Dated The 29 Mar 2016
न्यायनिर्णय
(द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
- तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून टाटा इंडिगो या वाहनाची पॅकेज पॉलिसी दि. 04/01/2010 ते दि. 03/01/2011 या कालावधीची घेतली असून रक्कम रु. 6,092/- एवढा विमा पॉलिसीच्या प्रिमियमपोटी सामनेवाले यांचेकडे भरणा केल्यानंतर तक्रारदारांना सदर वाहनाची “Own damages” अंतर्गत विमा पॉलिसी देण्यात आली.
- तक्रारदारांच्या वाहनाचा दुर्देवाने दि. 23/03/2010 रोजी मुंबई गोवा रोडवर अपघात झाला. सदर अपघातामध्ये तक्रारदारांच्या वाहनाचे पूर्णतः नुकसान झाले. सदर अपघाताची माहिती संबंधित पोलिस स्टेशनला तसेच सामनेवाले यांना फोनवर तात्काळ दिली. सामनेवाले यांचे सर्व्हेअर यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहनाची तपासणी केली, फोटो घेतले.
- तक्रारदारांना वाहनाच्या नुकसानीचा विमा प्रस्ताव सामनेवाले यांचेकडे दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी सदर प्रस्तावावर कार्यवाही केली नाही. तक्रारदारांना याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
- सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार सामनेवाले यांना विमा पॉलिसी मान्य आहे. तक्रारदारांनी सदर वाहन भारत सांगळे यांना ब-याच कालावधीपूर्वी विक्री केले आहे. प्रस्तुत वादग्रस्त वाहनाचा कायदेशीर मालकी हक्क तक्रारदारांकडे नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करण्याबाबत Locus Standi नाही. अपघाताचेवेळी वादग्रस्त वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते. वादग्रस्त वाहनाची बसण्याची क्षमता 5+(driver) प्रवाशांकरीता असून अपघाताचेवेळी 6 प्रवासी +1 driver अशा एकूण 7 व्यक्ती प्रवास करत होत्या.
- सामनेवाले यांचे सर्व्हेअर यांनी अपघाताचे घटनास्थळी भेट देऊन वाहनाची तपासणी केली व सर्व्हेअर अहवाल दि. 30/03/2010 रोजी सामनेवाले यांचेकडे दाखल केला. वादग्रस्त वाहनाच्या ड्रायव्हरजवळ अपघातचेवेळी गाडी चालविण्याकरीता ड्रायव्हींग लायसन्स नव्हते. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी मोटार वाहन कायदयातील तरतुदीचा भंग केला आहे.
- तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, सामनेवाले यांची लेखी कैफियत,पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे मंचाने वाचन केले. सामनेवाले यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार तोंडी युक्तीवादासाठी गैरहजर असल्यामुळे उपलब्ध कागदपत्रांच्याआधारे प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले.
- तक्रारीतील दाखल कागदपत्रे व वकीलांचा युक्तीवाद यावरुन मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढीत आहेः
- कारणमिमांसाः
- तक्रारदारांची विमा पॉलिसी दि. 04/01/2010 ते दि. 03/01/2011 या कालावधीची असून अपघात दि. 23/03/2010 रोजी विमा कालावधीत झाला आहे.
ब. सामनेवाले यांचे सर्व्हेअर यांनी अपघाताचेवेळी घटनास्थळी भेट देऊन वाहनाची तपासणी केली, फोटो घेतले व सर्व्हेअर अहवाल दि. 30/03/2010 रोजी सामनेवाले यांचेकडे दाखल केला. सर्व्हेअर अहवालाची प्रत मंचात दाखल आहे.
क. तक्रारदारांनी सदर अपघातची माहिती संबंधित पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केल्याबाबत सर्व्हेअर अहवालामध्ये नमूद केले आहे. परंतु पोलिस पेपर्सच्या प्रती प्राप्त नसल्याचे नमूद आहे.
ड. तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणात अपघातासंदर्भातील पोलिस पेपर्स म्हणजेच एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा वगैरे दाखल केले नाही. अपघाताच्यावेळी वाहनाच्या ड्रायव्हरजवळ ड्रायव्हींग लायसन्स होते का? याबाबत स्पष्ट खुलासा होत नाही. सर्व्हेअर अहवालामध्ये ड्रायव्हींग लायसन्स उपलब्ध असल्याबाबत नमूद नाही. सामनेवाले यांनी लेखी कैफियतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी सदर वाहन इतर व्यक्तीला विक्री केल्याबाबत नमूद केले आहे. परंतु यासंदर्भातील Investigation Report मंचासमोर दाखल नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले यांचे सदरचे म्हणणे ग्राहय धरता येत नाही असे मंचाचे मत आहे.
इ. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या वाहनामध्ये बसण्याची 5+1 (Driver) व्यक्तींकरीता असूनही अपघाताचेवेळी वादग्रस्त वाहनामध्ये 6+1 (Driver) असे एकूण 7 व्यक्ती प्रवास करत होत्या. परंतु याबाबतचा पुरावा मंचात दाखल नाही.
ई. तक्रारीतील दाखल कागदपत्रे व सर्व्हेअर अहवालानुसार वादग्रस्त वाहनाचे अपघाताचेवेळी फिटनेस सर्टिफिकेट अस्तित्वात नसल्याचे दिसून येते. सदर फिटनेस सर्टिफिकेटचा कालावधी दि. 06/03/2010 रोजी संपुष्टात आलेला असून त्यानंतर यासंदर्भात तक्रारदारांना मोटर वाहन कायदयातील तरतुदीनुसार वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट मिळणेबाबत कोणत्याही्प्रकारची कार्यवाही केल्याबाबतचा पुरावा मंचात दाखल नाही.
यासंदर्भात मंचाने मा. राष्ट्रीय आयोगाच्या रिव्हीजन पिटीशन क्र. 2976/2006 (युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कं.लि. वि. त्रिलोक कौशिक) मध्ये दि. 09/11/2010 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाचा आधार प्रस्तुत प्रकरणामध्ये घेतला आहे. सदर न्यायनिवाडयामध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे.
It was incumbent on the insured to have valid permit and fitness certificate on the date of the accident amounts to fundamental breach not only policy condition but also breach of law.
सामनेवाले यांनी दाखल केलेल्या दि. 30/03/2010 रोजीच्या सर्व्हेअर अहवालानुसार वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट दि. 06/03/2010 रोजी संपुष्टात आल्याचे नमूद केले आहे. तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणात दि. 06/03/2010 नंतर वाहनाला फिटनेस सर्टिफिकेट असल्याबाबतचा पुरावा मंचात दाखल केला नाही. यावरुन अपघाताचेवेळी वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट अस्तित्वात नसल्याची बाब स्पष्ट होते.
उ. वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या वादग्रस्त वाहनाची अपघातात झालेली नुकसानीची जबाबदारी सामनेवाले यांचेवर येत नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले यांची सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही असे मंचाचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
आ दे श
- तक्रार क्र. 350/2010 नामंजूर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.