(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 25 नोव्हेंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
1. तक्रारकर्ता हा मे.नारायण बाझार याचे प्रोप्रायटर नामे श्री महेश नारायण तिडके हे सद्या ते दुकान चालवितात. तक्रारकर्ता याच्या दुकानात किराणा वस्तु व सौंदर्य प्रसादनाच्या वस्तु, धान्य इत्यादी वस्तुंचा ग्राहकांना विकतात. सदरची सेवा देतांना ग्राहकांना बिल देण्याकरीता व आपल्या दुाकानातून ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी त्यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे सॉफ्टवेअर संगणकात इंस्टाल करुन घेतले. सदर सॉफ्टवेअरची किंमत विरुध्दपक्ष यांनी रुपये 25,000/- सांगितले व विरुध्दपक्ष यांना रुपये 4,000/- देवून दिनांक 29.9.2011 रोजी पैशाचा भरणा केला. त्यानुसार विरुध्दपक्ष यांनी डेमो म्हणून 15 दिवसाचे अवधीमध्ये सॉफ्टवेअर चालविण्याचे प्रशिक्षणही करण्यात आले. विरुध्दपक्ष यांनी संगणकात सॉफ्टवेअर इंस्टाल केल्यानंतर ते सॉफ्टवेअर बरोबर चालत नसून वारंवार हँग होत होता, त्यामुळे तक्रारकर्त्याने 2 ते 4 वेळा विरुध्दपक्ष यांना सदरबाबत माहिती दिली. पहिल्यांदा विरुध्दपक्षाने याबाबत सुधारणा करुन सेवा पुरविली, परंतु त्यानंतर पुन्हा-पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवत राहिली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना वारंवार माहिती देवूनही त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारकर्त्याला मालाची विक्री करतांना अतिशय ञास सहन करावा लागला. या सर्व बाबीमुळे ग्राहकांना सेवा देतांना तक्रारकर्त्याला अतिशय ञास झाला, त्यामुळे कित्येक ग्राहक परत जाऊ लागले. परंतु विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे ऐकले नाही व सॉफ्टवेअर सुधारुन दिले नाही. जेंव्हा, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला सॉफ्टवेअरच्या किंवा इंस्टालमेंटकरीता विनंती केली, तेंव्हा त्यांनी पुन्हा रुपये 20,000/- अतिरिक्त मागणी केली व त्यासोबत पुन्हा सर्वीस टॅक्स लागेल असे सांगितले. ग्राहकाच्या असुविधेचा विचार करुन तक्रारकर्ता यांनी ताबडतोब दुस-या कंपनीकडून सॉफ्टवेअर विकत घेवून दुकानतले अस्वस्थ झालेले काम सुरळीत आणले व विरुध्दपक्ष यांनी सॉफ्टवेअरपोटी दिलेली रक्कम परत मिळण्याबाबत अधिवक्ता मार्फत दिनांक 4.3.2013 रोजी नोटीस बजावण्यात आली, त्यावर विरुध्दपक्ष यांनी नोटीसाला उत्तर देवून तक्रारकर्त्याच्या नोटीसाला धुडकावून काढले. सरते शेवटी तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1) विरुध्दपक्ष यांनी सेवेत ञुटी दिलेली आहे असे घोषीत करावे.
2) विरुध्दपक्ष यांनी रुपये 2,50,000/- एवढी रक्कम विरुध्दपक्ष यांना तक्रारकर्त्याला दरम्यानच्या काळात झालेले नुकसान ज्याचे एकूण कालावधी 17 महिने असून त्यामध्ये तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी विरुध्दपक्षाने ती रक्कम अदा करावी. तसेच, तक्रारीचा खर्च द्यावा.
2. तक्रारकर्त्याचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष यांनी तक्रारीला उत्तर सादर करुन त्यात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याला त्यांनी सॉफ्टवेअरची सेवा दिली, ही बाब मान्य केली व ही बाब सुध्दा मान्य केले की, पूर्वी सॉफ्टवेअर चालविण्यात तक्रारकर्त्याला ञास झाला, परंतु त्यानंतर ते व्यवस्थीत चालत होते. पुढे आक्षेप नोंदवून असे नमूद केले की, तक्रारकर्ता हा व्यावसायी आहे व त्यामुळे तो ग्राहक या संज्ञेत बसत नाही व त्याची खोटी तक्रार खारीज करावी. तसेच, तक्रारकर्त्याला कोणत्या प्रकारचे नुकसान झाले याबद्दल कोणताही बाब स्पष्ट केली नाही. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने तक्रार मंचात घेवून आलेला नसून सत्यता ही वेगळीच आहे.
3. तक्रारकर्त्याने सप्टेंबर 2010 मध्ये सदरच्या सॉफ्टवेअर विकत घेतला त्या दरम्यानचे काळात विरुध्दपक्षाचे सॉफ्टवेअर कंपनी ही “Computex Consultancy Servcices” या नावाने भागीदारी होती. परंतु, दिनांक 6.10.2010 रोजी तक्रारकर्त्याकडून रुपये 10,000/- चा धनादेश घेवून 15 दिवसाकरीता सॉफ्टवेअर ट्रायल म्हणून देण्यात आले व त्यानंतर त्याचे समाधान झाल्यामुळे दिनांक 19.10.2010 रोजी सॉफ्टवेअरची उर्वरीत रक्कम रुपये 15,000/- मागितली. तेंव्हा तक्रारकर्त्याचे सॉफ्टवेअर बाबत समाधान झाले होते, त्यामुळे वार्षीक मेंटनन्सचा करार दिनांक 29.9.2011 रोजी पुढील वर्ष दिनांक 29.9.2012 पर्यंत करण्याकरीता तक्रारकर्त्याकडून रुपये 4,000/- चा धनादेश दिनांक 1.10.2011 रोजी घेण्यात आला. तक्रारकर्त्याचा करार हा दिनांक 30.9.2012 पर्यंतच होता, परंतु तक्रारकर्ता त्यापुढेही विरुध्दपक्षाकडून सेवा हवी असा हट्ट करीता होता. त्यामुळे विरुध्दपक्षाने सांगितले की, तक्रारकर्ता यांनी दिनांक 30.9.2012 रोजी विरुध्दपक्षाशी झालेला पूर्ण करार संपविला आहे आणि त्यामुळे पुढील वर्षाकरीता करारनामा करावा लागेल असे सांगितले असता, त्यांनी अभद्र भाषा वापरली व कोर्टात जाण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही बिनबुडाची आहे, त्याला विरुध्दपक्षाने कोणतीही सेवेत ञुटी किंवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारकर्त्याची तक्रार ही पूर्णपणे खोटी आहे, त्यामुळे सदरची तक्रार ही दंडासह खारीज करण्यात यावी.
4. तक्रारकर्त्याने तक्रारीबरोबर विरुध्दपक्ष यांना पाठविलेल्या कायदेशिर नोटीस व सॉफ्टवेअर मेंटनन्स चार्जेस विरुध्दपक्षास दिलेले दिनांक 29.9.2011 ची पावती व पुढे तक्रारकर्त्याने प्रतीउत्तरासोबत ‘तेहरी सॉफ्टवेअर कंन्सलटंसी’ यांचेकडून सॉफ्टवेअर दिनांक 13.6.2012 रोजी घेतल्याबाबतची रसीद पावती रुपये 20,000/- ची दाखल केली. विरुध्दपक्ष यांनी आपल्या लोखी युक्तीवादाबरोबर तक्रारकर्त्यांना पाठविलेले कायदेशिर नोटीसचे उत्तर दाखल केलेले आहे.
5. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी सदर प्रकरणात लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच दोन्ही पक्षांचा मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्षाने तक्रारदारास सेवेत ञुटी किंवा अनुचित व्यापार : नाही
प्रथेचा अवलंब केला असे सिध्द होते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही विरुध्दपक्ष कंपनीकडून तक्रारकर्त्याचे दुकानात ग्राहकाच्या सुविधेसाठी बिल मिळण्याकरीता व तसेच, दुकानातील स्टॉक व वस्तु यांचे स्टॉक मेंटन करण्यासाठी संगणकात सॉफ्टवेअर इंस्टाल करण्याची गरज असल्या कारणास्तव तो विरुध्दपक्षाकडून विकत घेतले होते व विरुध्दपक्ष कंपनीने संगणकात सॉफ्टवेअर चालविण्याकरीता सेवा दिली. परंतु, सॉफ्टवेअर योग्य पध्दतीने इंस्टाल झालेला नव्हता, करीता विरुध्दपक्ष कंपनीला वारंवार तक्रार केली व त्यांनी तक्रारकर्त्याला सेवा दिली नाही, अशी आहे. त्यावर विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याला पुरविलेले सॉफ्टवेअर हे हँग होत आहे असे कळविले व त्यानंतर त्यांना योग्य ती सेवा देवून त्यातील दोष दूर केले व सॉफ्टवेअर योग्य चालत होते. तक्रारकर्त्याने एकूण सॉफ्टवेअरची किंमत रुपये 25,000/- पैकी फक्त रुपये 4,000/- चा भरणा केला होता व मेंटनन्स सर्वीस ही पुढील वर्षी करीता वाढवून मागत होता. तेंव्हा विरुध्दपक्षाने त्यांना उर्वरीत सॉफ्टवेअरच्या रकमेची मागणी केली असता, त्यांनी अभद्र व्यवहार केला. त्यामुळे यात विरुध्दपक्षाचा कोणताही दोष नाही व तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. दोन्ही पक्षाचे युक्तीवाद ऐकल्यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांनी बसविले सॉफ्टवेअर योग्य इंस्टाल झालेले नाही याबाबत कोणताही पुरावा समोर आणला नाही. तसेच, सॉफ्टवेअरची मुळ रक्कम रुपये 20,000/- याबाबत फक्त रुपये 4000/- चा भरणा केलेला दिसून येतो व विरुध्दपक्षाने रुपये 10,000/- दिल्याचे मान्य केले आहे. तक्रारकर्त्यानेच दाखल केलेल्या तक्रारीबरोबर दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते व उर्वरीत रक्कम दिली नाही. तसेच तक्रारकर्त्याने पुढे रुपये 20,000/- चे दुसरे सॉफ्टवेअर ‘तेहरी सॉफ्टवेअर कन्सलटंसी’ यांचेकडून दिनांक 13.6.2012 ला विकत घेतले आहे, त्याचे बिल अभिलेखावर दाखल केलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नुकसान भरपाई रुपये 2,50,000/- मागितले आहे, परंतु एवढे नुकसान झाल्याबाबतचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. तसेच, तक्रारकर्त्याला ऑक्टोंबर 2010 मध्ये सॉफ्टवेअर लावून दिले व त्यानंतर दिनांक 13.6.2012 रोजी तक्रारकर्त्याने दुसरे सॉफ्टवेअर लावले, यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने दरम्यानच्या काळात मुदत संपेपर्यंत सॉफ्टवेअरचा वापर केला. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही पुरावा नसल्यामुळे खारीज होण्यास पाञ आहे.
करीता, सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 25/11/2016