तक्रारदार : वकीलामार्फत हजर.
सामनेवाले : वकीलामार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 हे वाहनाचे उत्पादक आहेत. सा.वाले क्र.2 हे वाहनाचे वितरक आहेत. तर सा.वाले क्र.3 हे अर्थ सहाय्य पुरविणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला ट्रक रुपये 9,78,902/- या किंमतीस विकत घेतला. व तो विकत घेण्याकामी सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांना कर्ज पुरविले. सा.वाले क्र.1 यांनी ट्रकचा ताबा तक्रारदारांना सा.वाले क्र.2 यांचे मार्फत दिनांक 8.9.2006 रोजी दिला.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे ट्रक नविन असला तरीही ट्रकमध्ये वेळोवेळी बिघाड होत होता. व तो दुरुस्तीकामी सा.वाले यांचे दुरुस्ती केंद्रावर वेळोवेळी घेवून जावे लागत असे. तक्रारदारांचे वाहन चालकाने तक्रारदारांना असे सांगीतले की, सदर ट्रक हा जुना व वापरलेला आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 28.11.2006 रोजी नोटीस दिली व दुसरी नोटीस दिनांक 15.12.2006 रोजी दिली. त्यानंतर सा.वाले क्र.2 यांचे प्रतिनिधींनी ट्रकची तपासणी केली. परंतु ट्रकमध्ये बिघाड होतच राहीला.
3. तक्रारदारांच्या तक्रारीेतील कथना प्रमाणे तक्रारदारांना वाहनाचा ताबा मिळाल्यानंतर तक्रारदारांनी वाहनाची नोंदणी करुन घेतली. सा.वाले यांनी तक्रारदारांना जे प्रमाणपत्र दिले आहे त्यामध्ये वाहनाचा उत्पादक महिना 9/2006 असा नमुद करण्यात आलेला होता. वास्तविक ते वाहन पुर्वीच दिले असले पाहिजे. तसेच वाहनावरील नंबर देखील खोटे व चुकीचे लिहिलेले होते. जुन्या वाहनाचा रंग देऊन दुरुस्ती करुन ते तळोजा, जिल्हा रायगड येथे ठेवण्यात आले होते. व या प्रकारच्या ट्रकचा ताबा सा.वाले यांनी तक्रारदारांना दिला. तक्रारदारांनी त्यानंतर वाहनामध्ये सतत बिघाड होत असल्याने, तसेच वाहनाला इंधन गैरवाजवी लागत असल्याने तक्रारदारांनी सा.वाले यांच्याकडे वाहन बदलून देण्यात यावे असा तगादा लावला. तथापी सा.वाले यांनी त्याची पुर्तता केली नाही. दरम्याने तक्रारदारांनी सा.वाले यांनी तक्रारदारांची फसवणूक केली व फौजदारी गुन्हा केला असा तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला दिला. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना वाहनाची किंमत रु. 9,78,902/- अदा करावी अन्यथा वाहन बदलून द्यावे. तसेच नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी केली.
4. सा.वाले क्र.1 व 2 यांनी आपली एकत्रित कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांना नविन वाहन विक्री केले होते. व तक्रारदारांच्या कथना प्रमाणे जुने वाहन दुरुस्ती करुन व रंग देऊन, नंबर बदलून, तक्रारदारांना जुने वाहन विक्री केले यास कथनास सा.वाले यांनी नकार दिला. सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचे नाटीसीला उत्तर दिनांक 3.1.2007 रोजी दिले व त्यामध्ये सर्व बाबींचा खुलासा करण्यात आलेला होता. तक्रारदारांचे वाहन किरकोळ दुरुस्तीकामी सा.वाले यांचे दुरुस्ती केंद्रामध्ये आणले गेले होते व त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. परंतु वाहनामध्ये मतूलभूत दोष नव्हता. त्याचप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना दिलेल्या विक्री दाखल्यामध्ये उत्पादनाचा महिना 9/2006 असा चुकीने छापण्यात आला आहे. वास्तविक वाहन 6/2006 मध्ये उत्पादित करण्यात आलेले होते. व त्या प्रकारचा क्रमांक चाचीसवर दाखविण्यात आलेला होता असा खुलासा सा.वाले यांनी केला. या प्रकारे जुना ट्रक तक्रारदारांना विकण्यात आला व तक्रारदारांची फसवणूक केली या आरोपास सा.वाले यांनी नकार दिला. सा.वाले क्र.1 व 2 यांनी आपला लेखी युक्तीवादामध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदार यांचे पती पत्नी वाहन चालविण्याचे व्यवसायात असून सदर वाहन त्या व्यवसायाकामी तक्रारदाराच्या पतीने तक्रारदारांचे नांवे घेतले. वाहन हे तक्रारदारांच्या पतीने विकत घेतलेले असल्याने ते वाणीज्य व्यवसायाकामी घेतले गेले होते.
5. सा.वाले क्र.3 ही अर्थ सहाय्य करणारी कंपनी यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये तक्रारदारांच्या आरोपास नकार दिला. तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचे विरुध्द कोणतीही दाद मागीतलेली नसल्याने सा.वाले क्र.3 यांचे कैफीयेतीवर विस्तृत चर्चा करण्यात येत नाही.
6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत वाहनाची छायाचित्रे, तसेच वाहनाचे सर्व्हेक्षक श्री.चितळे यांचा अहवाल दाखल केला आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीस प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र तसेच कागदपत्रे दाखल केली व लेखी युक्तीवाद दाखल केला.
7. प्रस्तुतचे मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले व त्यानुसार तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 व 2 यांचेकडून खरेदी केलेले वाहन व्यवसायाकामी खरेदी केलेले असल्याने प्रस्तुतचे ग्राहक मंचास सदर तक्रार चालविण्याचा अधिकार नाही हे सा.वाले सिध्द करतात काय ? | होय |
2 | सा.वाले यांनी तक्रारदारांना विक्री केलेले वाहन हे जुने होते व ते दुरुस्त करुन नविन वाहन म्हणून विक्री करण्यात आले हे तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
3 | तक्रारदारांना वाहन बदलून मिळावे किंवा वाहनाची किंमत मिळावी असा आदेश सा.वाले यांचे विरुध्द मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही |
4 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.4 मध्ये असे कथन केले आहे की, तकारदारांनी सदरहू वाहन व्यावसायाकामी परंतु स्वतः चे उपजिवीकेचे साधन म्हणून खरेदी केले होते. तक्रारदार ही स्त्री असून सहाजिकच तक्रारदार ही विवाहीत स्त्री असेल. सहाजिकच तक्रारदारांचे पती त्या वाहनाचे व्यवसायाकडे लक्ष देणार हे अपेक्षित असते. सा.वाले क्र.1 व 2 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली व तक्रार खोटी आहे असे कथन केले. सा.वाले क्र.1 व 2 यांचे युक्तीवादाचे परिच्छेद क्र. 5 मध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांचे पतीने त्यांचे ट्रकचे व्यवसायाकामी सदर ट्रक तक्रारदारांचे नांवे खरेदी केला व तो ट्रक तक्रारदारांनी स्वतः उपजिवीकेसाठी खरेदी केलेला नव्हता. तथापी प्रस्तुतची तक्रार ग्राहक मंचाने सुनावणीकामी घेण्यात यावी या उद्देशाने तक्रारदारांनी आपले उपजिवीकेचे साधन व्यवसाय दाखविला परंतु प्रत्यक्षात मात्र वाहन तक्रारदारांचे पतीने घेतले होते.
9. तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दिनांक 5.10.2009 चे सोबत काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत व त्यामध्ये तक्रारदारांनी पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीची प्रत हजर केलेली आहे. त्या तक्रारीमध्ये तक्रारदारांनी असे स्पष्टपणे कथन केले आहे की, तक्रारदार हया त्यांचे पती व त्यांची तिन मुले यांचे सोबत रहातात, व तक्रारदारांच्या पतीचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे व त्या व्यवसायाकामी ट्रक घेण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदारांनी आपला पोलीसांना दिलेला व्यावसायाचा तपशिल पुरविला असून सदरहू ट्रक तक्रारदारांचे पती व नातेवाईक यांनी तळोजा, जिल्हा रायगड येथे जावून पहाणी केली व पहाणीनंतर ट्रक पसंत केला व त्यानंतर इतर कार्यवाही करुन ताब्यात घेतला असे कथन केलेले आहे. त्यानंतर तक्रारीमध्ये ट्रक जुना होता व त्यास दुरुस्त करुन तो तक्रारदारांना विकण्यात आला असे कथन केले आहे. या प्रमाणे तक्रारदारांनी पोलीसांकडे दिलेली तक्रार दिनांक 14.12.2007 यामध्ये सदर ट्रक तक्रारदारांचे पतीने त्यांचे वाहन व्यवसायाकामी घेतला होता असे कथन केलेले आहे. तक्रारीतील पोलीसांचा पुढील जबाब असे स्पष्ट दर्शवितो की, सदरहू ट्रक तक्रारदारांनी स्वतःचे उपजिवीकेसाठी खरेदी केलेला नव्हता तर तक्रारदारांचे पतीने त्यांचे वाहन व्यवसायाकामी घेतला होता. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये पुराव्याचे शपथपतत्रामध्ये किंवा पोलीसांकडील जबाबामध्ये असे कोठेही कथन केलेले नाही की, सदरहू ट्रक तक्रारदारांनी घेतलेले पहीलेच वाहन होते व त्याचा वापर तक्रारदार किंवा त्यांचे पती हे माल वाहतुकीच्या व्यवसायाकरीता करीत नव्हते. या प्रमाणे तक्रारदारांनी सदरहू ट्रक हा तक्रारदारांचे पतीने त्यांचे व्यवसायाकामी घेतला होता असे कथन केलेले असल्याने व पोलीसांचा जबाब तक्रारदारांनी आपल्या शपथपत्रासोबत दाखल केलेला असल्याने ही बाब तक्रारदारांना मान्य आहे असा निष्कर्ष काढावा लागतो.
10. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(डी) प्रमाणे एखादी वस्तु किंवा सेवा सुविधा व्यवसायाकामी स्विकारली असेल तर ती वस्तु खरेदी करणारी किंवा सेवा सुविधा स्विकारणारी व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) प्रमाणे ग्राहक होत नाही. हयास अपवाद म्हणजे खरेदी केलेली वस्तु किंवा प्राप्त केलेली सेवा सुविधा ही जर स्वतःचे उपजिवीकेसाठी व व्यवसायाकामी घेतली असेल तर ती व्यक्ती ग्राहक होऊ शकते. तक्रारदार ही विवाहीत स्त्री असल्याने ती स्वतः वाहन चालवू शकत नाही. वाहन त्यांचे चालक चालवित होते ही बाब तक्रारदारांनी तक्रारीत मान्य केलेली आहे. पोलीसांकडील जबाबामध्ये त्यांचे पती माल वाहतुकीचा व्यवसाय करीत होते व त्याकामी सदरहू वाहन घेण्यात आले ही बाब मान्य केलेली आहे. यावरुन तक्रारदारांनी तक्रारीत केलेले कथन हे, त्यांनी सदर वाहन स्वतःचे उपजिवीकेसाठी खरेदी केलेले होते हे कथन खोटे आहे असे दिसुन येते.
11. तक्रारदारांनी पोलीसांपुढें दिलेल्या तक्रारीची प्रत आपले शपथपत्र दिनांक 5.1.2009 रोजी सोबत दाखल केलेली असल्याने ते कागदपत्र तक्रारदाराचे पुरावा शपथपत्राचा एक भाग होता. तक्रारदारांनी स्वतःच ते कागदपत्र म्हणजे तक्रारीची प्रत दाखल केलेली असल्याने व त्या बद्दलचा उल्लेख आपल्या शपथपत्राचे परिच्छेद क्र.6 मध्ये केलेला असल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांच्या पोलीसांकडील जबानीतील कथने सिध्द करण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांचा पोलीसांकडील जबाब/तक्रार दिनांक 14.12.2007 मध्ये वर नमुद केल्याप्रमाणे असे स्पष्ट कथन आहे की, तक्रारदार हे तक्रारदारांचे पतीसोबत रहातात. व त्यांचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. व त्याकामी वादग्रस्त ट्रक घेण्याचे ठरले होते. व्यवसायाचेकामी ट्रक घेण्याचे ठरल्याने तो निच्छितच वाणीज्य व्यवसायाकामी घेतला असा निष्कर्ष काढावा लागतो. या संदर्भात सा.वाले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या लक्ष्मी इंजिनियरींग वर्क्स विरुध्द पी.एस.जी. इंडस्ट्रीयल इंस्टीटयुट AIR 1995 1428 या प्रकरणावर भर दिला. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्याय निर्णयाचे परिच्छेद क्र.12 मध्ये वाणीज्य व्यवसायाकामी घेतलेली वस्तु ही कलम 2(1)(डी) मधील तरतुदीचा उहापोह केलेला आहे व काही उदाहरणे दिलेली आहेत. या प्रमाणे एखादे व्यक्तीने वाहन विकत घेतले व ते अन्य व्यक्ती मार्फत चालवावयास दिले असेल तर वाहन विकत घेणारी व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) प्रमाणे ग्राहक या संज्ञेस पात्र होत नाही. प्रस्तुत मंचास या परिस्थितीची जाणीव आहे की, तक्रारदार ही स्त्री असून ती ट्रक चालविणे दुरापास्त आहे. परंतु ही बाब नजरेआड केली तरीदेखील तक्रारदारांचे पोलीसांकडील जबानीतील कथन असे स्पष्टपणे दर्शविते की, प्रस्तुतचा वादातील ट्रक हा तक्रारदारांच्या पतीने त्यांचे वाहन व्यवसायाकामी विकत घेतला होता. यावरुन तक्रारदार यांनी वाणीज्य व्यवसायाकामी सदरहू ट्रक विकत घेतला असल्यासने तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) प्रमाणे ग्राहक ठरत नाही. सहाजीकच तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेस पात्र नसल्याने प्रस्तुतची तक्रार ग्राहक मंचापुढे सुनावणीस घेता येणे शक्य नाही. या प्रमाणे मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष नोंदविता येतो.
