(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या. )
(पारीत दिनांक– 21 सप्टेंबर, 2019)
01. त.क. सहकारी पतसंस्थे तर्फे तिचे व्यवस्थापकानी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष प्रॉमीस टेक्नॉलाजीस, भंडारा तर्फे तिचे प्रोप्रायटर याचे विरुध्द अग्रीम रक्कम स्विकारुनही ऑर्डर प्रमाणे साहित्याचा पुरवठा न केल्या बाबत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
त.क. ही एक सहकारी पतसंस्था असून तिचे वतीने व्यवस्थापकानी विरुध्दपक्ष प्रॉमीस टेक्नॉलाजीस, भंडारा तर्फे तिचे प्रोप्रायटर श्री स्वप्नील वानखेडे याचे विरुध्द अग्रीम रक्कम स्विकारुनही ऑर्डर प्रमाणे साहित्याचा पुरवठा न केल्या बाबत प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे. तक्रारी नुसार त.क. पतसंस्थेनी विरुध्दपक्ष याचे जवळून पतसंस्थे करीता 12 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, 02 फींगर प्रिंट अटेंडन्स मशीन आणि 1 प्रवेश नियंत्रण (Access Control) असे साहित्य एकूण रुपये-98,000/- मध्ये विकत घेण्याचा ऑर्डर दिला होता, त्यापोटी रुपये-50,000/- एवढया रकमेचा धनादेश क्रं-903322, दिनांक-02.01.2015 रोजी अग्रीम म्हणून विरुध्दपक्षाला दिला होता. परंतु खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदरचा धनादेश वटला नाही त्यामुळे त.क.संस्थेनी विरुध्दपक्ष याला साहित्याचे ऑर्डरपोटी दिनांक-08.01.2015 रोजी नगदी रक्कम रुपये-50,000/- दिली होती व वि.प.साहित्य पुरवठा हमीदार याने त्या बाबत पावती दिली होती. ऑर्डर बुकींग दिनांक-27.12.2014 पासून सहा महिन्याचे आत साहित्य पुरविण्याची हमी विरुध्दपक्षाने दिली होती परंतु विहित मुदतीत साहित्याचा पुरवठा विरुध्दपक्षाने केला नसल्याने त.क.संस्थे तर्फे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी घेऊन तसेच काही वेळेस दुरध्वनी वरुन ऑर्डर प्रमाणे साहित्य पुरवठा करण्या बाबत विनंती करण्यात आली होती परंतु विरुध्दपक्षाने त्यास योग्य तो प्रतिसाद दिला नाही. बराच कालावधी निघून गेल्याने त.क.पतसंस्थेस सदर साहित्याची आवश्यकता राहिलेली नव्हती, त्यामुळे त.क. पतसंस्थेनी वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याला दिनांक-12.04.2016 आणि त्यानंतर सुधारीत दिनांक-20.06.2016 रोजी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून साहित्याचे ऑर्डरपोटी दिलेली नगदी अग्रीम रक्कम रुपये-50,000/- ची मागणी केली परंतु विरुध्दपक्षाला नोटीस प्राप्त होऊनही त्याने सदर रक्कम परत केली नाही.
तक्रारकर्ता पतसंस्थे तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याने अग्रीम रक्कम स्विकारुनही कबुल केल्या प्रमाणे विहित मुदतीत ऑर्डर प्रमाणे कोणतेही साहित्य पुरविले नाही वा ऑर्डरपोटी स्विकारलेली अग्रीम रक्कमही परत केली नाही अशाप्रकारे विरुध्दपक्षाने दोषपूर्ण सेवा दिली आणि भौतीक सोयी-सुविधां पासून त.क. पतसंस्थेला वंचित ठेवले त्यामुळे तक्रारकर्ता पतसंस्थेला आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून त.क. पतसंस्थे तर्फे तिचे व्यवस्थापकांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्ष याचे विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्ष साहित्य साहित्य पुरवठा हमीदार याने साहित्य न पुरविल्याने त्याला आदेशित करण्यात यावे की त्याने तक्रारकर्ता पतसंस्थेला झालेल्या आर्थिक त्रासा बद्दल रुपये-30,000/-, नोटीस खर्च रुपये-2000/-,तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-तसेच साहित्यपोटी अग्रीम स्विकारलेली रक्कम रुपये-50,000/- असे मिळून एकूण रुपये-92,000/- दिनांक-08.01.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला द्दावेत.
(02) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याने लेखी उत्तर पान क्रं 28 ते 34 वर ग्राहक मंचा समक्ष दाखल केले. विरुध्दपक्षाने लेखी उत्तरात असे नमुद केले की, 12 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, 02 फींगर प्रिंट अटेंडन्स मशीन आणि 1 प्रवेश नियंत्रण (Access Control) असे साहित्य एकूण रुपये-98,000/- विकत घेण्या बाबत जो ऑर्डर त्याला मिळालेला होता, तो ऑर्डर त.क. पतसंस्थेने दिलेला नसून श्री गुलाब आंबाने या नावाचे व्यक्तीने त्याला दिलेला होता. त्याने श्री गुलाब आंबाने यांना सी.सी.टी.व्ही.कॅमे-याचे पहिले अंदाजपत्रक दिनांक-13.12.2014 रोजी दिले होते आणि फींगर प्रिन्ट टाईम अटेंन्डन्स संबधात दुसरे अंदाजपत्रक तसेच अॅक्सेस कंट्रोलचे तिसरे अंदाजपत्रक असे मिळून एकूण रुपये-98,000/- चे दिले होते. त्याने सदर साहित्य पुरवठा करण्या बाबतचा व्यवहार श्री गुलाब आंबाने यांचेशी केलेला असल्यामुळे त.क.पतसंस्था ही विरुध्दपक्षाची ग्राहक होत नाही. सदर पतसंस्था निर्माण झाली त्यावेळी कोणत्याही व्यवस्थापकाची नियुक्ती तेथे झालेली नव्हती. श्री गुलाब आंबोने यांनी उपरोक्त नमुद साहित्य पुरविण्याची मौखीक विनंती विरुध्दपक्षाकडे केली होती. सदर काम सुरु होण्यापूर्वी श्री गुलाब आंबोने यांनी अग्रीम रुपये-50,000/- देण्याची तयारी दर्शविली आणि उरलेली रक्कम लवकरात लवकर देण्याचे मान्य केले होते, त्यानुसार विरुध्दपक्षाने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्या करीता श्री आंबोने यांचे कार्यालयात केबल लावले व एक अॅक्सेस कंट्रोल पॅनल बसविले. केबलची किम्मत रुपये-3450/- आणि अॅक्सेस कंट्रोलची किंमत रुपये-19,660/- असे एकूण रुपये-23,110/- चे काम केले. सदर काम हे व्यवसायिक हेतूसाठी करण्यात आले होते.
विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याने उत्तरात पुढे असे नमुद केले की, त.क. पतसंस्थे तर्फे धनादेश क्रं-903322, दिनांक-02.01.2015 अन्वये रुपये-50,000/- विरुध्दपक्षाला अग्रीम दिले होते हे म्हणणे काल्पनीक, बनावट व खोटे असून ते त्याला मान्य नाही. दि भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑप. बँक शाखा भंडारा या बँकेचा धनादेश क्रं-903322 अन्वये रुपये-50,000/- एवढी रक्कम श्री आंबोने यांनी विरुध्दपक्षाला दिली होती. विरुध्दपक्षाने सदरचा धनादेश बँक ऑफ बडोदा शाखा भंडारा येथे जमा केला होता परंतु श्री आंबोने यांचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश वटला नाही, ही बाब विरुध्दपक्षाने श्री गुलाब आंबाने यांना सांगून वेळोवेळी नगदी रुपये-50,000/- ची मागणी केली होती परंतु त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली म्हणून विरुध्दपक्षाने उर्वरीत काम पूर्ण केले नाही. या सर्व प्रकारास श्री गुलाब आंबाने हेच जबाबदार आहेत. त.क. पतसंस्थे तर्फे साहित्याचे ऑर्डरपोटी विरुध्दपक्षाला दिनांक-08.01.2015 रोजी रोख रक्कम रुपये-50,000/- देण्यात आली होती व विरुध्दपक्षाने रक्कम प्राप्त झाल्या बाबत पावती दिली होती हे म्हणणे खोटे असल्याचे नमुद केले. दिनांक-08.01.2015 रोजी तक्रारकर्त्याचा (त.क. पतसंस्था आणि तिेचे सचिव) श्री आंबोने यांचे पतसंस्थे मध्ये उदयच झाला नव्हता त्यामुळे त्या तारखेला त.क. पतसंस्थेचे अस्तित्वच नव्हते. अशी स्थिती असताना विरुध्दपक्षाने त.क.पतंस्थेला धनादेश न वटल्या बाबत सांगणे आणि त्यानंतर त.क.पत संस्थे तर्फे विरुध्दपक्षाला रुपये-50,000/- नगदी देण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे नमुद केले. विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याने दिनांक-13.12.2014 रोजी साहित्याचे अंदाजपत्रक श्री गुलाब आंबाने यांना दिले होते, त्यावेळी मनीगंगा महिला सहकारी पतसंस्था भंडारा येथे कोणीही व्यवस्थापक या पदावर नव्हते व त्या अंदाजपत्रकावर व्यवस्थापक म्हणून कोणीही सही केलेली नाही. विरुध्दपक्षाने साहित्य हे सहा महिन्यात पुरविण्या बाबत कोणतीही लेखी हमी दिलेली नव्हती तर ती हमी तोंडी दिली होती. श्री गुलाब आंबाने यांना अंदाजपत्रक दिल्या नंतर त्यांनी साहित्य पुरवठया बाबत लेखी ऑर्डर विरुध्दपक्ष याला दिली नव्हती तर तोंडी ऑर्डर दिली होती. श्री गुलाब आंबाने यांचे कडून दिलेला रुपये-50,000/- चा धनादेश वटविल्या गेला नसल्याने विरुध्दपक्षाने उर्वरीत काम केले नाही. काम पूर्ण न होण्यास सर्वस्वी श्री गुलाब आंबोने हेच जबाबदार आहेत. बराच कालावधी निघून गेल्यामुळे त.क.पतसंस्थेला सदर साहित्याची आवश्यकता उरली नव्हती हे म्हणणे माहिती अभावी विरुध्दपक्षाला मान्य नाही. त.क.पतसंस्थेनी वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्षाला दिनांक-12.04.2016 रोजी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविल्याची बाब मान्य आहे परंतु सदर नोटीस ही वैध नाही व तशी नोटीस देण्याचा त.क.पतसंस्थेला कोणताही अधिकार नाही. त.क.पतसंस्थेनी दुस-यांदा दिनांक-20.06.2016 रोजी सुधारीत नोटीस पाठविल्याची बाब मान्य आहे परंतु त.क.पतसंस्थेला अशी नोटीस देण्याचे अधिकार नाहीत कारण साहित्य पुरवठयाचे व्यवहाराशी त.क.पतसंस्थेचा कोणताही संबध नाही. विरुध्दपक्षाने त.क.पतसंस्थेच्या दोन्ही नोटीसला अनुक्रमे दिनांक-08.07.2016 व दिनांक-26.04.2016 रोजी उत्तर पाठविले व त्याव्दारे त्याचा साहित्य पुरवठया बाबत त.क.पतसंस्थे सोबत कोणताही व्यवहार झालेला नसून सदर व्यवहार हा श्री गुलाब आंबाने यांचे सोबत झालेला असल्याने नोटीस मधील संपूर्ण मजकूर नाकबुल केला होता. विरुध्दपक्षाने पुरविलेल्या साहित्याचा एक वर्षाचा वॉरन्टी कालावधी संपलेला असल्याने विरुध्दपक्ष केलेल्या कामाची रक्कम परत मिळण्यास हक्कदार आहे. त.क.पतसंस्था ही विरुध्दपक्षाची ग्राहक होत नसल्याने दोषपूर्ण सेवा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही आणि त.क.ला विरुध्दपक्षा विरुध्द मागणी करण्याचा कोणताही अधिकार पोहचत नाही. सबब तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याने केली.
