तक्रारदार : वकील श्री.एस.एच.बोहरा यांचे मार्फत हजर. सामनेवाले क्र..1 : वकील श्री.प्रतापचंद्र यांचे मार्फत हजर. सामनेवाले क्र..3 : वकील श्री.एस.झेड.चौधरी यांचे मार्फत हजर -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले क्र.1 ही विमा कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांनी नेमलेले सर्व्हेक्षक आहेत. सा.वाले क्र.3 हे वाहन दुरुस्तीकेंद्र आहे. तक्रारदारांनी फीयेस्टा कार दिनांक 8.2.2007 रोजी खरेदी केली. व त्या वहनाचा विमा सा.वाले विमा कंपनी यांचेकडे उतरविला व विम्याचा करार 2007-08 या वर्षाकरीता अस्तीत्वात व वैध होता. 2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारदारांनी आपले वाहन त्यांचे इमारतीचे रस्त्यावर उभे केले होते. दिनांक 30.6.2007 रोजी मुंबई येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तक्रारदारांचे वाहन तिथे उभे होते त्या रस्त्यावर पाणी साचले व वाहनामध्ये पाणी घुसले. तक्रारदारांनी सकाळी वाहन सुरु करण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन सुरु होत नसल्याने ते ओढत सा.वाले क्र.3 दुरुस्तीकेंद्र यांचेकडे नेण्यात आले. वरील घटनेची सूचना सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांना मिळाल्यानंतर सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक यांची वाहन तपासणीकामी नेमणूक केली. व सार्व्हेअर दिनांक 10.7.2007 व 17.7.2007 रोजी सा.वाले क्र.3 यांचेकडे वाहन तपासण्यास गेले. त्यानंतर सा.वाले क्र.1 यांनी दिनांक 24.9.2007 चे पत्राप्रमाणे वाहन दुरुस्ती करण्याची परवानगी तक्रारदारांना दिली व त्या प्रमाणे सा.वाले क्र.3 यांनी वाहनाची दुरुस्ती केली. 3. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले क्र.3 यांनी वाहन दुरुस्ती खर्चाबद्द रुपये 2,93,720/- रुपयाची मागणी केली. त्या प्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे विमा कराराप्रमाणे वाहन दुरुस्ती खर्चाची रक्कम सा.वाले क्र.3 यांना अदा करण्यात यावी असा तगादा लावला. तथापी सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना वाहन दुरुस्ती खर्चापोटी फक्त रु.30,065/- देवू केले. व तक्रारदारांना असे कळविले की, तक्रारदारांनी वाहनाची योग्य काळजी घेतली नसल्याने विमा कंपनी संपूर्ण खर्चाची रक्कम देण्यास जबाबदार नाही. तक्रारदारांनी त्यानंतर सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांना नोटीस दिली. तथापी सा.वाले क्र.1 वाहन दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम तक्रारदारांना अदा करण्यास नकार दिला. दरम्यान वाहन दुरुस्ती खर्चाची रक्कम प्राप्त न झाल्याने सा.वाले क्र.3 दुरुस्ती केंद्राने तक्रारदारांचे वाहन अडकवून ठेवले. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 विमा कंपनी,सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक, व सा.वाले क्र.3 वाहन दुरुस्ती केंद्र, यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दिनांक 29.2.2008 रोजी दाखल केली. 4. सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये विम्याचा करार मान्य केला. सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयतीच्या परिच्छेद क्र.9 मध्ये असे कथन केले की, सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक यांनी वाहन तपासनीचा प्राथमिक अहवाल व वाहन तपासनीचा अंतीम अहवाल विमा कंपनीस सादर केला. सर्व्हेक्षक यांनी आपल्या अहवालात दिनांक 3.11.2007 व्दारे विमा कंपनीस असे कळविले आहे की, वाहनाचे इंजीनमध्ये पाणी गेल्यानंतर व वाहनाचे इंजीन बंद झाल्यानंतर तक्रारदारांनी वाहन सुरु करण्याचा प्रयत्न केल्याने वाहनाच्या इंजीनमध्ये बिघाड निर्माण झाला व वाहन जास्तीच बिघडले. वाहनाचे इंजीनमध्ये पाणी गेल्यानंतर तक्रारदारांनी वाहन सुरु करण्याचा प्रयत्न करणे ही चूक आहे, व हया चुकीमुळे इंजीनमध्ये जास्ती बिघाड झाला. व त्या अनुषंगीक बिघाडाचा खर्च विमा कंपनीने देऊ नये असे सर्व्हेक्षक यांनी सूचविले व सर्व्हेक्षकांचे अहवालाचे आधारावर विमा कंपनीने आपल्या दिनांक 14.11.2007 च्या पत्राप्रमाणे तक्रारदारांना वाहन दुरुस्तीकामी विमा कराराप्रमाणे फक्त रक्कम रु.30,065/ देऊ केले. या प्रमाणे विमा कंपनीने असे कथन केले की, तक्रारदारांची वाहन दुरुस्तीची मागणी संपूर्णतः मान्य न करण्याचे कारण म्हणजे सर्व्हेक्षकांचा वाहन दुरुस्ती नंतरचा अहवाल असून विमा कंपनीने तक्रारदारांना विमा कराराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला. 5. सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली व सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांच्या कैफीयतीमधील कथनाप्रमाणे कथन केले व गाडीचे इंजीन बिघाडामध्ये तक्रारदारांचा दोष आहे असे कथन केले. 6. सा.वाले क्र.3 वाहन दुरुस्ती केंद्र यांनी आपली वेगळी कैफीयत दाखली केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांच्या सूचनेप्रमाणे वाहन दुरुस्ती केंद्राने खर्चाची अंदाजित रक्कम रु.2,93,720/- अशी तक्रारदारांना सांगीतली. व तक्रारदारांच्या संमतीने वाहनाची दुरुस्ती केली जी दिनांक 14.12.2007 रोजी संपली. व वाहन दुरुस्तीचा एकूण खर्च रु.2,91,749/- असा आला. त्या बद्दलचे देयक दिनांक 14.12.2007 रोजी तंयार करण्यात आले. तथापी तक्रारदार व विमा कंपनी यामधील वादामुळे विमा कंपनीने सा.वाले क्र.3 यांना रक्कम अदा केली नाही व वाहन दुरुस्तीची रक्कम प्राप्त न झाल्याने सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांचे वाहन अडवून ठेवले. सा.वाले क्र.3 यांनी असे कथन केले की, वाहन सांभाळण्याचा दररोजचा खर्च रु.250/- प्रतिदीन या प्रमाणे तक्रारदारांकडून सा.वाले क्र.3 यांना येणे आहे. या प्रकारे सा.वाले क्र.3 यांनी आपली जबाबदारी झटकली व तक्रारदारांना वाहनाचे दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला. 7. तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र, पुरावे शपथपत्र, दिनांक 25.2.2011 रोजी दाखल केले.सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे कैफीयत व शपथपत्रासोबत आवश्यकत्या कागदपत्रांची यादी सोबत हजर केली. तसेच वाहनाची छायाचित्रेसुध्दा हजर केली. सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे व्यवस्थापक श्रीमती वैशाली परब यांचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले क्र.2 यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी तसेच सा.वाले क्र.1 यांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. 8. प्रस्तुतचे मंचाने तक्रार, सा.वाले यांचे कैफीयत, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्र, वाहनाची छायाचित्रे व लेखी युक्तीवाद याचे वाचन केले. त्यानुसार तक्रारीचे निकामी कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले विमा कंपनी यांनी वाहन दुरुस्तीची रक्कम विमा कराराप्रमाणे तक्रारदारांना अदा करण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून विमा कराराप्रमाणे वाहन दुरुस्तीची किंमत नुकसान भरपाई म्हणून मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. | 3 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 9. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत विमा कराराची व वाहन दुरुस्तीची संदर्भातील आवश्यक ती कागदपत्रांची यादी सोबत दाखल केली आहे. त्या कागदपत्रामध्ये अनुक्रमांक 2 वर विमा कराराची प्रत दाखल केली आहे. त्यांचे वाचन केले असताना असे दिसून येते की, विमा करार हा दिनांक 8.2.2007 ते 7.2.2008 या कालावधीमध्ये वैध होता व तक्रारदारांना विमा हप्ता रु.22,149/- वार्षीक सा.वाले क्र.1 यांचे कडे भरले होते. विमा करार वैध होता व तो अस्तीत्वात होता यास सा.वाले क्र.1 यांनी नकार दिला नाही. तसेच तो वाहन दुरुस्तीचे संदर्भात नव्हता असे ही सा.वाले यांचे कथन नाही. तक्रारदारांनी आपले वाहन इमारतीचे समोर लावले होते व 30 जून,2007 चे रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर व इमारतीत पाणी जमा झाले या बद्दल सा.वाले यांनी नकार दिला नाही. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये तसेच पुरावा शपथपत्रामध्ये असे कथन केले आहे की, अतिवृष्टीमुळे तक्रारदार राहात असलेल्या ठाकूर गावामध्ये पाणी जमा झाले होते व पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. व त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांना दूरध्वनीवरुन सूचना दिली. तथापी सा.वाले यांचेकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यानंतर वाहन दिनांक 4.7.2007 रोजी ओढत सा.वाले क्र.3 यांचेकडे नेण्यात आली. तक्रारदारांचे वाहन ओढत नेल्या बद्दलची संबंधीत वाहन कंपनीने दिलेली पावती तक्रारदारांनी जोडलेली आहे. यावरुन एक बाब सिध्द होते की, तक्रारदारांचे वाहन हे अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाले होते व ते ओढत नेऊन सा.वाले क्र.3 यांचेकडे दुरुस्तीकामी जमा करावे लागले. त्यानंतर सा.वाले क्र.3 दुरुस्तीकेंद्र यांनी वाहन दुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक तंयार केले, ज्याची प्रत तक्रारदारांनी तक्रारीचे निशाणी क वर पृष्ट क्र.42 वर दाखल केलेली आहे. त्याचे वाचन केले असताना असे दिसून येते की, सा.वाले क्र.3 यांनी दिनांक 25.7.2007 रोजी तक्रारदारांचे वाहन दुरुस्ती करणेकामी अंदाज पत्रक रक्कम रुपये 2,93,720/- तंयार केले. त्यानंतर सा.वाले क्र.3 यांनी इंजीनची दुरुस्ती व इतर दुरुस्त्या करणे आवश्यक आहे असे नजरेस आल्याने दुरुस्ती अंदाजपत्रक तंयार केले , ज्याची प्रत तक्रारदारांनी तक्रारीचे निशाणी ल वर दाखल केलेली आहे. त्यामध्ये हया दुरुस्ती खर्चाची रक्कम रु.2,93,720/- दाखविली आहे. 10. या संबंधात महत्वाची बाब म्हणजे क्र.2 चे सुधारीत अंदाजपत्रक यावर तक्रारदार यांनी दिलेला शेरा आहे. ज्याव्दारे त्यांनी इंजीन व इतर भागांची दुरुस्ती करुन घ्यावी असे सा.वाले क्र.3 यांना सुचविले होते. तक्रारदार आपले तक्रारीत असे म्हणतात की, त्यांनी सा.वाले क्र.3 हयांना इंजिनमधील दुरुस्ती करण्यास परवानगी दिेली नव्हती, परंतु वरील शेरा त्या कथनाचे विरुध्द जातो तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र परिच्छेद क्र.14 यामध्ये असे स्पष्ट कथन केलेले आहे की, सा.वाले क्र.2 यासंनी वाहन दुरुस्ती खर्चास कधीही आक्षेप घेतला नाही व दिनांक 17.7.2007 रोजी वाहन दुरुस्ती खर्चाबद्दल आवश्यक ते कागदपत्र सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक यांचे संल्याने भरण्यात आले होते. अंदाजपत्रक क्र.2 वर असलेला शेरा व सा.वाले क्र.2 यांची त्याबद्दल असलेली संमती हेच दर्शविते की, वाहन दुरुस्ती करण्यापूर्वी सा.वाले क्र.1 अगर त्यांचे सर्व्हेक्षक सा.वाले क्र.2 यांनी वाहन दुरुस्ती खर्चास किंवा अंदाजपत्रकास आक्षेप घेतला नाही. व त्यानंतर तक्रारदारांचे सूचनेवरुन सा.वाले क्र.3 यसांनी वाहन दुरुस्तीचे काम पुढे चालु केले. 11. येवढेच नव्हेतर सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे पत्र दिनांक 24.9.2007 प्रमाणे तक्रारदारांना असे कळविले की, सा.वाले क्र.1 यांचे सर्व्हेक्षक यांनी दिनांक 10.7.2007 व दिनांक 17.7.2007 रोजी वाहनाची तपासनी केलीव वाहनाची दुरुस्ती अद्याप सुरु झाली नसल्याने वाहनाची दुरुस्ती सुरु करण्यात यावी. सा.वाले क्र.1 यांनी त्यांच्या पत्राव्दारे तक्रारदारांना असे कळविले की, वाहन दुरुस्तीचे प्रक्रियेमध्ये तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक यांचेकडे सतत संपर्क साधावा. सा.वाले क्र.1 यांनी दिलेल्या पत्रातील मजकूर असे दर्शवितो की, सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक यांनी वाहनाचे सर्व्हेक्षण केल्यानंतर व सा.वाले क्र.3 यांनी अंदाजपत्रक दिल्यानंतर वाहन दुरुस्तीचे संदर्भात अधीही आक्षेप घेतला नाही. येवढेच नव्हेतर तक्रारदारांनी वाहनाची दुरुस्ती लवकर करुन घ्यावी असे सूचविले व त्या नंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचेमार्फत वाहनाची दुरुस्ती करुन घेतली. 12. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे सा.क्र.3 यांचे देयकाप्रमाणे रु.2,93,720/- ची मागणी केली परंतु सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे पत्र दिनांक 19.11.2007 प्रमाणे तक्रारदारांना फक्त रु.30,065/- रुपये देवू केले. तक्रारदारांनी त्यानंतर सा.वाले यांचेकडे पत्र व्यवहार केला व दुरुस्ती खर्चाची संपूर्ण रक्कम मागीतली. परंतु सा.वाले यांनी ती अदा करण्यास नकार दिला. 13. या संदर्भात सा.वाले क्र.1 यांचे कैफीयतीमध्ये परिच्छेद क्र.10 मध्ये असे कथन आहे की, सर्व्हेक्षकांनी (सा.वाले क्र.2) वाहनाची तपासणी केल्यानंतर त्या तपासणीअंती सर्व्हेक्षकांनी असे निरीक्षण नोंदविले की, वाहनाचे इंजीनमध्ये बिघाड हा हाय्ड्रोस्टॅटीक लॉक (Hydrostatic Lock ) झाल्यामुळे झाला. व या प्रकारचा बिघाड हा वाहन बंद पडल्यानंतर परत इंजिन चालु करण्याचा प्रयत्न केल्यामुळे झाला. सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.10 मध्ये पुढे असा खुलासा केला आहे की, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये वाहन सुरु केल्यानंतर इंजिनमधील पिस्टन हा वर खाली होतो. सुरवातीला इंजीन हवा ओढून घेते. त्यानंतर त्या हवेचा दाब पिस्टनमध्ये वाढला जातो व त्या हवेमुळे इंधन कार्यक्षम होते व वाहन सुरु होते. एखादे वाहन सुरु झाल्यानंतर पिस्टन खाली वर होत राहातो. व त्याव्दारे वाहन धाऊ लागते. वाहन सुरु झाल्यानंतर इंजीनाचे वापरामुळे होणारा धूर बाहेर टाकला जातो. सा.वाले यांनी कैफीयतीचे पृष्ट क्र.10 मध्ये असा खुलासा केला आहे की, हाय्ड्रोस्टॅटीक लॉक होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे इंजीनमध्ये जमा झालेले पाणी पिस्टनचे वर साचते व पिस्टनचे वरचे भागाला पाण्यामुळे धक्के देऊ शकत नाही. परंतु वाहन चालु केल्यामुळे पिस्टन व त्याला जोडणारे भाग खालीवर होत राहातात. परंतु पिस्टन हा वर पर्यत पोहचत नसल्याने त्याला जोडणारे लोखंडी रुळ हे वाकतात. व इंजीन तसेच चालु ठेवले तर पिस्टनला जोडणा-या लोखंडी रुळामध्ये (Rods) जास्तीचा दोष निर्माण होतात. सा.वाले यांच्या कैफीयतीमधील परिच्छेद क्र.11 प्रमाणे तक्रारदारांच्या वाहनाचे इंजीनमध्ये पुराचे पाणी गेले होते. व त्यामुळे पिस्टन योग्य रितीने काम करु शकत नव्हते. तरी देखील तक्रारदारांनी वाहन चालु करण्याचा प्रयत्न केला. इजिनला वारंवार चालु केले. परंतु पिस्टन योग्यरितीने काम करीत नसल्याने त्याला जोडणारे लोखंडी रॉड व अवशेष यांचे व इंजीनचे नुकसान झाले. थोडक्यात सा.वाले क्र.1 यांच्या कैफीयतीमधील कथनाप्रमाणे इंजीनमध्ये पाणी घुसले ही बाब नजरेस आल्यानंतर तक्रारदारांनी वाहन सुरु करावयास नको होते व वाहन दुस-या वाहनास बांधून (Tow) करुन दुरुस्ती केंद्रावर नेणे आवश्यक होते. याप्रमाणे तक्रारदारांच्या निष्काळजीपणामुळे व चुकीमुळे इंजीनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने सा.वाले क्र.1 हे विमा कराराप्रमाणे इंजीन दुरुस्तीचा खर्च देण्यास जबाबदार नव्हते. या प्रमाणे केवळ वाहन दुरुस्तीचे कामाच्या मजुरीचे पैसे रु.30,065/- सा.वाले क्र.1 यांनी हजर केलेले आहेत असे कथन सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयमतीमध्ये केलेले आहे. व त्याच स्वरुपाचे कथन सा.वाले क्र.1 यांचे व्यवस्थापक वैशाली परब यांनी आपल्या शपथपत्रामध्ये केलेले आहे. 14. सा.वाले क्र.2 (सर्व्हेक्षक) यांचा अहवाल वर विसंबून सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना इंजिनच्या दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम देण्याचे नाकारले. सा.वाले क्र.2 यांच्या कैफीयतीच्या परिच्छेद क्र.5 मध्ये ज्या स्वरुपाचे कथन आहे, जे सा.वाले क्र.1 यांच्या परिच्छेद क्र.10 मध्ये आहे. सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कागदपत्राच्या यादीसोबत जी कागदपत्रे हजर केलेली आहेत त्यामध्ये पुष्ट क्र.36 वर अंतीम पहाणी अहवाल दाखल केलेला आहे. त्यामध्ये असे नमुद केलेले आहे की, इंजीनमधील बिघाड हा पुराचे पाण्यामुळे झालेला नसून ब्लॉक, पिस्टन, पिस्टनला जोडणारे रॉड, शाप्ट बेरींग, यांची नादुरुस्ती ही वाहनाचे इंजीन चालु केल्यामुळे व इंजीन हाय्ड्रोस्टॅटीक लॉक झाल्यामुळे घडले आहे. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत वाहनाच्या इंजीनची तपासणी इत्यादीची रंगीत छायाचित्रे हजर केलेली आहेत. त्याचे मंचाने निरीक्षण केले. 15. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र, परिच्छेद क्र.30 मध्ये असे कथन केलेले आहे की, सा.वाले क्र.1 यांचे कैफीयेतीचे परिच्छेद क्र.9 व 10 मध्ये असलेली कथने ही खोटी आहेत. व तक्रारदारांनी वाहन सुरु करण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण येथे एक बाब नमूर करणे आवश्यक आहे की, सा.वाले क्र.2 यांनी वाहनाचे निरीक्षण दिनांक 10.7.2007 व 17.7.2007 रोजी केले व सा.वाले क्र.2 यांनी आपला प्राथमिक अहवाल सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांचेकडे दिनांक 30.7.2007 रोजी पाठविला. त्या प्राथमिक अहवालाची प्रत सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कागदपत्राच्या यादीमध्ये अनुक्रमांक 5 वर पृष्ट क्र.19 ते 21 वर हजर केली आहेत. त्यामध्ये सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक यांनी असे नमुद केले आहे की, वाहन हे दुस-या वाहनास बांधून सा.वाले क्र.3 केंद्रावर आणले गेले होते. इंजीनच्या आतील भागातील आच्छादने भिजली होती. एअर फील्टर पाण्याने बिघडले होते. तथापी वाहनाचे समोरील दिव्यामध्ये व मागील डिकीमध्ये पाणी साचले नव्हते. सर्व्हेक्षकांनी आपल्या अहवालामध्ये असेही नमुद केले आहे की, त्यांनी सा.वाले क्र.3 यांनी वाहन मोकळे करण्यास सांगीतले. व वाहनाच्या इंजीनचे पाण्यामुळे नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाई द्यावी.व इजीनचे नुकसान हाय्ड्रोस्टॅटीक लॉक ने झाले असले तर नुकसान भरपाई देण्यात येऊ नये. सर्व्हेक्षकांनी आपला प्राथमिक अहवालात असे नमुद केलेले आहे की, सा.वाले क्र.3 यांच्याकडून पुढील निरोपाची म्हणजे इंजीन मोकळे केल्यानंतर करण्यात येणा-या निरीक्षणाची वाट पहात आहेत. सर्व्हेक्षकांचा म्हणजे (सा.वाले क्र.2) यांचा अंतीम अहवाल दिनांक 3.11.2007 रोजीचा आहेत. त्या अहवालाचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, सर्व्हेक्षकांनी वाहन दुरुस्ती होत असतांना व इंजीन व त्यातील भाग खुले केल्यानंतर इंजीनाचे निरीक्षण केलेले होते. सर्व्हेक्षकांचा प्राथमिक अहवाल दिनांक 30.7.2007 रोजीचा आहे. त्यामध्ये निरीक्षकांनी दिनांक 10.7.2007 व 17.7.2007 रोजी वरील वाहन तपासल्याचा उल्लेख आहे. या प्रमाणे सर्व्हेक्षकांचा प्राथमिक व अंतीम अहवालावरुन ही बाब स्पष्ट होते की, वाहनाचे इंजिनास सर्व्हेक्षकांनी दुस-यांदा भेट दिल्यानंतर म्हणजे 17.7.2007 नंतर इंजीन मोकळे करण्यात आले व सर्व्हेक्षकांनी इजीन मोकळे झाल्यानंतर व खुले झाल्यानंतर वाहनाची तपासणी दिनांक 17.7.2007 नंतर केली नाही. थोडक्यात असे म्हणावे लागेल की, वाहनाला हाय्ड्रोस्टॅटीक लॉक झाले होते हा सा.वाले क्र.2 यांचा निष्कर्ष प्रत्यक्ष इंजीन तपासणी वर आधारीत नसुन केवळ तर्कावर आधारीत आहे. सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षकांनी दुरुस्ती केंद्रामध्ये सा.वाले क्र.3 यांनी वाहनाचे आतील भाग सुट्टे/खुले केल्यानंतर जर सर्व्हेक्षकांनी इंजीनाची तपासणी केली असती तर निच्छितच सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक यांच्या निष्कर्षास महत्व प्राप्त झाले असते. परंतु सर्व्हेक्षकांची कैफीयत व त्यांचा प्राथमिक अहवाल व अंतीम अहवाल हे स्पष्ट करते की, सर्व्हेक्षकांनी दिनांक 17.7.2007 नंतर वाहनाची तपासणी केली नाही. ही तपासणी त्यांनी अंतीम अहवालाप्रमाणे म्हणजे दिनांक 2.11.2007 रोजी केली. परंतु दरम्यान सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदारांना दिनांक 24.9.2007 रोजी पत्र देवून वाहनाची दुरुस्ती विना विलंब करुन घेण्यात यावी असे कळविले होते, व त्याप्रमाणे तक्रारदारांनी दिनांक 29.9.2007 रोजी सा.वाले क्र.3 यांना वाहनाचे इंजीन व अन्य भागांची दुरुस्ती करण्यात यावी असी विनंती केली. सा.वाले क्र.3 यांच्या कैफीयतीमध्ये असे दर्शविले आहे की, वाहनाची दुरुस्ती ही तक्रारदारांनी दिनांक 29.9.2007 रेाजी संमती दिल्यानंतर करण्यात आली व ती दिनांक 14.12.2007 रोजी संपली. सा.वाले क्र.3 यांच्या कैफीयतीमध्ये असे कोठेही कथन नाही की, वाहनास हाय्ड्रोस्टॅटीक लॉक झाले होते. त्याचप्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना दिलेल्या दिनांक 24.9.2007 च्या पत्रात असा कोठेही उल्लेख नव्हता की, इंजीनमधील बिघाड जर हाय्ड्रोस्टॅटीक लॉक मुळे झाला असेलतर दुरुस्ती खर्च देय असणार नाही. सर्व्हेक्षकांनी आपला प्राथमिक अहवाल दिनांक 30.7.2007 ची प्रत तक्रारदारांना दिली नव्हती किंवा ती पुरविल्याबाबतचा पुरावा नाही. तसेच दिनांक 2.11.2007 रोजीच्या अंतीम अहवालामध्ये नमुद केल्याप्रमाणे वाहनाचे इंजीनची तपासणी ही सर्व्हेक्षकांनी केले या बद्दल अंतीम अहवालातील एका वाक्याशिवाय वेगळा पुरावा नाही. त्याबद्दची नोटीस तक्रारदारांना देण्यात आली नव्हती. या प्रमाणे तक्रारदारांनी अनाधीकाराने वाहनाचे इंजीनची दुरुस्ती सा.वाले क्र.3 यांचेकडून करुन घेतली असे दिसून येत नाही. 16. या व्यतिरिक्त सा.वाले क्र.1 यांनी विमा कराराच्या कलम 4(1) चा आधार घेतला जी पुढील प्रमाणे आहे. Any accidental loss or damage to any property Whatsoever or any loss or expense whatsoever Resulting or arising therefrom or any consequential loss. वरील तरतुदीचे काळजीपूर्वक वाचन केले असतांना असे दिसून येते की, त्या तरतुदी हया अपघातामधून वाहनास निर्माण होणा-या दोषाबद्दलच्या दुरुस्ती खर्च या बद्दल आहेत. त्या तरतुदी वर उधृत केलेल्या आहेत. विमा कराराचे कलम 4 (अ) ची सुरुवात अपघातामुळे वाहनाची झालेले नुकसान अशी आहे. व त्या बद्दलच्या अनुषंगीक तरतुदीबद्दलची बाब ही देखील अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीचे संदर्भात लागेल. परंतु प्रस्तुतचे वाहन हे अपघातग्रस्त नाही. 17. सा.वाले क्र.2 सर्व्हेक्षक यांचा अहवाल तसेच सा.वाले क्र.2 यांची कैफीयत व त्यावर आधारीत सा.वाले क्र.1 यांची कैफीयत मधील परिच्छेद क्र.10 मधील कथने असे दर्शवितात की, तक्रारदारांनी वाहनाचे इंजीनामध्ये पाणी गेल्यानंतर इंजीन सुरु करण्याचा प्रयत्न केला परंतु पिस्टन कार्यरत होऊ शकला नाही. व त्यामुळे इंजीनमध्ये अधिकच बिघाड झाला. तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्रामध्ये ही बाब स्पष्टपणे नाकारली आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या वाहनाची जी छायाचित्रे हजर केलेली आहेत त्यावरुन असे दिसते की, वाहनाचे काही भागात पाणी गेले होते तर काही भाग कोरडा होता. डीकीमध्ये पाणी गेले नव्हते असे सर्व्हेक्षकाचा अहवाल म्हणतो. वाहनाची सीट देखील फार खराब झालेली नव्हती. या परिस्थितीमध्ये तक्रारदारांनी वाहन ओढून नेण्यापुर्वी जर वाहन सुरु करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यामध्ये तक्रारदारांचा निष्काळजीपणा होता असे म्हणता येणार नाही. वाहन चालविणारी कोणतीही व्यक्ती सर्वसाधारण परिस्थितीमध्ये वाहन बंद पडल्यानंतर प्रथमतः चालु करण्याचा प्रयत्न करते. व वाहन जर चालु होत नसेल तरच अन्य वाहनास जोडून ते दुरुस्ती केंद्रापर्यत पोहचविले जाते. तक्रारदारांनी त्या प्रकारचा प्रयत्न केला असल्यास त्यात चुक केली व ती चुक विमा कराराचा भंग होण्या इतपत गंभीर होती असा निष्कर्ष काढता येत नाही. या प्रकारची तांत्रिक बाब तकारदारांचे लक्षात आली नसेल. तसेच केवळ त्या चुकीवरुन विमा कराराचा भंग होतो असा निष्कर्ष काढणे इतपत विमा कराराचे अपवादाचे कलम 4 सुस्पष्ट नाही. सा.वाले हयांनी आपले कथनास पुष्टी मिळणेकामी मा.राष्ट्रीय आयोगाचे न्याय निर्णयाचा संदर्भ दिला. मा.राष्ट्रीय आयोगाने युनायटेड इंडिया इनश्युरन्स कंपनी विरुध्द दिनदयाल II 2009 CPJ 45 (NC) या प्रकरणात असा अभिप्राय नोंदविला की, सर्व्हेक्षकांचा अहवाल हा महत्वाचा पुरावा असल्याने सर्वसाधारण परिस्थितीत तो नाकारला जाऊ नये. त्याच प्रकारचा अभिप्राय मा.राष्ट्रीय आयोगाच्या नॅशनल इनश्युरन्स कंपनी लिमिटेड विरुध्द बान्सी डिसोझा II (2009) CPJ 110 (NC) या प्रकरणात नोंदविला आहे. त्या दोन्ही निर्णयाचे प्रस्तुत मंचाचे वाचन केले आहे. प्रथम प्रकरणामध्ये सर्व्हेक्षकांनी तक्रारदारांसोबत चर्चा करुन व सहमतीने अहवाल दिला होता. तर दुस-या प्रकरणामध्ये अपघातात तक्रारदारांचे गोडावून मधील मालास लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल दाखल केलेल्या तक्रारी विरुध्द होती. प्रस्तुत प्रकरणात परिस्थिती वेगळी होती. सर्व्हेक्षकांचा अहवाल तांत्रिक बाबीवर आधारीत होता. व न्याय निर्णयाचे वरील भागात नमुद केल्याप्रमाणे तो तर्कावर आधारीत आहे. 18. या उलट तक्रारदारांनी आपल्या लेखी युक्तीवादासोबत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यु इंडिया इनश्युरन्स कंपनी लिमिटेड विरुध्द प्रदिप कुमार 2009 ACJ 1729 या प्रकरणाचा आधार घेतला. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा अभिप्राय नोंदविला की, सर्व्हेक्षकांनी दिलेला अहवाल हा अंतीम नसुन तो विमा कंपनी तसेच विमा काढणारी व्यक्ती याचेवर बंधनकारक नसतो. त्या प्रकरणात विमा करार हा ट्रकचे संदर्भात होता. सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने मोटर वाहन कायद्याचे कलम 64 आपल्या निकालपत्रामध्ये उधृत केले. कलम 64 चे परंतुक जे सर्वोच्च न्यायालयाने उधृत केले ते असे स्पष्ट करते की, विमा कंपनीस सर्व्हेक्षकांचे अहवालापेक्षा वेगळा निर्णय घेता येईल. या तरतुदीवर आधारीत सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदविला की, सर्व्हेक्षकांचा अहवाल अंतीम नसतो. 19. वर चर्चा केल्याप्रमाणे व नोंदविलेल्या निष्कर्षाप्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना वाहन दुरुस्तीचे खर्चाबद्दल केवळ रु.30,065/- देण्याचे ठरवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष नोंदवावा लागतो. 20. सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांना दिलेले देयक रु.2,49,749/- असे होते. मुळचे देयक तक्रारदारांनी आपले अर्जासोबत दाखल केलेले आहे. प्रस्तुतचे प्रकरणात तक्रारदारांचे अर्जावरुन प्रस्तुत मंचाने दिनांक 28.4.2008 रोजी अंतरीम आदेश पारीत केला व तक्रारदारांना असे निर्देश दिले की, तक्रारदारांनी संपूर्ण रक्कम मंचाकडे जमा करावी व त्यापैकी 50 टक्के रक्कम सा.वाले क्र.3 यांना अदा करावी व सा.वाले क्र.3 यांनी वाहनाचा ताबा तक्रारदारांना द्यावा. या प्रकारचा आदेश जारी करीत असतांना त्या वेळेस मंचाने असा अभिप्राय नोंदविला की, तक्रारदारांची तक्रार प्रलंबीत आहे व ती निकाली निघण्यास बराच वेळ लागेल. विमा कंपनी तक्रारदारांना किती रक्कम देय आहे याची निश्चिती तक्रारीच्या निकालानंतर होईल. पंरतु तक्रारदारांचे वाहन सा.वाले क्र.3 यांचेकडे विनाकारण पडून असल्याने वाहनात अधिक बिघाड होऊ नये म्हणून त्या प्रकारचा अंतरीम आदेश करण्यात आला. त्या आदेशावर आधारीत तक्रारदारांनी प्रस्तुत मंचाकडे रु.2,91,749/- दिनांक 22.5.2008 रोजी जमा केले. त्या रक्कमेपैकी रिम्मी रक्कम म्हणजे रु.1,45,874/- सा.वाले क्र.3 यांना धनादेशाव्दारे अदा करण्यात आली. बाकीची रक्कम प्रस्तुत मंचाकडे प्रलंबीत आहे. वर चर्चा केल्याप्रमाणे सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असल्याचा निष्कर्ष नोंदविल्यावरुन विमा कंपनीने तक्रारदारांना वाहन खर्चाची संपूर्ण रक्कम विमा कराराप्रमाणे अदा करावी लागेल. तथापी प्रस्तुत मंचाकडे तक्रारदारांनी जमा केलेल्या रक्कमेपैकी शिल्लक रक्कम म्हणजे रु.1,45,874/- सा.वाले क्र.3 यांना मंचाला तक्रारदारांचे वतीने अदा करावी लागेल व प्रस्तुत तक्रारीतील न्याय निर्णयाप्रमाणे तक्रारदार क्र.1 विमा कंपनी ही वाहन दुरुस्तीची संपूर्ण रक्कम रु.2,91,749/- तक्रारदारांना व्याजासह अदा करेल. सा.वाले विमा कंपनी यांनी कुठलेही सबळ व समाधानकारक कारण नसतांना सर्व्हेक्षकाचे केवळ तर्कावर आधारीत निरीक्षणावरुन वाहन दुरुस्तीची संपूर्ण रक्कम अदा करण्याचे नाकारले. त्यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते. सहाजिकच सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना वाहन दुरुस्ती खर्चाची रक्कम 9 टक्के व्याजासह मागणी नाकारल्याच्या दिनांकापासुन म्हणजे दिनांक 14.11.2007 पासून तक्रारदारांना अदा करावी. तक्रारदारांना रक्कम व्याजासह प्राप्त होणार असल्याने नुकसान भरपाईबद्दल वेगळा आदेश करण्याची आवश्यकता नाही. 21. वरील निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 112/2008 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमा कराराचे संदर्भात तक्रारदारांचे वाहन दुरुस्त खर्चाची रक्कम संपूर्णपणे देय करण्याचे नाकारुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते. 3. सामनेवाले क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदारांना रु.2,91,749/- दिनांक 14.11.2007 पासून 9 टक्के व्याजासह प्रस्तुत न्यायनिर्णयाची प्रत प्राप्त झाल्यापासून आठ आठवडयाचे आत अदा करावी. 4. तक्रारदारांनी प्रस्तुत मंचाकडे जमा केलेली रक्कम रु.2,91,749/- पैकी शिल्लक रक्कम रु.1,48,875/- सामनेवाले क्र.3 यांना अदा करावी व ती रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मुदत ठेवीमध्ये गुंतविली असल्यास त्यावर प्राप्त होणारे व्याजदेखील सामनेवाले क्र.3 यांना देण्यात यावे. 5. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारीच्या खर्चाबद्दल तक्रारदारांना रक्कम रुपये 5,000/ अदा करावेत. 6. तक्रार सामनेवाले क्र.2 व 3 यांचे विरुध्द रद्द करयात येते. 7. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |