-निकालपत्र –
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारित दिनांक-15 फेब्रुवारी, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये विरुध्दपक्षा विरुध्द करारा प्रमाणे भूखंडाची खरेदी करुन न दिल्याचे कारणा वरुन मंचासमक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष नागपूर जिल्हयात बांधकाम व्यवसाय करीत असून भूखंड विकसित करुन विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय आहे आणि ते मे.बोंदाडे डेव्हलपर्स आणि बिल्डर्स या नावाने सदरचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याला स्वतःचे राहण्यासाठी भूखंडाची आवश्यकता असल्याने त्याने विरुध्दपक्षाशी संपर्क साधला. विरुध्दपक्षाचे मौजा रायपूर, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-45, खसरा क्रं-95 मध्ये प्रस्तावित ले-आऊट असून त्यामधील भूखंड क्रं-10 ज्याचे एकूण क्षेत्रफळ-1286 चौरसफूट, एकूण रुपये-5,14,400/- एवढया किंमतीत खरेदी करण्याचा करार तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष फर्म सोबत दिनांक-19/01/2013 रोजी केला. कराराचे वेळी तक्रारकर्त्याने बयाना दाखल नगदी विरुध्दपक्षास रुपये-1,00,000/- अदा केलेत व उर्वरीत रक्कम रुपये-4,14,400/- करार दिनांका पासून 36 महिन्या मध्ये प्रतीमाह रुपये-11,511/- प्रमाणे देण्याचे ठरले. कराराचे दिनांका पासून 36 महिन्याचे आत विक्रीपत्र नोंदवून देण्याचे ठरले. रजिस्ट्रीचा खर्च तसेच भूखंडाचे विकासशुल्काची रक्कम भरण्याची जबाबदारी ही खरेदीदाराची राहिल असेही करारनाम्यात ठरले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्षाकडे करारातील भूखंडापोटी खालील प्रमाणे रकमा भरल्यात व पावत्या प्राप्त केल्यात, ज्याचे विवरण “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे खालील प्रमाणे आहेग-
“परिशिष्ट-अ”
Sl.No. | Date | Receipt No. | Amount |
1 | 19/01/2013 | 693 | 1,00,000/- |
2 | 25/09/2014 | 3375 | 40,000/- |
| | Total | 1,40,000/- |
अशाप्रकारे तक्रारकर्त्याने दिनांक-25/09/2014 पर्यंत रुपये-1,40,000/- विरुध्दपक्षाकडे भरलेत आणि उर्वरीत रक्कम रुपये-2,74,400/- स्विकारुन (या ठिकाणी नमुद करण्यात येते की, तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीत नमुद केलेली उर्वरीत रक्कम रुपये-2,74,400/- ही चुकीची नमुद केलेली असून त्याऐवजी दाखल पावत्यांच्या प्रतींवरुन उर्वरीत भूखंडाची देय रक्कम ही रुपये-3,74,400/- एवढी हिशोबा प्रमाणे येते, त्यामुळे तेवढी देय रक्कम मंचा तर्फे हिशोबात धरण्यात येते) करारातील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास वारंवार विनंती विरुध्दपक्षास केली परंतु विरुध्दपक्षाने भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास टाळाटाळ केली. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दिनांक-18/07/2016 रोजीची वकिलाचे मार्फतीने कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्दपक्षाने नोटीसवर कोणतीही कार्यवाही केली नाही वा नोटीसला उत्तरही पाठविले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने करारा प्रमाणे न वागून आपल्या सेवेत त्रृटी ठेवली तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, त्यामुळे तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे विरुध्दपक्षा विरुध्द मागण्या केल्यात-
विरुध्दपक्षाने करारा प्रमाणे तक्रारकर्त्याचे नावे मौजा रायपुर, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-45, खसरा क्रं-95 मधील भूखंड क्रं-10 चे नोंदणीकृत विक्रीपत्र त्याचे नावे नोंदवून देऊन तसेच मोजमाप करुन ताबा देण्याचे आदेशित व्हावे. परंतु विरुध्दपक्षास असे करणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने करारातील भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,40,000/- द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षाला आदेशित व्हावे. याशिवाय झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/-तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) आणि क्रं-2) यांचे नाव आणि पत्त्यावर मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील झाल्या बाबत पोस्टाच्या पोच नि.क्रं-6 व 7 प्रमाणे अभिलेखावर दाखल आहेत परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) व विरुध्दपक्ष क्रं-2) तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपले लेखी निवेदन सुध्दा सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक-02/12/2016 रोजी तक्रारीत पारीत केला.
