निकालपत्र :- (दि.13/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2, 3 त्यांचे वकीलांमार्फत उपस्थित राहून त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले.सामनेवाला क्र.1 यांना नोटीस लागू होऊनही ते मंचासमोर हजर नाहीत. तदनंतर सामनेवाला क्र.1 मयत झालेने त्यांचे वारसांना नोटीस बजावणी झालेली आहे. पोच कामात दाखल आहे. वारसांपैकी कोणीही हजर नाही. उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेने सेवा त्रुटी ठेवलेमुळे दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) तक्रारदार हे शेतकरी असून ते शेती व्यवसाय करतात. सदर शेती कामकाजासाठी त्यांनी सामनेवाला क्र.1 हया अधिकृत वितरकाकडून तीन प्लग पलटी सहीत ट्रॅक्टर खरेदी केला. सामनेवाला क्र.1 हे शेतीतील अवजारांबरोबरच तीन प्लग पलटी इत्यादीची विक्री करतात. सामनेवाला क्र.2 हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून ती नमुद ट्रॅक्टरची उत्पादनकर्ती व सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 चे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदाराने बँक ऑफ बडोदा शाखा नांदणी यांचेकडून रु.1,73,000/-प्रारंभीचा भरणा करुन रक्कम रु.7,00,000/-दि.09/10/2006 रोजी द.सा.द.शे.12टक्के प्रमाणे कर्ज घेतले. सामनेवाला क्र.1 यांनी नमुद बँकेकडे कोटेशन भरले. त्याप्रमाणे नमुद बँकेने सामनेवाला क्र.2 यांचे नांवे रक्कम रु.8,00,000/-ट्रॅक्टरकरिता व रक्कम रु.80,000/-तीन प्लग पलटी करता डी.डी.काढून तो सामनेवाला क्र.1 यांना दिला व तदनंतर सामनेवाला क्र.2 यांनी ट्रॅक्टर सिरीयल नं.158992 इंजिन नं.006930 व तीन प्लग पलटी तक्रारदारास डिलीव्हरी केली. नमुद ट्रॅक्टरने नांगरणी करीत असताना ट्रॅक्टरमध्ये नको वाटणारा आवाज येत होता व तो योग्यरित्या काम करत नसलेने सामनेवाला क्र.1यांचेकडे नेला असता त्यांनी ऑईल व डिस्क बदलून दिली. तदनंतर क्लच प्लेटसही बदलल्या तरीही ट्रॅक्टर योग्यरित्या काम करीत नसलेने बराच वेळ सामनेवाला यांचे गॅरेजमध्येच पडून असे.तक्रारदारास नमुद ट्रॅक्टरमध्ये वारंवार तांत्रिक दोष उत्पन्न होत असलेने तक्रारदारास दुरुस्तीसाठीच्या खर्चाबरोबरच तसेच वेळेत शेती कामकाजासाठी ट्रॅक्टरचा वापर होऊ शकला नाही.त्यामुळे तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. ब) तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेबरोबर विचारविनीमय केला व विचारविनिमय करुनही ट्रॅक्टरमधील दोष दुरुस्त होऊ शकले नाहीत. विचारान्ती सामनेवाला यांनी एकमेकांबरोबर विचारविनिमय करुन संपूर्ण रक्कम तक्रारदारास दयावी व तक्रारदाराने त्याचे नमुद कर्ज भागवावे असे ठरवले व त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी रक्कम रु.8,00,000/-व रु.80,000/-अनुक्रमे चेक क्र.553691व 553692व्दारे तक्रारदारास देऊन व नमुद चेक स्विकारुन तक्रारदाराने ट्रॅक्टर व पलटी सामनेवाला यांचे ताब्यात देऊन तशी पावती दिलेली आहे व सदरचा ताबा सामनेवाला क्र.2 यांचेवतीने सामनेवाला क्र.1 यांनी घेतलेला आहे. क) नमुद चेक वर नमुद बँकेत भरणा केला असता फंडस इन्सफिशिअंट अशा मेमो व पत्राने दि.21/02/2007 रोजी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने परत पाठवले. बँक ऑफ बडोदा यांनी नमुद चेक्स व मेमो तक्रारदारास दि.26/02/2007 रोजी कव्हरींग लेटरसह पाठवून दिलेले आहे. तक्रारदाराने व्याज भरावे लागू नये म्हणून रक्कम रु.2,20,000/- बँक ऑफ बडोदा मध्ये भरले होते. तदनंतर याबाबत सामनेवाला क्र.1 व 2 यांना दि.13/03/2007 रोजी वकील डी.ए.बेळंके यांचेमार्फत नोटीस पाठवली. तरीही सामनेवाला क्र.1 यांनी चेक्सची रक्कम अदा केली नाही. तर सदर नोटीसीस चुकीचे उत्तर पाठवून दिले. तक्रारदाराने चेक्स अनादर झालेने निगोशिएबल इन्स्ट्रूमेंटस अॅक्टखाली प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, यांचेसमोर तक्रार दाखल केली असता सामनेवाला क्र.1 व 2 यांना दंड झालेला आहे. सामनेवाला क्र. 1 व 2 हे चेक्सची रक्कमही देत नाहीत अथवा त्यांनी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर व पलटीही तक्रारदाराचे ताब्यात देत नाहीत. त्यामुळे सामनेवालांच्या बेजबाबदारपणा व सेवात्रुटीमुळे प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास सदर मंचात दाखल करणे भाग पडले. मे. मंचामध्ये सामनेवालांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे पिडीत होऊन तक्रारदाराने नमुद सामनेवालांविरुध्द तक्रार क्र.336/07 दाखल केलेली होती. मात्र प्रस्तुतची तक्रार ही गुणदोषावर निर्णित न करता दि.27/08/2008 रोजी काढून टाकणेत आलेली आहे. सबब प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत यावी. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना ट्रॅक्टरपोटीची रक्कम रु.8,00,000/-पलटीची रक्कम रु.80,000/- तसेच त्यावरील दि.23/01/2007 ते ऑगस्ट-08 अखेर व्याज रु.2,09,000/-व सदर कालावधीत नमुद ट्रॅक्टर नसलेने शेतीकामकाजासाठी दुस-या ट्रॅक्टरचा वापर करुन दयावा लागलेला खर्च व नुकसानीपोटी रु.80,000/-मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-वकील फी व खर्च इत्यादीपोटी रु.5,000/-असे एकूण रु.12,24,000/-द.सा.द.शे.15टक्के व्याजासह देणेचा हुकूम व्हावा अथवा नवीन ट्रॅक्टर व तीन प्लग पलटी दि.23/01/2007 पासून रु.8,80,000/-वरील होणा-या 15 टक्के व्याजासहीत देणेचा हुकूम व्हावा अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ बँक ऑफ बडोदा यांचेकडील खाते क्र.67457 चा खातेउतारा,तसेच खाते क्र.2007259 चा उतारा, नमुद बँकेचे कर्जाबाबतचे पत्रे, सामनेवाला क्र.1 यांचेकडून ट्रॅक्टर खरेदी केलेचे बील, सामनेवाला क्र.1 यांनी बँक ऑफ बडोदा यांचे नांवे चेक्स दिलेबाबतचे पत्र, सामनेवाला क्र.1 यांनी ट्रॅक्टर परत मिळालेबाबत तक्रारदारांना दिलेले पत्र, तक्रारदारास दिलेले दोन चेक्स, नमुद चेक्स खातेवर भरलेबाबतचे चलन, सदर चेक न वटलेबाबतचे मेमो, स्टेटबँकेचे कव्हरींग लेटर, बँक ऑफ बडोदाचे कव्हरींग लेटर, सामनेवाला क्र. 1 व 2 यांना पाठविलेली नोटीस त्यांचे आलेले उलट उत्तरी नोटीस, समरी क्रि.के.नं.406/07 चे कागदपत्रे, रि.अ.नं.9/08 मधील रिव्हीजन अर्ज, सदर कामी झालेला निकाल, तक्रारदाराने माहितीअधिकाराखाली रत्नाकर बँकेकडे दाखल केलेला अर्ज, नमुद बँकेचे आलेले उत्तर, तक्रारदाराने तक्रार क्र.336/07 व त्यावरील हुकूम, रोजनामा, तक्रारदार आजारी असलेबाबतचा दाखला, ऑपरेशन झालेबाबतचा दाखला, तक्रारदाराचे वडीलांचा मयताचा दाखला, सामनेवाला क्र.1 यांचेकडे ट्रॅक्टर दुरुस्त करुन घेतलेचे बील, तसेच सर्वोच्च न्यायालयाचा पुर्वाधार इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. तसेच तक्रारदाराने रिजॉइन्डर दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.2 यांनी दि.16/02/2009 रोजी विनंती अर्ज दिलेला होता व सामनेवाला क्र.2 न्यु हॉलंड ट्रॅक्टर इंडिया प्रा.लि. या कंपनीचे फियाट इंडिया प्रा.लि. मध्ये विलीनीकरण झालेले असून सदर कंपनीचे नांव न्यु हॉलंड फियाट (इंडिया)प्रा.लि. झालेले आहे असा अर्ज दिलेला होता सदर अर्जासोबत त्यांनी भारत सरकार कार्पोरेट कार्य मंत्रालय, कंपनी रजिस्टर कार्यालय, महाराष्ट्र मुंबई यांचे नावातील बदलाबाबतचे पत्र व अन्य कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला क्र.2 यांचा विनंती अर्ज तक्रारदारांनी दाखल केलेली पुरसीस, मे. मंचाने वेळोवेळी पारीत केलेले आदेश तक्रारदारांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला क्र.2 यांनी दि.16/02/2009 रोजी विनंती अर्जानुसार तक्रारदाराने मंचाचे दि.28/05/2009 चे आदेशानुसार सदर तक्रारीमध्ये दुरुस्ती करुन घेतलेली आहे व त्याप्रमाणे नमुद फियाट कंपनीस पक्षकार केलेले आहे. 2) दि.03/07/2009 रोजी तक्रारदाराने मे.मंचासमोर अर्ज देऊन सदर अर्जामध्ये तक्रार दाखल केलेपासूनच्या काळामध्ये तक्रारदारास सामनेवालांकडून सन2009न्यु हॉलंड 7500 4 डब्ल्यु डी चेसेस क्र.1116844 इंजिन क्र.034856 एन मिळालेमुळे सामनेवाला क्र.2 व 3 यांना वगळणेत यावे अशी विंनती केलेली होती व सदर दिवशी मे. मंचाने तक्रारदारास कोल्हापूरातील डिलर मार्फत नवीन ट्रॅक्टर वॉरंटी कार्डसह ताब्यात मिळालेमुळे तक्रारदाराची सामनेवाला क्र.2 व 3 यांचेविरुध्द कोणतीही तक्रार राहिली नसलेने सामनेवाला क्र.2 व 3यांना प्रस्तुत कामातून वगळणेचा आदेश पारीत केलेला आहे. 3) मुद्दा क्र.2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराने नमुद निकाल पारीत करणेपूर्वीच सामनेवाला क्र. 2 व 3 यांना प्रस्तुत कामातून वगळणेचा अर्ज दिला तो मंजूर करणेत आला. सदर आदेशानुसार तक्रारदारास नमुद कंपनीचा नवीन ट्रॅक्टर वॉरंटी कार्डसह ताब्यात मिळालेमुळे तसेच त्यांना प्रस्तुत कामातून वगळलेने त्यांचेविरुध्दची कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
4) सामनेवाला क्र.1 यांनी व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांना पाठवलेल्या पत्रामध्ये तक्रारदारचे नांवावरील न्यु हॉलंड ट्रॅक्टर्स प्रा.लि. यांचे नांवे काढलेला डी.डी. ट्रॅक्टरच्या समस्येमुळे ट्रॅक्टर जमा करुन घेतलेला आहे व नमुद डी.डी. नंबर 347594 व 347595 अनुक्रम रक्कम रु.8,00,000/-व रु.80,000/- दि.15/02/2007 रोजी परत करत आहे असे नमुद केले असून रक्कम रु.8,00,000/-चा डी.डी. हा न्यु हॉलंड ट्रॅक्टर प्रा.लि. यांचे नांवे तर रु.80,000/-मे.चौगुले ट्रॅक्टर्सचे नांवे मिळालेबाबतचे दिसून येते. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी दि.23/01/2007 रोजी तक्रारदारास दिलेल्या पत्रामध्ये ट्रॅक्टर सिरीयल नं.158992 इंजिन नं.006930 एन ट्रॅक्टर चालवलेले एकूण तास 327 सदर ट्रॅक्टर त्यांचेकडे पोच झालेबाबत नोंद केलेली आहे. प्रस्तुत तक्रारीत तीन प्लग पलटी ही सामनेवाला क्र.2 यांनी उत्पादित केलेली नसून सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादित केलेले शेती अवजार आहे. प्रस्तुत कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाला क्र.1 यांनी ट्रॅक्टर त्यांचे ताब्यात दिलेबाबतची पोच दिसून येते. नमुद पलटीत दोष होता असे तक्रारीत कुठेही नमुद केलेले नाही. तसेच ट्रॅक्टर ताब्यात दिलेबाबत सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास लेखी पोच दिलेचे दिसून येते तशीच नमुद तीन पलटी त्यांचे ताब्यात दिलेबाबत कोणताही लेखी पोच प्रस्तुत प्रकरणी दिसून येत नाही. सबब याबाबत कोणताही स्वयंस्पष्ट पुरावा तक्रारदाराने सदर मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 हे मयत झालेने वारस मुदतीत रेकॉर्डवर आणलेले असून त्यास परवानगी दयावी असा विनंती अर्ज दि.29/07/2009 रोजी दिलेला होता. सदर अर्जावर सामनेवाला यांनी म्हणणे दयावे असा आदेश दि.05/08/2009 रोजी पारीत केलेला होता.मात्र तक्रारदाराने मूळ तक्रार अर्जामध्ये निशानी क्र.1 वर वारसांच्या नोंदी केल्याचे दिसून येत नाही. मात्र दुरुस्तीची प्रत दाखल करुन त्याप्रमाणे वारसांना नोटीसा काढलेल्या आहेत. नोटीसा त्यांना लागू झालेल्या आहेत. मात्र ते हजर नाहीत. तक्रारदार सामनेवाला क्र.1 यांचे ताब्यात पलटी दिलेची बाब सिध्द करु शकलेला नाही. तसेच सामनेवाला क्र.1 हे मयत झालेले आहेत. सबब सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्दच्या मागण्या मान्य करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
4) सबब तक्रारदारास सामनेवाला क्र.2 व 3 यांचेकडून नवीन ट्रॅक्टर मिळालेला आहे.तसेच सामनेवाला क्र.1 यांचे ताब्यात पलटी दिलेची बाब सिध्द झालेली नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार निकाली काढणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते. 2) खर्चाबद्दल काहीही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |