(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 16 ऑगष्ट, 2017)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. विरुध्दपक्ष यांच्या पत संस्थेत असलेले दैनिक बचत पासबुक खाते क्रमांक अ/43 (A/43) दिनांक 1.7.2015 ला सुरु केले. या सदरच्या बचत खात्याची मुदत ही दिनांक 28.9.2016 पर्यंत होती. तक्रारकर्ता स्वतः बचत खात्यामध्ये विरुध्दपक्षाकडे दररोज रुपये 200/- जमा करीत असे किंवा विरुध्दपक्षाने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे/ एजंटकडे जमा करीत असहे. विरुध्दपक्ष जमा करीत असलेल्या रकमेसबंधी तक्रारकर्त्यास पासबुक प्रदान केले होते. सदरच्या पासबुकवर विरुध्दपक्षाच्या व्यवस्थापकाची किंवा एजंटची किंवा नेमून दिलेल्या व्यक्तींची स्वाक्षरी आहे. तक्रारकर्त्यास सदरची रक्कम ही दिनांक 1.9.2015 ते 28.9.2016 पर्यंत रुपये 200/- प्रमाणे प्रत्येक दिवशी किंवा महिण्यावारी जमा करावयाचे होते आणि सदरची मुदत संपल्यानंतर तक्रारकर्त्यास मुद्दल रकमेवर 3 % टक्के व्याजा प्रमाणे येणारी रक्कम विरुध्दपक्ष संस्था तक्रारकर्त्यास देणार होती, असे विरुध्दपक्षाच्या पासबुकमधील दैनिक बचत खात्याच्या नियमात दिलेले आहे.
2. दैनिक बचत खात्याची मुदत संपल्यानंतर ठरलेल्या नियमाप्रमाणे विरुध्दपक्ष पत संस्थेकडे जमा केलेली रक्कम रुपये 67,200/- ही 3 % टक्के व्याजदराने मागण्यास गेली असता, विरुध्दपक्षाने सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तरी सुध्दा तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडे वारंवार जाऊन आपल्या रकमेची मागणी करीत होता. परंतु, आजपर्यंत विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास त्याची मुद्दल रक्कम व व्याजाची रक्कम परत केली नाही. यावरुन, त्याने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे व सेवेत त्रुटी केली आहे. याप्रमाणे, विरुध्दपक्षाने ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यानंतर, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दिनांक 27.7.2016 ला वकीलामार्फत कायदेशिर नोटीस बजाविली, परंतु सदरचा नोटीस विरुध्दपक्षाच्या कार्यालयाचा पत्ता बदलला आहे, या शे-यासह नोटीस परत आला. त्यामुळे, तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) तक्रारकर्त्याची मुद्दल रक्कम रुपे 67,200/- दिनांक 28.9.2016 पर्यंत 3 % टक्के व्याजदराने येणारी रक्कम रुपये 69,216 तक्रारकर्त्यास परत करावी व दिनांक 28.9.2016 पासून सदर रकमेवर 34 % टक्के व्याजदराने तक्रारकत्याचे हातात रक्कम पडेपर्यंत देण्यात यावे.
2) तसेच, तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 25,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- विरुध्दपक्षाकडून मागितले आहे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. परंतु, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस मिळून सुध्दा मंचात हजर झाले नाही व तक्रारीत जबाब दाखल केले नाही. त्यामुळे मंचाने विरुध्दपक्ष क्र.1 व 2 चे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्र.1 वर दिनांक 25.4.2017 ला पारीत केला.
4. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेले शपथपत्र, लेखीयुक्तीवाद व दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रुपये 200/- रोज प्रमाणे दिनांक 1.9.2015 ते 28.9.2016 पर्यंत जमा केली, ही एकूण रक्कम रुपये 67,200/- एवढी होते. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दैनिक बचत पासबुक खाते क्रमांक A/43 दिलेले होते, त्यात त्याच्या सर्व जमा रकमेच्या समोर विरुध्दपक्ष संस्थे मार्फत कर्मचा-याची/ व्यवस्थापकाची स्वाक्षरी दिसून येत आहे. तक्रारकर्त्याने पासबुकाची छायाप्रत निशाणी क्र.3 नुसार पान क्र.7 ते 14 वर दाखल केले आहे. तसेच, निशाणी क्र.3 नुसार दिनांक 27.10.2016 रोजी वकीला मार्फत पाठविलेला नोटीस पान क्र.15 वर दाखल केला आहे.
6. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दिलेल्या दैनिक बचत पासबुक प्रमाणे तक्रारकर्त्याच्या ठेवीच्या संपूर्ण रकमेवर प्रॉडक्ट पध्दतीने 3 % टक्के व्याज देण्यात येईल, असे पासबुकातील परिच्छेद क्र.9 मध्ये नमूद केले आहे. तसेच, तक्रारकर्त्याने आपल्या बचत ठेव खात्यात जमा असलेल्या रकमेवर कर्ज काढावयाचे असल्यास जमा रकमेवर 80 % टक्के पर्यंत खातेदाराला कर्ज मिळू शकेल, परंतु त्यावर द.सा.द.शे. 18 % व्याजदर आकारण्यात येईल, असे परिच्छेद क्र.10 मध्ये नमूद आहे.
7. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे जमा केलेली रक्कम रुपये 67,200/- यामधील कोणतीही रक्कम विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास परत केली नाही. त्याचप्रमाणे, विरुध्दपक्ष संस्थे मार्फत दैनिक बचत पासबुकमध्ये नमूद केल्याप्रमाणे 3 % टक्के प्रॉडक्ट पध्दतीने व्याज सुध्दा तक्रारकर्त्यास देण्यात आला नाही. यावरुन विरुध्दपक्ष संस्थेने सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येत आहे व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला दिसून येत आहे, असे मंचाला वाटते. करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीकरित्या व संयुक्तीकरित्या, तक्रारकर्त्याची जमा रुपये 69,216/- ही रक्कम दिनांक 28.9.2016 पासून द.सा.द.शे. 12 % टक्के व्याजदराने येणारी रक्कम तक्रारकर्त्याचे हातात पडेपर्यंत देण्यात यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 16/08/2017