04. त.क.पतसंस्थे तर्फे पान क्रं 09 वरील यादी नुसार अक्रं 1 ते 12 प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने पतसंस्थेचा ठराव, अंदाजपत्रक, त.क. पतसंसथे तर्फे निर्गमित धनादेश, रुपये-50,000/- वि.प.ला दिल्याची पावती, वि.प.ला दोन्ही नोटीस रजि.पोस्टाने पाठविल्या बाबत रजिस्टर नोटीस, रजि. पावत्या, रजि. पोच, विरुध्दपक्षाने नोटीसला दिलेले उत्तर अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. त.क. पतसंस्थे तर्फे पान क्रं 45 ते 47 वर शपथपत्र दाखल करण्यात आले तसेच पान क्रं 53 ते 55 वर लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला.
05. विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याने लेखी उत्तर पान क्रं 28 ते 34 वर दाखल केले. तसेच दस्तऐवज यादी क्रं 35 अन्वये एकूण 07 दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ बडोदा शाखा भंडारा यांचे कडून परत आलेला चेकचा मेमो, विरुध्दपक्षाने त.क.चे दोन्ही नोटीसला दिलेली उत्तरे,रजि.पोस्टाच्या पावत्या व पोच पावत्या अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. वि.प.ने पान क्रं 59 वर त.क. पतसंस्थेचे पत्रक दाखल केले. तसेच विरुध्दपक्षाने पान क्रं 60 ते 67 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
06 तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री जे.एम.बोरकर तर विरुध्दपक्षा तर्फे वकील श्री महेंद्र गोस्वामी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
07. त.क.पतसंस्थे तर्फे व्यवस्थापकाची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याचे लेखी उत्तर तसेच उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
(1) | त.क. पतसंस्था ही वि.प.ची ग्राहक होते काय? | होय. |
(2) | वि.प.ने, त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | होय. |
(3) | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारण मिमांसा ::
मुद्दा क्रं-1 बाबत-
08. विरुदपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याने संक्षीप्त बचाव असा घेतलेला आहे की, 12 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, 02 फींगर प्रिंट अटेंडन्स मशीन आणि 1 प्रवेश नियंत्रण (Access Control) असे साहित्य एकूण रुपये-98,000/- विकत घेण्याचा जो ऑर्डर त्याला मिळालेला होता, तो त.क.पतसंस्थे तर्फे त्याला मिळालेला नव्हता तर तो ऑर्डर श्री गुलाब आंबोने नावाच्या व्यक्तीने त्याला मौखीक स्वरुपात दिलेला होता आणि त्या ऑर्डरपोटी श्री गुलाब आंबाने याने अग्रीम रक्कम रुपये-50,000/- चा धनादेश त्याला दिला होता आणि उर्वरीत रक्कम लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे शब्दावर विश्वास ठेऊन विरुध्दपक्षाने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्या करीता श्री आंबोने यांचे कार्यालयात केबल लावले व एक अॅक्सेस कंट्रोल पॅनल बसविले. केबलची किम्मत रुपये-3450/- आणि अॅक्सेस कंट्रोलची किम्मत रुपये-19,660/- असे एकूण रुपये-23,110/-चे काम केले. सदर काम हे व्यवसायिक हेतूसाठी करण्यात आले होते. पुढे आंबाने याचे बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारणा वरुन सदरचा रुपये-50,000/- चा धनादेश वटविल्या गेला नसल्या बाबत विरुध्दपक्षाला बँक ऑफ बडोदा शाखेतून प्राप्त चेक मेमो वरुन कळले, उर्वरीत रक्कम मिळाली नसल्याने विरुध्दपक्षाने उर्वरीत काम केले नाही. सदर साहित्य विक्रीच्या व्यवहारामध्ये त.क.सहकारी पतसंस्थेचा कोणताही संबध त्याचे सोबत नव्हता. तसेच त.क.पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचे पदच सदर विक्री व्यवहाराचे वेळी निर्माण झालेले नव्हते. थोडक्यात विरुध्दपक्षाने साहित्य पुरवठा करण्या बाबतचा व्यवहार हा श्री गुलाब आंबाने यांचे सोबत झालेला असल्याने तसेच सदर साहित्य हे व्यवसायिक हेतूसाठी ऑर्डर केलेले असल्याने त.क.पतसंस्थे तर्फे व्यवस्थापक हे विरुध्दपक्षाचे ग्राहक होत नाहीत असा आक्षेप विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदाराचा आहे.
09. ग्राहक मंचा समोरील पान क्रं 11 वर जे विरुध्दपक्षाने साहित्या पुरवठया बाबत दिलेले जे अंदाजपत्रक आहे ते श्री गुलाब आंबाने यांचे नावाने दिलेले असून ते सी.सी.टी.व्ही.कॅमे-याचे पहिले अंदाजपत्रक दिनांक-13.12.2014 रोजीचे दिसून येते. परंतु पान क्रं 12 वर दाखल साहित्य पुरवठयाचे व्यवहारा बाबत दिनांक-02.01.2015 रोजीचा धनादेश क्रं-903322, विरुध्दपक्ष स्वप्नील वानखेडे याचे नावाचा असून सदर धनादेश हा रुपये-50,000/- एवढया रकमेचा दिसून येतो आणि सदर धनादेशावर शालीनी धनराज आंबोने मुख्य प्रवर्तिका (नियोजित) मनिगंगा महिला सहकारी पतसंस्था मर्यादित, भंडारा यांची त्यावर सही आहे. सदरचा धनादेश आंबोने यांचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटविल्या गेला नाही. सदर क्रमांकाचा धनादेश आणि तो वटविल्या गेला नाही या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत व त्या उभय पक्षांनाही मान्य आहेत. येथे मंचा तर्फे विशेषत्वाने नमुद करण्यात येते की, सदरचा धनादेश हा त.क. पतसंस्थे तर्फे मुख्य प्रवर्तिका (नियोजित) मनिगंगा महिला सहकारी पतसंस्था मर्यादित, भंडारा यांचे कडून विरुध्दपक्षाला देण्यात आलेला आहे आणि यामधील त.क. मनिगंगा महिला सहकारी पतसंस्था मर्यादित, भंडारा ही एक सहकारी पतसंस्था असून तिचे वतीने व्यवस्थापकाने ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे, त्यामुळे साहित्य पुरवठा करण्या बाबतचा व्यवहार हा जरी श्री गुलाब आंबोने यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याचेशी झालेला असला तरी साहित्य पुरवठा करण्या बाबतचे व्यवहारा संबधीचा धनादेश हा मनिगंगा महिला सहकारी पतसंस्था मर्यादित, भंडारा या नावाने विरुध्दपक्ष पुरवठा हमीदाराला देण्यात आला होता व सदर धनादेश वि.प.ला मिळाल्याची बाब विरुध्दपक्षाने मान्य केलेली आहे, त्यामुळे त.क. पतसंस्थेनी विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदाराशी साहित्य पुरवठा करण्या बाबत व्यवहार केला नसून तो श्री गुलाब आंबाने यांनी केलेला असल्याने त.क. पतसंस्थे तर्फे तिचे व्यवस्थापक हे विरुध्दपक्षाचे ग्राहक होत नाहीत या विरुध्दपक्षाचे आक्षेपात ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येत नाही. त.क. पतसंस्थेची तक्रार मुख्य असून तिचे वतीने तिचे व्यवस्थापकानी ही तक्रार ग्राहक मंचा मध्ये दाखल केलेली असल्याने त.क. पतसंस्थे तर्फे तिचे व्यवस्थापक हे विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदाराचे ग्राहक होतात त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं-2 बाबत-
10. उपरोक्त वर्णनातीत रक्कम रुपये-50,000/- चा विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याला मिळालेला धनादेश आंबोने यांचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटविल्या गेला नाही ही बाब उभय पक्षांना मान्य आहे. पान क्रं 13 वर दाखल विरुध्दपक्ष स्वप्नील वानखेडे याने दिनांक-08 जानेवारी, 2015 रोजी
दिलेली पावती ही त्यानेच दिल्याची बाब नाकारलेली आहे. सदर पावती मध्ये असे नमुद आहे की-
“Received Advance payment of Rs. 50,000/- (Fifty Thousand only) against the cctv camera, Fingerprint, Attendance Machine and Access Control from Maniganga Mahila Patsantha, Bhandara.
Received
Swapnil Wankhede
Sd/-
(Promise Technologies)
11. विरुध्दपक्षाचे उत्तरा प्रमाणे त्याने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्या करीता श्री आंबोने यांचे कार्यालयात केबल लावले व एक अॅक्सेस कंट्रोल पॅनल बसविले. केबलची किम्मत रुपये-3450/- आणि अॅक्सेस कंट्रोलची किम्मत रुपये-19,660/- असे एकूण रुपये-23,110/- चे काम केले. परंतु या संबधात विरुध्दपक्षाने सदर काम केल्या बाबत कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर दाखल केलेला नाही. जर विरुध्दपक्षाला रुपये-50,000/- अग्रीम रककम त.क. कडून मिळाली नसती तर त्याने त्याच वेळी त.क.ला पत्र देऊन पैशाची मागणी केली असती. विरुध्दपक्षाचे म्हणण्या प्रमाणे त्याने रुपये-23,110/- चे काम केले तर तो एवढे दिवस तो मौन का बाळगून होता व आता ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्या नंतर खोटा बचाव ग्राहक मंचा समोर घेत असल्याचे दिसून येते.
12. पान क्रं 12 वर अभिलेखावरील दाखल विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याने दिनांक-08 जानेवारी, 2015 रोजी रक्कम रुपये-50,000/- नगदी मिळाल्या बाबत दिलेल्या पावतीवर केलेली सही तसेच पान क्रं 17 व 18 वर अभिलेखावर दाखल विरुध्दपक्ष स्वप्नील वानखेडे याने त.क.पत संस्थेचे नोटीसला दिलेल्या दिनांक-26.04.2016 रोजीचे उत्तरावर केलेली सही तसेच पान क्रं 22 व 23 वर दाखल विरुध्दपक्ष स्वप्नील वानखेडे याने त.क.पत संस्थेचे नोटीसला दिनांक-08.07.2016 रोजी दिलेल्या उत्तरावर केलेली सही या सर्व सहया मोठया खुबीने वेगवेगळया स्वरुपात विरुध्दपक्षाने केलेल्या असल्या तरी त्या केलेल्या सहया हया एकमेकांशी ताळमेळ खातात. विरुध्दपक्षाने त.क.चे नोटीसला दिनांक-08/07/2016 रोजीचे दिलेल्या उत्तरावर केलेली सही आणि पान क्रं 28 ते 34 वर ग्राहक मंचा समक्ष विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या उत्तरावर केलेली सही हया एकसारख्या सहया आहेत तर पान क्रं 17 व 18 वर दाखल त.क.पत संस्थेचे नोटीसला दिनांक-26.04.2016 रोजी विरुध्दपक्ष स्वप्नील वानखेडे याने दिलेल्या उत्तरावर केलेली सही ही वर नमुद दोन्ही केलेल्या सहयांशी थोडी वेगळी केलेली सही आहे. परंतु नीट अवलोकन केले असता हया सहया एकाच व्यक्तीच्या असल्याची बाब सिध्द होते. पान क्रं 11 वर दाखल विरुध्दपक्षाने दिलेल्या अंदाजपत्रकावर केलेली सही आणि पान क्रं 13 वर दाखल रुपये-50,000/- मिळाल्या बाबत विरुध्दपक्षाने केलेली सही हया एकमेकांशी मेळ खात असून एक सारख्याच (Co-related and same) दिसून येतात आणि विशेषत्वाने विरुध्दपक्षाने अभिलेखावरील पान क्रं 11 वर दाखल असलेले अंदाजपत्रक (Estimate) नाकारलेले नाही.
13. उपरोक्त नमुद दस्तऐवजांचे अवलोकन केले असता विरुध्दपक्ष साहित्य पुरवठयाची हमी देणारा हा खोटा बचाव मंचा समक्ष घेत असल्याची बाब संपूर्णतः दस्तऐवजी पुराव्यानिशी सिध्द होते. विरुध्दपक्षाने काही प्रमाणात साहित्य बसविण्याचे काम केल्याचे जे म्हणणे मांडले त्या संबधात सुध्दा त्याने कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर दाखल केलेला नाही. जर त्याला त.क.पतंस्थे कडून अग्रीम राशी मिळाली नसती व त्याचे म्हणण्या प्रमाणे त्याने एकूण रुपये-23,110/- चे काम केले असते तर त्याने नक्कीच त.क. पतसंस्थेशी वा तो म्हणतो त्या प्रमाणे श्री गुलाब आंबाने याचेशी रक्कम परत मिळण्या बाबत पत्रव्यवहार केला असता व त्यानंतर कायदेशीर कार्यवाही केली असती परंतु तसे काहीच या प्रकरणात विरुध्दपक्षा कडून घडलेले नाही, विरुध्दपक्षाची एकंदरीत कृती ही संशयास्पद असून तो ग्राहक मंचा समोर खोटा बचाव घेत असल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते.
14. विरुध्दपक्षाचा असाही बचाव आहे की, यातील साहित्य हे व्यवसायिक हेतूने त्याचेकडे ऑर्डर केले होते. या संबधात ग्राहक मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, जेंव्हा साहित्य विकत घेऊन नफा कमाविण्यासाठी त्याची पुर्नविक्री केली जाते तेंव्हा तो व्यवसायिक हेतू होतो परंतु या प्रकरणात त.क. पतसंस्थेनी संस्थेच्या उपयोगा करीता साहित्य पुरवठा करण्या बाबतचा ऑर्डर विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याचेकडे दिला होता, यामध्ये पुर्नविक्री करुन नफा कमाविण्याचा कोणताही उद्देश्य दिसून येत नाही त्यामुळे विरुध्दपक्ष पुरवठा हमीदाराचे याही बचावा मध्ये ग्राहक मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही. या संदर्भात विरुध्दपक्षा तर्फे मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे दाखल केलेले आहेत परंतु ते हातातील प्रकरणात लागू पडत नाहीत असे ग्राहक मंचाचे मत आहे.
मुद्दा क्रं-3 बाबत-
15. त.क. पतसंस्थे तर्फे दिनांक-08 जानेवारी, 2015 रोजी साहित्य पुरवठया संबधात अग्रीम रुपये-50,000/- प्राप्त होऊनही विरुध्दपक्षाने कोणतेही साहित्य आज पर्यंत त.क. पतसंस्थेला पुरविलेले नाही आणि ही विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदाराने त.क. पतसंस्थेला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे, त्यामुळे त.क.पतसंस्थेला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे आणि नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च करावा लागलेला आहे. त्यामुळे त.क. पतसंस्थे तर्फे तिचे व्यवस्थापक यांना विरुध्दपक्षा कडून साहित्य पुरवठयापोटी दिलेली अग्रीम रक्कम रुपये-50,000/- आणि सदर रक्कमेवर नगदी अदा केल्याचा दिनांक-08.01.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-6 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. त्याच प्रमाणे या संपूर्ण प्रकरणात त.क.पतसंस्थेला झालेल्या आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि तक्रार खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष साहित्य पुरवठा हमीदार याचे कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
- तक्रारकर्त्याची विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष प्रॉमीस टेक्नॉलाजीस, भंडारा तर्फे तिचा प्रोप्रायटर श्री स्वप्नील वानखेडे याला आदेशित करण्यात येते की, त्याने त.क. पतसंस्थे तर्फे तिचे व्यवस्थापक यांना साहित्य पुरवठयापोटी
स्विकारलेली अग्रीम रक्कम रुपये-50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) परत करावी आणि सदर रक्कमेवर रक्कम नगदी स्विकारल्याचा दिनांक-08.01.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-6 टक्के दराने व्याजाची रक्कम त.क. पतसंस्थे तर्फे तिचे व्यवस्थापक यांना अदा करावी. - विरुध्दपक्ष प्रॉमीस टेक्नॉलाजीस, भंडारा तर्फे तिचा प्रोप्रायटर श्री स्वप्नील वानखेडे याला आदेशित करण्यात येते की, त्याने त.क. पतसंस्थे तर्फे तिचे व्यवस्थापक यांना आर्थिक त्रासापोटी रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष प्रॉमीस टेक्नॉलाजीस, भंडारा तर्फे तिचा प्रोप्रायटर श्री स्वप्नील वानखेडे याने प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- त.क. पतसंस्थेला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.