत्रही दाखल केले आहे. तक्रारदार यांच्या वतीने या प्रकरणात आर्किटेक्ट श्री. वाय.एस. फाटक यांचा अहवाल दाखल केलेला आहे. श्री.फाटक यांच्या अहवालानुसार सदर वादग्रस्त मिळकतीचे क्षेत्र 84 चौ.फुट कमी आहे. परंतू तक्रारदार यांनी स्वत: या प्रकरणात 60 चौ.फुट क्षेत्र कमी असल्याचे नमूद केले आहे व तक्रारीमध्ये अहवाल आल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. तक्रारदार यांनी सदर कमी क्षेत्राची किंमत चालू बाजारभावाप्रमाणे मागितलेली आहे. परंतू दोन्ही पक्षकारांमध्ये तसा कोणताही करार नव्हता. त्यामुळे तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून कराराच्या वेळेची किंमत रुपये 1100/- प्रति चौ.फुट प्रमाणे 60 चौ.फुटासाठी रुपये 66,000/- मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी किचन ओटयाच्या दुरुस्तीसाठी रुपये 15,000/- मागितलेले आहेत. परंतू त्या कामासाठी केलेल्या खर्चाची बिले व तपशिल मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे त्या कामासाठी जाबदेणार यांनी रुपये 5000/- दयावेत, असे या मंचाचे मत आहे.
5. प्रस्तूत प्रकरणात पर्यायी घरभाडयासाठी जाबदेणार यांनी दरमहा रुपये 4000/- प्रमाणे दोन महिन्यांसाठी रुपये 8000/- दयावेत अशी तक्रारदारांनी मागणी केलेली आहे. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दिनांक 8/11/2008 रोजी पत्र पाठवून जागा ताब्यात घेण्यासाठी तक्रारदारांना कळविले होते. परंतू तक्रारदार यांनी सदरची जागा वेळेत ताब्यात घेतली नाही. त्यामुळे जाबदेणार हे दोन महिन्यांचे भाडे रुपये 8000/- देण्यास बांधील नाही. त्याचप्रमाणे कमिशन एजंटला दयावयाची रक्कम रुपये 6000/- देण्याचे जाबदेणार यांनी कधीही कबूल केलेल नव्हते. त्यामुळे सदरची रक्कम देण्यास जाबदेणार हे बांधील नाहीत.
6. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून जादा रकमेचा परतावा मागितलेला आहे. तक्रारदार यांच्या कथनानुसार ट्रान्सफॉरमर, विज मिटर, मेंटेनन्स व इतर कामासाठी जाबदेणार यांनी रुपये 64,500/- घेतलेले आहेत. 64,500/- रुपयांपैकी रुपये 1121/- व मेंटेनन्स रुपये 12,000/- एकूण रुपये 13,121/- वजा जाता रुपये 51,379/- जाबदेणार यांनी जादा घेतलेले आहेत ते परत मिळावेत, असे तक्रारदारांचे कथन आहे. परंतू दोन्ही पक्षातील नोंदणीकृत करारनाम्याचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रुपये 52,500/- चा चेक दिनांक 8/1/2009 रोजी दिलेला होता व सदरची रक्कम ही कायदेशीर फी, शेअरमनी, अपार्टमेंट असोसिएशन किंवा सोसायटी करण्यासाठी व विद्युत पुरवठा आणण्यासाठीचे डिपॉझिट या कारणासाठी घेतलेले आहेत. सदरची बाब ही केवळ एका सदनिकेला मिळणा-या विज पुरवठासाठी घेतलेली नाही. त्यामुळे सदरची रक्कम तक्रारदार हे परत मागण्यास पात्र नाहीत असे या मंचाचे मत आहे.
वर उल्लेख केलेल्या विवेचनावरुन मुद्यांचे निष्कर्ष काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कमी क्षेत्राची सदनिका देऊन
सेवेतील त्रुटी निर्माण केलेली आहे, असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना 60 चौ.फुट कमी क्षेत्रासाठी रुपये
66,000/- व किचन ओटयाच्या दुरुस्तीसाठी रुपये 5000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावे.
4. जाबदेणार यांनी तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणून एकत्रित रक्कम रुपये 3000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावे.
5. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत घेऊन जावेत, अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
स्थळ-पुणे
दिनांक-2/7/2014