तक्रारदार : स्वतः
सामनेवाले : एकतर्फा.
आदेशः- श्री. एम.वाय. मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
न्यायनिर्णय
1. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून फ्रिज (प्रशीतक) विकत घेतला व काही वर्ष निर्दोष सेवा दिल्यानंतर त्यामध्ये बिघाड उत्पन्न झाला व तो दुरूस्त करता येत नाही असे सामनेवाले यांनी कळविल्यानंतर तक्रारदारानी ही तक्रार त्याकरीता दाखल केली. सामनेवाले यांना मंचानी पाठविलेली नोटीस प्राप्त झाली. परंतू, ते मंचासमक्ष उपस्थित न झाल्यामूळे त्यांच्या विरूध्द दि. 27/10/2015 ला तक्रार एकतर्फा चालविण्याबाबत आदेश पारीत करण्यात आला.
2 तक्रारदारानूसार त्यांनी सामनेवाले क्र 3 यांच्या कंपनीचा फ्रिज सामनेवाले क्र 1 यांच्याकडून रू. 38,500/-, अदा करून विकत घेतला. सामनेवाले यांच्यातर्फे वस्तुसाठी 1 वर्षाची व कॉम्प्रेसर करीता 5 वर्षाची वारंटी देण्यात आली. तक्रारदारानी हा फ्रिज दि. 07/06/2007 ला विकत घेतला होता दि. 29/06/2012 ला या फ्रिजमध्ये बिघाड उत्पन्न झाला. तक्रारदारानी याबाबत सामनेवाले यांच्याकडे तक्रार नोंदविली असता सामनेवाले क्र 2 यांचे तंत्रज्ञ तक्रारदारांकडे आले. परंतू, ते फ्रिज दुरूस्त करू शकले नाही. त्यानंतर, दि. 15/07/2012 ला दुसरे तंत्रज्ञ काही यंत्र घेऊन आले व तक्रारदारांचा फ्रिज आंतरीक शॉर्टमूळे बंद असल्याचे सांगीतले व दुरूस्तीकरीता त्याला कार्यालयामध्ये चर्चा करावी लागेल असे सांगीतले. परंतू तक्रारदारांच्या तकादयामूळे सामनेवाले क्र 2 यांनी दि. 05/03/2013 ला पत्र पाठवून फ्रिज दुरूस्त होऊ शकत नाही असे कळविले. तक्रारदाराप्रमाणे एवढी महागडी वस्तु जर थोडयाशा कालावधीनंतर दुरूस्त होत नसेल तर ती सेवामध्ये कसूर समजण्यात यावी. तक्रारदारानी बराचसा पाठपूरावा केल्यानंतर सामनेवाले क्र 3 यांनी त्यांच्या अभियंत्याला पाठविले व अभियत्यांनी फ्रिजचा कॉम्प्रेसर बदलावा लागेल असे सांगीतले. परंतू ते त्याबाबत वॉरंटी देण्यास तयार नव्हते. तक्रारदारांनी चौकशी केली असता इतर व्यावसायीक कॉम्प्रेसरकरीता वॉरंटी देण्यास तयार होते.
3. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 01/06/2013 ला नोटीस पाठवून फ्रिज दुरूस्ती करण्याबाबत कळविले. परंतू, त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. सबब, ही तक्रार दाखल करून तकारदारांनी सामनेवाले यांना नविन फ्रिज किंवा अदा केलेली रक्कम 12 टक्के व्याजासह, नुकसान भरपाई म्हणून रू. 1,00,000/-, व तक्रारीच्या खर्चासह अदा करावे अशी मागणी केली आहे. तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केले. तक्रारदारानी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले व त्यांना लेखीयुक्तीवाद दाखल करायचा नसल्याने त्यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
4. ही तक्रार निकाली काढण्याकरीता तक्रारदार नविन फ्रिजकरीता अथवा केलेला मोबदला व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत काय? हे पाहणे आवश्यक ठरेल. तक्रारदारांनी हा फ्रिज दि. 07/06/2007 ला विकत घेतला व या फ्रिजच्या वस्तुकरीता 1 वर्ष व कॉम्प्रेसरकरीता 5 वर्षाची वारंटी होती. वारंटी मुदत संपल्यानंतर फ्रिज मध्ये बिघाड उत्पन्न झाला. तक्रारीवरून वारंटीच्या कालावधीमध्ये बिघाड झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे फ्रिजमध्ये निर्मिती दोष होता हे म्हणण्यास वाव नाही.
5. या फ्रिजचे कसुन परिक्षण केल्यानंतर आतील वायरींग शॉर्ट झाल्यामूळे फ्रिज दुरूस्त करता येणार नाही असे कळविले. तक्रारदारांच्या मते एवढया महाग वस्तुबाबत ही बाब योग्य ठरत नाही. ग्राहकांच्या दृष्टीने विचार करता हे योग्य असल्याचे वाटते. परंतू हा अधिकार एक तर कायदयाप्रमाणे प्राप्त होतो किंवा कराराप्रमाणे. उभयपक्षांचा असा करार होता याबाबत अभिलेखात पुरावा नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अमर्यादित कालावधीकरीता निःशुल्क सेवा देण्यास मान्य केलेले नाही. सामनेवाले यांनी उदार भावनेने ख्याती मुल्याकरीता कॉम्प्रेसर निःशुल्क बदलवून देण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतू तक्रारदार यांना त्याबाबत वारंटी हवी होती. त्यामूळे हा प्रस्ताव प्रत्यक्षात अंमल होऊ शकला नाही. सबब,आमच्या मते सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा फ्रिज दुरूस्त न करून सेवा देण्यात कसुर केला असे म्हणता येणार नाही. वारंटी अवधी संपल्यानंतर सामनेवाले यांना त्याबाबत बाध्य करता येत नाही. असे आमचे मत आहे. त्याकरीता आम्ही मा. महाराष्ट्र राज्य आयोगानी अपील नं. 735 व 781/1997 मे.एस.आर. गंद्रे आणि इतर विरूध्द रमेशचंद्रजी कन्हैयालालजी श्रावगी आणि इतर निकाल दि. 30/07/1998 व (1999) 3 CPJ 566 मध्ये प्रकाशीत नि र्णयाचा आधार घेत आहोत.
6. उपरोक्त चर्चेनूसार व निष्कर्षानूसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
7. या मंचाचा कार्यभार व इतर प्रशासकिय बाबी विचारात घेता ही तक्रार यापूर्वी निकाली काढता आली नाही.
आदेश
- तक्रार क्र. 218/2014 ही खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निःशुल्क पाठविण्यात याव्या.
- अतिरीक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावे.
- npk/-