04. तक्रारकर्त्याने तक्रार सत्यापनावर दाखल केली. तसेच तक्रारीचे समर्थनार्थ भूखंड विक्री करारनामा प्रत, विरुध्दपक्षास करारातील भूखंडापोटी रकमा दिल्या बाबत विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित करण्यात आलेल्या पावत्यांच्या प्रती, विरुध्दपक्षास दिलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजिस्टर पोस्टाची पावती, विरुध्दपक्षास रजिस्टर पोस्टाची नोटीस मिळाल्या बाबत रजिस्टर पोचची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला आणि तक्रार व लेखी युक्तीवादालाच मौखीक युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली.
05. तक्रारकर्त्याची सत्यापना वरील तक्रार तसेच त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षाचे मौजा रायपूर, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-45, खसरा क्रं-95 मध्ये प्रस्तावित ले-आऊट मधील भूखंड क्रं-10 एकूण क्षेत्रफळ-1286 चौरसफूट, एकूण रुपये-5,14,400/- एवढया किंमतीत खरेदी करण्याचा करार विरुध्दपक्ष फर्म सोबत दिनांक-19/01/2013 रोजी केला. कराराचे वेळी तक्रारकर्त्याने बयाना दाखल नगदी विरुध्दपक्षास रुपये-1,00,000/- अदा केलेत व उर्वरीत रक्कम रुपये-4,14,400/- करार दिनांका पासून 36 महिन्या मध्ये प्रतीमाह रुपये-11,511/- प्रमाणे देण्याचे ठरले. कराराचे दिनांका पासून 36 महिन्याचे आत विक्रीपत्र नोंदवून देण्याचे ठरले. रजिस्ट्रीचा खर्च तसेच भूखंडाचे विकासशुल्काची रक्कम भरण्याची जबाबदारी ही खरेदीदाराची राहिल असेही करारनाम्यात ठरले. तक्रारकर्त्याने आपल्या या म्हणण्याचे पुष्टयर्थ दिनांक-19/01/2013 रोजी त्याच्यात आणि विरुध्दपक्ष फर्म मध्ये भूखंड खरेदी बाबत झालेल्या करारनाम्याची प्रत पुराव्या दाखल दाखल केलेली आहे,ज्यावरुन त्याचे या कथनास पुष्टी मिळते.
07. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने करारातील भूखंडापोटी करार दिनांक-19/01/2013 पासून ते दिनांक-25/09/2014 पर्यंत एकूण रुपये-1,40,000/- भरलेत, आपल्या या म्हणण्याच्या पुष्टयर्थ त्याने विरुध्दपक्ष फर्म तर्फे करारातील भूखंडापोटी वेळोवेळी रकमा मिळाल्या बाबत निर्गमित केलेल्या पावत्यांच्या प्रती पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत, ज्यावरुन तक्रारकर्त्याने करारातील भूखंडापोटी “परिशिष्ट- अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे करारातील भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रक्कम रुपये-1,40,000/- विरुध्दपक्षास दिल्याची बाब सिध्द होते.
08. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने करारा प्रमाणे उर्वरीत रक्कम रुपये-3,74,400/- स्विकारुन करारातील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास वारंवार विनंती विरुध्दपक्षास केली परंतु विरुध्दपक्षाने त्यास टाळाटाळ केली म्हणून त्याने विरुध्दपक्षास दिनांक-18/07/2016 रोजीची वकिलाचे मार्फतीने कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्दपक्षाने नोटीसवर कोणतीही कार्यवाही केली नाही वा नोटीसला उत्तरही पाठविले नाही, आपल्या या म्हणण्याचे पुराव्यार्थ तक्रारकर्त्याने कायदेशीर नोटीसची प्रत, रजिस्टर पोस्टाची पावती व पोच अभिलेखावर दाखल केली, ज्यावरुन तक्रारकर्त्याच्या या कथनास पुष्टी मिळते.
09. विरुध्दपक्षास करारातील भूखंडापोटी काही रक्कम मिळून तसेच करारा प्रमाणे उर्वरीत रक्कम स्विकारुन भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास तक्रारकर्त्याने वेळोवेळी विनंती करुनही तसेच दिनांक-18/07/2016 रोजीची तक्रारकर्त्याची कायदेशीर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही वा नोटीसला उत्तरही दिलेले नाही. तक्रारकर्त्याची तक्रार सत्यापनावर दाखल आहे. तसेच त्याने पुराव्या दाखल विरुध्दपक्षा तर्फे निर्गमित पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. विरुध्दपक्षास ग्राहक मंचा तर्फे पाठविलेली रजिस्टर नोटीस मिळूनही तो ग्राहक मंचा समक्ष हजर झाला नाही वा त्याने आपले बचावार्थ कोणतेही लेखी निवेदनही सादर केलेले नाही वा तक्रारकर्त्याने तक्रारीत त्याचे विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने करारा प्रमाणे न वागून आपल्या सेवेत त्रृटी ठेवली तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब सिध्द होते, त्यामुळे तक्रारकर्त्याला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
10. अशा परिस्थितीत विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला करारा प्रमाणे उर्वरीत रक्कम रुपये-3,74,400/- स्विकारुन त्याचे नावे करारातील भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देऊन मोजमाप करुन प्रत्यक्ष्य ताबा/ताबापत्र द्दावे परंतु काही कायदेशिर तांत्रिक कारणास्तव विरुध्दपक्षास तक्रारकर्त्याचे नावे करारातील भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देणे शक्य नसल्यास तक्रारीतील “परिशिष्ट- अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने करारातील भूखंडापोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये वेळोवेळी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,40,000/- सदर रकमा दिल्याचे दिनांकां पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह विरुध्दपक्षा कडून मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. त्याच बरोबर विरुध्दपक्षाने शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-7000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- तक्रारकर्त्याला द्दावेत.
11. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री पुनेश्वर नारायण तिघरे यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) मे.बोंदाडे डेव्हलपर्स आणि बिल्डर्स तर्फे प्रोप्रायटर बंडू गोपालराव बोंदाडे आणि विरुध्दपक्ष क्रं-2) बंडू गोपालराव बोंदाडे, प्रोपायटर मे.बोंदाडे डेव्हलपर्स आणि बिल्डर्स यांचे विरुध्द “वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या” अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्षास आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्याशी दिनांक-19/01/2013 रोजी केलेल्या भूखंड विक्री बयानापत्रा प्रमाणे तक्रारकर्त्या कडून उर्वरीत रक्कम रुपये-3,74,400/- (अक्षरी रुपये तीन लक्ष चौ-याहत्तर हजार चारशे फक्त) प्राप्त करुन भूखंड करारनाम्या नुसार मौजा रायपूर, तहसिल हिंगणा, जिल्हा नागपूर येथील पटवारील हलका क्रं-45, खसरा क्रं-95 मधील भूखंड क्रं-10, एकूण क्षेत्रफळ 1286 चौरसफूट भूखंडाचे विक्रीपत्र त्याचे नावे नोंदवून देऊन, भूखंडाचे प्रत्यक्ष्य मोक्यावर मोजमाप करुन ताबा देऊन ताबापत्र द्दावे. तसेच करारनाम्या नुसार विक्रीपत्रासाठी लागणारे मुद्रांकशुल्क आणि नोंदणीशुल्काचा खर्च तसेच शासनमान्य देय विकास शुल्काचा भरणा तक्रारकर्त्याने करावा
(03) काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे विरुध्दपक्षास तक्रारकर्त्याचे नावे भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने करारातील भूखंडापोटी विरुध्दपक्षास तक्रारीतील “परिशिष्ट अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे त्या-त्या रकमा दिल्याचे दिनांकां पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह येणा-या रकमा तक्रारकर्त्याला द्दाव्यात.
(04) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-7000/- (अक्षरी रुपये सात हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला द्दावेत.
(05) सदर निकालपत्रातील आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.