पारीत दिनांकः- 28/10/2010 (द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून वाहन कर्ज घेतले असून, समझोत्यानुसार कर्जाची परतफेड केली. गैरअर्जदार यांनी रकमेची पुन्हा मागणी केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून टाटा स्पेशियो जीप खरेदी करण्यासाठी दि.18.02.2003 रोजी 2 लाख 80 हजार रुपयाचे कर्ज घेतले. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली आहे, पण काही हप्त्याबाबत मतभेद झाल्यामुळे त्यांनी ती रक्कम गैरअर्जदार यांच्याकडे भरली नाही. गैरअर्जदार यांनी आर्बिट्रेशन व कॉन्सिलेशन कायद्यातील तरतुदीनुसार दि.21.09.2008 रोजी वाद मिटविण्यासाठी पत्र दिले, त्यात तडजोड होऊन गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून 6837/- रुपये दि.23.09.2008 रोजी स्विकारले. अर्जदाराने ‘नो डयुज’ पत्राबदद्ल विचारणा केली असता, ते नंतर पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले. गैरअर्जदार यांच्यातर्फे त्यानंतर दि.26.02.2010 रोजी अर्जदारास नोटीस पाठविण्यात आली, ज्यामध्ये त्यांना आर्बिट्रेशनसाठी दि.26.03.2010 रोजी मुंबईत उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व नो डयुज पत्र देण्याची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांना नोटीस प्राप्त होऊनही मंचात उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून 2,80,000/- रुपयाचे वाहन कर्ज घेतले आहे. कर्जफेडीच्या थकीत रकमेबाबत दोन्ही बाजूमध्ये वाद होता. गैरअर्जदार यांनी दि.05.09.2008 रोजी अर्जदारास आर्बिट्रेशन व कॉन्सिलेशन कायद्याअंतर्गत तडजोड करण्याबाबत पत्र दिले. दोन्ही पक्षात दि.21.09.2008 रोजी तडजोड होऊन अर्जदाराने 6831/- रुपये भरण्याचे मान्य केले. तडजोडीनुसार अर्जदाराने दि.23.09.2008 रोजी ही रक्कम गैरअर्जदार यांच्याकडे भरली असल्याचे दिसून येते. दि.22.02.2007 रोजी, गैरअर्जदार यांच्यातर्फे नितीन चडडा, सोल आर्बिट्रेटर यांच्याकडे उपस्थित राहण्याची नोटीस अर्जदारास देण्यात आली व अर्जदारास दि.26.03.2010 रोजी मुंबई येथील कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. गैरअर्जदार यांच्यातर्फे रकमेबाबतचा वाद दि.21.09.2008 रोजी मिटला असल्यामुळे व अर्जदाराने रक्कम भरलेली असतांना देखील पुन्हा नोटीस पाठविण्यात आलेली दिसून येते. या प्रकारामुळे अर्जदार मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. आदेश 1) गैरअर्जदार यांनी अर्जदारास 30 दिवसाच्या आत बे बाकी प्रमाणपत्र द्यावे. 2) गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासाबदद्ल रु.2500/- व खर्चाबदद्ल रु.1,000/- 30 दिवसात द्यावे.
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |