निकालपत्र :- (दि.20/11/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत उपस्थित झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 व 2 यांचा लेखी युक्तीवाद दाखल. तक्रारदारचा व सामनेवाला वकीलांचा युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेने सेवा त्रुटी ठेवलेमुळे दाखल केलेली आहे. (02) प्रस्तुत सामनेवाला क्र.2 न्यु हॉलंड ट्रॅक्टर्स (ईस्ट) प्रा.लि. कंपनीचे विलीनीकरण झालेने सदर कंपनीचे नांव न्यु हॉलंड फियाट(इंडिया) प्रा.लि. असे झालेले असलेने दि.09/06/2009 रोजी सामनेवाला क्र. 2 व 3 तर्फे दिलेल्या अर्जानुसार तक्रारदाराने सदर नावांत दुरुस्ती करणेबाबत अर्ज दिला होता वत्यानुसार मंचाचे दि.09/06/2009 चे आदेशानुसार दुरुस्ती करणेत आली. (03) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) प्रस्तुत तक्रारीतील सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 कंपनीचे ट्रॅक्टर विक्रेते आहेत व सामनेवाला क्र.3 हे नमुद सामनेवाला क्र.2 कंपनीचे डीजेएम आहेत. सामनेवाला क्र.3 हे सर्व्हीस संबंधीत असलेने त्यांना फॉर्मला पार्टी केलेले आहे. ब) तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 कंपनीचा न्यु हॉलंड ट्रॅक्टर 5500 टीटीविथ ऑक्झलरी व्हॉल्व 55 एच.पी.फ्रंट टायर 7 x 50x 16 रियर टायर 16 x 9 x 28 विथ ग्राऊंट स्पिड पी.टी.ओ.(155703)या मॉडेल ट्रॅक्टर व त्याबरोबर रोटावेटर व हायड्रोलिक डबल पल्टी यातील सामनेवाला क्र.1 यांचेकडून दि.08/01/2008 रोजी रक्कम रु.6,70,000/-इतक्या रक्कमेचा बॅंक ऑफ बडोदा या बॅकेचा डीडी देऊन खरेदी केलेला आहे. क) सदरचा ट्रॅक्टर घेतलेपासून ट्रॅक्टरचे कार्य सुस्थितीत नव्हते. ट्रॅक्टर वापरावयास चालू केले नंतर नमुद ट्रॅक्टर हा ओरिजीनल फिटींगप्रमाणे म्हणजेच मॉडेल नं.155703 प्रमाणे नाही तसेच सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना आजतगायत सर्व्हीससुध्दा दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांना देण्यात येणा-या सर्व्हीसबद्दल माहिती नाही. सदर ट्रॅक्टरमध्ये अनेक त्रुटी होत्या व आहेत त्यामुळे त्याबाबत सामनेवाला क्र.1 यांना वेळोवेळी लेखी कळवलेले आहे. नमुद ट्रॅक्टर हा इन्व्हाईसप्रमाणे देण्यात आलेला नाही. सदर ट्रॅक्टरमध्ये कंपनी फिटींगप्रमाणे ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ.(155703) प्रमाणे अस्तित्वात नव्हते. त्याबाबत सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांनी चुकीची सेवा दिलेचे फॅक्सने कळवलेले आहे. सदर तक्रारीनंतर आजतगायत ट्रॅक्टरचा वापर करता आलेला नाही. ट्रॅक्टरमधील दोषाबाबत तक्रार केलेनंतर ट्रॅक्टर वर्कशॉपला घेऊन येण्यास सांगितलेल्या पत्रास तक्रारदाराने सदर ट्रॅक्टरची फिल्डवर येऊन तपासणी करणेबाबत उत्तर दिलेले आहे. तदनंतर सामनेवाला क्र.1 यांचे अधिकारी(बोगस) येऊन ट्रॅक्टरची तपासणी केली. मात्र तक्रारीचे निवारण केलेले नाही. त्यामुळे दि.03/06/2008, 09/06/2008 रोजी सामनेवाला क्र.2 यांना फॅक्सने कळवले. सामनेवालांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदाराचे नुकसान झालेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी यातील तक्रारदारास ट्रॅक्टर बदलून देणेची हमी दिलेली होती.मात्र त्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारदाराने त्यांना अॅड.ए.ए.पाटील यांचेमार्फत नोटीस पाठवली होती. त्यावेळी सामनेवाला क्र.1 हे स्वत: तक्रारदारास भेटून ट्रॅक्टरमधील त्रुटी दुर करुन देणेचे आश्वासन दिले. तसेच ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. फॅसिलीटी नसलेचे कबूल करुन सदर पी.टी.ओ. बसवून देतो असे कबूल केले. सदरचा पार्ट हा कंपनी फिटींगप्रमाणे मागितला होता. त्यामुळे तक्रारदाराने त्यास नकार दिला व कंपनी फिटींगप्रमाणे व इन्व्हाईसप्रमाणे ट्रॅक्टर बदलून देण्यास सांगितले. त्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतलेने दि.16/12/2008 रोजी अॅड. एस.एम.पाटील यांचेमार्फत नोटीस पाठवली. त्याची दखल सामनेवाला यांनी घेतलेली नाही. सामनेवालांच्या या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास ट्रॅक्टर वापरता आला नाही. उलट शेतीची कामे करण्यासाठी भाडयाने ट्रॅक्टर घ्यावा लागला. त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच प्रस्तुतचा ट्रॅक्टर हा कर्जप्रकरण करुन घेतलेला आहे. सदर कर्जाचा बोजा वाढत आहे. सामनेवाला यांनी खोटे आश्वासने दिली. मात्र ट्रॅक्टरमधील त्रुटीचे निरसन करुन दिलेले नाही अथवा ट्रॅक्टरही बदलून दिला नाही. त्यामुळे प्रस्तुतचा अर्ज दाखल करणे भाग पडले. सबब ट्रॅक्टरमधील दोषामुळे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.4,00,000/- कर्जावरील व्याजाची रक्कम रु.90,450/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.6,000/-, मानसिक व शारिरीक त्रासाचा खर्च रु.25,000/- असे एकूण रक्कम रु.5,21,450/- वसुल होऊन मिळावेत तसेच तक्रारीतील नमुद वर्णनाचा ट्रॅक्टर बदलून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (04) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला क्र.1 यांनी ट्रॅक्टरच्या मॉडेलसंबंधी व सोबत दयावयाच्या औजारासंबंधीचे पत्र, ट्रॅक्टरचे इनव्हाईस, सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 ची फॅक्सने केलेली तक्रार, सामनेवाला क्र.1 चे तक्रारदारास पत्र, तक्रारदाराने सामनेवाला क्र.1, 2 यांना दिलेले पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, त्याच्या पोष्टाच्या रिसीट, नोटरी केलेल्या अस्सल पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (05) सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार- अ) तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीत कथने चुकीची व खोटी, तक्रार अर्जातील कलम 1 ते 10 मधील मजकूर चुकीचा आहे. सदर मजकूर सामनेवाला यांना मान्य नाही. सामनेवालांकडून पैसे उकळण्याच्या दु्ष्ट हेतुने सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. कलम 11 मधील मागणी मान्य करता येणार नाही. तक्रारदार हा स्वच्छ हाताने सदर मंचासमोर आलेला नाही. सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सामनेवालांनी तक्रारदारांना ट्रॅक्टरची विक्री केली असून विक्री पश्चात नियमानुसार आवश्यक असणारी सर्व सेवा पुरविलेली आहे. आर्थिक लाभ करुन घेणेचे एकमात्र दुषित हेतुने सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने सत्य वस्तुस्थिती कोर्टापासून लपवून ठेवली आहे. सबब ती चालणेस पात्र नाही. ब) सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती अशी आहे, सामनेवाला यांचेकडे दोन कंपनीची डिलरशिप असून तक्रारदाराशी सामनेवालांचे ओळखीचे व मैत्रीचे संबंध होते. तक्रारदारास ट्रॅक्टर खरेदी करणेचा होता. त्यामुळे त्यांने सामनेवाला क्र.1 शी संपर्क साधला व ट्रॅक्टरसंबंधीची सर्व आवश्यक माहिती सामनेवालांनी तक्रारदारास पुरवली. तक्रारदाराने ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. असणा-या ट्रॅक्टरसबंधी विचारणा केली असता ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ.गिअर न्यु हॉलंड मॉडेल 155703 यास कंपनी फिटींगसह येत असलेची कल्पना देऊन सदर गीअर पंजाब व हरियाणा या विभागामध्ये गहू कापणीसाठी मशीन वापरतात व त्याचा अन्य बाबत वापर होत नाही. त्यामुळे सदर मॉडेल कोल्हापूर विभागामध्ये वापर होत नसलेने उपलब्ध होऊ शकणार नाही. मात्र तक्रारदार यांना हवा असलेला सदर ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. 155703 हा गीअर कंपनीकडून मागवून कंपनीचे 55एच.पी.ट्रॅक्टरला फिटींग करुन देऊ शकू याबाबत सर्वतोपरी कल्पना दिली. सर्व बाबी समजावून घेऊन तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडे न्यु हॉलंड मॉडेल ट्रॅक्टर बुकींग केला व कंपनीकडून ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. मागवून तो ट्रॅक्टरमध्ये फिटींग करुन मिळावा अशी विनंती केली व त्याप्रमाणे व्यवहार ठरला. क) सदर व्यवहाराप्रमाणे नमुद ट्रॅक्टर व त्यास नमुद गिअरसह किंमत रु.6,50,000/-तसेच रोटाव्हेटर रु.1,25,000/-हायड्रोलिक डबल पल्टी किंमत रु.1,25,000/- याप्रमाणे स्थानिक बनावटीची अवजारांसह एकूण रक्क्म रु.8,95,000/- ला व्यवहार ठरला व सदर ठरलेल्या व्यवहारानुसार दि.14/01/2008 रोजी ट्रॅक्टरची डिलीव्हरी दिली. सदर व्यवहारापोटी तक्रारदाराने आजतागायत फक्त रक्कम रु.6,70,000/- इतकीच रक्कम अदा केलेली आहे व उर्वरित रक्कम अदयाप येणे बाकी आहे. सदर ट्रॅक्टरच्या खरेदीपूर्वी सामनेवाला यांनी तक्रारदारास डेमो पिस म्हणून शेती कामकाजासाठी ट्रॅक्टर दिलेला होता व सर्व खातरजमा करुन घेऊनच प्रस्तुत तक्रारीतील नमुद ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे. विक्रीपश्चात सेवाही दिलेली आहे. ड) तक्रारदारास ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे ट्रॅक्टर व अवजारांची डिलीव्हरी दिलेली आहे व दि.15/12/2008 रोजी ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. संपूर्ण किट मागवून घेऊन प्रत्यक्ष अदा केलेले आहे. तसेच विक्रीपश्चात सेवा देऊन ट्रॅक्टरची सर्व्हीस करुन दिलेली असून त्याकामी किरकोळ व आवश्यक दुरुस्ती तथा ऑईल अगर वेळोवेळी घेतलेल्या साहित्याचे बील तक्रारदाराने भागवलेले नाही. ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला तसेच ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. नसलेने ट्रॅक्टर वापरता आला नाही त्यामुळे आर्थिक नुकसान झाले ही विधाने खोटी आहेत. वादाकरिता सदर ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. फिटींग केला नाही असे मानलेतरी ट्रॅक्टरच्या इंजिन क्षमतेवर अथवा कार्यक्षमतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. इ) तक्रारदार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून ट्रॅक्टर खरेदी केलेनंतर वेळोवेळी दमदाटी करुन दबाव तंत्राचा वापर करुन सर्व्हीस बिलाचे पैसे न देता सेवा करुन घेतलेली आहे. तसेच उर्वरित बिलाची रक्कमही येणे बाकी आहे. तसेच दि.11/12/2008 रोजी तीन फणी सरी रेझर खरेदी केलेला असून त्याचीही रक्कम दिलेली नाही. सामनेवाला क्र.1 यांचे मैत्रीचा व भोळेपणाचा वेळोवेळी फायदा घेऊन व फसवणूक करुन मैत्रीखातर तंबाखू व केळीच्या पिकातून मोठी रक्कम येणार आहे व तुमची सर्व रक्कम भागवतो असे सांगून वेळोवेळी बरीच रक्कम उचल केली आहे. तक्रारदार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असलेने वारंवार पोलीस केसमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे तो दहशत करीत असलेने प्रस्तुतच्या देय रक्कमा सामनेवाला तक्रारदाराकडून वसूल करु शकलेले नाहीत अशी वस्तुस्थिती असतानाही तक्रारदाराने प्रस्तुतचा वाद हा केवळ देणे लागत असलेली रक्कम बुडवणिचे उद्देशाने केलेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. सामनेवाला क्र.1 यांची नाहक फसवणूक करुन खर्चात पाडलेने कॉम्पेसेंटरी कॉस्ट म्हणून तक्रारदाराने सामनेवाला यांना रक्कम रु.25,000/- देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केलेली आहे. (06) सामनेवाला क्र.1 यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ तक्रारदाराला खरेदीपूर्व ट्रॅक्टर डेमो वापराकरिता दिलेबाबतचे पत्र, तक्रारदाराने ट्रॅक्टर खरेदी केलेचे बील, बँक ऑफ बडोदा यांचे रक्कम रु.4,87,500/- व रु.1,82,500/- जमा केलेबाबतचे पत्र, र्टॅक्टरसोबत अॅक्सेसरीज दिलेबाबतचे डिलीव्हरी चलन,तक्रारदाराला सर्व्हीस दिलेबाबतची जॉबकार्डच्या प्रती, सामनेवाला यांनी तक्रारदारांशी केलेला पत्रव्यवहार, तक्रारदार यांना पुरविलेल्या क्रेडीट मालाचा मेमो, तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडून घेतलेले रक्कम रु.55,000/- चे व्हौचर, ट्रॅक्टर दिलेबाबतचे फोटोग्राफ, तक्रारदार यांना ग्राऊंड स्पीड पी.टी.ओ. गिअर फिट ठरलेप्रमाणे दिलेबाबतचा मेमो, डुप्लीकेट वॉरंटी बुकलेट इत्यादी कागदपत्रे व शपथपत्र दाखल केले आहे. (07) सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रार अर्जातील सर्व कथने चुकीची, खोटी असलेने नाकारलेली आहेत. सामनेवाला क्र.2 विरुध्द तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाला क्र.2 हे कंपनीस स्वतंत्र कायदेशी अस्तित्व असलेने सामनेवाला क्र.2 चे जनरल मॅनेजर यांना सामनेवाला क्र.3 म्हणून पक्षकार केलेले आहे ते कायदयाचे दृष्टीकोनातून योग्य नाही. सबब प्रस्तुतची तक्रार फेटाळणेस पात्र आहे. प्रस्तुतची तक्रार आर्थिक फायदा उकळण्याच्या दृष्टीने दाखल केलेली आहे. तसेच प्रस्तुतची तक्रार अधिकार क्षेत्राच्या आधारावरही फेटाळणेस पात्र आहे. तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूर चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. सबब तो नाकारत आहे. कलम 2 मधील कर्जाबाबतच्या मजकूराबाबत सामनेवाला अनभिज्ञ आहेत. सबब त्याबाबत भाष्य करीत नाहीत. तक्रार अर्ज कलम 4 ते 6 मधील मजकूर नाकारलेला आहे. तसेच कलम 8 ते 10 मधील मजकूर नाकारलेला आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रे सामनेवाला यांना मान्य व कबूल नाहीत. तक्रारदाराने केलेली मागणी देणेस सामनेवाला जबाबदार नाहीत. सामनेवाला क्र.2 यांचे शाखा कार्यालय सदर मंचाचे अधिकार क्षेत्रात नसलेने सदर तक्रार मंचाचे अधिकार क्षेत्राबाहेरील आहे. तसेच प्रस्तुतची तक्रार मुदतीत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. सामनेवाला कंपनी न्यु हॉलंड या नावाखाली ट्रॅक्टरची विक्री करीत असते. सामनेवाला क्र.1 हे त्यांचे Non Exclusive Authorised Dealer आहेत. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 व 2यांचेमध्ये प्रिन्सीपल एजंट असे नाते न येता प्रिन्सीपल टू प्रिन्सीपल असे नाते आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचे सामनेवाला क्र.1 यांचेवर कोणतेही नियंत्रण नाही. तक्रारीत नमुद असणारे थ्री प्लग पल्टी व रोटा हे सामनेवाला कंपनीचे उत्पादन नाही. सबब त्याबाबत सामनेवाला कंपनीचा काहीही संबंध नाही. प्रस्तुत वादातील ट्रॅक्टर हा डिलरने तक्रारदारास विकलेला आहे व त्यासंबंधी डी.