श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 29 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांच्या त्यांच्या सदनिका क्र.203, लेर्ब्रुनम पार्क, मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे साठी जाबदेणार यांच्याकडून मॉडयुलर किचन बसवून घेण्यासाठी टेन्टेटिव्ह प्लान, कोटेशन घेतले. दिनांक 9/9/2010 रोजीच्या चेकद्वारे रुपये 1,75,000/- व दिनांक 9/9/2010 रोजीच्या चेकद्वारे रुपये 37,500/- जाबदेणार यांना अदा केले. त्यासाठी लागणारे साहित्य जाबदेणार अहमदाबार, राजकोट येथून मागविणार होते व सांगितलेल्या डिझाईन व साईज प्रमाणे युनिट्स बनविणार होते. हार्डवेअर पुण्यातूनच घेण्यात येणार होते. तक्रारदार जाबदेणारांकडे वारंवार गेले परंतू पुढील माहिती व कामातील प्रगती जाबदेणार यांनी तक्रारदारांना सांगितली नाही. 50 टक्के आगाऊ रकमेबाबत जाबदेणार यांनी आग्रह धरला. तक्रारदार वेगवेगळया शोरुम मध्ये गेले असता त्यांना काही डिझाईन्स आवडल्या, जाबदेणार यांनी तेथे जाऊन माहिती घेऊ असे तक्रारदारांना आश्वासन दिले. जाबदेणार यांनी डिझाईन्स, लेआऊट, कलर स्कीम्स यांची माहिती तक्रारदारांना दिली नाही. 30 ते 35 दिवसात काम पूर्ण करण्याचे ठरले होते परंतू माहिती अभावी डिझाईन्स नक्की करण्याचे काम होऊ शकले नाही. तक्रारदारांनी सांगितलेल्या दोन शोरुम्स मध्ये जाबदेणार गेलेच नाही व तक्रारदारांनी निवडलेले डिझाईन्सही बघितले नाही. दिनांक 26/9/2010 च्या ई-मेल द्वारे floral designs साठी रुपये 10,000/- वाढतील असे जाबदेणार यांनी तक्रारदारांना कळविले व अप्पर कॅबिनेट चे डिझाईन्स तक्रारदारांनी फायनल केलेले नसल्याचे व तक्रारदारांना नक्की काय हवे आहे ते कळविण्याबाबतही सांगितले. रुपये 10,000/- का वाढतील याचे स्पष्टीकरण करण्यात आलेले नव्हते वास्तविक floral facia हे पुर्वी कोटेड मरिन प्लाय पेक्षा कमी दर्जाचे होते. तुलनात्मक किंमती देखील तक्रारदारांना सांगण्यात आल्या नव्हत्या. तक्रारदारांनी श्री. राठोड यांच्याशी प्रतिनिधींबरोबर दुरध्वनी वरुन संपर्क साधून अडचणी सांगितल्या परंतू उपयोग झाला नाही म्हणून शेवटी दिनांक 2/10/2010 च्या ई-मेल द्वारे तक्रारदारांनी रकमेचा परतावा मागितला. श्री. राठोड यांनी सांगितल्यानुसार भरलेल्या रकमेपैकी 5 टक्के रक्कम वगळून उर्वरित रक्कम परत करण्यात येईल असे तक्रारदारांना जाबदेणार यांनी सांगितले. जाबदेणार यांनी तक्रारदारांना आवश्यक असलेली माहिती पुरविली नाही, आगाऊ रक्कम भरुन देखील कामात तत्परता दाखविली नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 1,70,000/- दिनांक 18/10/2010 रोजीच्या चेकद्वारे परत केले परंतू रक्कम रुपये 42,500/- परत केली नाही. ही रक्क्म एस्टिमेटेड प्रोजेक्ट कॉस्ट च्या 10 टक्के इतकी होते. दिनांक 18/10/2010 च्या चेक सोबत जाबदेणार यांनी दिनांक 16/10/2010 च्या पत्रात काही कारणे नमूद केलेली होती. जाबदेणार यांनी अचुक मापे घेतली नव्हती, facia चे डिझाईन्स, अप्पर कॅबिनेट्ची डिझाईन्स, लेआऊट नक्की करण्यात आले नव्हते. ऑर्डर फायनलाईझ झालेली नव्हती. प्रोजेक्ट पूर्ण न झाल्यास प्रोजेक्ट कॉस्टच्या 10 टक्के रक्कम ठेवून घेण्यात येईल यासदंर्भात कुठलाही क्लॉज नव्हता. यासर्वांमुळे तक्रारदारांना मात्र शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 22/10/2010 रोजी जाबदेणार यांना नोटीस पाठवून रुपये 42,500/- ची मागणी केली. परंतू उपयोग झाला नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 42,500/- 18 टक्के व्याजासह परत मागतात, तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/-, सदनिकेच्या भाडयापोटी झालेले नुकसान रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांना जाबदेणार यांनी दिनांक 23/6/2010 रोजीचे कोटेशन दिले होते हे जाबदेणार यांनी मान्य केलेले आहे. तक्रारदार नवीन रिक्वायमेंट घेऊन आल्यानंतर परत दिनांक 28/6/2010 रोजी कोटेशन देण्यात आले होते. जाबदेणार क्र.2 तक्रारदारांच्या घरी गेले होते व मापे घेतल्यानंतरच मॉडयुलर किचनचे स्केच तयार करण्यात आले होते. तदनंतर दिनांक 8/9/2010 रोजीची फायनर ऑर्डर तक्रारदारांना इश्यू करण्यात आली होती. अटी व शर्तींच्या कलम 7 नुसाकर तक्रारदारांनी 50 टक्के रक्कम भरलेली होती व कलम 10 नुसार ऑर्डर एकदा फायनल झाल्यानंतर रद्द करता येत नव्हती. तक्रारदारांच्या निदर्शनास वरील अटी व शर्ती आणून देण्यात आलेल्या होत्या, त्यावर तक्रारदारांनी सही केली होती. जेवढी शक्य होती तेवढी सूट तक्रारदारांना देण्यात आलेली होती. डिझाईन व कलर फायनलाईझ झाल्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 26/9/2010 च्या ई-मेल द्वारे त्यात बदल सुचविले. दिनांक 2/10/2010 च्या ई-मेल द्वारे भरलेल्या रकमेचा परतावा मागितला. दिनांक 11/10/2010 रोजीच्या पत्राद्वारे रक्कम रुपये 2,12,500/- चा परतावा मागितला. जाबदेणार यांनी दिनांक 16/10/2010 च्या पत्राद्वारे त्यास उत्तर दिले व त्यात अटी व शर्तीच्या कलम 10 चा उल्लेख त्यात केला होता. कलम 10 नुसार आगाऊ रक्कम मिळाल्यानंतर ऑर्डर रद्द करण्याची तरतूद नाही, तक्रारदारांनी डिझाईन, कलर आधीच नक्की केलेले होते. श्री. राठोड यांच्याशी चर्चा केल्यानंतर फायनल ऑर्डरच्या रकमेच्या 10 टक्के रक्कम रुपये 42,500/- वजा करुन उर्वरित रक्कम तक्रारदारांना परत करण्याचे ठरले होते. जाबदेणार यांनी वेळ, पैसा व डिझाईन्स वगैरे च्या तयारीसाठी म्हणून ही वजावट केलेली होती. त्यानुसार तक्रारदारांनी रक्कम रुपये 1,70,000/- चा दिनांक 18/10/2010 रोजीचा चेक स्विकारला होता. तक्रारदारांनी काम रद्द केल्यामुळे जाबदेणार यांना त्रास सहन करावा लागला. कामाच्या पुर्वतयारीसाठी लागणा-या कच्च्या मालासाठी काही रक्कम खर्च करावी लागली. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून सदरहू तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब नाकारला.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिनांक 8/9/2010 रोजी मॉडयुलर किचनसाठी फायनल ऑर्डर या शिर्षकाखाली रक्कम रुपये 4,25,000/- चे कोटेशन दिल्याचे तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या अनेक्सचर ए वरुन दिसून येते. सदरहू पत्रात अटी व शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यातील अट क्र.7 नुसार तक्रारदारांनी जाबदेणार यांना एकूण रकमेच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच रुपये 2,12,500/- आगाऊ म्हणून दिलेली होती, ही बाब निर्विवाद आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या दिनांक 26/9/2010 च्या मेल चे अवलोकन केले असता तक्रारदारांनीच डिझाईन्स व कलर मध्ये बदल सुचविल्याचे दिसून येते. तक्रारदारांच्या मॉडयुलर किचनसाठी जाबदेणार यांनी स्केच बनवून दिलेले होते, तसेच जाबदेणार यांनी सदरील काम पूर्ण करण्याची असमर्थता दर्शविलेली नव्हती. जर तक्रारदार यांना जाबदेणार यांनी नक्की केलेल्या कलर व फिनिशेस मध्ये काही बदल हवे होते तर त्यांनी तसे जाबदेणार यांना कळवावयास हवे होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिनांक 27/9/2010 च्या ई-मेल द्वारे तक्रारदारांची नक्की काय मागणी आहे यासंदर्भात विचारणा केली असल्याचे दिसून येते. याउलट तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून भरलेल्या रकमेचा परतावा मागितला असल्याचे दिनांक 2/10/2010 च्या ई-मेल वरुन दिसून येते. तक्रारदार व जाबदेणार यांच्यात दिनांक 8/9/2010 रोजी ठरलेल्या अटी व शर्तीच्या कलम 10 नुसार एकदा फायनलाईज झालेली ऑर्डर रद्द करता येत नाही. तरीसुध्दा जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 1,70,000/- दिनांक 18/10/2010 रोजीच्या चेकद्वारे परत केले असल्याचे तक्रारदारांनी मान्य केलेले आहे. तक्रारदारांचे मॉडयुलर किचनचे कामासंदर्भात जाबदेणार यांना नक्कीच वेळ, पैसा, प्रयत्न, त्यासाठी लागणारे प्लायवूड, लॅमिनेट्स व इतर सामग्रीसाठी खर्च करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी, कमतरता सिध्द केलेली नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार अमान्य करण्यात येत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्दल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.