मुद्दा क्र.1
12. मुद्दा क्र.1 यावरील निष्कर्ष तक्रारदारांच्या विरोधात नोंदविल्यानंतर इतर मुद्दे विचारात घेणे व त्यावर निष्कर्ष नोंदविणे आवश्यक ठरत नाही. तथापी वरिष्ठ मंचाने प्रस्तुत मंचाचे मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष चूकीचे ठरविल्यास भविष्यामध्ये प्रकरण फेर सुनावणीकामी पाठविण्याची आवश्यकता पडू नये या उद्देशाने व दिरंगाई टाळण्याचे हेतुने इतर मुद्यांवरील निष्कर्ष नोंदविण्यात येत आहे.
13. तकारदारांना सा.वाले यांचेकडून वाहनाचा ताबा दिनांक 8.9.2006 रोजी मिळाला व त्यानंतर तक्रारदारांनी सर्व प्रथम दिनांक 31.10.2006 रोजी सा.वाले यसांना ई-मेलव्दारे त्या वाहनातील दोष नजरेस आणले. त्या ई-मेलची प्रत तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी अ वर दाखल केलेली आहे. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 28.11.2006 रोजी सा.वाले यांना वकीलामार्फत नोटीस दिली व त्यामध्ये वाहनामधील खालील दोष सा.वाले यांचे नजरेस आणले.
1) ट्रकचा सांगाडा जुना आहे.
2) शॉर्ट सर्किट व्यवस्था सदोष आहे.
3) इंजीन जास्त गरम होते.
4) वाहनाचे इंजीन जास्त इंधन पिते.
5) वाहनाचे मागील पाईप सदोष आहे.
6) सर्व टायर जुने आहेत.
7) वाहनाच्या सिटस् खराब झालेल्या आहेत.
8) वाहनाला जुना रंग बदलणेकामी नविन रंग देण्यात आलेला
आहे व क्लज प्लेट मधून आवाज येतो.
14. त्यानंतर तक्रारदारांनी वकीलामार्फत दिनांक 15.12.2006 रोजी पूर्वीच्याच मजकुराची नोटीस सा.वाले यांना पुनहा दिली त्याची प्रत निशाणी क वर दाखल केलेली आहे. वरील दोन्ही नोटीसला स्मरणपत्र वकीलामार्फत दिनांक 30.12.2006 रोजी दिले त्याची प्रत निशाणी ड वर दाखल केलेली आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या दिनांक 28.11.2006 रोजीच्या नोटीसीला त्यांचे वकीलामार्फत दिनांक 3.1.2007 रोजी उत्तर दिले त्याची प्रत तक्रारदारांनी निशाणी ई वर दाखल केलेली आहे. त्या उत्तरामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांचा आरोप नाकारलेला आहे. व नोटीसचे उत्तराचे परिच्छेद क्र.6 मध्ये ट्रकचे सांगाडयावर असलेल्या क्रमांकाचा खुलासा केला.
15. तक्रारदारांचा असाही आरोप आहे की, सा.वाले यांनी जाणीवपुर्वक जुने वाहन तक्रारदारांना विक्री केले व वाहनाची विक्री प्रमाणपत्र निशाणी ग वर वाहन उत्पादनाचा महिना व वर्षे 9/06 असे नमुद करण्यात आलेले आहे, ते चुक आहे. ते खोटे आहे. यावरुन जुने वाहन तक्रारदारांना नविन वाहन म्हणून विकण्यात आले हे सिध्द होते असे तक्रारदारांचे कथन आहे. या कथनाचे पृष्यर्थ तक्रारदारांनी आपले तक्रारीसोबत वाहनाची व वाहनाचे वेगवेगळया भागाची तसेच चासेस वरील क्रमांक या सर्वाचे रंगीत छायांचित्रे दाखल केलेली आहेत. त्या सर्वाचे प्रस्तुत मंचाने वाचन व निरीक्षण केलेले आहे. या व्यतिरिक्त तक्रारदारांनी वाहन सर्वेक्षक श्री.चितळे यांचा अहवाल दिनांक 21.2.2007 निशाणी जे वर दाखल केलेला आहे. सा.वाले यांचे वकीलांनी आपले युक्तीवादात असे कथन केले की, तक्रारदारांनी श्री.चितळे यांचा अहवाल दाखल केला परंतु चितळे यांचे शपथपत्र दाखल नाही. तथापी हा युक्तीवाद चुकीचा आहे कारण तक्रारदारांनी दिनांक 13.12.2010 रोजी सर्वेक्षक श्री.व्ही.व्ही.चितळे यांचे शपथपत्र प्रस्तुत प्रकरणामध्ये दाखल केलेले आहे. त्यामध्ये श्री.चितळे यांनी असे कथन केलेले आहे की, त्यांचा दिनांक 21.2.2007 रोजीचा अहवाला मधील कथने ही सत्य आहेत व त्या अहवालावर त्यांची स्वाक्षरी आहे.
16. श्री.चितळे यांनी त्याच परीसरात वाहन चालवून बधीतले व श्री.चितळे यांना वाहनाचे इंजीनमधून आवाज येत आहे, क्लजमधून आवाज येत आहे, असे दोष दिसले. व वाहनाचा काही भाग गंजलेला आहे असेही दिसून आले. श्री.चितळे यांनी आपल्या अहवालामध्ये असे नमुद केलेले आहे की, ट्रकचे सांगाडयावर (चाचीस) पुढील क्रमांक दिसून आला तो 30 K C 6 F 007225 असा होता. व त्यापैकी शेवटचे 225 हे अंक वेगळया निर्मितीचे म्हणजे 007 या अंकाचे निर्मितीपेक्षा वेगळे दिसून आले.
17. या संदर्भात तक्रारदारांनी आपले नोटीसीची उत्तर दिनांक 3.1.2007 तसेच कैफीयत व शपथपत्र यामध्ये पुढील प्रमाणे खुलासा केलेला आहे. तो मुळ इंग्रजी मधून उधृत करणे मंचास योग्य वाटते.
My clients state that the said truck is bearing Chassis
No. 30KC6F 007225. The said chassis no. denotes and
falsifies the claim of your client that the said truck is second hand. On decoding the chassis no. it is seen that the first two digits “30 ” signify basic model code. The alphabet “K ” denotes the wheel base. The alphabet “C ” denotes version of cabin. The numeral “6 ” appearing thereafter denotes the year of manufacture which in the present case is 2006. The alphabet “F ” denotes the month of manufacture which in the present case is June. The rest 6 digits refer to the running serial number. The chassis no. in fact reveled that the truck is manufactured in June, 2006. Your clients claim that my client have delivered a second hand truck to your client therefore hold no water.
18. वरील प्रमाणे सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तसेच शपथपत्रामध्ये असे स्पष्ट कथन केलेले आहे की, इंग्रजी अद्याक्षर F हे वाहन जुन महिन्यामध्ये निर्मिती केलेले आहे असे दर्शविते. इंग्रजी अद्याक्षर F हेइंग्रजी अद्याक्षराचे 6 व्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे वाहनाचे इंजीनवर ते दिसून आले. त्यामध्ये अंक 6 व अद्याक्षर F हे अंतर्भुत होते हे देखील वाहन जुन, 2006 मध्ये उत्पादीत करण्यात आलेले आहे हे दर्शविते. तक्रारदारांचे साक्षीदार श्री.चितळे यांनी वाहनाची चाचीसवर व इंजीनवर दिसून आलेल्या क्रमांकाचा खुलासा आपल्या अहवालामध्ये केलेला नाही. तर केवळ शेवटचे तीन अंक 225 हे वेगळया निर्मितीचे दिसतात असा निष्कर्ष नोंदविला. सहाजिकच तो क्रमांक इंजीनचा व वाहनाचा चालू क्रमांक दर्शवितात. या प्रमाणे सा.वाले यांचे नोटीसीचे उत्तरात व कैफीयतीचे शपथपत्रामध्ये चाचीस व इंजीनवर दिसून
येणा-या क्रमांकाच्या अक्षरांचा सविस्तर खुलासा करण्यात आलेला आहे. ते कथन असे दर्शविते की, वाहनाची निर्मिती जून 2006 मध्ये झालेली होती व ते वाहन मुळचे होते.
19. वरील प्रकारचा निष्कर्ष सा.वाले यांचे साक्षीदार श्री.एन.शंकर यांनी केलेल्या शपथपत्रावरुन पुष्टी देतात. श्री.एन.शंकर हे सा.वाले यांचेकडे उप व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते. व त्याबद्दलचे शपथपत्र दिनांक 23.10.2009 रोजी दाखल केलेले आहे. व यामध्ये असे कथन केले आहे की, ट्रकचा सांगाडा व इंजीन उत्पादन करीत असताना उत्पादन शुल्क खाते यांचे माहितीकरीता वाहन सांगाण्याचे इंजीन व चाचीस याच्या क्रमांकाची यादी बनविली जाते व प्रस्तुतचे वाहनाचे संदर्भात त्या यादीची प्रत श्री.एन. शकर यांनी आपल्या शपथपत्रासोबत दाखल केलेली आहे. या यादीमध्ये अ.क्र.39 वर वाहन चासेस क्रमांक 30KC6F 007225 हा क्रमांक नमुद आहे. व त्या 39 अनुक्रमांकावर इंजीन क्रमांक E683CD6F
012061 असे नमुद आहे. या प्रकारची यादी उत्पादन शुल्क विभागास पुरविली जात असल्याचे श्री.शंकर यांनी आपल शपथपत्रात नमुद केलेले आहे. त्या यादीमध्ये अ.क्र.39 वर प्रस्तुत वाहनाचा चासीस क्रमांक व इंजीन क्रमांक नमुद केलेला आहे. त्यावरुन प्रस्तुत वाहन जून 2006 मध्ये उत्पादीत केलेले होते या सा.वाले यांच्या कथनास पुष्टी मिळते. सहाजिकच वाहनाचे उत्पादन जून, 2006 मध्ये झाले असेल तर विक्री प्रमाणपत्रामध्ये उत्पादनाचा महीना सप्टेंबर, 2006 (9/2006) असा नमुद केल्याने ते वाहन सप्टेंबर मध्ये उत्पादित झालेले नाही असा निष्कर्ष काढता येतो. श्री.शंकर यांचे वर उल्लेख केलेले शपथपत्र तसेच वर उल्लेख केलेली यादी व त्यातील नोंदी हे दर्शवितात की, सा.वाले यांनी तक्रारदारांना दिलेल्या विक्री पत्रामध्ये वाहनाचा उत्पादनाचा महिना 9/2006 असे नमुद करण्यात चुक झाली होती व केवळ त्या तांत्रिक चुकीमुळे खरोखरच वाहन 9/2006 महीन्यात उत्पादित झाले होते असा निष्कर्ष काढता येणार नाही. श्री.शंकर यांचे शपथपत्र व त्यांनी हजर केलेली यादी सा.वाले यांच्या कथनास पुष्टी देते की, विक्री प्रमाणपत्रामध्ये वाहनाचे उत्पादनाचा महिना 9/2006 नजरचुकीने नमुद करण्यात आला होता. वाहन विक्री व्यवहारातील सर्वसाधारण व्यवहार लक्षात घेता ज्या महिन्यात वाहन उत्पादित झालेले आहे त्याच महिन्यामध्ये वाहन विक्रीकामी विक्रेत्याकडे पोहचविले जाते. व त्याचे कडून विक्री नंतर सुपूर्द केले जाईल ही शक्यता कमी असते. वाहन उत्पादित केल्यानंतर उत्पादकाचे कारखान्यामधून ते विक्रत्याकडे पोहचविले जाते व त्यानंतर विक्रेते त्याची हंगामी नोंदणी करुन ते वाहन त्यानंतर ग्राहकास विक्री करतो. प्रस्तुतचे व्यवहारामधील वाहन हे मध्यप्रदेशातील धर येथे उत्पादित करण्यात आलेले आहे. व त्यानंतर ते सा.वाले क्र.2 विक्रत्याकडे जिल्हा ठाणे येथे पोहचविण्यात आले. व तक्रारदारांनी निवड केल्यानंतर ते वाहन तक्रारदारांना सुपुर्द करण्यात आले. दरम्यान वाहन ठाणे जिल्हयातून रायगड येथे पोहचविते झाले व तेथून वाहनाचा ताबा तक्रारदारांना मिळाला. हया सर्व घडामोडी एका महिन्यात सप्टेंबर 2006 महिन्यामध्ये घडतील हे शक्य दिसत नाही. हया सर्व बाबी देखील सा.वाले यांचे कथनास पुष्टी देतात की, प्रस्तुतचे वाहन 6/09 या महिन्यात उत्पादित झाले होते व त्यानंतर स्थलांतरानंतर विक्रेत्यामार्फत ते तक्रारदारांना विक्री करण्यात आले. व वाहनाचा ताबा दिनांक 8.9.2007 रोजी तक्रारदारांना मिळाला. त्यामुळे केवळ विक्री प्रमाणपत्रामध्ये वाहन उत्पादनाचा महिना 9/06 नमुद आहे. यावरुन सा.वाले यांनी वाहनाचे उत्पादनाचे महिन्याबद्दल तक्रारदारांची फसवणूक केली असे दिसून येत नाही. सहाजिकच आहे की, विक्री प्रमाणपत्रावर उत्पादनाचा महिना 9/06 हा चुकीने नमुद करण्यात आलेला आहे.
20. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की. श्री.चितळे यांनी आपल्या अहवालामध्ये असे कोठेही नमुद केलेले नाही की, प्रस्तुतचे वाहन हे जुने होते किंवा पुर्नविक्रीचे होते. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीनंतर आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये पुन्हा असे कथन केले की, वाहन जुनेच होते. व जुन्या वाहनास रंग देण्यात येऊन ते विक्री करण्यात आले. तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दिनांक 5.1.2009 चे परिच्छेद क्र.6 मध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी पोलीसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी ते वाहन तपासणीकामी शासकीय प्रयोगशाळेकडे, कालीना मुंबई येथे तपासणीकामी पाठविले. व तक्रारदारांच्या कथना प्रमाणे त्या अहवालातील निष्कर्ष तक्रारदारांच्या अहवालास पुष्टी देतात. शासकीय प्रयोगशाळा कालीना, मुंबई यांनी प्रस्तुत वाहनाचे तपासणीनंतर दिलेल्या अहवालाची प्रत तक्रारीच्या पृष्ट क्र.174 ते 177 वर दाखल आहे. त्याचे वाचन केले असतांना असे दिसून यते की, प्रयोगशाळेमध्ये वाहनाचे चासीससचे क्रमांकावर असलेला रंग खरवडून काण्यात आला व तो खरवडून घेतल्यानंतर वाहनाचा चासीस क्रमांक व इंजीन वरील क्रमांक दिसून आला ते प्रयोगशाळेने आपल्या अहवालामध्ये नमुद केलले आहे. त्या दोन्ही क्रमांक वर नमुद केल्याप्रमाणे मिळते जुळते आहेत. ते सा.वाले यांनी आपल्या नोटीसचे उत्तर व कैफीयतीचे शपथपत्रामध्ये नमुद केलेले आहे. या प्रमाणे चासीस वरील व इंजीनवरील क्रमांकाचे बाबत काही फेरफार करण्यात आला होता किंवा बदली करण्यात आला होता व जून्या क्रमांका ऐवजी नवीन क्रमांकाचे छापे तेथे बसविण्यात आलेले होते असा पुरावा उपलब्ध नाही ही बाब तक्रारदारांचे तक्रारीतील कथनास छेद देते.
21. या संदर्भात महत्वाची बाब म्हणजे वाहनाचे टायर हे जुने होते व ते वापरलेले होते असे निरीक्षण श्री.चितळे यांनी आपल्या अहवालात नमुद केलेले नाही. त्या उलट श्री.चितळे आपल्या अहवालात असे म्हणतात की, ते वाहनाचे टायरचे संदर्भात कुठलेही मत प्रदर्शित करु शकत नाही. या उलट सा.वाले यांचे साक्षीदाराने असे स्पष्ट कथन केले आहे की, वाहनाचे टायर हे नविनच होते. श्री. शंकर यांच्या पुराव्याचे शपथपत्र दिनांक 17.10.2007 या मधील परिच्छेद क्र.9 असे कथन आहे की, वाहनाचे टायरवर महीना व वर्षे नमुद केलेले होते व त्याचा तपशिल श्री.शंकर यांनी आपल्या शपथपत्राचे परिच्छेद क्र.9 मध्ये दिलेला आहे. त्याचे विरुध्द कथन श्री.चितळे यांचे अहवालामध्ये नाही. तसेच तक्रारदारांच्या अन्य शपथपत्रात देखील दिसून येत नाही. यावरुन असा निष्कर्ष काढावा लागतो की, वाहनाचे सर्व टायर्स हे नविन होते. सा.वाले यांनी जर जुनी वाहन नविन म्हणून तक्रारदारांना विकायचे असते तर त्यांनी निच्छितच वाहनाचे टायर बदलले नसते. परंतु एन. शंकर यांच्या दिनांक 17.10.2007 चे शपथपत्राचे परिच्छेद क्र.9 असे दर्शविते की, वाहनाचे सर्व टायरवर उत्पादनाचा महिना व वर्षे हे जून, 2006 होते. हया प्रकारची माहिती सा.वाले यांच्या कथनास पुष्टी देते तर तक्रारदारांच्या कथनास छेद देते.
22. तक्रारदारांनी आपले कथनाचे पृष्टयर्थ तक्रारदारांचे वाहन चालक श्री.अब्दुल कादर सय्यद याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये श्री.कादर यांनी असे कथन केले आहे की, वाहनाचे इंजीन व्यवस्थित काम करीत नव्हते. तसेच वाहनाचा सांगाडा हा चांगल्या परिस्थितीत नव्हता. व जुनें वाहन हे तक्रारदारांना नविन म्हणून विकण्यात आलेले होते. तक्रारदारांच्या वाहन चालकाचे दिनांक 3.5.2010 रोजीचे शपथपत्र हे मोघम असून संदिग्ध आहे. मुळातच तक्रारदाराचे पोलीसांकडील जबाबातील कथन हे असे दर्शविते की, तक्रारदारांचे पतीने व त्यांचे नाते वाईकांनी तळोजा, जिल्हा रायगड येथे जावून ट्रकची पहाणी केली व त्यानंतर ट्रक पसंत केला. व त्यानंतर व्यवहार पूर्ण करण्यात आला. तक्रारदारांचे पतीने वाहनाचे निरीक्षण केल्यानंतर वाहन ताब्यात घेतले असल्याने जुने वाहन तक्रारदारांना नविन म्हणून विक्री केली असती तर निश्चीतच तक्रारदारांचे पतीला त्याबद्दल शंका आली असती व वाहनाचा ताबा न घेता तक्रारदारांचे पतीने त्याबद्दल आक्षेप घेतला असता. परंतु त्या प्रकारचा आक्षेप वाहन ताब्यात घेण्यापूर्वी नोंदविण्यात आला होता असा पूरावा उपलब्ध नाही.
23. या व्यतिरिक्ति तक्रारदारांचे निरीक्षक श्री.चितळे यांनी दिनांक 21.2.2007 रोजी वाहनाचे निरीक्षण केले तेव्हा वाहन 10416 किलो मिटर चालविल्याची नोंद सर्वेक्षक श्री.चितळे हयांनी अहवालामध्ये नोंदविली आहे. तक्रारदारांना वाहनाचा ताबा 8 सप्टेंबर, 2006 रोजी मिळाला. तर श्री.चितळे यांनी वाहनाची तपासणी दिनांक 21.2.2007 रोजी केली, म्हणजे तक्रारदारांनी वाहनाचा ताबा मिळाल्यानंतर साडे पाच महीन्यांनी केली. यावरुन असे दिसते की, सदरहू वाहन प्रतीमहा 2000 किलोमिटर चालविण्यात आली. ही बाब असे दर्शविते की, वाहन बंद नव्हते किंवा तक्रारदारांचे गॅरेजमध्ये उभे करण्यात आलेले नव्हते. तर त्याचा उपयोग सतत चालु होता. या संदर्भात सा.वाले यांचे साक्षीदाराने असे कथन केले आहे की, वाहनाचा वापर जनावरांसाठी वाहतूक करणेकामी करण्यात आलेला होता व जनावरांचे शेण व मुत्र यामुळे वाहनाचा सांगाडा खराब झाला असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदारांनी दरम्यान वाहन दुरुस्ती करणेकामी सा.वाले यांचे केंद्रावर आणले होते. परंतु वाहनामध्ये मुलभूत दोष दिसून आल्याची नोंद दुरुस्तीचे अहवालामध्ये नाही. किंबहुना वाहन जुने असून नविन म्हणून विकण्यात आलेले आहे असे कुठलाही अहवाल उपलब्ध नाही.
24. वरील सर्व परिस्थितीत व उपलब्ध पुराव्याचा साकंल्याने विचार करता प्रस्तुतची तक्रारीमध्ये सा.वाले यांनी जुने वाहन तक्रारदारांना नविन म्हणून विक्री केले व तक्रारदारांची फसवणूक केली व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हा आरोप तक्रारदार सा.वाले यांचे विरुध्द सिध्द करु शकले नाहीत असा निष्कर्ष नोंदवावा लागतो.
25. वरील चर्चेवरुन व निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 90/2007 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत काही आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.