पी. डिलरने सामनेवालांना पाठविलेला आहे. तो तक्रारदाराने थेट पाठविलेला नाही. प्रस्तुतचा ट्रॅक्टर व्यवस्थित काम करत नव्हता. तसेच जेव्हा जेव्हा प्रस्तुतचा ट्रॅक्टर सर्व्हीससाठी आलेला होता. तेव्हातेव्हा सर्व्हीस दिलेली आहे. तसेच वॉरंटीप्रमाणे जॉबवर्कही करुन दिलेला आहे. त्यामुळे त्याबाबत सेवात्रुटी नाही. सामनेवालांनी उत्पादित केलेले ट्रॅक्टर हे विविध प्रकारच्या चाचण्या घेऊनच तयार केलेला असलेने त्याचा दर्जा हा उत्तम आहे. तसेच प्रस्तुत कंपनीचे ग्राहकाभिमूख सेवा असलेने सदर कंपनीचे उत्पादन हे नामांकित आहे. तसेच कंपनीस आय.एस.ओ. प्रमाणपत्रे मिळालेले आहे व सदर कंपनी प्रतिष्ठित व नामांकित कंपनी आहे. प्रस्तुतचा ट्रॅक्टर हा वॉरंटी करार व शर्तीनुसार खरेदी केलेला आहे. त्यामुळे त्यातील अटी व शर्ती पूर्तता सामनेवालांनी केलेली आहे. त्यामुळे नवीन ट्रॅक्टर बदलून देणेचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळे तक्रारदाराने आरोप केलेला व्यवहार हा सामनेवाला क्र.1 व तक्रारदारामध्ये झालेला आहे. त्यास सामनेवाला क्र.2 जबाबदार नाहीत. सामनेवाला क्र.2 यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालां कंपनीविरुध्द घेतलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईस सामनेवाला कंपनी जबाबदार नाही. सामनेवाला कंपनीविरुध्द कोणतेही न्याययोग्य कारण घडलेले नाही. सदरची तक्रार दाखल केल्यामुळे सामनेवालांना विनाकारण त्रास झालेला आहे. सबब प्रस्तुतची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व तक्रारदाराकडून सामनेवालांना कॉम्पेंसेंटरी कॉस्ट म्हणून रक्कम रु.25,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांचे बाजूने न्यायाचे दृष्टीने योग्य ते आदेश पारीत करावेत अशी विनंती सदर मंचास केली आहे. (08) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचा लेखी युक्तीवाद तसेच तक्रारदाराचा व सामनेवाला क्र. 2 व 3 चे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. सामनेवाला क्र.1 यांनी 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांनी उत्पादित केलेला न्यु हॉलंड ट्रॅक्टर 5500 टीटीविथ ऑक्झलरी व्हॉल्व 55 एच.पी.फ्रंट टायर 7 x 50x 16 रियर टायर 16 x 9 x 28 विथ ग्राऊंट स्पिड पी.टी.ओ.(155703)या मॉडेल ट्रॅक्टर व त्याबरोबर सदर कंपनी उत्पादित न केलेले शेती अवजारे रोटावेटर व हायड्रोलिक डबल पल्टी सामनेवालांकडून दि.08/01/2008 रोजी रक्कम रु.6,70,000/- चा बँक ऑफ बडोदा या बँकेचा डीडी देऊन खरेदी केलेला आहे ही वस्तुस्थिती सामनेवाला क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणेचे कलम 12 मध्ये मान्य केलेले आहे. मात्र त्यांनी प्रस्तुत व्यवहारापोटी रक्क्म रु.8,95,000/- किंमतीचा व्यवहार ठरलेचे मात्र त्यापैकी रक्कम रु.6,70,000/- दिलेले असून उर्वरित रक्कम तक्रारदार अदयापि देणे असलेचे नमुद केले आहे. याचा विचार करता तक्रारदाराने दाखल केलेल्या सामनेवाला क्र.1 यांचे बील क्र.182 चे अवलोकन केले असता सदर इन्हवाईस नं.182 असून व्यवहाराचे अटीमध्ये डीडी व्दारे व्यवहार करणेचे आहे. तसेच इंजिन नं.018908एन असून चेसीस क्र.286540 आहे. सदर ट्रॅक्टरचा कलर हा एनएचब्ल्यु अॅन्ड ग्रे असा नमुद आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास पाठवलेल्या दि.26/12/2007 च्या पत्राचे अवलोकन केले असता सदर पत्राचा विषय हा ट्रॅक्टर डिलीव्हरी व डीडीबाबतचा होता. सदर पत्रानुसार सदर सामनेवाला क्र.1 यांचेकडून न्यु हॉलंड ट्रॅक्टर 5500 हॉर्सपॉवर 2 व्हिल मॉडेल 5500 टीटी 155703 सुपर डिलक्स मॉडेल सोबत दयावयाचे साहित्य पॉवर स्टेअरिंग ऑईल ब्रेक, लिप्टोमेटिक स्विच, कॉन्सटंट मॅश गिअर बॉक्स, ऑब्झलरी व्हॉल्व, ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. चार चाकी हुक, पाना सेट, ऑपरेट मॅन्युअल, पुढील वजन 120 कि.ग्रॅ. मागील वजन नोंद नाही. डबल क्लच, ग्रीस पंप, व्हील पाना, ड्रॉवर बार, टॉपलिंग, पुढील बंपर, 6 फुटी रोटावेटर(पुष्पक इंर्पोटेक शार्प) व होणारा वरील बॅंकींग खर्च व पासिंग करुन देणेचा आहे. इन्शुरन्स बँकेकडून तक्रारदाराने देणेचा आहे व सदर सर्व साहित्य रक्कम रु.6,45,000/- ला देणेचे आहे. तसेच डीडी मिळालेपासून 10 दिवसात सर्व साहित्य जोडून डिलीव्हरी देतेवेळी जादा आलेल्या रक्कमेतून डिलीव्हरी देऊन उर्वरित रक्कम वजा जाता रक्कम परत देणेची आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता नमुद मॉडेल हे तसेच रोटावेटरसह ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ.सह रक्क्म रु.6,45,000/- मध्ये देणेचे सामनेवाला क्र.1 यांनी मान्य केलेले आहे. याचा विचार करता सामनेवालांनी तक्रारदाराकडून रक्क्म रु.6,70,000/- मिळालेचे मान्य केलेले आहे व तदनंतर दि.14/01/2008 रोजी तक्रारदारास नमुद मॉडेलच्या ट्रॅक्टरची डिलीव्हरीही दिली आहे. यावरुन सामनेवाला क्र.1 यांना ट्रॅक्टर तसेच रोटावेटर व ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. याची संपूर्ण रक्कम मिळालेली आहे. सबब सामनेवाला कंपनीने उपस्थित केलेला रक्कम देय असलेबाबतचे कथन हे मंच विचारात घेऊ शकत नाही. प्रस्तुतची रक्कम स्विकारलेनंतर सामनेवालांनी दि.14/01/2008 रोजी नमुद मॉडेलचा ट्रॅक्टर तक्रारदाराला डिलीव्हरी दिली. मात्र सदर ट्रॅक्टर देत असताना सदर ट्रॅक्टरला ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ.गिअर न्यु हॉलंड मॉडेल नं.155703 हा जोडून दिलेला नव्हता. कारण सदरचा गिअर सदर दिवशी सामनेवालांनी नमुद कंपनीकडून मागवूनच घेतलेला दिसून येत नाही. सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेतील कलम 13 मध्ये 15/12/2008 रोजी सदर गिअर तक्रारदारास अदा केलेचे नमुद केले आहे. याचा विचार करता सदर गिअरच्या किंमतीपोटी रक्कम स्विकारुन तसेच दि.27/12/2007 चे पत्रानुसार सदर ट्रॅक्टरचे डिलीव्हरीसोबत सदर गिअर फिटींग करुन देणे क्रमप्राप्त असतानाही सामनेवाला क्र.1 यांनी सदरचा गिअर ट्रॅक्टरची डिलीव्हरी केलेला दि.14/01/2008 नंतर जवळजवळ एक वर्षानी म्हणजे दि.15/12/2008 रोजी सदर गिअर तक्रारदाराचे ताब्यात दिलेला आहे. यावरुन सदर गिअर तक्रारदाराचे ताब्यात दिलेचे दिसून येतो मात्र नमुद ट्रॅक्टरला तो फिटींग करुन दिलेचे कुठेही निदर्शनास आलेले नाही. तक्रारदाराने नमुद ट्रॅक्टरला सदर गिअर फिटींगची सोय नसलेचे तसेच ओरिजनल फिटींग नसलेचे कथन केले आहे. सदर गिअर हा गहू कापणीसाठी वापरला जातो. पंजाब व हरियणामध्ये अशा प्रकारचे ओरिजनल कंपनी फिटींगचे ट्रॅक्टर्स वापरले जातात. मात्र कोल्हापूर विभागामध्ये अशा प्रकारचे ट्रॅक्टर वापरात नसलेने तक्रारीत नमुद केलेल्या मॉडेललाच सदर सुविधा असलेने व तसेच सदरचा गिअर मागवून घेऊन तो सदर मॉडेलला जोडून देणेची जबाबदारी स्विकारलेची सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या लेखी म्हणणे व युक्तीवादाच्या वेळी मान्य केले आहे. तसेच आजही सामनेवाला क्र.1 हे सदर गिअर नमुद मॉडेलला जोडून देणेस तयार असलेचे प्रतिपादन केलेले आहे. याचा विचार करता सदर गिअर पोटी रक्कम स्विकारुनसुध्दा योग्य त्या पुरेशा वेळेत सदरचा गिअर मागवून घेऊन जोडून दिलेला नाही. सदर गिअर तक्रारदाराचे ताब्यात देणेसच जवळजवळ एक वर्षाचा कालावधी घेतलेला आहे व ही सामनेवाला क्र.1 यांचे सेवेतील गंभीर त्रुटी असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराचा मूळ वादाचा विषयच नमुद ट्रॅक्टरला सदर गिअरचे ओरिजनल फिटींग नसल्याने त्यांनी सदर ट्रॅक्टर कार्य करु शकत नसलेचे वारंवार प्रतिपादन केलेले आहे. मात्र सामनेवालांनी अशा प्रकारचे ट्रॅक्टरला ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. जोडता येतो त्याप्रमाणे तक्रारदाराचे समाधान झालेनंतरच नमुद ट्रॅक्टर व सदर गिअरची मागणी केलेली आहे हे कथन हे मंच विचारात घेत आहे. सबब सदर ट्रॅक्टरला जर ही सुविधा असेल अदयापही सदर गिअर या ट्रॅक्टरला जोडला गेलेला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास विक्री पश्चात सेवा दिलेला नाही याबाबत सामनेवाला उत्पादित कंपनीशी मोठया प्रमाणात पत्र व्यवहार केलेला दिसून येतो. तसेच सदर ट्रॅक्टरमध्ये गिअर बसवण्याची सेवा असलेस दाखवून दयावी, बॅटरी, टाय, अॅव्हरेज प्रॉब्लेम असून ऑईल लिकेज असलेचे कळवलेले आहे. त्यास सामनेवाला यांनी 10 दिवसात ट्रॅक्टर वर्कशॉपमध्ये आणून सुचनांचे निरसन करुन घ्यावे असे कळवलेचे दिसून येते. त्यास आर्थिक ऐपत नसलेने फिल्डवर येणेचे तक्रारदाराने कळवलेचे दिसून येते. अशा प्रकारचा पत्रव्यवहार केला असलेचे दिसून येते. तसेच अॅड. ए.ए.पाटील व एस.एन.पाटील यांचेमार्फत नोटीसाही दिल्याचे व ते सामनेवालांना मिळालेचे दिसून येते. सामनेवाला क्र.1 यांनी विक्रीपश्चात सेवा दिलेचे आपले लेखी म्हणणेत कथन केले आहे. तसेच सदर सेवेदरम्यान बिलाची रक्कमही तक्रारदाराने दिलेली नाही. त्याबाबत सामनेवाला यांनी काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. यामध्ये डेमोकरिता ट्रॅक्टर दिलेचे तसेच बँक ऑफ बडोदाचे कर्जासंदर्भातले पत्र, मालाच्या तपशीलामध्ये दि.14/01/2008 रोजीचे डिलीव्हरी चलन क्र.204 नुसार पाना सेट व टॉपलिंग वर मार्क असून दि.02/05/2008 तारीख नमुद करुन त्याखाली वजन सेट2, जॅक व टॉमी 1, मागील चाकाची वजने 3, मागील चाकाचे नट 8 हस्ते अनिल पाटील नमुद केले आहे. मात्र सदर पावतीखाली टॉपलिंग फक्त असाही मजकूर नमुद आहे. याचा अर्थ पाना सेट दिलेला नव्हता. तसेच दि.16/01/2008 रोजीचे डिलीव्हरी चलन क्र.206 नुसार हुक 4 चाकी, रेल फेंटर सिट, ड्राबर पट्टी, फ्रंट बंपर, पाना सेट व टॉपलिंक ची नोंद असून दि.15/01/08 रोजी रक्कम रु.55,000/- रोख मिळालेची नोंद आहे. त्याबाबतची दि.15/01/2008 ची रोखीची पावती तसेच दि.16/01/2008 ची कराड अर्बन बँकेचा चेक क्र.022282 दिलेबाबतची रक्कम रु.50,000/- ची पावती दिसून येते. तसेच जॉब कार्ड क्र.84, 372 दाखल आहे. यावरुन विक्रीपश्चात सेवा सामनेवालांनी दिलेली आहे. तसेच दि.27/05/2008 रोजी सामनेवालांनी त्यांचे शोरुममध्ये तक्रार निवारणासाठी ट्रॅक्टर आणणेबाबत कळवलेचे दिसून येते. सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेले अनु क्र.22 वरील सामनेवाला क्र.1 यांचे बील तपशीलाप्रमाणे रक्कम रु.2,569/- येणे बाकीची नोंद केलेची दिसून येते. मात्र तक्रारदाराने दाखल केलेल्या सदर पावतीच्या अस्सल प्रतीची नोटराईज्ड नोंदीच्या सत्यप्रतीवर अशा कोणत्याही प्रकारची नेांद दिसून आली नाही. सदर बीलाची येणे बाकी असेल तर तक्रारदाराला दिलेल्या प्रतीवर सुध्दा त्याची नोंद असायला हवी ती दिसून येत नाही. सबब सामनेवाला क्र.1 यांनी सदरच्या नोंद नंतर केल्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रमाणेच तक्रारदाराने अन्य बीलाबाबतही आक्षेप घेतलेला आहे. सामनेवालांचे रक्कमा अदा केलेचे तक्रारदाराने प्रतिपादन केलेले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणणेमध्ये उपस्थित केलेले मुद्दे तक्रारदाराने आपले रिजॉइन्डरमध्ये खोडून काढलेले आहेत. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचे सदरचा व्यवहार सोडून अन्य थकीत देणेबाबत हे मंच काहीही भाष्य करीत नाही. कारण सदर देणे असेल तर या तक्रारीचा त्याचेशी काहीही संबंध दिसून येत नाही. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांनी नमुद व्यवहारपोटी रक्कम स्विकारुनही तक्रारदारास ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. देणेस एक वर्षाचा कालावधी लावला व तो अदयापही फिटींग करुन न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब त्यामुळे तक्रारदारास सदर ट्रॅक्टरचा वापर करता आलेला नाही. दरम्यानचे काळात बरेचसे गहू कापणीचे हंगाम होऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यास ट्रॅक्टरचा वापर करता आलेला नाही. तसेच सदरचा ट्रॅक्टर त्यांनी कराड अर्बन बँकेकडून कर्ज प्रकरण करुन घेतलेली आहे. याचा विचार करता तक्रारदारास आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासास सामोरे जावे लागले आहे ही वस्तुस्थिती हे मंच मान्य करत आहे. सबब वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 हे उत्पादित कंपनी असून सामनेवाला क्र.3 हे जनरल मॅनेजर आहेत. सदर ट्रॅक्टरमध्ये उत्पादित दोष आढळून आलेला नाही. तसेच सामनेवाला क्र.1 हे अधिकृत डिलर आहेत व ते सामनेवाला क्र.2 या उत्पादित कंपनीचे ट्रॅक्टर घेऊन विक्री करतात. तक्रारदार यांचा सामनेवाला क्र.2 यांचेशी प्रत्यक्ष संबंध आलेला नाही. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी मागणी केलेप्रमाणे नमुद मॉडेल सामनेवाला कंपनीने पाठवून दिलेले आहे. सदर ट्रॅक्टरमध्ये कोणताही उत्पादित दोष आढळून न आलेने सामनेवाला क्र. 2 व त्यांचे कर्मचारी सामनेवाला क्र.3 यांना जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये नमुद ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. गिअर सामनेवाला कंपनीकडे कधी मागणी केला याबाबत मौन बाळगलेले आहे.सबब सदर ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ. गिअर तक्रारदाराचे ताब्यात देणेस एक वर्षाचा कालावधी घेतलेला आहे. यास सामनेवाला क्र.1 जबाबदार आहेत. त्यामुळे सदर गिअर मागणी करुन वेळेत नमुद ट्रॅक्टरला जोडणेसाठी सामनेवाला क्र.1 हेच जबाबदार असून सामनेवाला क्र.1 यांचे सेवात्रुटीसाठी सामनेवाला क्र. 2 व 3 यांना जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवाला क्र. 1यांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे या निष्कषाप्रत हे मंच येत आहे तसेच नमुद ट्रॅक्टरमध्ये कोणताही उत्पादित दोष न आढळलेमुळे ट्रॅक्टर बदलून नवीन ट्रॅक्टर देणेबाबत तक्रारदाराने केलेले मागणी तसेच कर्जावरील व्याजाची मागणीही मान्य करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला क्र.1 यांचे वकीलांनी नमुद गिअर हा नमुद ट्रॅक्टर जोडून देऊन चालू स्थितीत करुन देणेचे केलेले प्रतिपादन विचारात घेता नमुद ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ.155703 गिअर नमुद ट्रॅक्टरला जोडणी करुन देऊन सदर ट्रॅक्टर चालू स्थितीत करुन देणेसाठी नैसर्गिक न्यायतत्व इक्वीटीचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांना जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला क्र.1 यांनी विनामोबदला तक्रारदारांचे नमुद ट्रॅक्टरला ग्राऊंड स्पिड पी.टी.ओ.155703 गिअर जोडून ट्रॅक्टर सुस्थितीत करुन दयावा. 3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |