तक्रारदार : वकील श्री.डि.एन.वानखेळे यांचेमार्फत हजर.
सामनेवाले : वकील श्रीमती विद्या बागल हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही सामानाचे नेआण करणारी कंपनी आहे. तक्रारदारांच्या पतीला डेहराडून उत्तराखंड येथून आपले घरगुती सामान मुंबई येथे पाठविणे होते. तक्रारदारांचे पती हे मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरीत असून सतत दौ-यावर असतात. तक्रारदारांच्या पतीने सा.वाले यांना रु.20,225/- सामानाची नेआण करण्याबद्दल अदा केले. व दिनांक 21.4.2008 रोजी आपले घरगुती सामान सा.वाले यांचेकडे सुपुर्द केले. सा.वाले यांनी तक्रारदारांना ते घरगुती सामान मुंबई येथे 5,7 दिवसामध्ये पोहचते होईल असे सांगीतले. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांना मुंबई येथे दिनांक 2.5.2008 रोजी घरगुती सामान सुपुर्द केले.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, वाहतूक करीत असतांना सा.वाले यांनी सामानाचे बरेच नुकसान केले व सोफासेट, डायनिंग टेबल, डायनिंग टेबलच्या खुर्च्या, रॅक, ई. लाकडी सामान व इतर घरगुती सामान याची मोडतोड झालेली होती. सामान उचलित असतांना यादीमध्ये मोडलेल्या व नुकसान झालेल्या वस्तुंची नोंद करण्यात आली. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 19.5.2008 व 23.8.2008 रोजी घरगुती सामानाचे नुकसानी बद्दल रु.23,270/- नुकसान भरपाईची मागणी केली. अथवा मोडतोड झालेल्या वस्तु सा.वाले यांनी पून्हा खरेदी करुन तक्रारदारांना पुरवाव्यात असे सूचविले. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या ई-मेल संदेशाला दाद दिली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 6.10.2008 रोजी सा.वाले यांना नोटीस दिली व सा.वाले यांनी दिनांक 23.10.2008 रोजी त्यास उत्तर दिले व सामानाची यादी मध्ये वस्तुची किंमत नोंदविली आहे. त्याप्रमाणे सा.वाले यांनी नुकसान भरपाई देण्यास तंयार आहेत, परंतू तक्रारदारांचे मागणी प्रमाणे नव्हे असे कथन केले. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 9.4.2009 रोजी दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना घरगुती सामानाच्या वाहतुकीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे. तसेच घरगुती सामानाची किंमत, वाहतुकीचा खर्च, व नुकसान भरपाई रु.50,000/- अदा करावेत अशी दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी आपली एकत्रित कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये घरगुती सामानाची मोडतोड वाहनाचा अपघात झाल्याने घडली असेल असे कथन केले. व त्यात सा.वाले यांचा निष्काळजीपणा नव्हता असे कथन केले. त्याचप्रमाणे तक्रारदारांच्या मोडतोड झालेल्या वस्तु हया वर्ष 1991-92 मध्ये खरेदी केलेल्या होत्या व त्याची किंमत वर्ष 2008 मध्ये अगदीच कमी होती व तक्रारदार अवास्तव नुकसान भरपाई मागत आहे असे कथन केले.
4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत सा.वाले यांना रक्कम अदा केल्याच्या पावतीच्या प्रती, सामानाचे यादी त्यावर असलेली नोंद, व कन्सेप्ट फर्नीचर यांनी दिलेले अंदाजपत्रकाच्या प्रती हजर केलेल्या आहेत. तसेच तक्रारदारांनी मोडतोड झालेल्या वस्तुंची छायाचित्रे हजर केलेली आहेत. सा.वाले यांनी त्यांच्या साक्षीदारांचे शपथपत्र दाखल केले व आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजुच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले वाले यांनी तक्रारदारांना घरगुती सामानाच्या वाहतुकीच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून सामानाची किंमत त्या व्यतिरिक्त नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. एकत्रित रुपये 50,000/- |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे डेहराडून ते मुंबई घरगुती सामान वाहतुक करणेकामी सुपुर्द केले होते व त्या बद्दल तक्रारदारांनी सा.वाले यांना रु.15,225/- + 5000/- = 20,250/- रक्कम अदा केली. या बद्दल वाद नाही. सा.वाले यांनी मालाची वाहतुक केली व घरगुती सामान मुंबईमध्ये तक्रारदारांना सुपुर्द केले या बद्दल वाद नाही. त्यातही महत्वाची बाब म्हणजे तक्रारदारांच्या घरगुती सामानापैकी लाकडी वस्तु व इतर काही वस्तु यांची मोडतोड झाली होती, नुकसान झाले होते या बद्दलही वाद नाही. संपूर्ण प्रकरणामध्ये उभयपक्षकांचे दरम्यान वाद फक्त नुकसान भरपाईचे रक्कमे बद्दलचा आहे.
7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत निशाणी सी-4 येथे वाहतुक केलेल्या सामानाची यादी हजर केलेली आहे. त्यामध्ये एकंदर 34 वस्तुंची नोंद आहे. तक्रारदारांनी सी-3 येथे चलनाची प्रत हजर केलेली आहे. व डिलीव्हरी चलनाची प्रत हजर केलेली आहे. व डिलीव्हरी चलनाचे मागील बाजूस मोडतोड झालेल्या वस्तुंची यादी दिलेली असून यादीखाली तक्रारदार व सा.वाले यांचे प्रतिनिधींच्या सहया आहेत व दिनांक 2.5.2008 ही तारीख नमुद आहे. त्यातील नोंदींची पडताळणी केली असता असे दिसून येते की, डायनिंग टेबलच्या खुर्च्या, सिंगल बेड, डबल बेड, स्वयंपाक घरातील रॅक, शू टेबल, तिन आसनी सोपा, डायनिंग टेबल, 3 खुर्च्या, टी पॅाय, डायनिंग टेबल, सोफा चेअर, व टी.व्ही.ट्रॅाली, असे एकंदर 11 वस्तु खराब झालेल्या होत्या. तक्रारदारांनी निशाणी सी-8, येथे मोडतोड झालेल्या फर्नीचरची छायाचित्रे हजर केलेली आहेत. त्यावरुन लाकडी सामानाची खूपच मोडतोड झालेली होती असे दिसून येते. थोडक्यामध्ये त्या वस्तु वापरण्याजोग्या नव्हत्या. तक्रारदारांनी निशाणी सी-6 येथे कन्सेप्ट फर्निचर यांचेकडून प्राप्त केलेल्या त्या वस्तुचे अंदाजपत्रकाची प्रत हजर केलेली आहे. त्यातील रक्कमा हया तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केलेल्या व सा.वाले यांनी देऊ केलेल्या रक्कमेपेक्षा खूपच जास्त आहेत.
8. तथापी सा.वाले यांनी आपल्या नोटीसीचे उत्तरामध्ये व सा.वाले यांच्या वकीलांनी युक्तीवादाचे दरम्यान असे कथन केले की, निशाणी सी-4 येथे ज्या सामानाची 34 वस्तुंची यादी आहे, त्या मध्ये प्रत्येक वस्तुसमोर किंमत लिहीलेली आहे. व त्या किंमतीप्रमाणे सा.वाले हे नुकसान भरपाई देण्यास तंयार आहेत. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, तक्रारदारांनी पाठविलेले फर्नीचर हे जर 1991 मध्ये खरेदी केलेले असेल तर सागवानी लाकडाची किंमत ही जुने झाल्यामुळे कमी होत नाही तर उलट त्यामध्ये वृध्दी होते. त्यातही सामानाचे यादीमधील किंमत ही विमा कराराकरीता नोंदविण्यात येत असल्याने त्या कमीच लिहीलेल्या असतात. त्यातही पुन्हा नुकसान भरपाईचा आकडा ठरवित असतांना तक्रारदार यांनी 1991 मध्ये ज्या किंमतीस वस्तु खरेदी केलेल्या होत्या त्याची किंमत व तक्रारदारांना वस्तु निकामी झाल्याने घ्यावी लागणारी नविन वस्तुची संद्याची किंमत या दोन्ही किंमतीच्या दरम्यान सद्याची किंमत ग्राहय मानावी लागेल. तक्रारदारांना त्या वस्तु निकामी झाल्याने जर नविन वस्तु खरेदी कराव्या लागल्या तर त्या करीता निच्छितच ज्यादा पैसे द्यावे लागले असते व ही बाब सिध्द करण्याकामी तक्रारदारांनी कन्सेप्ट फर्नीचर यांचेकडून प्राप्त केलेल्या अंदाजपत्रकाच्या प्रती हजर केलेल्या आहेत. या वरुन वस्तुची यादी मधील किंमत ग्राहय धरणे शक्य नाही.
9. त्यातही तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीमध्ये ही बाब मान्य केलेली आहे की, ई-मेल संदेशाव्दारे त्यांनी सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई रु.23,270/- वस्तुच्या किंमती बद्दल मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी निशाणी-7, येथे ज्या वस्तुंच्या किंमतीची यादी दिलेली आहे त्याप्रमाणे किंमतीची एकंदर बेरीज रु.25,700/- होती व तक्रारदारांनी ई-मेलव्दारे जी सा.वाले यांचेकडे मागणी केलेली आहे रु.23,270/- ही या रक्कमेपेक्षा कमीच आहे.
10. सा.वाले यांनी आपले कथन सिध्द करण्याचे कामी त्यांचेकडील सुतार श्री.पवन कुमार यांचे शपथपत्र दाखल केले. व पवन कुमार यांनी आपल्या शपथपत्रात तक्रारदारांनी पाठविलेल्या वस्तु हया जुन्या होत्या व तक्रारदारांनी त्या दुरुस्त करण्यास श्री.पवन कुमार यांना मनाई केली असे कथन केलेले आहे. प्रवासामध्ये वस्तुचे स्थलांतर होताना लाकडी सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने सा.वाले यांचे सुतार ज्या प्रकारची दुरुस्ती करणार होते त्या प्रकारची दुरुस्ती करणे तक्रारदारांना योग्य वाटले नसेल. ही बाब तक्रारदारांनी आपल्या प्रति उत्तराचे शपथपत्र दिनांक 13.9.2011 मध्ये कथन केलेले आहे. सा.वाले यांनी वाहनाचे चालक श्री.मुस्ताक अहंमद यांचे शपथपत्र दाखल केले व त्यामध्ये किरकोळ अपघातामुळे वस्तुंचे थोडे नुकसान झाले होते असे कथन केले. वाहतुकीचा कायदा कलम 9 प्रमाणे ही बाब गौण ठरते. कारण वाहतुक करणा-या व्यक्तीची अथवा कंपनीची जबाबदारी ही विमा कंपनीचे जबाबदारी सदृष्य ठरते व तेथे निष्काळजीपणाचा मुद्दा गौण ठरतो. त्यानंतर सा.वाले यांनी त्यांचे पॅकिंग अधिक्षक श्री.अशोक कुमार यांचे शपथपत्र दाखल केले. त्यांनी आपल्या शपथपत्रात असे कथन केले आहे की, पॅकिंग लिस्ट मधील वस्तुची नोंद व किंमत तक्रारदारांच्या पतीचे सांगण्याप्रमाणे लिहीली आहे. तक्रारदारांनी आपल्या प्रति उत्तराच्या शपथपत्रामध्ये ही बाब नाकारली आहे. तसेच तक्रारीमध्ये असे कथन केले आहे की, त्या सामानाच्या यादीमधील किंमत ही सा.वाले यांनी स्वताःच लिहिली होती व व एकूण किंमत रु.50,000/- दाखविली होती. या प्रमाणे सा.वाले यांच्या साक्षीदारांचे साक्षीस वस्तुच्या किंमतीचे संदर्भात जास्त महत्व देता येत नाही. तर वर नमुद केल्याप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांचे घरगुती सामान डेहराडून ते मुंबई असे स्थलांतरीत करणेकामी स्विकारले व प्रवासा दरम्यान लाकडी फर्नीचरचे व काही इतर वस्तुंची मोडतोड झाली व नुकसान झाले. तक्रारदारांना त्या वस्तु नव्याने खरेदी कराव्या लागल्या असतील किंवा नविन खरेदी केलीतर त्याची किंमत निच्छितच पॅकींगचे यादीमध्ये दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त असेल. या वरुन तक्रारदारांनी वस्तुच्या किंमती बद्दल मागणी केलेली रु.23,270/- ही मागणी वाजवी दिसते. सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी फेटाळली व तक्रारदारांना सा.वाले यांना पत्र व्यवहार करावा लागला. त्यानंतर वकीलामार्फत नोटीस द्यावी लागली. वस्तुंची मोडतोड झाल्यामुळे व काही दिवसतरी त्या वस्तु वापरण्यास उपलब्ध नसल्याने तक्रारदारांची गैरसोय व कुचंबणा झाली असेल. तक्रारदारांनी त्या बद्दल नुकसान भरपाई रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. या व्यतिरिक्त तक्रारदारांना वकीलांची मदत घेऊन तक्रार दाखल करावी लागली व त्याकामी खर्च करावा लागला असेल. वरील सर्व बाबींचा विचार करता सा.वाले यांनी तक्रारदारांना एकत्रित रु.50,000/- अदा करावेत असा आदेश देणे योग्य व संयुक्तीक राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. त्यामध्ये तक्रारीचा खर्च, वस्तुंची किंमत, येणे रक्कमे वरील व्याज, नुकसान भरपाई हया सर्व गोष्टी संम्मलीत आहेत.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 284/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना घरगुती सामानाच्या वाहतुकीच्या संर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना वस्तुची किंमत, नुकसान भरपाई, व तक्रारीचा खर्च या बद्दल एकत्रितपणे रु.50,000/- न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाचे आत अदा करावी असा आदेश देण्यात येतो. अन्यथा विहीत मुदत संपल्यापासून 9 टक्के व्याज रक्कम अदा करेपर्यत अदा करावेत असाही आदेश देण्यात येत आहे.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.