द्वारा-श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 30 डिसेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार 1 यांच्या सोबत दिनांक 20/2/2002 रोजी नोंदणीकृत करारनामा करुन जाबदेणार यांच्या ईशा गार्डन, सदनिका क्र.502 [जूना] नवीन सदनिका क्र.501, 5वा मजला, बिल्डींग क्र.ए, रक्कम रुपये 4,00,000/-विकत घेतली. तक्रारदारांनी रक्कम रुपये 4,00,000/- जाबदेणार क्र.1 यांना अदा केली. तक्रारदारांनी वेळोवेळी सदनिकेच्या ताब्याची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांना असे आढळून आले की त्यांची सदनिका क्र.501 चा ताबा श्री. कात्रे यांना देण्यात आलेला आहे. तक्रारदार हे प्रॅक्टिसिंग गायनॅकोलॉजीस्ट असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना इस्लामपूर येथून यावे लागते. ब-याच वेळा इर्मजन्सी असते. तक्रारदारांनी सदनिकेची संपूर्ण किंमत अदा केलेली असतांनादेखील जाबदेणार क्र. 1यांनी त्यांना दिलेली सदनिका श्री. कात्रे यांना दिली. त्यानंतर जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना दिलेल्या 501 सदनिकेऐवजी सदनिका क्र.603 तक्रारदारांना दिली. त्याप्रमाणे करारात दुरुस्ती दिनांक 20/1/2005 रोजी करण्यात आली. सदनिका क्र.603 चा ताबा ज्या दिवशी देण्याचे कबूल केले होते त्यानंतर तीन वर्षांनी तो देखील अर्धवट बांधकाम असलेल्या स्वरुपात दिला. दिनांक 20/2/2002 रोजीच्या नोंदणीकृत करारनाम्यातील कलम 9 मध्ये ताबा देण्यास विलंब झाला तर विलंबाच्या दिनांकापासून प्रत्यक्ष ताबा दिनांकापर्यन्त रुपये 1000/- दंड जाबदेणार क्र.1 यांनी दयावयाचा आहे असे नमूद करण्यात आलेले आहे. जाबदेणार क्र.1 यांना सदनिकेचा ताबा देण्यास 1073 दिवसांचा विलंब झालेला आहे. तक्रारदारांनी सोसायटी सदस्यत्वापोटी श्री.म्हसकर, चेअरमन यांना रुपये 5000/- दिले होते. परंतू श्री. म्हसकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तक्रारदारांना अदयापपर्यन्त सोसायटीचे सदस्यत्व मिळालेले नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदनिका क्र.603 चे बांधकाम अपूर्ण स्वरुपात होते. तक्रारदारांना रंगकाम, टायलिंग, डब्लू सी फिटींग, इलेक्ट्रिक वायरिंग, वीज मिटर ही कामे पूर्ण करुन घ्यावी लागली. त्यापोटी रुपये 1,54,000/- खर्च आला. त्याची मागणी तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे करुनही जाबदेणारांनी त्याची दखल घेतली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 1,54,000/- 9 टक्के व्याजासह, नुकसान भरपाई पोटी रुपये 2,00,000/-, सदनिका देण्यास विलंब झाला त्यापोटी रुपये 10,73,000/- मागतात, सोसायटीचे सभासदत्व व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र, विलंब माफीचा अर्ज व कागदपत्रे दाखल केली.
2. तक्रारदारांनी दाखल केलेल्या विलंब माफीच्या अर्जावर सुनावणी होऊन रुपये 1000/- दंडासह दिनांक 20/5/2008 रोजीच्या आदेशान्वये विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात आला. जाबदेणार यांनी फक्त विलंब माफीच्या अर्जावरील म्हणणे दाखल केलेले आहे, परंतू लेखी जबाब दाखल केलेला नाही. जाबदेणार क्र.2 यांनी लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्याविरुध्द दिनांक 21/11/2008 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दिनांक 20/2/2002 रोजी नोंदणीकृत करारनाम्यानुसार जाबदेणार क्र.1 यांनी ईशा गार्डन, सदनिका क्र.501, 5वा मजला, बिल्डींग क्र.ए चा ताबा तक्रारदारांना दयावयाचा होता. कराराम्यास विटनेस श्री. म्हसकर, जाबदेणार क्र.2 चे चेअरमन होते. जाबदेणारांनी सदनिकेची संपूर्ण किंमत रुपये 4,00,000/-तक्रारदारांकडून स्विकारुनसुध्दा सदनिकेचा ताबा मात्र श्री. व्ही.एस.कात्रे यांना दिला. नंतर तक्रारदार व जाबदेणार क्र.1 यांच्यात दुरुस्त करारनामा दिनांक 20/1/2005 झाला. जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना सदनिका क्र.603 संदर्भातील दिलेले ताबा पत्र दिनांक 29/1/2005 रोजीचे आहे. तक्रारदार हे डॉक्टर आहेत त्यांना त्यांचा दैनंदिन व्यवसाय सोडून जाबदेणार क्र.1 यांच्या चुकीमुळे निष्कारण त्रास सहन करावा लागला, दुसरी सदनिका मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले, जाबदेणार यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन तक्रारदारांना नाहक त्रास दिला, यासर्वांवरुन जाबदेणार क्र.1 यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब दिसून येतो. त्यामुळे सदनिकेचा ताबा देण्यास दिनांक 20/2/2002 पासून दिनांक 29/1/2005 पर्यन्त 1073 दिवसांचा विलंब झाल्याचे दिसून येते. दिनांक 20/2/2002 रोजीच्या करारनाम्यातील कलम 9 मध्ये ताबा देण्यास विलंब झाला तर विलंबाच्या दिनांकापासून प्रत्यक्ष ताबा दिनांकापर्यन्त रुपये 1000/- दंड जाबदेणार क्र.1 यांनी देण्याचे कबूल केलेले असल्यामुळे विलंब कालावधी 1073 दिवसांसाठी जाबदेणार क्र.1 यांनी रुपये 10,73,000/- दंडापोटी तक्रारदारांना दयावेत असा जाबदेणार क्र.1 यांना आदेश देण्यात येत आहे. तक्रारदारांना जाबदेणार क्र.1 यांनी सदनिका क्र. 603 चे अर्धवट बांधकाम पूर्ण करुन घेण्यासाठी रुपये 1,54,000/- खर्च करावे लागले, त्याच्या पावत्या तक्रारदारांनी मंचासमोर दाखल केलेल्या आहेत, त्यामुळे जाबदेणार क्र.1 यांनी रुपये 1,54,000/- तक्रारदारांना दयावेत असा आदेश देण्यात येत आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटींमुळे व अनुचित व्यापारी पध्दतीमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. म्हणून नुकसान भरपाई पोटी जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 25,000/- दयावी असा आदेश देण्यात येत आहे. तक्रारदारांनी सोसायटीच्या सदस्यत्वापोटी रुपये 5000/-भरल्या संदर्भातील पावती मंचासमोर दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सोसायटी सभासदत्वापोटी जी रक्कम असेल ती भरुन जाबदेणार क्र.2 यांनी तक्रारदारांना सभासद करुन घ्यावे असा आदेश जाबदेणार क्र.2 यांना देण्यात येत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 10,73,000/- 9 टक्के व्याजासह दिनांक 29/10/2007 पासून संपुर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यन्त तसेच बांधकाम पूर्ण करण्याचा खर्च रक्कम रुपये 1,54,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
3. जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 25,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. तक्रारदारांनी सोसायटी सभासदत्वाची जी रक्कम असेल ती भरुन जाबदेणार क्र.2 यांनी तक्रारदारांना सोसायटीचे सभासद आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करुन घ्यावे.
5. जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.