निशाणी क्रं-1 वरील आदेश
(पारीत दिनांक-25 ऑक्टोंबर, 2017)
सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्य.-
(01) अर्जदार तर्फे वकील श्री बुरडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदारां तर्फे मौखीक युक्तीवादाचे वेळी कोणीही उपस्थित नव्हते.
(02) अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर यांनी ग्राहक संरक्षण कायद्दातील कलम-12 खालील मूळ ग्राहक तक्रार क्रं-CC/14/154 निकाल पारीत दिनांक-08/06/2015 मध्ये पारीत केलेल्या आदेशाचे अनुपालन गैरअर्जदाराने विहित मुदतीत न केल्याने त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-25 अन्वये अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर तर्फे आदेशित केलेल्या रकमेची वसुली होण्यासाठी प्रस्तुत दरखास्त प्रकरण (Execution Application) अर्जदाराने दाखल केलेले आहे.
(03) अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर यांचे समोरील ग्राहक संरक्षण कायद्दातील कलम-12 खालील मूळ ग्राहक तक्रार क्रं-CC/14/154 मध्ये विरुध्दपक्ष मे.अंबिका लॅन्ड डेव्हलपर्स, नागपूर तर्फे प्रोप्रायटर श्री नामदेव लक्ष्मणराव धंदाळे हे होते व विरुध्दपक्षाला अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर यांचे निकाल पारीत दिनांक-08/06/2015 चे आदेशान्वये निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत आदेशाचे अनुपालन करावयाचे होते. अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर यांचे मूळ तक्रारीतील आदेशाला विरुध्दपक्ष श्री नामदेव धंदाळे यांनी मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांचे समोर प्रथम अपिल क्रं-A/15/309 अन्वये आव्हानित केले होते परंतु मूळ विरुध्दपक्ष श्री नामदेव धंदाळे याचे सततचे अनुपस्थितीमुळे सदर अपिल मा.राज्य ग्राहक आयोगाचे दिनांक-25 जुलै, 2016 रोजीचे आदेशान्वये खारीज (Dismissed in default) करण्यात आले. पुढे विरुध्दपक्षा तर्फे मा.राज्य ग्राहक आयोगाचे आदेशाला आव्हानित करण्यात आले नसल्याने तसेच विरुध्दपक्ष श्री नामदेव धंदाळे याने केलेले अपिल खारीज झाले असल्याने अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर यांनी मूळ तक्रारीत पारीत केलेल्या आदेशाला आता अंतिम स्वरुप (Finality) प्राप्त झालेले असून अतिरिक्त ग्राहक मंचाचे आदेशाचे अनुपालन करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष श्री नामदेव धंदाळे याची होती.
(04) येथे नमुद करणे अत्यावश्यक आहे की, कलम-12 खालील तक्रारीतील मूळ विरुध्दपक्ष श्री नामदेव धंदाळे यांचे निधन झाले असल्याचे दिसून येते कारण कलम 27 खालील दरखास्त प्रकरणात गैरअर्जदार म्हणून श्री नामदेव धंदाळे यांची विधवा पत्नी श्रीमती गिता नामदेव धंदाळे आणि मुलगा श्री आशिष नामदेव धंदाळे यांची नावे नमुद केलेली आहेत आणि मूळ विरुध्दपक्ष श्री नामदेव धंदाळे यांचे मृत्यू नंतर दिवाणी प्रक्रिया संहिते मधील तरतुदी नुसार त्यांचे कायदेशीर दायीत्व देण्याची जबाबदारी मृतक श्री नामदेव धंदाळे याचे कायदेशीर वारसदार म्हणून त्याची पत्नी व मुलगा अनुक्रमे श्रीमती गिता धंदाळे व श्री आशिष धंदाळे यांची येते.
(05) अतिरिक्त ग्राहक मंचाचे आदेशाचे अनुपालन दिलेल्या मुदतीत का केले नाही या बद्दल कुठलेही समाधानकारक स्पष्टीकरण गैरअर्जदारानीं दिलेले नाही. अर्जदाराला, गैरअर्जदारां कडून अतिरिक्त ग्राहक मंचाचे आदेशा प्रमाणे सोबत जोडलेल्या “परिशिष्ट-अ” प्रमाणे आदेशित रक्कम तसेच शारिरीक व मानसिक त्रास आणि तक्रारखर्चा बद्दलच्या रकमा घेणे आहेत. त्यानुसार अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-25 अन्वये आदेशित रकमेची वसुली गैरअर्जदारां कडून करण्यासाठी प्रस्तुत कलम-25 खालील दरखास्त अर्ज दाखल केलेला आहे. अर्जदाराला “परिशिष्ट-अ” प्रमाणे गैरअर्जदारां कडून खालील प्रमाणे रकमा घेणे आहेत.
परिशिष्ट-अ
अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर यांनी ग्राहक संरक्षण कायद्दातील कलम-12 खालील मूळ ग्राहक तक्रार क्रं-CC/14/154, निकाल पारीत दिनांक-08/06/2015 मधील आदेशित भाग-
(1) विरुध्दपक्षाने मौजा लावा, पटवारी हलका क्रं-4, खसरा क्रं-40, नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर मधील भूखंड क्रं-40-बी, क्षेत्रफळ-135 चौरसमीटर तसेच भूखंड क्रं-60-बी, क्षेत्रफळ-150 चौरसमीटर या दोन्ही भूखंडाच्या किमती विरुध्दपक्षास प्राप्त झालेल्या असल्याने दोन्ही भूखंडांचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून द्दावे विक्रीपत्र नोंदणीचा खर्च तक्रारकर्त्याने सहन करावा. तसेच शासनमान्य विकासशुल्काची रक्कम तक्रारकर्त्या कडून विरुध्दपक्षाने प्राप्त करावी. विरुध्दपक्षाने सदर आदेशाचे अनुपालन निकलपत्राची प्रमाणितप्रत प्राप्त झाल्या पासून 03 महिन्याचे आत करावे.
किंवा
(2) असे करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास सुधारीत ले आऊट नकाशा नुसार भूखंड क्रं-8, एकूण क्षेत्रफळ 3633 चौरसफुटाची भूखंडाचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे जास्तीची रक्कम रुपये-31,685/- तक्रारकर्त्या कडून स्विकारुन नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून द्दावे. विक्रीपत्र नोंदणीचा खर्च तक्रारकर्त्याने सहन करावा. तसेच शासनमान्य विकासशुल्काची रक्कम तक्रारकर्त्या कडून विरुध्दपक्षाने प्राप्त करावी. विरुध्दपक्षाने सदर आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 03 महिन्याचे आत करावे.
किंवा
(3) विरुध्दपक्षाने मुद्दा क्रं-(1) व क्रं-(2) मध्ये नमुद केल्या प्रमाणे सदर आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 03 महिन्याचे आत म्हणजेच विहित मुदतीत न केल्यास मौजा लावा, पटवारी हलका क्रं-4, खसरा क्रं-40, नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर मधील भूखंड क्रं-48-बी, क्षेत्रफळ-135 चौरसमीटर तसेच भूखंड क्रं-60-बी, क्षेत्रफळ-150 चौरसमीटर दोन्ही भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ-285 चौरसमीटर (3066.6 चौरसफूट) या दोन्ही भूखंडांची निकालपत्र पारीत दिनांक-08 जून, 2015 रोजी महाराष्ट्र शासनाचे रेडी रेकनर दरा प्रमाणे त्या भागातील अकृषक भूखंडाचे प्रती चौरस मीटर/प्रती चौरस फूट जे दर असतील त्या दरा प्रमाणे दोन्ही भूखंडांचे क्षेत्रा प्रमाणे जी काही किम्मत येईल तेवढी रक्कम विरुध्दपक्षाने अर्जदारास द्दावी.
(4) या शिवाय तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षाने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्यास द्दावेत.
*******
(06) उपरोक्त मुद्दा क्रं-(1) अथवा मुद्दा क्रं-(2) चे अनुपालन विरुध्दपक्षाने दिलेल्या विहित मुदतीत केलेले नाही. विरुध्दपक्षास आदेशाचे अनुपालन करण्यासाठी दिलेली विहित मुदत आता संपलेली असल्याने आता मुद्दा क्रं-(3) मध्ये नमुद केल्या प्रमाणे अतिरिक्त ग्राहक मंचाचे आदेशा प्रमाणे आदेशित भूखंड मौजा लावा, पटवारी हलका क्रं-4, खसरा क्रं-40, नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर मधील भूखंड क्रं-48-बी, क्षेत्रफळ-135 चौरसमीटर तसेच भूखंड क्रं-60-बी, क्षेत्रफळ-150 चौरसमीटर दोन्ही भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ-285 चौरसमीटर (3066.6 चौरसफूट) एवढया भूखंडाची निकाल पत्र पारीत दिनांक-08 जून, 2015 रोजी महाराष्ट्र शासनाचे रेडी रेकनर दरा प्रमाणे त्या भागातील अकृषक भूखंडाचे प्रती चौरस मीटर/प्रती चौरस फूट जे दर असतील त्या दरा प्रमाणे जी काही किम्मत येईल तेवढी रक्कम गैरअर्जदारां कडून मिळण्यास अर्जदार पात्र आहे तसेच मुद्दा क्रं-(4) प्रमाणे शारिरीक व मानसिक त्रास व तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- गैरअर्जदारां कडून मिळण्यास अर्जदार पात्र आहे.
(07) गैरअर्जदारानीं अतिरिक्त ग्राहक मंचाचे मूळ तक्रारीतील निकालपत्रा प्रमाणे आदेशाचे अनुपालन त्यांना संधी देऊनही केलेले नाही. गैरअर्जदारां कडून अतिरिक्त ग्राहक मंचाचे मूळ तक्रारीतील आदेशाचे अनुपालन न करण्यासाठी कुठल्याही प्रकारे समाधानकारक म्हणणे मांडण्यात आलेले नाही. सबब उपरोक्त नमुद ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-25 खालील अर्ज मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
-आदेश-
अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर तर्फे आदेशीत रकमेची वसुली परिशिष्ट-अ मधील मुद्दा क्रं-(3) व क्रं-(4) मध्ये नमुद केल्या प्रमाणे हिशोबा नुसार येणारी रक्कम ( मौजा लावा, नागपूर ग्रामीण, पटवारी हलका क्रं-4, खसरा क्रं-40 मधील येथील दोन्ही भूखंड क्रं-48-बी व क्रं-60-बी, दोन्ही भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ-285 चौरसमीटर (एकूण क्षेत्रफळ 3066.6 चौरसफूट) किम्मतीचे हिशोबासाठी अतिरिक्त ग्राहक मंचाचे आदेशा नुसार आदेश दिनांक-08 जून, 2015 रोजी गव्हरमेंट रेडी रेकनर प्रमाणे त्या भागातील अकृषीक भूखंडाचे प्रती चौरस फूट असलेले दर विचारात घेण्यात यावे, यासाठी दुय्यम निबंधक, नोंदणी व मुद्रांक शुल्क यांचे कार्यालयातील मालमत्तेचे शिघ्रगणक पत्रकाचा उपयोग करण्यात यावा व असे मालमत्तेचे शिघ्रगणक पत्रक आणण्याची जबाबदारी ही अर्जदाराची राहिल) हिशोबात घेऊन अतिरिक्त ग्राहक मंचाचे आदेशित रकमेची वसुली गैरअर्जदारांचे मालकीचे मौजा लावा, पटवारी हलका क्रं-4, खसरा क्रं-40 नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर या मालमत्ते मधून करावी, असा आदेश आम्ही याव्दारे देत आहोत. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी, नागपूर यांना वसुली प्रमाणपत्र (Recovery Certificate) पाठविण्यात यावे की, त्यांनी किंवा त्यांचे वतीने इतर सक्षम अधिका-याने गैरअर्जदारांचे मालमत्ते मधून “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे मुद्दा क्रं-(3) व क्रं-(4) मध्ये नमुद केल्या प्रमाणे हिशोबा नुसार येणारी रक्कम गैरअर्जदारांचे मालमत्ते मधून वसुल करुन ती रक्कम अर्जदाराला देण्यात यावी.
सोबत-वसुल करावयाच्या रकमेचे “परिशिष्ट-अ”
नागपूर
दिनांक-25/10/2017