जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.190/2008. प्रकरण दाखल दिनांक – 22/05/2008. प्रकरण निकाल दिनांक – 14/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते अध्यक्ष (प्र) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. श्री.विलास पि.त्रिंबकराव लाठकर, अर्जदार. वय वर्षे 69, व्यवसाय निरंक, रा.शाश्वत निवास,विस्तारीत काबरानगर,नांदेड.. विरुध्द. मेसर्स अष्टविनायक सेल्स अन्ड सर्व्हीस, गैरअर्जदार. दुकान नं.6,7 शुक्ला कॉम्प्लेक्स, गोदावरी हॉटेलच्या समोर,नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.आर.एम.डावरे. गैरअर्जदारा तर्फे - एकतर्फा. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार श्री. विलास पि.त्रिंबकराव लाठकर यांनी स्वतःच्या करमणुकीसाठी दि.06/04/2008 रोजी व्हिडीओकॉन कंपनीचा 21 इंच मॉडेल नं.5490 पीएल सी.नं.110208010128100879 दुरचित्रवाणी संच रु.7,500/- नगदी देवून पावती क्र.696 द्वारे गैरअर्जदार यांचेकडुन खरेदी केला. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दुरचित्रवाणी संच घेवून जा व आमचा माणुस येवून चालु करुन देईल असे सांगितलेवरुन अर्जदार यांनी तो घरी नेला. गैरअर्जदार यांना अनेक वेळा विनंती करुनही दुरचित्रवाणी संच सुरु करुन दिला नाही. त्यांचा प्रतिनीधी दुरचित्रवाणी संच सुरु केला असता तर त्यामध्ये तांत्रिक बिघाड आढळुन आली. त्यांच्या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे अर्जदाराने बुस्टर,एन्टीना,वायर, पिन रु.500/- देवून गणेश इलेकट्रॉनिक्स या दुकानातुन आणला आणि त्यानंतर त्यांचा प्रतिनीधी ते वस्तु जोडुन संच सुरु करण्याचा प्रयत्न केला असता, संच सुरुच झाला नाही. गैरअर्जदार यांची समक्ष भेट घेवून सदरील संच बदलुन देण्याची विनंती केली असता, त्यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. दुरचित्रवाणी सुरु न झाल्यामुळे त्यास करमणुकीस मुकावे लागले. म्हणुन त्यांना मानसिक त्रास झाला. गैरअर्जदार यांनी सदोष दुरचित्रवाणी संच पुरवठा करुन सेवेत कमतरता केली. म्हणुन त्यांची मागणी आहे की, सदरील नादुरुस्त दुरचित्रवाणी संच गैरअर्जदार यांच्याकडुन बदलुन मिळावे किंवा त्यांची किंमत रु.7,500/- व मानसिक त्रास आणि दावा खर्च मिळावा. यातमध्ये गैरअर्जदार यांना या मंचाद्वारे नोटीस देण्यात आली. नोटीस तामील होऊन ते हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी आपल्या अर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्र व शपथपत्र दाखल केले. त्यांचे तर्फे वकील आर.एम.डावरे यांनी युक्तीवाद केला. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय? होय. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडुन व्हिडीओकॉन या कंपनीचा रंगीत दुरचित्रवाणी संच 21 इंच मॉडेल नं.5490 पीएल. सी.नं.110208010128100973 असा दि.06/04/2008 रोजी पावती क्र. 696 ने रक्कम रु.7,500/- देऊन गैरअर्जदार यांच्याकडुन खरेदी केलेला आहे. याबाबत अर्जदार यांनी रक्कम गैरअर्जदार यांना दिली. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दिलेली पावती व वॉरंटी कार्ड दाखल केलेले आहे. सदरील कागदपत्रांचा विचार करता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 - अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या दुकानातुन दुरचित्रवाणी संच स्वखर्चाने घेरी नेल्यानंतर अर्जदार यांच्या विनंतीवरुन गैरअर्जदार यांच्या प्रतिनिधीने संच सुरु केले असता, संचात अस्पष्टता व आवाज येत नव्हता, त्यावेळी सदर प्रतिनिधीने दुरचित्रवाणी संचात काही इतर बिघाड आहे नंतर येऊन दुरुस्त करतो, असे सांगुन निघुन गेला. त्यानंतर गैरअर्जदार यांनी अनेकदा विनवणी केल्यानंतर त्यांचा प्रतिनिधी अनील हमदे यास संचाची पाहणी करण्यास पाठविले त्यावेळी सदरील संचात आवाज व सुस्पष्टता येण्यासाठी बुस्टर, अंटीना, वायर,पीन व इतर वस्तु आणल्या शिवाय संच सुरु होणार नाही असे सांगितल्यावरुन अर्जदारांनी सदरचे सर्व वस्तु गणेश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातुन रक्कम रु.500/- यास खरेदी केलेले आहेत, त्याबाबतची पावती अर्जदाराने मे.मंचामध्ये अर्जासोबत दाखल केले आहे. सदर सर्व वस्तु आणल्यानंतर गैरअर्जदार यांच्या प्रतिनिधीने अर्जदार यांच्याकडे येऊन दुरचित्रवाणी संच चालु करण्याचा प्रयत्न केला. परंतु सदरचा संच योग्य प्रकारे चालु होत नव्हता. त्यामुळे गैरअर्जदाराच्या प्रतिनिधीने सदरील संच बदलून घ्यायात तांत्रिक दोष असुन तो दुरुस्त होणे शक्य नाही असे सांगितले, त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदार यांची समक्ष भेट घेऊन दुरचित्रवाणी संच बदलुन देणे विषयी अथवा संचाची रक्कम परत करण्या विषयी विनंती केली असता, गैरअर्जदारांनी त्यास स्पष्ट नकार दिला. सदर कामी मंचा मार्फत काढलेली नोटीस गैरअर्जदार यांना तामील झालेली आहे तरी पुढे गैरअर्जदार यांनी या मंचामध्ये हजर राहुन अर्जदार यांचे अर्जातील कथन कोणत्याही प्रकारे नाकारलेले नाही अगर त्या बाबत कोणतेही कागदोपत्री पुरावा व शपथपत्र या कामी या मं.मंचामध्ये दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन दि.06/04/2008 रोजी व्हिडीओकॉन या कंपनीचा रंगीत दुरचित्रवाणी संच गैरअर्जदार यांचेकडुन खरेदी केल्याचे त्यांनी दाखल केलेले पावतीवरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी दाखल केलेले वॉरंटी कार्डचे अवलोकन केले असता, सदर वॉरंटी कार्डामध्ये The one year warranty on the T.V. set covers all spairs and C.P.T.असे नमुद केल्याचे दिसुन येते. अर्जदार यांनी दि.06/04/2008 ला दुरचित्रवाणी संच खरेदी केल्यानंतर तो व्यवस्थीत चालु न झाल्याने अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या समक्ष सदरील संच बदलुन देण्याची अथवा संचाची रक्कम परत करण्या विषयीची मागणी गैरअर्जदार यांनी नाकारलेली आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना वॉरंटी कालावधीमध्ये असतांना सुध्दा सदरचे दुरचित्रवाणी संच बदलुन दिलेले नाही अगर दुरचित्रवाणी संचाची रक्कमही परत केलेली नाही, याचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्या मध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रोख रक्कम देऊन दुरचित्रवाणी संच घेतलेले आहे. सदरचा दुरचित्रवाणी संच नादुरुस्त असलेने दुरचित्रवाणी संच बदलुन देण्याची मागणी गैरअर्जदार यांचेकडे केलेली आहे. परंतु गैरअर्जदार यांनी सदरचे दुरचित्रवाणी संच बदलुन दिलेला नाही अगर संचाची रक्कमही परत केलेली नाही अगर त्याबाबत कोणताही पाठपुरावा केल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे अर्जदार यांना सदरच्या मंचामध्ये अर्ज दाखल करुन दाद मागावी लागली आहे त्यासाठी निश्चितच खर्चही करावा लागला आहे याचा विचार होता अर्जदार हे मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व अर्जाचा खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदाराचा अर्ज,शपथपत्र, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व अर्जदारा तर्फे केलेला वकीलांचा युक्तीवाद याचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. आज पासुन 30 दिवसांच्या आंत. 1. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना अर्जात नमुद केलेले नादुरुस्त व सदोष दुरचित्रवाणी संच बदलुन द्यावा. 2. तसे न केल्यास गैरअर्जदार यांनी दुरचित्रवाणी संचाची किंमत रक्कम रु.7,500/- द्यावी. सदर रक्कमेवर 9 टक्के दराने प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत दि.06/04/2008 पासुन व्यासहीत होणारी रक्कम अर्जदार यांना द्यावी. 3. मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व दावा खर्चापोटी रु.1,000/- द्यावेत. 4. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीशसामते) सदस्या अध्यक्ष (प्र) गो.प.निलमवार. लघुलेखक. |