-ः निकालपत्र ः- द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रारदाराची तक्रार खालीलप्रमाणे- तक्रारदार हा सामनेवालेचा ग्राहक असून सामनेवाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. सामनेवाले 2 हा सामनेवाले 1 चा प्रोप्रायटर असून सामनेवाले 3 हा मॅनेजर आहे. तक्रारदारास जागेची गरज होती. सामनेवाले हे तक्रारदारास हव्या असलेल्या ठीकाणी बांधकाम करत असल्याचे त्यास समजल्यामुळे त्याने आपल्या मित्रासोबत सामनेवालेची गाठ घेतली. सामनेवालेचे ऑफिस नमूद केलेल्या पत्त्यावर आहे. गाठ घेतेवेळी संतोष कापरे नावाचा मध्यस्थ होता. सामनेवालेचे कामोठेमधील प्लॉट नं.7, सेक्टर 16 मधील ओरिएंट एव्हेन्यूमध्ये बांधकाम चालू होते. सामनेवाले 3 ने तक्रारदारास असे सांगितले की, तो सामनेवाले 2 चे वतीने व्यवहार करतो. तक्रारदाराने सामनेवालेच्या वरील इमारतीत 540 चौ.फुटाचा बी 101 ची सदनिका घेण्याचे ठरवले. त्याचा दर रु.1850/- चौ.फुट होता. त्यावेळी सामनेवाले 3 ने त्यास असे सांगितले की, रु.सहा लाख दिले तर रु.1750/- दर लावू. त्याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवालेस 31-3-08, 2-4-08, 17-4-08 रोजी रु.1,00,000/-, रु.50,000/- रु.4,50,000/- अशा रकमा चेकने दिल्या. त्या रकमा सामनेवालेना मिळाल्या आहेत. सामनेवालेनी तक्रारदारास रजि.करार करण्याचे कबूल केले होते. ते 25-5-08 ला करणेचे होते. पण ते झाले नाही, त्यानंतर सामनेवालेनी तक्रारदारास या प्लॉटसंदर्भात 16-4-08 रोजी अलॉटमेंट लेटर देऊन पावती दिली. 2. तक्रारदार सामनेवालेच्या मागे अँग्रीमेंट टु सेल करणेबाबत प्रयत्नशील होता. पण सामनेवाले त्यास दाद देत नव्हते. ते या ना त्या कारणाने अँग्रीमेंट टु सेल रजिस्टर्ड करणेची टाळाटाळ करत होते. सामनेवाले 3 ने त्यास जून 08 मध्ये असे सांगितले की, सामनेवाले 2 ची सही अँग्रीमेंट वर होण्याची आहे तुम्ही त्यावर सही करा, मी त्याची सही घेईन. त्या सांगण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारानी त्यावर सही केली. सामनेवालेनी त्यास लवकरात लवकर अँग्रीमेंट करणेचे कबूल केलें पण ते झाले नाही, तक्रारदाराच्या मागणीवरुन सामनेवालेनी दिलेली झेरॉक्स प्रत या कामी दाखल आहे. सामनेवाले 2,3 ने या ना त्या कारणाने अडचणी सांगून टाळाटाळ केली आहे, प्रत्येक वेळी वाट पहाणेस सांगितली आहे. शेवटी 29-9-08 रोजी सामनेवाले 3 ने त्यास परस्पर असे सांगितले की, स्टॅम्प डयूटी व रजि.चार्जेसचे पैसे भरा, ते दिल्यावर अँग्रीमेंट रजिस्टर्ड करणेत येईल. त्याचे बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारानी त्यास चेकने पैसे दिले ते ही सामनेवालेस मिळाले आहेत. सामनेवालेने त्याप्रमाणे रजि.करार केला नाही. ते वारंवार टाळाटाळ करत राहिले. तक्रारदारानी त्याची अनेकदा गाठ घेतल्यावर त्याला नवीन हकीगत सांगितली ती म्हणजे प्लाट नं.7 बाबत प्लॉटचे मालकाशी अँग्रीमेट ट्रायपार्टी करायचे आहे, ते झाल्यावर 2-3 महिन्यात काम होईल असे सांगितले. अशा प्रकारे सामनेवालेनी तक्रारदाराची फसवणूक केली आहे. प्रत्येक वेळी भेट घेतली असता ते टाळाटाळ करत आहेत. सामनेवाले 2,3 ने त्यांचे बाबा शुक्ल नावाच्या सी.ई.ओ.ची गाठ घालून दिली. म्हणून तक्रारदारानी बाबा शुक्ल यास रजि.पत्राने रजि.करार करणेस विनंती केली. ते त्यास मिळाले आहे व या कामी दाखल आहे. 3. सामनेवालेनी असे सांगितले की, इमारतीचे काम करु नका. 2/09 मध्ये ताबा देऊ. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, कोणतेही काम चालू नाही. सामनेवाले नेहमीच खोटे आश्वासन देऊन फसवणूक करत आहेत. त्याने त्याचेकडून रु.सहा लाखाची रक्कम घेतली आहे. तक्रारदारानी सामनेवालेस विनंत्या करुन तो त्यांना दाद देत नाही. अशा प्रकारे सामनेवालेनी सेवेत त्रुटी दाखवलेली आहे. त्याचेकडून रु.6,82,000/- घेतली आहे. तक्रार दाखल केली त्या भागात साधारणपणे रु.2600/- ते 3500/- दर चालू आहे. अशा परिस्थितीत तेथे त्याला जर नवीन ब्लॉक् खरेदी करायचा असल्यास रु.18,00,000/- लागतील. वास्तविक तो नेहमीच तक्रारदारांचे बाकी पैसे देणेस तयार होता. पण सामनेवालेनी त्याचे नुकसान केले आहे. त्याला ताबा मिळाला असता तर त्याचे भाडयाचे पैसे वाचले असते. त्यामुळे तक्रारदारास ही तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदाराची अशी विनंती की, त्याने सामनेवालेस तक्रारीत नमूद सदनिकेचा रजि.करार करुन दयावा कारण त्याने रक्कम दिलेली आहे, तसेच सदनिकेचा ताबा त्यांना विनातक्रार दयावा. हे शक्य नसेल तर त्याने दिलेली रक्कम रु.6,82,000/- 21 टक्के व्याजाने परत करावी, तसेच त्याला नवीन सदनिका खरेदी करायचा असल्यास त्याला लागणारी जादा रक्कमही त्यांचेकडून मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.एक लाख मिळावेत व न्यायिक खर्चापोटी रु.पंधरा हजार मिळावेत. 4. तक्रारदारानी नि.2 अन्वये प्रतिज्ञापत्र दिले आहे. नि.4 वर ते ज्या कागदावर अवलंबून आहेत त्याची यादी दाखल केली आहे, त्यात प्रामुख्याने चेकच्या प्रती, दिलेली पत्रे, त्याची पोचपावती, अँग्रीमेंट टु सेलची प्रत, 30-9-08 रोजी दिलेला चेक, 23-11-09 चे लेटर पावतीसह, इ.कागद दाखल आहेत. 5. याकामी सामनेवालेना नोटीसा काढण्यात आल्या. त्या नोटीसा सामनेवालेनी घेण्याचे नाकारले म्हणून त्या रिफ्यूज्ड शे-याने परत आल्या आहेत. त्याना योग्य संधी देऊनही ते मंचाकडे आले नसल्याने मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश 6-7-10 ला पारित केला. 6. याकामी सुनावणीचे तारखेस सामनेवाले गैरहजर होते. तक्रारदारातर्फे वकील श्री.अनिल जाधव यांनी युक्तीवाद केला. त्यांनी मंचाला युक्तीवादात असे सांगितले की, त्यानी आपल्या तक्रारीतील विनंती कॉलम 31 मधील बी व सी या मागण्या सोडल्या आहेत कारण सामनेवालेकडून त्याना ताबा मिळण्याची शक्यता नाही. सबब त्यांनी भरलेले पैसे सव्याज परत करावेत. 7. तक्रारदारानी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली. तक्रारदारानी सामनेवालेस रु.6,82,000/-/ दिले आहेत. सामनेवालेनी त्यास भूलथापा दिल्या असल्याचे दिसून येते. त्याने तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र दिले आहे. या परिस्थितीत त्याचे म्हणणे अमान्य करणेसारखे काही कारण नाही. कोणत्याही प्रकारे सामनेवालेनी कथन नाकारलेले नाही. सामनेवालेनी त्यास दोषपूर्ण सेवा देत असून अनुचित व्यापारी प्रथाही अवलंबत आहेत, त्यांचे हे वर्तन निश्चितपणे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा अर्ज मंजूर करावा या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. तक्रारदारानी सदनिकेच्या मागण्या सोडून दिल्या आहेत. त्यांना मिळालेले पैसे व त्यांना जमीन खरेदी करायची झाल्यास जास्त रक्कम भरावी लागणार हे उघड आहे. नवी मुंबईसारख्या शहरात दिवसेंदिवस दर वाढत असतात. तेव्हा तक्रारदारास त्याचे मिळालेले पैसे मिळूनही काही उपयोग होणार नाही. त्याला जादा पैसे घालावयास लागणार आहेत. त्याला वेळीच जर सदनिका मिळाली असती तर त्याला हे नुकसान सोसावे लागले नसते व त्याच्या नुकसानीस सामनेवालेच जबाबदार आहेत. सदनिका वेळीच ताब्यात न मिळाल्याने त्याला भाडे पण भरावे लागत आहे. मुळातच त्याची कथने अमान्य करण्यासारखी नाहीत. याशिवाय त्याना झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी व न्यायिक खर्चापोटीही रक्कम मागितली आहे, त्या पण त्याला दयाव्यात या मताचे मंच आहे. 5. त्याला नवी सदनिका घेण्यासाठी जी जादा रक्कम दयावी लागणार आहे त्यासाठी त्याने रु.बारा लाखाची मागणी केली आहे. मंचाचे मते त्याने गुंतवलेली रक्कम सव्याज दिल्यानंतर नवी सदनिका खरेदी करणेसाठी सर्व विचार करता रु.दहा लाखाची रक्कम सामनेवालेनी देण्याचा आदेश दयावा या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 6. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे -ः आदेश ः- अ) सामनेवालेनी खालील आदेशाचे पालन वैयक्तिक व 1. तक्रारदारास त्यांनी त्याचेकडून घेतलेली रु.6,82,000/-ची रक्कम त्याला संयुक्तीकरित्या आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे- द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने त्याने घेतलेल्या तारखेपासून सर्व रक्कम परत करेपर्यंतच्या तारखेपर्यंत अदा करावी. 2. त्याला नवीन सदनिका खरेदी करण्यासाठी जी जादारक्कम भरावी लागणार आहे त्यापोटी त्याला सामनेवालेनी रु.10,00,000/- दयावेत. 3. शारिरीक, मानसिक त्रासापोटी त्याला रु.1,00,000/- (रु.एक लाख मात्र) तर न्यायिक खर्चापोटी रु.15,000/- दयावेत. वरील कलम 2,3 मधील रकमा त्यानी विहीत मुदतीत न दिल्यास द.सा.द.शे.10 टक्के दराने वसूल करण्याचा अधिकार तक्रारदारास राहील. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पाठवण्यात याव्यात. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि.14-3-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |