द्वारा श्री.उ.वि.जावळीकर- मा.अध्यक्ष.
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. प्रस्तुत प्रकरणामध्ये ता.03.01.2009 रोजी तत्कालीन मंचाने न्याय निर्णय दिला होता. तथापि सामनेवाले यांनी त्या निर्णयावर प्रथम अपील क्रमांक-ए/09/174 दाखल केले. त्या अपीलावर आदेश देतांना मा.मा.राज्य आयोगाने ता.03.01.2009 रोजीचा या मंचाचा तक्रारदारांना बंगल्याचा ताबा देण्या विषयीचा निर्णय आदेशातील काही त्रुटींमुळे रद्द करुन या प्रकरणातील मुळच्या तक्रारीवर पुन्हा नव्याने निर्णय देण्याची प्रक्रीया सुरु करण्याचे आदेश दिले. या आदेशास अनुसरुन प्रस्तुत मंचाने या प्रकरणाचा नव्याने आढावा घेतला व त्यानुसार खालील प्रमाणे न्याय निर्णय देण्यात येत आहे.
न्यायनिर्णय
2. सामनेवाले ही अंबरनाथ येथील इमारत बांधकाम व्यवसायिक भागिदारी संस्था आहे. तक्रारदार हे उल्हासनगर येथील रहिवाशी असुन सामनेवाले यांनी अंबरनाथ येथील खुंटवली विभागात विकसित केलेल्या बंगल्यापैंकी एक बंगला विकत घेण्याच्या व्यवहारामधुन प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
3. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांनी अंबरनाथ येथे जे बंगले बांधले त्यापैंकी 1481 चौरस फुट क्षेत्रफळाचा तळमजला अधिक पहिला मजला, बंगला नंबर-2, श्री साईराम नगर,प्लॉट सर्व्हे नं.9/3, कोहोज खौंटावली ता.अंबरनाथ जि.ठाणे हा बंगला विकत घेण्याचे ठरवुन त्यानुसार तक्रारदाराने ता.01.10.2007 रोजी विरुध्द पक्षकारास रु.11,000/- इतकी बुकींग रक्कम बँकेच्या धनादेशाव्दारे प्रदान केली व बंगला नंबर-2,श्री साईराम नगर बुक केला. सदरच्या बंगल्याची एकूण विक्री किंमत उभयपक्षी रु.14,81,000/- अशी ठरली. सदर बंगल्याचा मोफा कायदयानुसार विक्री करारनामा करण्यासाठी सामनेवाले यांनी आणखी रकमेची मागणी केली. म्हणून तक्रारदारांनी रु.75,000/- आणि रु.50,000/- अशी रक्कम रु.1,25,000/- बँकेच्या धनादेशाव्दारे ता.14.10.2007 रोजी दिली. सदरचे सर्व धनादेश सामनेवाले यांचे खात्यावर जमा झाले. तरी सुध्दा सामनेवाले यांनी मोफा कायदयातील कलम-4 अन्वये विक्री करारनामा करुन दिला नाही. याउलट सामनेवाले यांनी उर्वरीत रक्कम देण्यासाठी तगादा लावणे चालु केले परंतु करारनामा तर केला नाहीच, शिवाय बँकेमधुन कर्ज काढण्यासाठी इतर आवश्यक कागदपत्रेही दिली नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने स्वप्रयत्नाने स्टेट बँकेशी संपर्क साधुन रु.13,00,000/- इतके कर्ज तत्वतः मान्य करुन घेतले, व मंजुरीची प्रत सामनेवाले यांना ता.20.12.2007 रोजी सुपुर्द केली. परंतु सामनेवाले यांनी ता.18.12.2007 रोजी पत्र लिहून तक्रारदाराचे बंगल्याचे नोंदणी/बुकींग रद्द केल्याचे कळविले. अशा प्रकारे सामनेवलो यांनी मोफा कायदयाचे कलम-4 चे उल्लंघन केले. सामनेवाले यांनी एकंदर रु.1,36,000/- तक्रारदाराकडून घेऊन बंगल्याचा करारनामा न केल्यामुळे त्यांनी सेवेमध्ये त्रुटी केली व कायदयाच्या तरतुदीचे अनुपालन न केल्यामुळे तक्रारदाराला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास झाला व त्यामुळे तक्रारदार यांनी ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल करुन खालील मागण्या केल्या.
(1) सामनेवाले यांनी सेवेमध्ये त्रुटी, न्युनता, बेजबाबदारपणा दाखविला व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, त्यासाठी जबाबदार ठरवावे, (2) सामनेवाले यांस तळमजला अधिक पहिला मजला चौरस फुट 1481 क्षेत्रफळाचा बंगला नं.2 श्री साईराम नगर, प्लॉट नं.9/3,कोहोज, खौटांवली,ता.अंबरनाथ जिल्हा-ठाणे येथील बंगल्याचे विक्री करारनामा करावयाचे आदेश दयावे, (3) बंगला नं.2 तळमजला अधिक पहिला मजला 1481 चौरस फुट क्षेत्रफळ प्लॉट नं.9/3 कोहोज खौंटावली ता.अंबरनाथ जिल्हा-ठाणे येथील बंगल्याचा ताबा दयावा. सदर बंगल्याचे 1481 चा अथवा सदर बंगल्याचे 1481 चौरस फुट क्षेत्रफळाचे चालु बाजारभावाप्रमाणे रक्कम अदा करावी, (4) वरील बंगल्यासंबंधी सामनेवाले यांनी किंवा त्यांचे नातेवाईक किंवा प्रतिनीधी यांनी कोणतेही तृतीय पक्षीय करार/व्यवहार करु नये, (5) वरील बंगल्यासंबंधी तक्रारदाराचे लाभात अंतरीम आदेश दयावे, (6) तक्रारदारास रु.2,50,000/- मानसिक नुकसानीपोटी भरपाई व रु.50,000/- न्यायीक खर्च प्रदान करावा, (7) अन्य फायदयाचे हुकूम तक्रारदाराचे लाभात व्हावेत.
4. तक्रारीची नोटीस सामनेवाले यांना निशाणी-5 व्दारे मिळाली. निशाणी-13 नुसार सामनेवाले यांनी लेखी जबाब सादर केले, त्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील सर्व कथने अमान्य केली. तक्रारदाराने रु.11,000/- दिले. नंतर रु.75,000/- दिले व शेवटी रु.50,000/- दिले. परंतु बंगल्याची किंमत रु.14,81,000/- पैंकी 10 टक्के रक्कम रु.1,48,100/- ऐवढी होते व तक्रारदाराने फक्त रु.1,36,000/- दिले. म्हणजे नियमानुसार कमी रक्कम दिली. तक्रारदारानेच कराराचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी झालेला विक्री व्यवहार रद्द केल्याचे सामनेवाले यांनी नमुद केले आहे.
5. तक्रारदारांनी आपले शपथपत्र, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद दाखल केला. सामनेवाले यांनी आपली कैफीयत पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला.
प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार व इतर सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे वाचन केले. त्यावरुन तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
(1)सामनेवाले यांनी तक्रारदाराबरोबर बंगला विक्री व्यवहार
करुन त्याप्रीत्यर्थ अनामत रक्क्म स्विकारुनही
तक्रारदाराशी बंगला विक्री करारनामा न करुन तसेच
तक्रारदारांना कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे
न देऊन पर्यायाने तक्रारदारांना बंगल्याचा ताबा न देऊन
सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केली हे तक्रारदार
सिध्द करतात काय ?.....................................................................होय.
(2) सामनेवाले यांना बंगल्याची उर्वरीत किंमत देऊन सामनेवाले
कडून बंगल्याचा ताबा मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत
काय ?.....................................................................................अंशतःहोय.
(3) अंतिम आदेश ?.................................................... तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
6. कारण मीमांसा—
(अ) तक्रारदार यांनी सामनेवालेकडून 1481 चौरस फुट क्षेत्रफळ आकाराचा बंगला तळमजला व पहिला मजला श्री साईराम नगर,प्लॉट सर्व्हे नं.9/3, कोंहोज खौंटावली,ता.अंबरनाथ जिल्हा-ठाणे येथे प्रथम रु.11,000/- ची रक्कम कॅनरा बँकेच्या नांवे काढलेला धनादेशाव्दारे सामनेवाले यांना देऊन ता.02.10.2007 रोजी बुक केला, तदनंतर रु.1,25,000/- देऊनही सामनेवाले यांनी बंगल्याचा करारनामा करुन दिला नाही. याउलट तक्रारदाराकडून उर्वरीत रकमेची मागणी चालु ठेवली व करारनामा रद्द करण्याची नोटीसही देण्यात आली.
(ब) दरम्यान तक्रारदारांनी बंगल्याची उर्वरीत रक्कम सामनेवालेना देण्याच्या दृष्टीने स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेण्यासाठी प्रयत्न चालु केले व त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे बँकेकडे सादर केली. त्यावर बॅंकेने तक्रारदारांना रु.13,00,000/- कागदपत्रांची पुर्तता करण्यासापेक्ष ता.20.12.2007 रोजी गृहकर्ज तत्वतः मंजुर केले व हे पत्र तक्रारदारांनी त्वरीत सामनेवाले यांना दिले व सामनेवाले यांना हे मिळाल्याचे सामनेवाले यांनी मान्यही केले आहे.
(क) यानंतर तक्रारदारांना कर्ज प्राप्तीसाठी आवश्यक ती कागदपत्रे व मोफा कायदयातील कलम-4 मधील तरतुदीनुसार बंगला विक्री करारनामा करुन देण्याचे टाळून सामनेवाले यांनी तक्रारदारांना ता.18.12.2007 रोजीचे पत्र पाठवून (जे प्रत्यक्ष तक्रारदारांना ता.23.12.2007 रोजी मिळाले) करारनामा रद्द केल्याचे कळविले व आपले पैसे परत घेऊन जाण्याची सुचना केली.
(ड) यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या वरील कृतीस तीव्र आक्षेप घेतला व त्वरीत करारनामा करुन देण्याची मागणी करुन उर्वरीत रक्कम विना विलंब देण्याची तयारी दर्शविली. परंतु त्यांस सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाहीच, शिवाय त्यापुढे जाऊन करारनामा रद्द करण्याची नोटीस दिली. याशिवाय सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असेही कथन केले आहे की, तक्रारदार हे नोकरीमध्ये स्थायी नसल्याने त्यांना बँकेचे कर्ज मिळत नव्हते, शिवाय बॅंकेचे प्रोसेंसिंग फीच्या रकमेसाठी दिलेला धनादेशही अनादर झाल्याने म्हणजेच त्यांची बंगला विकत घेण्याची आर्थिक क्षमता नसल्याने हा व्यवहार रद्द केला.
सामनेवाले यांचा सदरील युक्तीवाद म्हणजे त्यांनी काल्पनीक सबबी देऊन बंगला विक्री करारनामा रद्द करण्यासाठी केलेले समर्थन अयोग्य आहे. यावरुन सामनेवाले बंगला विक्री करारनामा तक्रारदारांबरोबर करण्यास तयार नव्हते व अयोग्य सबबी देऊनही व्यवहार रद्द करावयाचा होता हे स्पष्ट होते.
(इ) तक्रारदार यांनी ता.02.10.2007 रोजी रु.11,000/- देऊन बंगला बुक केला व तदनंतर लगेचच रु.1,25,000/- सामनेवाले यांना दिले. सामनेवाले यांनी सदरील रक्कम स्विकारुनही तक्रारदाराशी करारनामा न करता तसेच गृहकर्ज मिळविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे न देताही तक्रारदारांनी स्वयप्रयत्नाने रु.13,00,000/- तत्वतः मंजुर करुन घेतले. यावरुन तक्रारदार हे ख-या अर्थाने बंगला विकत घेण्यासाठी सर्वतोपरी सक्षम होते. परंतु बँक कर्जाची तत्वतः मान्यता सामनेवाले यांना सादर केल्यावर सामनेवाले यांनी करारनामा रद्द करण्याची धमकी देऊन तक्रारदारांवर अन्याय केल्याचे पर्यायाने, सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केल्याचे तक्रारदार सिध्द करतात.
वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
------ आ दे श -------
(1) तक्रार क्रमांक-92/2009 अंशतः मान्य करण्यात येते.
(2) सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून बंगल्याच्या किंमतीपैंकी 9 टक्के पेक्षा जास्त रक्कम
स्विकारुनही करारनामा न करुन गृहकर्ज मिळविण्यासाठी तक्रारदारांना आवश्यक ती
कागदपत्रे न देऊन, तसेच, तक्रारदारांबरोबरचा बंगला खरेदी विक्री व्यवहार रद्द करुन सेवा
सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केल्याचे जाहिर करण्यात येते.
(3) सामनेवाले यांनी तक्रारदारांना विक्री करण्याचे मान्य केलेल्या बंगल्याची किंमत
रु.14,81,000/- पैंकी 20 टक्के रक्कम रु.2,96,200/- वजा यापुर्वी दिलेली रक्कम
रु.1,36,000/- वजा जाता उर्वरीत रक्कम रु.1,60,200/- तक्रारदारांनी सामनेवाले यांना
आदेशाच्या तारखेपासुन 45 दिवसांच्या आंत दयावी. सामनेवाले यांनी ती स्विकारावी,
व ही रक्कम स्विकारल्यानंतर 15 दिवसांच्या आंत सामनेवलो यांनी मोफा कायदयातील
तरतुदीनुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेल्या नमुना करारनाम्यामध्ये नमुद
असलेल्या सर्व सोयी सुविधांसह, नोंदणीकृत विक्री करारनामा सामनेवाले यांनी
तक्रारदाराशी करावा, व त्याच दिवशी गृहकर्ज मिळविण्यासाठी आवश्यक ती सर्व
कागदपत्रे तक्रारदारांना दयावी.
(4) अनुक्रमांक-3 नुसार नोंदणीकृत करारनामा झाल्यानंतर व कागदपत्रे प्राप्त
झाल्यानंतरच्या दिवसापासुन पुढील 30 दिवसांच्या आंत बंगल्याची 20 टक्के दिलेली
रक्कम वजा जाता उर्वरीत किंमत रक्कम तक्रारदारांनी सामनेवाले यांना दयावी,
सामनेवाले यांनी ती त्याचवेळी स्विकारावी व ही रक्कम स्विकारल्यानंतर पुढील 30
दिवसांच्या आंत मान्य केलेल्या सर्व सोयी सुविधांसह बंगल्याचा ताबा तक्रारदारांना
दयावा. सदर मुदतीत सामनेवाले यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास सामनेवाले यांनी
तक्रारदारांना प्रतिदिन रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) प्रमाणे, आदेश पुर्ती
होईपर्यंत रक्कम दयावी.
(5) तक्रारदारांना झालेल्या मानसिक,शारिरीक व न्यायीक खर्चाबद्दल सामनेवाले यांनी
तक्रारदारांना रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख) आदेशाच्या तारखेपासुन तीन
महिन्यांच्या आंत दयावी. आदेशाची पुर्तता या कालावधीत न केल्यास,तदनंतर
आदेश पुर्ती होईपर्यंत 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम तक्रारदारांना दयावी.
तारीख-28.01.2014
( ना.द.कदम ) ( उ.वि.जावळीकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,ठाणे.
जरवा/280113