- आ दे श –
(पारित दिनांक – 19 जुलै, 2018)
श्रीमती दिप्ती अ. बोबडे, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याची सदर तक्रार वि.प.कडून खरेदी केलेल्या सदनिकेमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध न केल्याने ग्रा.सं.का.चे कलम 12 खाली दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याने दि.23.08.2012 च्या विक्रीपत्रानुसार वि.प.क्र. 1 ते 4 यांचेकडून सदनिका विकत घेतली होती. मौजा-वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथील एकदंत अपार्टमेंट टाईप अ मधील सदनिका क्र. 402 व 403 तक्रारकर्त्याच्या मालकीची असून ते स्वतः तेथे राहतात. तक्रारकर्त्याला सदर सदनिका विकत घेण्या अगोदर अपार्टमेंटमध्ये लिफ्टची सुविधा, जनरेटर बॅकप सहित तसेच इतर सुविधा आहेत असे वि.प.ने सांगितले होते. तसे त्याने नोंदणीकृत करारनाम्यामध्येही नमूद केले असल्याने तक्रारकर्त्याने सदर अपार्टमेंटमध्ये चौथ्या माळ्यावर सदनिका घेतल्या होत्या. लिफ्ट सुविधा व इतर सुविधेबाबत तक्रारकर्त्याने वि.प.कडे बरेचदा मागण्या करुनही वि.प.ने त्याकडे दुर्लक्ष करुन उलट काम लवकरच पूर्ण करुन देण्याचे खोटे आश्वासन दिले. सदनिका चौथ्या माळयावर असल्याने त्याला जाणे-येणे करण्याकरीता लिफ्टची अत्यंक आवश्यकता आहे आणि लिफ्ट नसल्याने त्याला सदनिका भाडयाने देता येत नाही व त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत पुढे असे नमूद केले आहे की, वि.प.क्र. 1 यांचे संपूर्ण ख.क्र.104, वानाडोंगरी येथे अपार्टमेंटची वसाहत वसविली असून प्रत्येक अपार्टमेंटला वेगवेगळे नाव देण्यात आले आहे. वि.प.च्या संपूर्ण अपार्टमेंटमधील निवासी लोकांनी दि.18.09.2016 रोजी एक समिती बनविली असून त्यामध्येसुध्दा इतर लोकांनी ब-याच तक्रारी केल्या आहेत. तक्रारकर्त्याच्या मागणीस वि.प. टाळाटाळ करीत असल्याने दि.05.09.2016 ला तक्रारकर्त्याने वकिलामार्फत वि.प.ला रीतसर नोटीस पाठविली. त्याला वि.प.ने 10.10.2016 रोजी खोटे उत्तर दिले म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन वि.प.क्र. 1 ते 4 यांनी मौजा-वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर, ख.क्र.104 येथील एकदंत अपार्टमेंट टाईप-अ मध्ये लिफ्ट जनरेटर बॅक अप सहित व इतर उर्वरित कामे पूर्ण करुन द्यावी, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने तक्रारीचे पुष्टयर्थ दस्तऐवज क्र. 1 ते 8 दाखल केलेले आहेत.
3. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 4 व 5 यांचेवर नोटीस बजावण्याबात कुठलीही पावले न उचलल्याने त्यांचेविरुध्द सदर तक्रार खारिज करण्यात आले. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर वि.प.क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे लेखी उत्तर दाखल केले. वि.प.ने लेखी उत्तरामध्ये तक्रारीवर काही प्राथमिक आक्षेप उपस्थित केले आहेत. वि.प.च्या मते तक्रारकर्त्याने सदर सदनिका ही भाडयाने द्यायच्या उद्देशाने घेतली असल्याने ती मंचासमोर चालविण्यायोग्य नाही. वि.प.च्या मते तक्रारकर्त्याने स्वतःच्या उपयोगाकरीता सदनिका घेतलेल्या नसल्याने सदर तक्रार खारिज होण्यास पात्र आहे. वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याने सदनिका क्र. 402 व 403 या रु.25,50,000/- मध्ये विकत घेतलेल्या आहेत हे मान्य करुन तक्रारकर्त्याने रकमा या अटीनुसार दिलेल्या नाहीत. वि.प.ने दोन्ही सदनिकांचे विक्रीपत्र करुन दिलेले आहे. विक्रीपत्र करुन दिल्यापासून सन 2016 पर्यंत तक्रारकर्त्याने लिफ्टबाबत कधीही मागणी केली नाही व दि.05.09.2016 ला कायदेशीर नोटीस पाठविली. तसेच वि.प.चया मते सदनिकाधारकांनी जी समिती स्थापन केली व त्यात काही निर्णय घेतलेले आहे ती नोंदणीकृत समिती नसल्याने त्यांचा निर्णय वि.प.वर बंधनकारक नाही. वि.प.ने लिफ्ट लावण्याकरीता ट्रांसफॉर्मर बसविले आहे व लिफ्टचे कामही सुरु आहेत. विज मंडळाकडे मागणी पत्रानुसार रक्कमसुध्दा भरण्यात आली व विज मंडळाने लिफ्ट लावण्याकरीता परवानगी मिळाल्याचेही वि.प.ने नमूद केले आहे. वि.प.ने त्याला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये तक्रारकर्त्याचा पत्ता नंदनवन येथील लिहिला आहे असे सांगितले असून यावरुन तक्रारकर्ता वादातील सदनिकेमध्ये (सदनिका क्र. 402 व 403) राहत नाही. म्हणून सदर सदनिका भाडयाने देण्याच्या दृष्टीने घेतल्याचे दिसून येते. सदर तक्रार ही मुदतबाह्य असून ती खारिज होण्यायोग्य आहे असे वि.प.ने लेखी उत्तरात नमूद केले आहे.
4. मंचाने तक्रारकर्त्यांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. वि.प. युक्तीवादाचे वेळेस गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
5. वि.प.ने सदर तक्रारीवर प्राथमिक आक्षेप उपस्थित करतांना सदर तक्रार ही मुदतबाह्य असल्याचे म्हटले आहे. परंतू मंचाचे मते सदनिकेच्या विक्रीच्या करारनाम्यामध्ये लिफ्टची सुविधा दर्शविण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात मात्र विक्रीपत्र करुन दिल्यावरही सदर सुविधा वि.प.ने आजपर्यंत उपलब्ध करुन दिलेली नाही, म्हणजे वादाचे कारण अखंड सुरु आहे, म्हणून सदर तक्रार मुदतबाह्य असल्याचा वि.प.चा आक्षेप निरर्थक असल्याचे मंचाचे मत आहे.
6. वि.प.ने दुसरा प्राथमिक आक्षेप असा घेतला आहे की, तक्रारकर्त्याने तक्रारीत लिफ्टची सुविधा नसल्याने सदनिका ही भाडयाने देता येत नाही असे म्हटले आहे व कायदेशीर नोटीसमध्ये तक्रारकर्त्याचा पत्ता हा नंदनवन येथील आहे. मंचाचे मते तक्रारकर्त्याने कायदेशीर नोटीसमध्ये जरीही नंदनवन येथील पत्ता लिहिला असला तरीही तक्रारीमध्ये मात्र त्याने विवादीत सदनिकेचाच पत्ता लिहिलेला आहे व सध्या त्याचे वास्तव्य तेथेच आहे असे नमूद केले आहे. वि.प.नेही कुठलेही दस्तऐवज मंचासमोर दाखल करुन हे स्पष्ट केले नाही की, तक्रारकर्ता तक्रारीत नमूद पत्यावर राहत नाही. याचाच अर्थ तक्रारकर्ता तक्रारीत नमूद पत्यावर राहतो. म्हणून वि.प.चा सदर आक्षेप मंचास मान्य नाही.
7. उभय पक्षांमध्ये सदनिका क्र. 402 व 403 खरेदीबाबत कुठलाही वाद नाही. वि.प.ने त्याच्या तक्रारीला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, सदर सदनिकेबद्दलची पूर्ण रक्कम तक्रारकर्त्याने त्याला दिली नाही. परंतू मंचास ही बाब मान्य नाही कारण ज्याअर्थी, वि.प. म्हणतो की, त्याने सदर सदनिकेकरीता खरेदी खत तक्रारकर्त्याला करुन दिले आहे. त्याअर्थी, वि.प.ने तक्रारकर्त्याकडून संपूर्ण रक्कम मिळाल्यावरच खरेदी खत करुन दिले असेल. तक्रारकर्त्याची तक्रार फक्त लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्याबाबत आहे. वि.प.ने तक्रारीला उत्तर देतांना त्याने लिफ्टबाबत विज मंडळाने पाठविलेली डिमांडबाबत रक्कम दिलेली आहे असे नमूद केले आहे. तसेच लिफ्टचे कामही सुरु आहे व विज मंडळाने त्याला परवानगी दिल्याचे म्हटले आहे. म्हणजेच लिफ्टची सुविधा वि.प. सदनिकाधारकांना देणार होते. परंतू सदनिकाधारक राहवयास आल्यानंतरही ही सुविधा वि.प.क्र. 1 ते 3 ने उपलब्ध करुन दिलेली नाही ही वि.प. यांच्या सेवेतील कमतरता आहे असे मंचाचे मत आहे आणि म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार दाद मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने इतर कामे असे तक्रारीत नमूद केले आहे. परंतू इतर कामे कोणती होती याचे विवरण तक्रारीत दिलेले नसल्याने त्याबाबत काहीही स्पष्ट होत नाही.
8. वि.प.ने लिफ्टची सुविधा देण्याचे कबूल करुनही सदनिकाधारक तेथे राहावयास आल्यावरही ती उपलब्ध करुन न देणे ही वि.प.ची कृती निश्चितच तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास देणारी आहे आणि म्हणून तक्रारकर्ता सदर त्रासाच्या नुकसानीकरीता भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1) वि.प.क्र. 1 ते 3 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी दि.24 जून, 2011 मधल्या करारनाम्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्ता सदनिकाधारकास मौजा-वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथील एकदंत अपार्टमेंट टाईप अ मध्ये लिफ्टची सुविधा जनरेटर बॅकअप सह 3 महिन्यात उपलब्ध करुन द्यावी.
2) वि.प.क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाच्या भरपाईदाखल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- द्यावे.
3) वि.प.क्र. 1 ते 3 ने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेश पारित झाल्याचे दिनांकापासून 3 महिन्याचे आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावी.
4) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.