तक्रारदार : वकील श्री. एम.पी.राज हजर.
सामनेवाले : स्वतः हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री. स. व. कलाल , सदस्य, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. प्रकरणात अवर लेडी ऑफ फातीमा प्लॅाट ओनर्स वेलफेअर असोशियेशन, वांजळे , ता.करजत, स्थानिक कार्यालय विले-पार्ले, मुंबई 400 057 ( यापुढे तक्रारदार असा उल्लेख आहे) यांनी श्रीमती. आयव्ही निकोलास जॉर्ज फर्नाडीस, कालीना सांताक्रृझ, मुंबई 400 098 यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत या ग्राहक मंचासमोर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार यांचे वतीने तक्रारदार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मौरीस गोन्सालवीज यांनी असोसिएशनच्या ठरावा प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, सा.वाले हे सिटी सर्व्हे क्रमांक 176/37 जमीनीचे क्षेत्रफळ 1945 स्वेअर मिटर, आणि सिटी सर्व्हे क्रमांक 176/38 जमीनीचे क्षेत्रफळ 6362 स्वेअर मिटर, या मालमत्तेचे मालक आहेत. सा.वाले यांनी सदर जमीनीचे 36 प्लॅाट तंयार करुन ते संबंधित प्लॅाट खरेदीदार यांना वैयक्तिक विक्री केलेले आहेत व त्यामध्ये खुली जागा, अंतर्गत रोड, रिक्रियेशन गाऊंड याचा समावेश आहे. सा.वाले यांनी मंजूर नकाशा प्रमाणे खुली जागा, अंतर्गत रोड, रिक्रियेशन गाऊंड या बाबतचे कोणतेही विकासाचे काम केलेले नाही आणि सदरची जागा ही सा.वाले यांच्यात नांवावरच आहे. सा.वाले यांना वेळोवेळी सूचना व पत्र व्यवहार करुनही त्यांनी सदर प्लॅाटच्या संकुलातील खुली जागा अंतर्गत रोड, वगैरेसाठी काही कामकाज केलेले नाही व त्यासाठी सा.वाले यांचे कडून टाळाटाळ केली जाते. तसेच तक्रारदार यांनी सा.वाले यांचे सोबत पुरवणी करार करुन सदर करारा नुसार सा.वाले यांना विकासा संबंधी सोपविण्यात आलेली विविध प्रकारची कामे सा.वाले यांनी आगाऊ मोबदला घेऊन देखील सदरची कामे पूर्ण केलेली नाहीत. म्हणून तक्रारदार यांनी या मंचासमोर तक्रार दाखल केलेली आहे.
3. तथापी तक्रारदार यांनी दिनांक 21.3.2017 रोजी त्यांच्या तक्रारीतील सर्व मागण्या मागे घेऊन केवळ त्यांच्या संकुलासाठी विद्युत ट्रान्सफॉर्मर सा.वाले यांनी बसवून द्यावा या मागणी बाबत आग्रही असल्याची पुरसीस दाखल केली. त्यानुसार तक्रारदार यांची केवळ त्यांच्या प्लॉट धारकांच्या संकुलासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविणे बाबतची मागणीचा विचार मंचासमोर आहे.
4. या उलट सा.वाले यांनी आपली कैपीयत, दाखल करुन तक्रारदारांची तक्रार खोटी व लबाडपणाची असल्याचे नमुद करुन तक्रारदारांची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे. उभय पक्षकारांचे पुरावा शथपथपत्र, लेखी युक्तीवाद, व पुराव्या संबंधीचे कागदपत्र अभिलेखात दाखल आहेत. उभय पक्षकारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्या नुसार मंच खालील प्रमाणे न्यायनिर्णय करीत आहे.
5. तक्रारदार यांच्या दिनांक 21.3.2017 रोजीच्या पुरसीस नुसार त्यांनी केवळ त्यांच्या प्लॉट धारकांच्या संकुलासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर सा.वाले यांनी बसवून मिळावा अशी प्रमुख मागणी केलेली आहे. या बाबत सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारदार यांना स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर बसवून देण्या बाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही, तसेच सा.वाले यांनी वैयक्तिकरीत्या विज वितरण कंपनीकडे सतत पाठपुरवा करुन विद्युत पुरवठा क्षमता वाढऊन घेतेलेली आहे. त्यामुळे संकुलातील सर्व प्लॉट धारकांकडे विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला असून संबंधित प्लॉटधारकांना स्वतंत्र मिटर देण्यात आलेले आहेत. त्यामुळे नविन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याची सा.वाले यांची जबाबदारी संपलेली आहे. मंचाने अभिलेखातील कागदपत्रांचे अवलोक केले असता तक्रारदार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. श्री. मौरीस गोन्सालवीज यांनी सा.वाले यांचे मुखत्यारधारक श्री. निकोलास जॉर्ज फर्नाडीस यांचे सोबत विकास कामासंबंधी पुरवणी करार केल्याचे दिसून येते. सदर करारातील परिच्छेद क्र.2 कलम ‘ सी ’ नुसार संपूर्ण संकुलासाठी एक विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सा.वाले यांना सोपविण्यसात आलेले असल्याचे दिसुन येते. या व्यतिरिक्त इतरही कामे सा.वाले यांना सदर करारानुसार सोपविण्यात आल्याचे दिसून येते व सदर कामासाठी रु.1,40,270/- इतकी रक्कम सा.वाले यांनी तक्रारदार यांचेकडून आगाऊ स्वरुपात घेतलेली आहे. म्हणून सदर करारानुसार सा.वाले यांना तक्रारदार प्लॅाट धारकांच्या संकुलासाठी स्वतंत्र विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविणे क्रमप्राप्त आहे असे मंचाचे मत आहे.
6. वरील विवेचनावरुन सा.वाले यांनी तक्रारदार यांचे सोबत विकास कामासंबंधी केलेल्या पुरवणी करारा नुसार ट्रान्सफॉर्मर संबंधीच्या कामा बाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केलेली आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. आरबीटी तक्रार क्रमांक 159/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदार यांना ट्रान्सफॉर्मर संबंधीच्या कामा बाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले यांनी तक्रारदार प्लॅाट धारकांच्या संकुलासाठी पुरवणी करारानुसार हे आदेश पाप्त झाल्यापासून 60 दिवसाचे आज ट्रान्सफॉर्मर बसवून द्यावा. तसे न केल्यास सा.वाले यांनी तक्रारदार यांचे कडून ट्रान्सफॉर्मरच्या खर्चासाठी घेतलेली रक्कम तक्रारदार यांनी तक्रार दाखल केल्यापासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज आकारणी करुन तक्रारदारास संपूर्ण रक्कम मिळपर्यत व्याजासह रक्कम परत करावी.
4. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 21/04/2016