अॅड ए.एस.कदम तक्रारदारांतर्फे
अॅड प्रो. विजयराव जे. काळे जाबदेणार क्र 1 ते 3 तर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 28/मे/2013
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 नुसार जाबदेणार यांनी सेवेत न्युनता केल्यामुळे दाखल केली आहे. यातील कथने खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार हे ख्रिश्चन धर्माचे असून इस्त्रायल या पवित्र भूमीला भेट देण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. जाबदेणार क्र 1 ही भागिदारी संस्था असून जाबदेणार क्र 2 ते 4 हे संस्थेचे भागिदार आहेत. जाबदेणार क्र 3 ते 4 यांचे व्यतिरिक्त जाबदेणार क्र 4 यांच्या पत्नी मोनिका संजय बनसोडे या देखील भागिदारी संस्थेच्या एका सदस्य होत्या. त्या सध्या हयात नाहीत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना माहितीपत्रक देऊन इस्त्रालय येथे सहल नेण्यात येईल असे आमिष दाखविले. तक्रारदारांकडून तक्रारीत नमूद परिच्छेद क्र 22 मध्ये नमूद केल्याप्रमाणे जाबदेणार यांनी घेतलेल्या रकमांचा तपशिल खालीलप्रमाणे -
अ.क्र | नाव | अदा रक्कम रुपये |
1 | श्री. सुभाष योहान पंडित | 40,000/- |
2 | श्री. सुरेश राफायल पंडित | 35,000/- |
3 | श्री. अरुण मोगल गायकवाड | 40,000/- |
4 | श्री. सॅम्युअल पिटर चोपडे | 35,000/- |
5 | श्रीमती गीताबाई सॅम्युअल चोपडे | 35,000/- |
6 | श्री. मार्कस तावजी पारखे | 35,000/- |
7 | श्रीमती सुमती मार्कस पारखे | 35,000/- |
8 | श्री. भगवान रेणू वाघ | 35,000/- |
9 | श्रीमती अनिता भगवान वाघ | 35,000/- |
10 | श्रीमती नम्रता भगवान वाघ | 40,000/- |
11 | श्री. नितीश भगवान वाघ | 35,000/- |
12 | श्री. दिपक तुकाराम बनसोडे | 35,000/- |
13 | श्रीमती मंगल दिपक बनसोडे | 35,000/- |
14 | श्रीमती स्वप्नील दिपक बनसोडे | 35,000/- |
15 | कु. विपुल दिपक बनसोडे | 35,000/- |
16 | श्री. रमेश वामन थोरात | 45,300/- |
17 | श्रीमती सगुणाबाई रमेश थोरात | 45,300/- |
18 | श्री. अशोक मधुकर खंडागळे | 35,000/- |
19 | श्रीमती रत्नमाला अशोक खंडागळे | 35,000/- |
20 | श्री. सचिन अशोक खंडागळे | 35,000/- |
एकूण रुपये 7,35,600/-
सदरची रक्कम घेऊन जाबदेणार यांनी इस्त्रायल येथे सहल नेली नही व रक्कमही परत दिली नाही. म्हणून प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार यांचे विरुध्द केली केली. जाबदेणार यांनी सेवेमध्ये न्यूनता दर्शविली आहे. त्यासाठी तक्रारदार यांनी त्यांनी जमा केलेली रक्कम रुपये 7,35,600/- त्यावरील व्याज वनुकसान भरपाई जाबदेणार यांच्याकडून मागितले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाच्या खर्चाची रक्कमही मागितली आहे.
2. या प्रकरणात हजर होऊन जाबदेणार क्र 2 व 3 यांनी स्वतंत्ररित्या तसेच जाबदेणार क्र 4 यांनी स्वतंत्ररित्या आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे. तक्रारदार हे ग्राहक आहेत ही बाब जाबदेणार यांनी नाकारलेली आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार पर्यटन व्यवसाय हा त्यांचा व्यवसाय नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार ग्राहक मंचात चालविण्यास पात्र नाही. जाबदेणार क्र 2 व 3 यांच्या कथनानुसार जाबदेणार क्र 3 यांनी या संस्थेच्या रकमेपैकी रक्कम रुपये 72,15,000/- भागिदारी संस्थेच्या खात्यातून काढून घेतलेली आहे व त्या रकमेचा अपहार केला आहे. सदरची रक्कम देण्यास जाबदेणार क्र 4 हे जबाबदार आहेत. तेव्हा जाबदेणार क्र 2 व 3 यांच्याविरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी जाबदेणार क्र 2 व 3 यांनी केली आहे.
जाबदेणार क्र 4 यांच्या वतीने दाखल केलेल्या लेखी म्हणण्यानुसार प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक मंचात चालविण्यास पात्र नाही. तक्रारदार हे ग्राहक नाहीत. सदर व्यवहारातील रकमा जाबदेणार क्र 1 व 2 यांच्याकडे जमा केलेल्या आहेत व त्याच्याशी जाबदेणार क्र 4 यांचा कोणताही संबंध नाही. जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी जाबदेणार क्र 4 यांच्याविरुध्द दिवाणी न्यायालयात वसुली दावा दाखल केलेला आहे व फौजदारी न्यायालयात फसवणूकीचा दावा दाखल केलेला आहे. सदरच्या प्रकरणांचा निकाल होईपर्यन्त हे प्रकरण चालवू नये अशी विनंती जाबदेणार क्र 4 यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, तोंडी युक्तीवाद व कथने यांचा विचार करुन खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न देऊन सेवेत कमतरता निर्माण केली आहे काय ? | होय |
2 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
प्रस्तुत प्रकरणातील शपथपत्र व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की तक्रारदार क्र 1 व 2 यांनी जाबदेणार यांचेकडे प्रत्येकी रक्कम रुपये 35,000/- ते रुपये 45,300/-, वर नमूद परिच्छेद क्र 1 मधील तक्त्यात दर्शविल्यानुसार एकूण रुपये 7,35,600/- जमा केलेली आहे. यासाठी तक्रारदार यांनी जाबदेणार यांनी दिलेल्या पावत्या, नोटीसची स्थळप्रत, त्याचे उत्तर, बँकेतील खातेउतारे इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरची रक्कम जमा केल्याबाबतची बाब जाबदेणार यांनी लेखी जबाबामध्ये स्पष्टपणे नाकारलेली नाही. यावरुन सदरची रक्कम जाबदेणार यांच्याकडे जमा आहे हे सिध्द होते.
या प्रकरणात जाबदेणार क्र 1 ही भागिदारी संस्था असून जाबदेणार क्र 2 ते 4 व जाबदेणार क्र 4 यांच्या पत्नी मोनिका हे भागिदार होते याबाबत दोन्ही पक्षकारात वाद नाही व सदरची बाब भागिदारी पत्राच्या नकला दाखल करुन सिध्द केलेली आहे. जाबदेणार क्र 2 व 3 यांच्या वतीने असे कथन करण्यात आले की या प्रकरणातील सर्व रक्कम जाबदेणार क्र 4 यांनी घेतलेली आहे. त्या संबंधात जाबदेणार क्र 2 व 3 यांनी खातेउतारे व इतर कागदोपत्री पुरावा दाखल केलेला आहे. या प्रकरणातील कागदोपत्री पुरावा, प्रतिज्ञापत्र विचारात घेतले असता असे स्पष्ट होते की सदरची रक्कम भागिदारी संस्थेत जमा केलेली आहे त्यामुळे सर्व भागिदार व्यक्तीश: व सामुदायिकरित्या तक्रारदारांना देण्यास बांधील आहेत. जाबदेणार क्र 2 ते 4 यांचेमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा प्रलंबित आहे. परंतू ते वाद प्रलंबित असतांना तक्रारदारांनी दाखल केलेली प्रस्तुतची तक्रार थांबविण्याचे कोणतेही कारण नाही. कारण जाबदेणार क्र 2 ते 4 हे तक्रारदार यांची रक्कम देण्यास जबाबदार आहेत.
तक्रारदार यांनी सदर रकमेवर 18 टक्के दरानुसार व्याज मागितलेले आहे. परंतू दोन्ही पक्षांमध्ये व्याजासंबंधी कोणताही करार नव्हता म्हणून तक्रारदार यांना व्याजाची रक्कम मागता येणार नाही.
जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कबूल करुन त्यांच्याकडून पैसे स्विकारुनही योग्य ती सेवा पुरविली नाही त्यामुळे सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. या कारणासाठी तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई मागू शकतात. त्याचप्रमाणे तक्रारदार यांना ग्राहक मंचामध्ये प्रकरण दाखल करावे लागले त्यासाठी शारिरीक व मानसिक त्रास झाला यासाठी ते नुकसान भरपाई मागू शकतात. तक्रारदार यांनी जमा केलेल्या रकमे व्यतिरिक्त त्यांना सेवेतील त्रुटीसाठी प्रत्येकी रुपये 5,000/-, मानसिक व शारिरीक त्रासासाठी रुपये 2,500/- व प्रकरणाचा खर्च म्हणून एकूण रुपये 2,000/- जाबदेणार यांनी दयावेत असा आदेश दिला तर तो न्यायास धरुन होईल.
वर उल्लेख केलेले विवेचन, मुद्ये त्यावरील निष्कर्ष व कारणे यांचा विचार करुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार क्र.1 ते 4 यांनी व्यक्तिश: व सामुदायिकरित्या
तक्रारदारांना रक्कम रुपये 7,35,600/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
3. जाबदेणार क्र.1 ते 4 यांनी व्यक्तिश: व सामुदायिकरित्या
सेवेतील त्रुटीसाठी तक्रारदारांना प्रत्येकी रुपये 5,000/-, मानसिक व शारिरीक त्रासासाठी प्रत्येकी रुपये 2,500/- व तक्रारीचा खर्च एकूण रुपये 2,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.