निकालपत्र:- (दि.30/05/2011) (व्दारा-सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला सदर मंचासमोर वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले तक्रारदार व सामनेवाला यांचे वकील यांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार सामनेवालांनी खराब बॅटरी देऊन गॅरंटी कालावधीमध्ये बंद पडलेने त्याचे दुरुस्तीबाबतची सेवा पुरवली नसलेने दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-तक्रारदार ही सहकारी संस्था असून तिची नोंदणी सहकार कायदा 1960 नुसार झाली आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र माळवाडी(माजगांव) ता.पन्हाळा जि.कोल्हापूर हे आहे. तेथे दुध संकलन केले जाते. यातील सामनेवाला ही रिकंडीशन बॅटरी विक्री, चार्जींग व रिपेअरी करण्याचा व्यवसाय करते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून दि.26/06/2009 रोजी कॅश मेमो नं.596 ने अल्फा कंपनी फुल असिड चार्जिंग न्यू बॅटरी नग एक बॅटरी नं.01091162 दोन वर्षे गॅरंटीने खरेदी केली होती. त्यानंतर दि.26/06/2009 ते 30/12/2010 या काळात सुरळीत चालू होती. ती 30 डिसेंबर-2010 रोजी बंद पडली. तिचा गॅरंटी कालावधी असल्याने तक्रारदाराने सामनेवालाकडे दि.08/1/2011 रोजी बॅटरी बदलून किंवा दुरुस्त करुन मिळणेसाठी विनंती करुन जमा केली. तशी पोचही सामनेवाला यांनी तक्रारदारास दिली आहे. मात्र सामनेवाला यांनी सदर बॅटरी बदलून मिळणार नाही तर ती दुरुस्तीसाठी रक्कम रु.2,400/- खर्च येणार आहे तो भरा म्हणजे दुरुस्त करुन देता येईल असे तोंडी सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.11/01/2011 रोजी सामनेवालांकडे जाऊन बॅटरी बदलून मिळणेबाबत विचारले असता दि.14/01/2011 रोजी फोनवर चर्चा केली पण सामनेवाला यांनी बॅटरी बदलून देणेबाबत ठाम नकार दिला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वारंवार विनंती करुनही सामनेवाला यांचेकडून बॅटरी दुरुस्त करुन देणेबाबत कोणतेही सहकार्य मिळाले नाही. म्हणून दि.18/01/2011 रोजी रजिस्टर ए.डी.ने पत्र पाठवून बॅटरी बदलून देणेबाबत मागणी केली तसेच सदर बॅटरी बदलून न दिलेस संस्थेच्या दररोजच्या होणा-या नुकसानीस आपणास जबाबदार धरणेत येऊन योग्य त्या कोर्टात आपलेविरुध्द दाद मागणी लागणार याची नोंद घ्यावी असे कळवले. सामनेवाला यांना पत्र मिळाले असूनही त्यांनी कोणतेही उत्तर तक्रारदारांना पाठवले नाही. सबब तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर व्हावी व सामनेवाला यांनी तक्रारदारास बॅटरी बदलून किंवा दुरुस्त करुन दयावी. किंवा बॅटरीची किंमत रु.4,200/-, तक्रारदार संस्थेचे झालेले नुकसान रु.3,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- असे एकूण रक्कम रु.13,200/- सामनेवालाकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांचेकडून बॅटरी खरेदी केलेला कॅश मेमो, सामनेवालांचे दुकानात बॅटरी जमा केलेची पोच, सामनेवाला यांना रजि.ए.डी.ने पाठविलेले पत्र व रजि.ए.डी. ची पावती क्र.6804, सामनेवाला यांना सदर पत्र मिळालेबाबतचा पोष्टाचा दाखला, कार्यकार समिती सभा दि.24/02/2011 ठराव क्र.3 चा लागूपुरता उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला यांनी दाखल केले लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार खोटी, लबाडीची व बेकायदेशीर आहे. तक्रारदार ही दूध संकलन-उत्पादक-खरेदी विक्री करणारी व्यावसायिक व्यापारी सहकारी संस्था आहे. तक्रारदार संस्थेने त्यांचे नित्य कामकाजासाठी, व्यापारासाठी व व्यवसायाकरिता प्रस्तुत सामनेवाला यांचेकडून बॅटरी खरेदी केली होती. सदरचा व्यवहार हा व्यापारी स्वरुपाचा आहे व तो कमर्शिअल पर्पजसाठी असलेने मे.मंचात तक्रार दाखल करणेचा अधिकार तक्रारदारास नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.26/06/2009 रोजी बॅटरी नंबर 010919162 टाईप A-70 ZP ही अल्फा या ट्रेडनेमची आणि पुष्पक इंडस्ट्रीज जयसिंगपूर या मॅन्यूफॅक्चरींग कंपनीची बॅटरी तक्रारदारास विकत दिली आणि त्यावेळी वॉंरटी कार्डही सही करुन दिले त्या वॉरंटी कार्डानुसार वॉंरंटी पिरियड 12 महिन्याचा असलेबाबत स्पष्ट उल्लेख आहे. सबब वॉंरटी पिरियड हा दि.25/06/2010 रोजी संपुष्टात आला आहे. सबब सदर तक्रारीस मुदतीची बाधा येतो. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी अस्सल कागदपत्र दाखल केलेली नाहीत तर त्याच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. तक्रारदारास अस्सल प्रती दाखल करणेस कोणतीच अडचण नव्हती. तक्रारदाराने दाखल केलेल्या कॅश मेमोच्या झेरॉक्स प्र्रतीवर 2 वर्षे गॅरंटी असे लिखाण आहे ते सामनेवाला यांचे हस्ताक्षरात नाही. सदर कॅश मेमो वरील हस्ताक्षर हे संजय वडाम नामक तक्रारदाराच्या इसमाचे आहे आणि त्याचाच गैरफायदा घेऊन सदर संजय वडामने 2 वर्षे गॅरंटी असे शब्द लिहून स्वत:ची सही अगर इनिशियल केलेचे दिसून येते. मात्र तशा दुरुस्तीखाली सामनेवाला यांची सही नाही. याचाच अर्थ तक्रारदाराने संजय वडाम यांच्या सहाय्याने सरळ सरळ खोटेपणाने मजकूर परस्पर लिहून फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केला आहे. त्यामुळे हा कागद पुराव्यात वाचताच येणार नाही. त्याच प्रमाणे अनुक्रमांक 2 चा कागद हा संजय वडाम यांच्या हसताक्षरात असून सदर बॅटरी सामनेवालांकडे जमा केलेवर त्याखाली सामनेवाला यांनी सही केली आहे. ही बॅटरी तक्रारदाराने दुरुस्तीसाठी दि.08/01/2011 रोजी दरम्यान सामनेवाला यांचेकडे दिली आणि त्याच वेळी वॉरंटी कार्डही सामनेवालास दिले व ते अस्सल वॉंरंटी कार्ड या कामी सामनेवाल यांनी दाखल केले आहे. त्यावरील मजकूर खरा व बरोबर असून त्यावर सामनेवाला यांची सही आहे. प्रस्तुत तक्रारदाराने बॅटरी दुरुस्ती करणेस सांगितले त्यावेळी सामनेवाला ने सदर बॅटरीच्या वॉंरंटीची मुदत दि.25/06/2010 रोजी संपलेचे सांगितले व त्या बॅटरीच्या दुरुस्तीसाठी होणारा खर्च दयावा लागेल असे सांगितले. तक्रारदाराने कबूल केलेप्रमाणे सदर बॅटरी दुरुस्त करुन ठेवली आहे. मात्र ती बॅटरी नेणेस तक्रारदार फिरकलेही नाहीत. तक्रारदाराने बॅटरी खरेदी केलेपासून दिड वर्षापेक्षा जास्त काळ त्या बॅटरीचा उपयोग तक्रारदारांनी घेतलेला आहे. त्यामुळे सदर तक्रार अर्जात बॅटरीची मूळ किंमत रु.4,200/-ची मागणी चुकीची, बेकायदेशीर व खोटेपणाची असलेने सामनेवाला यांना मान्य नाही. तसेच रु.3,000/-ची नुकसान भरपाईच्या मागणीस कोणताही पुरावा नाही. तसेच वेल सेटल्ड लॉ प्रमाणे संस्थेस मानसिक त्रास होत नसतो व तसा झालेलाही नाही. त्यामुळे मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/-व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.1,000/-खोटी व लबाडीची असलेने सामनेवाला यांना मान्य नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चसह नामंजूर करुन तक्रारदाराकडून सामनेवाला यांना रु.10,000/- कॉम्पेसेंटरी कॉस्ट देणेबाबत आदेश व्हावा अशी विंनती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे तसेच तक्रारदाराचा व सामनेवाला यांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सदर तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे का? --- होय. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- अ) सामनेवाला यांनी प्रस्तुतची बॅटरी ही वाणिज्य हेतूने खरेदी केली असलेने प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नसलेचा आक्षेप घेतलेला आहे. याचा विचार करता तक्रारदार संस्था ही बॅटरी विक्रीचा व्यवसाय करणारी संस्था नसून दुध संकलन करणारी सहकारी तत्वावर चालणारी संस्था आहे. विज भार नियमनामुळे काजकाजासाठी प्रकाश मिळणेसाठी प्रस्तुत बॅटरी तक्रारदार संस्थेने सामनेवालांकडून घेतली आहे. यामध्ये कोणताही वाणिज्य हेतू दिसून येत नाही. सबब सामनेवाला यांचा हा आक्षेप फेटाळणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. ब) प्रस्तुत तक्रारीतील बॅटरीचा पिरियड हा दि.25/06/2010 रोजी संपुष्टात आलेने तक्रारीस मुदतीचा बाध येत असलेचे सामनेवाला यांचे प्रतिपादनाचा विचार करता प्रस्तुतची तक्रार तक्रारीस कारण घडलेपासून दोन वर्षाच्या आत दाखल केलेली आहे. सबब प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वरील विवेचनाचा विचार करता प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.26/06/2009 रोजी बॅटरी नंबर 010919162 टाईप A-70 ZP ही अल्फा या ट्रेडनेमची आणि पुष्पक इंडस्ट्रीज जयसिंगपूर या मॅन्यूफॅक्चरींग कंपनीची बॅटरी विकत दिली हे मान्य केले आहे. मात्र सदर बॅटरीस 1 वर्षाची वॉरंटी असलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच सामनेवाला यांनी वॉरंटी कार्ड सही करुन दिले होते ते सामनेवालांनी सदर कामी दाखल केले आहे. तक्रारदाराने नमुद वॉरंटीचे दि.26/06/2009 ची खरेदीची अस्सल पावती प्रस्तुत प्रकरणी दाखल केली आहे. सदर पावतीवर सामनेवालांनी सही केलेचे मान्य केले आहे. मात्र पावतीवरील लिखीत मजकूर हा सामनेवालांनी लिहिलेला नसून वडाम यांनी लिहीलेचे नमुद केले आहे. मात्र सर्वसाधारण व्यवहाराचा विचार करता प्रत्येक विक्रेत्याची जबाबदारी असते की पावती देताना सदर मजकूर व्यवस्थित भरणे. मजकूराची खात्री करुन व मगच सही करुनच खरेदीदाराच्या ताब्यात देणे कायदयाने अपेक्षित आहे. मात्र येथे विक्रेत्याने सही करुन पावती दिलेचे मान्य केले आहे. मात्र सदर पावतीवरील मजकूर त्याने लिहीलेचे अमान्य केला आहे. वादाकरिता अशा प्रकारे को-या विनामजकूराची पावती सही करुन दिल्यास त्याची जबाबदारी विक्रेत्यावरच येते. सबब अशा प्रकारच्या पावत्या देणे व नंतर त्यामधील मजकूर नाकारणे हीसुध्दा सेवेतील गंभीर त्रुटी आहे. नमुद पावतीवरील लिखीत मजकूराखाली सामनेवालांची सही आहे. ती त्यांनी मान्य केली आहे. मात्र मजकूर अमान्य केला आहे. याचा विचार करता सदर पावतीवर दिलेल्या मजकूरास विक्रेता बांधील आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस वॉरंटी कार्ड दाखल केले आहे. त्यावर कंपनीची 1 वर्षाची वॉंरटी असताना 2 वर्षाची वॉरंटी कशी देईन? असा मुद्दा उपस्थित केला आहे. याचा विचार करता सदर खरेदी पावतीच्या बाहेर सामनेवालांना जाता येणार नाही. सदर पावतीवर 2 वर्षे गॅरंटी असे नमुद केले आहे. त्याखाली सदर पावतीवर सामनेवालांची सही आहे व सही सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. सबब पावतीवरील मजकूरास सामनेवाला बांधील आहेत. त्याचे मागे त्यांना आता जाता येणार नाही. सबब सदर पावतीवर नमुद केलेप्रमाणे 2 वर्षाची गॅरंटी सामनेवाला विक्रेत्याने दिली असलेने बॅटरी बदलून किंवा दुरुस्त करुन मिळणेस तक्रारदारदार पात्र आहे. सबब तक्रारदाराने प्रस्तुत बॅटरी दुरुस्त होऊन मिळणेबाबत योग्य ते प्रयत्न केले आहे. नोटीस पाठवलेली आहे. त्यास सामनेवालांकडून दाद मिळेना. सबब सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब तक्रारदाराने केले विनंती प्रमाणे बॅटरी दुरुस्त होऊन मिळणेस विनंती केली आहे. सामनेवाला यांनी बॅटरी दुरुस्त करुन दयावी. बॅटरी दुरुस्त होत नसलेस नवीन बॅटरी बदलून दयावी अथवा बॅटरीची खरेदीची रक्कम तक्रारदारास अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3:- युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला यांचे वकीलांनी बॅटरी दुरुस्त करुन ठेवलेबाबतच्या केलेल्या कथनाची न्यायीक नोंद या मंचाने घेतलेली आहे. तक्रारदार ही एक संस्था असलेने मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस तकारदार संस्था पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदार संस्थेस तक्रारीत नमुद बॅटरी दोषरहीत व चालण्यास योग्य अशाप्रकारे दुरुस्त करुन दयावी. अथवा सदर बॅटरी दुरुस्त होत नसलेस नवीन त्याच मॉडेलची नवीन दोषरहीत बॅटरी दयावी अथवा सामनेवाला यांनी तक्रारदारास बॅटरी खरेदीची रक्कम रु.4,200/- तक्रारदारास परत दयावी. 3) सामनेवाला यांनी तक्रारदार संस्थेस खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त)अदा करावी.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |