निकालपत्र :- (दि.24.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.3 प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत. सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, कोल्हापूर शहर महानगरपालिका हद्दीतील ए वॉर्ड, सि.स.नं.3139/2अ, क्षेत्र 84.3 चौरस मिटर व सि.स.नं.3139/4 क्षेत्र 20.9 चौरस मिटर या लगतच्या दोन मिळकती याचे एकत्रित क्षेत्र 105.2 चौरस मिटर यापैकी रस्ता रुंदीकरणात गेलेले क्षेत्र वजाजाता शिल्लक क्षेत्र 92.7 चौरस मिटर ही मिळकत तक्रारदारांच्या मालकीची असून सदर मिळकत विकसित करणेसाठी सामनेवाला यांचेबरोबर दि.14.09.1999 रोजी करार झालेला आहे. करारातील अटीनुसार विकसित केलेल्या -धनलक्ष्मी संकुल अपार्टमेंटमधील दुस-या मजल्यावरील रेसिडेन्शियल फलॅट नं.5, क्षेत्र 800 चौरस फूट, तसेच, सदर फलॅट व्यतिरिक्त रुपये 5 लाख सामनेवाला यांनी देणेचे होते. सामनेवाला यांनी करारातील अटीनुसार बांधकाम पूर्ण केले नसून बांधकामामध्ये त्रुटी ठेवलेल्या आहेत. इमारतीतील फरशी, जिना काम अपूर्ण आहे, रंगकाम केलेले नाही, आवश्यक ते पार्किंग ठेवलेले नाही. फलॅटमध्ये गळती आहे. भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही. ठरलेप्रमाणे जुन्या इमारतीमध्ये स्वयंभू अशी महादेवाची पिंड होती, सदर पिंड सामनेवाला यांनी नेलेली असून त्यांनी कबूल केलेप्रमाणे सदर ठिकाणी योग्यप्रकारे देऊळ बांधून त्याची प्रतिष्ठापना केलेली नाही. इमारतीचे घोषणापत्र केलेले नाही. फलॅटचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही. इमारतीस गिलावा केलेला नाही. सामनेवाला यांनी 1999 पासून 18 महिन्यात बांधकाम पूर्ण करणे आवश्यक असताना 9 वर्षे विलंब लावलेला आहे. तसेच, सामनेवाला यांचेकडून मोबदला मिळालेला नाही. इमारतीमध्ये पावसाळयात गळती निर्माण होते. सामनेवाला यांनी फसवणुक करुन विकसनासाठी न दिलेले 12.5 चौरस मिटर ही रस्त्यात गेलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई/चटई निर्देशांक विना अधिकार वापरलेला आहे. पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही. सबब, सामनेवाला यांनी फलॅट नं.5 चे खरेदीपत्र तक्रारदारांच्या नांवे करुन देणेचा आदेश व्हावा, तसेच उपरोक्त त्रुटी दूर कराव्यात व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 50,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत विकास करारपत्र दि.14.09.1999, सामनेवाला यांना दि.26.05.2008 रोजी पाठविलेली नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी एकत्रितरितया म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला, डी.सी.के.कन्स्ट्रक्शन कंपनी ही कंपनी अॅक्टखाली नोंद झालेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. दि.14.09.1999 रोजीच्या करार झाला, त्यावेळेस सामनेवाला क्र.1 ते 4 हे सदर कंपनीचे डायरेक्टर होते. दि.14.09.1999 च्या विकसन करारानुसार दि.03.08.2001 रोजी नविन विकास करारपत्र नोंद झाले असून त्यावर तक्रारदार तसेच सामनेवाला क्र.4 यांच्या सहया आहेत. सदर दि.03.08.2001 रोजीच्या नविन विकास करारपत्रात पूर्वीचे विकास करारपत्र व मुखत्यारपत्र रद्द झालेचे कथन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेल्या त्रुटी पूर्ततेसाठी मुदतीचा बाध येत आहे. सदर सामनेवाला यांनी सदर कंपनीचा राजीनामा दिला असल्याने त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी येत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ सामनेवाला कंपनी बोर्ड मिटींग रेझोल्युशन दि.26.08.1999, दि.05.10.1999, दि.09.02.2000, दि.08.05.2000, दि.04.09.2000, दि.07.12.2000, सामनेवाला क्र.1 व 2 यांचे शेअर्स विक्री पत्र व संचालक पद राजीनामा पत्र अनुक्रमे दि.24.11.2000 व दि.04.04.2001, कंपनी अॅक्ट फॉर्म नं.23 संदिप-मॅनेजिंग डायरेक्टर, कंपनी अॅक्ट फॉर्म नं.32 उमेश कुलकणी-रिटायरमेंट, को-ऑप.कोर्टाचे हुकूम सी.सी.एस्.873 व 874, तक्रारदार व सामनेवाला क्र.4 यांचेकधील नवीन विकास करारपत्र दि.03.08.2001, वटमुखत्यारपत्र दि.03.08.2001, सुधारित बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दि.07.07.2001 इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) सामनेवाला क्र.4 यांनी म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांची तक्रार मुदतीत नाही. तक्रारदारांना कराराप्रमाणे मिळकत विकसित करुन फलॅटचा ताबा दिलेला आहे. तसेच, इतर युनिटधारकांचे घोषणापत्राची नोंद प्रॉपर्टी कार्डास करुन खरेदीपत्रे करुन दिलेली आहेत. तथापि, रजिस्ट्रेशनसाठी येणा-या खर्चाची तयारी तक्रारदारांचेकडे नसल्याने व त्याची तरतूद करणेसाठी तक्रारदारांनी मुदत घेतली असल्याने तक्रारदारांना खरेदीपत्र करुन देता आले नाही. सदर सामनेवाला यांनी खरेदीपत्र करुन देणेत कोणतीही टाळाटाळ केलेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी. तसेच, खरेदी द्यावयाच्या फलॅट मिळकतीची सरकारी मुल्यांकनानुसार होणा-या रक्कमेनुसार रजिस्ट्रेशन कराव्या लागणा-या खर्चाची रक्कम सामनेवाला यांचेकडे जमा करणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला क्र.4 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ व्यंकटेश पतसंस्थेने दि.06.12.2007 रोजी दिलेल्या पत्र, वाद मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) तक्रारीत उल्लेख केलेल्या मिळकतीचे तक्रारदार हे मालक आहेत. सदर मिळकत तक्रारदारांनी विकसित करणेसाठी सामनेवाला यांना दिलेली होती व त्याबाबतचा विकसन करार तक्रारदार व सामनेवाला क्र.1 ते 4 यांचेमध्ये दि.14.09.1999 रोजी झालेला आहे. तसेच, सदरचा करार झालेनंतर दि.03.08.2001 रोजी नविन विकसन करारपत्र झाले आहे. तसेच, समनेवाला क्र.1 व 2 यांनी सामनेवाला, डी.सी.के.कन्स्ट्रक्शन या कंपनीचा राजीनामा दिलेला आहे व तशी वस्तुस्थिती असल्याने दि.03.08.2001 रोजीच्या करारपत्रामध्ये दि.14.09.1999 चा करार रद्दबातल केला आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. (9) सामनेवाला यांनी बांधकामामध्ये त्रुटी ठेवली असल्याचे कथन तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये केले आहे. पंरतु, तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनानुसार बांधकाम त्रुटीबाबत व सेवा-सुविधांबाबत सदनिकेचा ताबा घेतलेनंतर 9 वर्षांनी तक्रार दाखल केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24 (ए) यातील तरतुदीचा विचार करता त्रुटीबाबतची मागणी मुदतबाहय झाली असल्याने तक्रारदारांना त्याची मागणी करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारीत उल्लेख केलेली सदनिका क्र.5 चे नोंद खरेदीपत्र सामनेवाला यांनी केले नसल्याचे प्रतिपादन केले आहे. सदरनिकेचा ताबा तक्रारदारांना दिलेला आहे व सामनेवाला यांनी पार्ट परफॉरमन्स केलेला आहे. त्यामुळे जोपर्यन्त सदनिकेचे नोंद खरेदीपत्र होत नाही तोपर्यन्त प्रस्तुत तक्रारीस सातत्याने कारण घडत आहे. सामनेवाला क्र.4 यांच्या वकिलांनी युक्तिवादाचेवेळेस तक्रारदारांनी खरेदीखताचा नमुना दिलेला आहे, तो प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे व त्यानुसार नोंद खरेदीपत्र करुन देणेची तयारी दर्शविली आहे. परंतु, सामनेवाला यांनी करारानुसार विहीत वेळेत तक्रारदारांना सदनिकेचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी सामनेवाला कंपनीचा राजीनामा दिला असल्याने कराराची पूर्तता करुन देणेस सामनेवाला क्र.3 व 4 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार असतील या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्त विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.3 व 4 यांनी तक्रारदारांना करारात नमूद केलेल्या सदनिकेचे नोंद खरेदीपत्र करुन द्यावे. 3. सामनेवाला क्र.3 व 4 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला क्र.3 व 4 यांनी तक्रारदारांना तक्रारीपोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |