द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले हे मिरारोड येथील ‘ध्वनी प्रॉपर्टीज’ या बांधकाम संस्थेचे मालक आहेत. तक्रारदार 1 या सेवानिवृत्त वयोवृध्द महिला आहेत. तक्रारदार 2 ही तक्रारदार क्र. 1 यांची मुलगी आहे. उभय तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडुन विकत घेतलेल्या सदनिकेचा ताबा सामनेवाले यांनी दिला नसल्याने प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार त्या सेवानिवृत्त वयोवृध्द महिला असुन त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना त्यांच्या मालकीची चौथ्या मजल्यावरील सदनिका चढउतार होण्यासाठी गैरसोयीची होत असल्याने त्यांनी आपली सदरील सदनिका विकुन, सामनेवाले हे मीरारोड येथील कनकिया सिनेमॅक्सच्या बाजुला विकसित करत असलेल्या ‘ध्वनी टॉवर’ इमारतीमधील तळमजल्यावरील सदनिका क्र. A-7 रु. 12 लाख किमतीस विकत घेण्याचा व्यवहार सामनेवाले यांचेशी केला व त्यानुसार द. 04/12/2009 रोजी रु. 2 लाख इतकी बयाना रक्कम दिली. यानंतर दि. 17/12/2009 रोजी रु. 1 लाख व दि. 03/02/2010 रोजी रु.37,900/- धनादेशाद्वारे दिली. शिवाय, त्याच दिवशी रु. 2,61,100/- रोख स्वरुपात दिले. उभय पक्षांनी दि. 17/09/2010 रोजी सदनिका विक्री करारनामा करुन तो दि. 22/09/2010 रोजी नोंदणीकृत करण्यात आला. सदर करारनाम्यामध्ये सदनिकेचा ताबा देण्याची तारीख सामनेवाले यांनी नमुद न केल्याने, तक्रारदारांनी सामनेवाले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता, डिसेंबर 2011 पर्यंत सदनिेचा ताबा देण्याचे सामनेवाले यांनी मान्य केले होते. यानंतर, तक्रारदारांनी वारंवार भेट दिली असता, इमारतीच्या बांधकामाचे केवळ तिस-या माळयापर्यंत सांगाडे उभे असल्याचे दिसुन आले. यानंतर तक्रारदारांनी विचारणा केली असता ऑगस्ट 2014 मध्ये सदनिकेचा ताबा दिला जाईल असे आश्वासन सामनेवाले यांनी दिले. तथापी, सामनेवाले यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्याने, सामनेवाले यांना नोटिस पाठविण्यात आली. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने, पस्तुत तक्रार दाखल करुन उर्वरित रक्कम सामनेवाले यांना देण्यापेक्षा सदनिकेचा ताबा मिळावा, मानसिक त्रास गैरसोयीबद्दल खर्च म्हणुन रु. 8 लाख मिळावेत, सहकारी संस्था स्थापित करण्याचे आदेश व्हावेत. सोसायटी स्थापन केल्यानंतर संस्थेच्या नावे हस्तांतरण पत्र करुन मिळावे, तक्रारदार त्यांची सदनिका विकल्यानंतर, भाडयाच्या घरात रहात असल्याने रु. 4.48 लाख रक्कम मिळावी अशा मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांना, तक्रारीची नोटीस दि. 13/07/2015 रोजी नोटीस प्राप्त झाल्याचा पोस्टल ट्रॅक रिपोर्ट अभिलेखावर आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांना नोटिस प्राप्त झाल्याबाबत सर्व्हिस अॅफिडेव्हिट दाखल केले. सामनेवाले यांना नोटिस प्राप्त झाल्यानंतर, दीर्घकाळ संधी देवुनही सामनेवाले सुनावणीस गैरहजर राहिल्याने तक्रार त्यांच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदारांनी तोंडी युक्तिवादाची पुरसिस दिली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या संपुर्ण कागदपत्रांचे वाचन मंचाने केले. त्यावरुन प्रकरणात खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) तक्रारदारांनी तक्रारी सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसुन येते की, सामनेवाले यांनी तक्रारदाराशी दि. 22/9/2010 रोजी केलेल्या नोंदणीकृत करारनाम्या प्रमाणे, सामनेवाले यांनी मीरा रोड येथे विकसित केलेल्या ‘ध्वनी टॉवर्स’ या इमारतीमधील तळ मजल्यावरील A-7 ही सदनिका तक्रारदारांना रु. 12 लाख या किंमतीस विकल्याचे सामनेवाले यांनी मान्य केले आहे.
ब) तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार तक्रारदारांनी सामनेवाले यांना रु. 3,37,900/- वेगवेगळया धनादेशाद्वारे दिल्याबाबत तक्रारदारांनी त्यांच्या पास बुकामधील नोंदी सादर केल्या आहेत. त्यानुसार, सामनेवाले यांना दि. 04/12/2009 रोजी रु. 2 लाख, दि. 17/12/2009 रोजी 1 लाख व दि. 03/02/2010 रोजी रु. 37,900/- अशी एकुण रक्कम रु. 3,37,900/- दिल्याचे स्पष्ट होते.
क) या रकमेव्यतिरिक्त तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 03/02/2010 रोजी रु. 2,62,100/- रोख स्वरुपात दिल्याचे तक्रारीमध्ये तसेच शपथपत्रामध्ये नमुद केले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पास बुकामधील नोंदीनुसार त्यांनी दि. 02/02/2010 रोजी त्यांच्या बँक खात्यामधुन रोख रक्कम रु. 3,90,000/- काढल्याचे दिसुन येते. तक्रारदारांनी सामनेवाले यांना धनादेशाद्वारे रु. 37,900/- व रोखी द्वारे रु. 2,61,900/- दिल्याचे तक्रारदाराचे कथन उपलब्ध कागदपत्रांद्वारे ग्राह्य वाटते. तक्रारदारांनी सदर रक्कम रु. 2,61,900/- रोख स्वरुपात दिल्याचे शपापत्र दाखल केल्याने, आणि विशेषतः सामनेवाले यांना दीर्घकाळ संधी मिळुनही त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने तक्रारदाराची शपथेवरील कथने अबाधित राहतात.
ड) उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार केल्यास सामनेवाले यांना तक्रारदाराकडुन सदनिकेचे 50% मुल्य स्वीकारुनही तक्रारदारांना सदनिका देण्याविषयी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दिसुन येते. तक्रारदारांनी त्यांच्या मालकीची अन्य इमारतीमधील चौथ्या मजल्यावर सदनिका विकुन, प्रकृति अस्वास्थ्याचा विचार करुन, सामनेवाले यांच्या इमारतीमधील तळमजल्यावरील सदनिका विकत घेतली. तथापी, तक्रारदारांची निकड त्यांचे प्रकृति अस्वास्थ्य यांचा कोणताही विचार न करता, तक्रारदारांनी दिलेल्या रु. 6 लाख रकमेचा त्यांनी गेली सात वर्ष यथेच्छ उपभोग घेतल्याचे, उपलब्ध कागदपत्रांवरुन स्पष्ट होते.
इ) तक्रारदारांनी करारनाम्याप्रमाणे त्यांना विकण्यात आलेली सदनिका मिळाली किंवा ती सदनिका देता येत नसेल तर, त्याच परिसरातील तत्सम आकाराची सदनिका मिळावी अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी आपल्या मागणीच्या पृष्ठयार्थ मा. महाराष्ट्र राज्य आयोगाची तक्रार क्र. 99/2011 मधील दि. 22/12/2014 रोजीचा न्यायनिवाडा सादर केला आहे. सदर न्याय निवाडयानुसार, तक्रारदार हे नुकसान भरपाई तसेच, करानाम्यामध्ये नमुद केलेल्या सदनिकेऐवजी त्याच परिसरातील, तेवढयाच क्षेत्रफळाची सदनिका मिळण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते.
