जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 177/2013 तक्रार दाखल तारीख – 17/12/2013
निकाल तारीख - 12/05/2015
कालावधी - 01 वर्ष , 04 म. 25 दिवस.
संतोष सुर्यकांत भस्मे,
वय – 43 वर्षे, धंदा – नौकरी,
रा. प्रकाशनगर लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- मृगेंद्र डेव्हलपर्स,
प्रो प्रा. सच्चिदानंद चंद्रकांत पांचाळ,
वय – 38 वर्षे, धंदा – बिल्डर व डेव्हलपर्स
रा. रुद्रेश्वर मंदिरासमोर, एल.आय.सी कॉलनी,
लातुर.
- ज्ञानेश्वरराव जाधव,
वय – 60 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त,
रा. श्रीनगर लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एल.ई.भागवत.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- अॅड.एस.ओ.जाधव.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :- अॅड.एस.के.जोशी
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा लातुर येथील रहिवाशी असून, शाळेत लिपीक या पदावर काम करतो. गैरअर्जदार क्र. 1 हे मृगेंद्र डेव्हलपर्स व बिल्डर्स म्हणून दुकान क्र; 102 ओमकार कॉम्प्लेक्स खर्डेकर स्टॉप येथे व्यवसाय करतात. गैरअर्जदार क्र. 2 यांच्या जागेत कृष्णाई अपार्टमेंट व अन्नपुर्णा अपार्टमेंट या दोन अपार्टमेंटचे बांधकाम करणार आहेत असा करार गैरअर्जदार क्र. 1 व 2 मध्ये झाला आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 2 ची सदर जागा अर्जदारास दाखवली. सदर जागेत अपार्टमेंटचे काम केले जाणार आहे त्याचे माहिती पत्रक गैरअर्जदाराने अर्जदारास दिले. अर्जदाराने कृष्णाई अपार्टमेंट येथील 1 बीएचके फ्लॅट क्र. 101 (जी) त्याची किंमत रु. 11,00,000/- होती. अर्जदाराने गैरअर्जदारास अडव्हान्स रक्कम रु. 76,000/- इतकी दिली आहे. अर्जदाराने उर्ववरीत रक्कम तीन हप्त्यात जमा करण्याचे सांगितले. अर्जदारास जमा केलेल्या रकमेच्यापावत्या मृगेंद्र डेव्हलपर्स या नावाने दिल्या अर्जदाराने लेखी कराराची मागणी केली असता, गैरअर्जदाराने लेखी करार करुन दिला नाही.अर्जदाराने तक्रारी अर्जात सदर फ्लॅटचा लेखी करार करुन दयावा किंवा रु. 76,000/- व्याजासह परत करावेत. मानसिक, शारिरीक त्रासापोटी व दाव्याच्या खर्चापोटी रु. 10,000/- ची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे, व त्यासोबत एकुण 08 कागदपत्रे दिली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 यांचे विरुध्द दि. 09/06/2014 रोजी म्हणणे नाही आदेश झाला आहे.
गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात कोणताही व्यवहार झाला नाही. अर्जदाराकडुन कोणतीही रक्कम स्विकारली नाही. अर्जदारास ओळखत नाही. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. अर्जदाराने लेखी अथवा तोंडी तक्रार दिली नाही, अर्जदाराची तक्रार नामंजुर करण्यात यावी.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदार क्र. 2 चे लेखी म्हणणे, अर्जदाराचा दि. 09/10/2014 रोजीचा युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 2 चा लेखी युक्तीवाद याचे वाचन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदाराने गैरअर्जदारास फ्लॅट खरेदी करण्यासाठीची रक्कम दिली आहे. सदरची रक्कम गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो. म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराने गैरअर्जदारास दि. 30/11/11 रोजी पावती क्र. 18 व 19 चेकद्वारे रक्कम रु. 30,000/- व 21,000/- दिले आहेत. सदरच्या पावत्या मृगेंद्र डेव्हलपर्स या नावाने असल्याचे पावतीवरुन दिसते. अर्जदाराने दि. 21/01/12 रोजी रक्कम रु. 24,000/- पावती क्र. 24 द्वारे गैरअर्जदारास दिले आहेत. सदरची पावती दाखल आहे, यावरुन असे दिसते की, गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराने दिलेली रक्कम स्विकारलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराचे दिलेले फ्लॅटचे माहिती पत्रक दाखल केले आहे, त्यात फ्लॅट बुक करा व आकर्षक सवलत व एक्स्ट्रा पॅकेज मिळवा तसेच साईडचे नाव अन्नपुर्णा व कृष्णाई अपार्टमेंट श्रीनगर विदया विकास शाळेच्या मागील बाजुस रिलायन्स पेट्रोल पंप बार्शी रोड, लातुर, व मृगेंद्र डेव्हलपर्स दुकान क्र.102 ओमकार कॉम्प्लेक्स खर्डेकर स्टॉप लातूर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. अर्जदारास दिलेल्या पावती क्र. 18,19,24 वरील पत्ता व सदरचा पत्ता एकच आहे. यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदार मृगेंद्र डेव्हलपर्स नावाने बिल्डर व डेव्हलपर्सचा व्यवसाय करतो.
अर्जदाराने दैनिक लोकमत दि. 25/12/2013 रोजीचे जाहीर प्रगटन दाखल केले आहे. त्यात गैरअर्जदार क्र. 2 सोबत कृष्णाई अपार्टमेंट बाबत कोणताही व्यवहार करण्यात येवू नये, असे गैरअर्जदार क्र. 1 ने म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 ने दि. 30/12/2013 रोजी दि. 25/12/2013 रोजीच्या जाहीर प्रगटनाचे उत्तर दैनिक एकमतमध्ये दिले आहे. यावरुन असे दिसते की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्यात कृष्णाई अपार्टमेंट लातुर संदर्भात व्यवहार झालेला आहे, असे सिध्द होते. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यास रक्कम रु. 75,000/- दिलेली आहे. त्याप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदारास करारनामा व फ्लॅट दिलेला नाही. गैरअर्जदाराने रक्कम स्विकारुन कराराप्रमाणे सेवा न देवून अनुचित प्रथेचा वापर केला आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने म्हणणे दिले नसल्यामुळे त्याचा उजर असल्याचे दिसुन येत नाही, यावरुन अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र. 1 यांना मान्य असल्याचे दिसते. म्हणुन मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून सदरचा तक्रारी अर्ज सिध्द केल्यामुळे रक्कम रु. 75,000/- व मानसिक, शारिरीक त्रासापोटी व तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 8,000/- अनुतोष मिळण्यास पात्र आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु.75,000/-दि.
30/11/2011 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन अतिरिक्त व्याज द.सा.द.शे. 9 टक्के
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 4,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 4,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन
30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.