(द्वारा श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे - मा. सदस्या)
1. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी सामनेवाले बिल्डर्स व डेव्हलपर्स यांचे प्रोप्रायटर श्री. संतोष बलाल यांचे मौ. नेवाली, अंबरनाथ येथील सर्वे नं. 67, हिस्सा नं. 2 व 4 या मिळकतीतील प्रायोजित केलेल्या चाळीच्या इमारतीबाबतच्या वृत्तपत्रातील जाहीरातीनुसार सदर प्रोजेक्टमध्ये वन बेडरूम, किचन (1BHK) सदनिका 250 चौ.फुट क्षेत्रफळाची व रक्कम रु. 1,50,000/- एवढया किमतीची विकत घेण्याचे ता. 06/09/2013 रोजी निश्चित केले.
2. सामनेवाले यांनी नेवाळी येथे प्रायोजित केलेल्या चाळ बांधकामामधील 250 चौ.फू. क्षेत्रफळाची खोली रु. 1,50,000/- किमतीस तक्रारदारांना विकत देण्याचे निश्चित केले. तक्रारदारांनी सदर खोली विकत घेण्यासाठी खोली खरेदर पोटी रक्कम रु. 75,000/- सामनेवाले यांचेकडे जमा केली.
3. तक्रारदार व सामनेवाले यांचे मध्ये सदर प्रोजेक्ट मधील खोली विकत घेण्याबाबतचा करार ता. 29/10/2013 रोजी नोटरी समक्ष सक्षांकित केला आहे. सामनेवाले यांनी सदर करारानुसार खोलीचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. तथापी सामनेवाले यांनी प्रायोजित ठिकाणी इमारतीचे कोणतेही काम सुरू केले नाही.
4. तक्रारदारांना सामनेवाले यांनी ता. 29/10/2013 रोजीच्या करारानुसार खोलीचा ताबा दिला नाही अथवा खोली खरेदीपोटी जमा रक्कम ही परत केली नाही. या कारणास्तव तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
5. सामनेवाले यांना जाहीर प्रगटनाद्वारे नोटीसची बजावणी केली असुनही मंचासमोर हजर नाही अथवा त्यांचेतर्फे आक्षेप दाखल नाही. सामनेवाले यांना पुरेशी संधी देवुनही मंचासमोर हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आहे.
6. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार, दाखल कागदपत्र, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद हाच त्यांचा तोंडी पुरावा समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली. तक्रारीतील उपलब्ध कागदपत्रांआधारे मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढत आहेः
मुद्देः
-
| सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून खोलीची रक्कम रु.75,000/- स्विकारुन तसेच दि.29/10/2013 रोजीच्या खरेदी करारानुसार खोलीचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय? | होय |
2. | तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत का? | होय |
3. | अंतिम आदेश? | निकालाप्रमाणे |
7. कारणमिमांसा
अ. तक्रारदारांनी व सामनेवाले यांचेमधील दि. 29/10/2013 रोजी नोटरी समक्ष सांक्षांकित झालेल्या करारानुसार सामनेवाले यांनी मौ. नेवाळी नाका येथील सर्वे नं. 67, हिस्सा नं. 2 व 4 ही मिळकत विकसित करण्यासाठी श्री. लक्ष्मण गंगाराम भोईर व अनंत रामचंद्र फडके यांनी डेव्हलपमेंट तत्वावर दिली आहे. सदर करारानुसार सामनेवाले यांनी त्यांच्या वर नमुद मिळकतीतील घरकुल योजना “मेसर्स एव्हरेस्ट बिल्डर्स व डेव्हलपमेंट” येथील प्रायोजित चाळीतील 250 चौ.फुट क्षेत्रफळाची खोली रक्कम रु. 1,50,000/- किमतीची तक्रारदार यांना विक्री करण्याचे निश्चित केल्याचे स्पष्ट होते.
ब. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदर खोली खरेदीपोटी नोंदणी रक्कम रु. 75,000/- अदा केल्याची बाब वर नमुद करारातील परिच्छेद 2 मध्ये नमुद केली आहे. तसेच तक्रारदार यांनी रक्कम रु. 45,000/- सामनेवाले यांचेकडे जमा केल्याबाबतची पावती क्र. 091 ता. 06/09/2013 रोजीची प्रत तसेच रक्कम रु. 30,000/- पावती क्र. 091 ता. 27/09/2013 रोजीची प्रत मंचात दाखल आहे. वर नमुद ता. 29/10/2013 रोजीची दाखल करार व पावतीवरुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर खोलीखरेदी पोटी रक्कम रु. 75,000/- जमा केल्याचे स्पष्ट होते.
क. तक्रारदारांनी दाखल केलेल्या समझोता करार व वर नमुद पावतीमध्ये खोलीचा क्रमांक अथवा इमारतीच्या बाबतचा तपशील नमुद नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी नियोजित इमारतीचे बांधकाम अद्याप पर्यंत चालू केले नाही.
ड. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन खोली खरेदी पोटी रक्कम रु. 75,000/- स्विकारुन ता. 29/10/2013 रोजीच्या करारानुसार अद्याप पर्यंतही खोलीचा ताबा दिलेला नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडुन खोलीचा ताबा अथवा खोली पोटी स्विकारलेली रक्कम रु. 75,000/- व्याजासहीत परत मिळण्यासाठी मागणी केली आहे.
इ. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार नियोजित इमारतीचे बांधकाम अद्याप चालू नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी सामनेवाले यांचेडे खोली खरेदी पोटी ता. 29/10/2013 रोजी जमा केलेली रक्कम रु.75,000/- त्यांना सामनेवाले यांनी परत देणे न्यायोजित होईल असे मंचाचे मत आहे.
8. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आ दे श
1. तक्रार क्र. 899/2015 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून खोली खरेदीपोटी रक्कम स्विकारुन दि. 29/10/2013 रोजीच्या नोटरी समक्ष करारानुसार खोलीचा ताबा दिला नाही अथवा खोली खरेदी पोटी जमा असलेली तक्रारदारांची रक्कमही परत न देवून त्रुटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की तक्रारदारांनी खोली खरेदीपोटी सामनेवाले यांचेकडे जमा केलेली रक्कम रु. 75,000/- (अक्षरी रुपये पंचाहत्तर हजार फक्त) दि. 29/10/2013 पासून दि. 31/10/2017 पर्यंत 12% व्याजदराने परत दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास दि.01/11/2017 पासून आदेशाची पुर्तता होईपर्यंत 15% व्याजदाराने दयावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) दि. 31/10/2017 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास दि. 01/11/2017 पासून आदेशाची पुर्तता होईपर्यंत 9% व्याजदाराने दयावी.
5. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.