ई) सदर न्याय निवाड्याशिवाय, तक्रारदारांनी मा. राष्ट्रीय आयोगाने वीना खन्ना विरुध्द अन्साळ प्रापर्टीज अॅण्ड इंडस्ट्रीज लि. या प्रकरणामधील न्यायनिवाडाही सादर केला आहे.
उपरोक्त दोन्ही न्याय निवाडयामधील न्यायिक तत्व विचारात घेता, सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन सदनिकेची 50% रक्कम स्वीकारुन, त्याचा दीर्घकाळ वापर करुन, इमारतीचे पर्यायाने सदनिकेचे बांधकाम न करुन तसेच मान्य केल्याप्रमाणे तक्रारदारांना सदनिकेचा ताबा न देवुन, तक्रारदारावर अन्याय केल्याचे स्पष्ट होते.
5. सामनेवाले यांनी कैफियत दाखल न केल्याने, तक्रारदाराची सर्व कथने अबाधित राहतात. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक. 982/2015 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विकलेल्या सदनिकेसंदर्भात त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी दि. 22/09/2010 रोजीच्या नोंदणीकृत करारनाम्यानुसार तक्रारदारांना रु. 12 लाख किंमतीस ‘ध्वनी टॉवर’ इमारतीमधील सदनिका क्र. A-7 या सदनिकेचे उर्वरित मुल्य रु. 6 लाख, तक्रारदारांनी दि. 31/10/2016 रोजी किंवा त्यापुर्वी सामनेवाले यांना द्यावे. सामनेवाले यांनी ते स्विकारावे व तक्रारदारांना सदर सदनिकेचा ताबा करारनाम्यामध्ये नमुद केलेल्या सर्व सुविधासह दि. 15/11/2016 पुर्वी द्यावा. सदर आदेशपुर्ती विहित कालावधीमध्ये न केल्यास दि. 16/11/2016 पासून प्रतिदिन रु. 200/- प्रमाणे रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी.
4. सामनेवाले यांना सदर ‘ध्वनी टॉवर’ इमारतीमधील सदनिका क्र. A-7 चा ताबा, तक्रारदारांना देणे अशक्य असल्यास, सदर इमारतीच्या परिसरातील अन्य विकसित इमारतीमध्ये, त्याच आकाराची व समान सुविधांची सदनिका, सामनेवाले यांनी दि.31/12/2016 रोजी किंवा त्यापुर्वी, तक्रारदाराकडुन रु. 6 लाख रक्कम स्वीकारुन द्यावी. सदर आदेशपुती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि. 01/01/2016 पासून आदेशपुर्ती होईपर्यंत रु. 200/- प्रतिदिन प्रमाणे रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी.
5. सामनेवाले यांनी विकसित केलेल्या ‘ध्वनी टॉवर’ इमारतीमधील सदस्यांची सरकारी गृहनिर्माण संस्था स्थापन न केल्याची बाब, करारनाम्यामध्ये मान्य केली असल्याने, सामनेवाले यांनी दि. 31/12/2016 पुर्वी सदस्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करावी. सदर आदेश पुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि.01/01/2016 पासून आदेशपुर्ती होईपर्यंत प्रतिदिन रु. 50/- प्रमाणे रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी.
6. तक्रारदारांना झालेल्या शारिरिक, मानसिक आर्थिक व अन्य खर्चाबद्दल रु 50,000/-(अक्षरी रु. पन्नास हजार फक्त) तक्रारदारांना दि. 15/11/2016 पुर्वी द्यावा.
7. तक्रारदारांची अभिहस्तांतरणाची मागणी सामायिक स्वरुपाची असल्याने नामंजुर करण्यात येते.
8. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
9. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.
ठिकाण – ठाणे.
दिनांक – 01/09/2016