उपस्थित : तक्रारदार : स्वत:
जाबदार : एकतर्फा.
********************************************************************
द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
// नि का ल प त्र //
(1) सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक मंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/157/2006 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा मंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/281/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
(2) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांनी करारात ठरल्याप्रमाणे आश्वासनांची पूर्तता केली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,
(3) तक्रारदारांनी जाबदार आमडेकर घाणेकर असोसिएटस (ज्यांचा उल्लेख यापुढे “बिल्डर” असा केला जाईल) यांचेबरोबर दि. 17/8/2001 रोजी करार केला होता. बिल्डर जी मिळकत विकसित करणार होते त्या मिळकतीमधील 218 चौ.फुट एवढी जागा तक्रारदार यांच्या ताब्यामध्ये होती. बिल्डरने तक्रारदारांबरोबर केलेल्या कराराप्रमाणे या 218 चौ.फुट क्षेत्रफळाच्या खोलीसाठी रक्कम रु.65,400/- मात्र तक्रारदारांनी बिल्डरला देण्याचे कबुल केले होते. कराराच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत बिल्डरने खोलीचा ताबा तक्रारदारांना देण्याचे ठरले होते. तसेच ताबा देईपर्यंत प्रतिमहा रु.500/- याप्रमाणे पर्यायी जागेचे भाडे बिल्डरने संबंधित घरमालकाला देण्याचे होते. बांधकाम सुरु असताना तक्रारदारांनी घरमालकाला भाडयासाठी रक्कम रु.12,000/- मात्र दिलेले असून बिल्डरने मात्र करारात कबुल केल्याप्रमाणे आपल्याला ही रक्कम अदा केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. बिल्डरने दिलेल्या खोलीचे मोजमाप केले असता ते प्रत्यक्षात 170 चौ. फुट भरलेले असून बिल्डरने आपल्याला 48 चौ.फुट क्षेत्रफळ कमी दिलेले आहे अशी तक्रारदारांची तक्रार असून या क्षेत्रफळाची किंमत रु. रु.43,248/- आपल्याला देवविण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे. बिल्डरने आपल्याला खोलीचा ताबा आठ महिने उशीरा दिलेला आहे याचा विचार करता करारात ठरल्याप्रमाणे प्रतिमाह रु.1000/- याप्रमाणे रु.8000/- तसेच व्याज आपल्याला बिल्डरकडून देवविण्यात यावे अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. एकूणच जाबदारांनी दिलेल्या त्रुटीयुक्त सेवेचा विचार करता आपण अर्जामध्ये मागितलेली रक्कम रु.84,226/- मात्र आपल्याला देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. या रकमेबरोबरच आपल्याला भोगवटापत्र तसेच खरेदीखत करुन मिळावे अशाही तक्रारदारांच्या मागण्या आहेत. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, करारपत्र तसेच जाबदारांना पाठविलेली नोटीस व त्याची पोहोचपावती इ. कागदपत्रे मंचापुढे हजर केली आहेत.
(4) प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. 1 यांचेवरती नोटीस बजावल्याची पोहोच पावती निशाणी 16 अन्वये याकामी दाखल आहे. तर जाबदार क्र. 2 यांचा नोटीसीचा लिफाफा “नॉट क्लेम्ड” या शे-यासह परत आला आहे. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. 2 ची नोटीस “नॉट क्लेम्ड” या शे-यासह परत आल्यानंतर जाबदार क्र. 2 त्याच पत्त्यावर अदयापही राहत आहेत अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र तक्रारदारांनी मंचापुढे दाखल केले. तक्रारदारांतर्फे दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता याच पत्त्यावरती जाबदारांना पाठविलेली नोटीस प्राप्त झाल्याची पोहोच पावती त्यांनी मंचापुढे दाखल केलेली आढळून येते. सबब तक्रारदारांच्या या प्रतिज्ञापत्रातील मजकुराच्या आधारे जाबदार क्र. 2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला.
(5) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रारींच्या अनुषंगे उभय पक्षकारांचे दरम्यान झालेल्या कराराचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या ताब्यात असलेल्या 218 चौ.फुट जागेच्या ऐवजी तक्रारदारांनी प्रति चौ.फुट रक्कम रु.300/- याप्रमाणे बांधकामाचा खर्च देऊन करारात नमुद सोई सुविधांसह त्या खोलीचा ताबा देण्याचे बिल्डरने कबुल केल्याचे आढळते. संबंधित खोलीचा ताबा करारापासून दोन वर्षांचे आत देण्याचे तसेच विलंब झाल्यास रु.1000/- प्रतिमहा नुकसानभरपाई व अदा केलेल्या रकमेवर 18% व्याज देण्याचे बिल्डरने करारामधील अट क्र. 8 मध्ये कबुल केल्याचे आढळते. बांधकाम सुरु असेपर्यंत तक्रारदारांना प्रतिमाह रु.500/- याप्रमाणे घरभाडे देण्याचे करारातील अट क्र.7 प्रमाणे बिल्डरने कबुल केलेले आढळते. जर मोजमापामध्ये जागा कमी दिली गेली तर कमी दिलेल्या क्षेत्रफळाची किंमत प्रति चौ फुट 901/- याप्रमाणे परत करण्यात येर्इल असे आश्वासन बिल्डरने करारातील अट क्र. 15 मध्ये दिलेले आढळते. प्रस्तुत प्रकरणातील बिल्डरने आपल्याला 48 चौ. फुट जागा कमी दिली तसेच आपल्याला घरभाडे दिले नाही व आठ महिने विलंबाने आपल्याला आपल्या सदनिकेचा ताबा दिला अशा तक्रारदारांनी तक्रारी केलेल्या आढळतात. बिल्डरने आपल्याला भोगवटापत्र तसेच सदनिकेचे खरेदीखत करुन दिले नाही अशीही तक्रारदारांनी तक्रार केली आहे. तक्रारदारांनी वस्तुस्थितीबाबत केलेल्या या सर्व तक्रारी जाबदारांनी हजर होऊन नाकारलेल्या नाहीत किंवा या तक्रारी खोटया असून यासंदर्भात आपण कायदेशीर पूर्तता केलेली आहे असा कोणताही पुरावा दाखल कलेला नाही. सबब याअनुषंगे प्रतिकुल निष्कर्ष निघतो. तक्रारदारांनी केलेल्या त्यांच्या सर्व मागण्यांना करारातील अटी व शर्तींचा आधार असल्यामुळे तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे. वर नमुद निष्कर्षांच्या आधारे तक्रारदारांनी मागणी केल्यापमाणे 48 चौ.फुट या कमी जागेचे करारातील अट क्र. 15 प्रमाणे प्रति चौ.फुट रु.901/- प्रमाणे रक्कम रु.43,248/- अदा करण्याचे बिल्डरला निर्देश देण्यात येत आहेत. तसेच बिल्डरने कबुल करुनही घरभाडे दिले नाही व यासाठी आपण रु.12,000/- घरभाडे अदा केले या तक्रारदारांच्या निवेदनास अनुसरुन तक्रारदारांना रु.12,000/- अदा करण्याचे बिल्डरला निर्देश देण्यात येत आहेत. बिल्डरने आपल्याला आठ महिने विलंबाने ताबा दिला याचा विचार करता आपण अदा केलेल्या रकमेवरील व्याज व प्रति महिना रक्कम रु.1000/- प्रमाणे एकूण रक्कम रु.8,000/- दयावी अशी तक्रारदारांनी विनंती कली आहे. तक्रारदारांच्या या मागणीस करारातील अट क्र.14 चा आधार मिळतो. सबब तक्रारदारांनी मागणी केल्याप्रमाणे प्रतिमहिना रु.1000/- याप्रमाणे आठ महिन्यांसाठी रु.8000/- तसेच अदा केलेल्या रु.25,00/- या रकमेवर आठ महिन्यांकरिता 18% प्रमाणे व्याजाचे रु.3,000/- तक्रारदारांना मंजूर करण्यात येत आहेत. बिल्डरने तक्रारादारांना अदयापही भोगवटा पत्र व खरेदीखत करुन दिलेले नाही याचा विचार करता या दोन्ही बाबींची पूर्तता करण्याचे बिल्डरला निर्देश देण्यात येत आहेत. सदरहू तक्रार अर्ज दाखल करण्यापूर्वी तक्रारदारांनी बिल्डरला नोटीस पाठवून आपल्या सर्व तक्रारींचे निवारण करुन मिळण्यासाठी प्रयत्न केला होता. ही नोटीस बिल्डरला मिळाल्याची पोहोच पावती तक्रारदारांनी मंचापुढे दाखल केली आहे. मात्र ही नोटीस प्राप्त होऊनसुध्दा बिल्डरने तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण केले नाही व त्यामुळे तक्रारदारांना सदरहू तक्रार अर्ज दाखल करावा लागला या बाबींचा विचार करीता तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रककम रु.3,000/- मंजूर करण्यात येत आहे.
(6) वर नमुद विवेचनावरुन तक्रारदारांना कमी क्षेत्रफळासाठी रु.43,248/-, घरभाडेसाठी रु.12,000/- व विलंबाने ताबा दिल्याबद्दल एकूण रु.11,000/- असे एकूण रु.66,248/- बिल्डरकडून देय होतात ही बाब सिध्द होते. वर नमुद रक्कम तक्रारदारांना तक्रार अर्ज दाखल तारखेपासून म्हणजे दि. 24/4/2006 पासून 7% व्याजासह अदा करण्याचे बिल्डरला निर्देश देणे योग्य व न्याय्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब त्याप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
(7) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी जाबदारांना रु. 65,400/- पैकी रु. 25,000/- अदा केले होते असे त्यांनी नमूद केलेले आढळते. तक्रारदारांचे हे निवेदन जाबदारांनी हजर राहुन नाकारलेले नाही. सबब ते मान्य करण्यात येत आहे. वादग्रस्त सदनिकेचा ताबा घेताना जे 40,400/- तक्रारदारांनी जाबदारांना अदा करण्याचे होते ते आपण त्यांना अदा केलेले नाहीत असे तक्रारदारांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. जाबदारांनी आपल्याला भाडयाची रक्कम दिली नाही तसेच कमी क्षेत्रफळ दिले म्हणून आपण त्यांना ही रक्कम अदा केली नाही असे तक्रारदारांनी नमुद केले आहे. किंबहुना देय होणा-या रकमेमधून ही रक्कम वजा करण्यात यावी अशीही विनंती त्यांनी केलेली आहे. मात्र रक्कम रु.40,400/- ऐवजी त्यांनी ही रक्कम रु.25,600/- अशी नमुद केली आहे. तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील निवेदनावरुन त्यांनी जाबदारांना रु.40,400/- दिलेले नाहीत ही वस्तुस्थिती लक्षात येत असल्यामुळे मंचाच्या आदेशाप्रमाणे देय होणा-या रक्कम रु.66,248/- मधून रक्कम रु.40,400/- वजा करुन उर्वरित रक्कम रु.25,848/- मात्र तक्रारदारांना देण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात येत आहेत. यासंदर्भात नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे तक्रारादारांनी रक्कम रु.40,400/- अदा न करताच जाबदारांनी त्यांना सदनिकेचा ताबा दिला व या रकमेची त्यांचेकडून कधीही मागणी केली नाही या वस्तुस्थितीवरुन देखील तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे ही बाब सिध्द होते.
(8) वर नमुद सर्व निष्कर्ष व विवेचनांच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की,
// आदेश //
1. तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
1.
2. यातील बिल्डरने तक्रारदारांना निकालपत्रातील परिच्छेद क्र. 7 मध्ये नमुद केलेप्रमाणे रक्कम रु.25,848/- (रु. पंचवीस हजार आठशे अठ्ठेचाळीस)मात्र दि. 24/4/2006 पासून संपूर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत 7% व्याजासह अदा करावेत.
2.
3. यातील बिल्डरने तक्रारदारांना भोगवटा प्रमाणपत्र दयावे
4. यातील बिल्डरने तक्रारदारांच्या सदनिकेचे खरेदीखत करुन दयावे.
4.
5. यातील बिल्डरने तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रु.5,000/- व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च रु.3000/- अदा करावेत.
5.
6. वर नमुद आदेशाची अंमलबजावणी बिल्डरने निकालपत्राची प्रत मिळालेपासून 30 दिवसांचे आत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतूदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
7. निकालपत्राची प्रत उभयपक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.