:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा मा.सदस्या श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर)
(पारीत दिनांक– 14 ऑगस्ट, 2018)
01. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्षां विरुध्द दोषपूर्ण बियाण्या संबधी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
यातील उभय तक्रारदार हे नात्याने अनुक्रमे पुत्र आणि पिता आहेत. तर उभय विरुध्दपक्ष अनुक्रमे बियाणे विक्रेता आणि बियाणे निर्माता आहेत. तक्रारकर्ता क्रं-2) याचे नावाने शेती असून त्यामध्ये गव्हाची पेरणी करण्या करीता त्याचा मुलगा तक्रारकर्ता क्रं-1) याने विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीव्दारे उत्पादीत महाराजा क्वॉलिटी सीडस क्रं-786415 लॉट क्रं-सप्टेंबर-2015 एम.जी.-702 चे गव्हाचे 20 किलो बियाणे रुपये-950/-एवढया किमतीत विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-16/11/2015 रोजी खरेदी केले व बिल प्राप्त केले.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, गव्हाचे बियाणे खरेदी केल्या नंतर त्यांनी ते मौजा खरबी येथील गट क्रं 101 या शेतामध्ये पेरले परंतु बियाणे पेरल्या नंतर काही दिवसांनी त्यांचे अंकुर निघाले नाही. बियाणे खरेदी करते वेळी विरुध्दपक्ष क्रं 1) बियाणे विक्रेता यांनी संपूर्ण गव्हाचे पिक हे 115 ते 120 दिवसां मध्ये निघेल असे आश्वासित केले होते परंतु बियाण्याची उगवण झालीच नाही. या संदर्भात विरुध्दपक्ष क्रं 1) बियाणे विक्रेता यांची तक्रारकर्ता क्रं-1) यांनी भेट घेऊन आणि वेळोवेळी दुरध्वनीव्दारे तक्रारी केल्यात तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधी श्री भूषण वाघाडे व श्री रोकडे यांचेकडे वारंवार दुरध्वनी वरुन तक्रारी केल्यात. विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता यांनी, तक्रारकर्ता क्रं-1) यांचे जवळ तडजोड करण्यास तयार असल्याचे सांगितले तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधी श्री भूषण वाघाडे आणि श्री रोकडे यांनी रुपये-5000/- मध्ये तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला परंतु तक्रारदारांना बियाण्याची किम्मत, पेरणी, खते, पाणी, विद्दुत, मजूरी इत्यादी घटकां करीता मोठया प्रमाणावर खर्च आल्यामुळे त्यांनी सदर तडजोड प्रस्तावास नकार दिला. तक्रारदारांनी गव्हाचे बियाण्याची उगवण न झाल्यामुळे दिनांक-13 जानेवारी, 2016 रोजी कृषी अधिकारी, तुमसर, खंडविकास अधिकारी, तुमसर तसेच तहसिलदार, तुमसर त्याच बरोबर तलाठी खरबी यांचेकडे लेखी तक्रारी केल्यात परंतु विरुध्दपक्षांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने तक्रारदार यांनी उभय विरुध्दपक्षांना दिनांक-19/07/2016 रोजी नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविली परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून शेवटी त्यांनी प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन उभय विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
पेरणी केलेल्या 20 किलो गव्हाच्या बियाण्या पासून अपेक्षीत 10 क्विंटल गव्हाचे उत्पादन न आल्याने एकूण रुपये-30,000/- एवढी नुकसान भरपाई वार्षिक-18% व्याजासह विरुध्दपक्षां कडून मिळावी. या व्यतिरिक्त गव्हाचे बियाणे खरेदी करण्यासाठी आलेला खर्च रुपये-950/- खरेदी दिनांका पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक-18% व्याजासह मिळावा. तसेच मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावा.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) श्री सुभाष गंगाराम राऊत बियाणे विक्रेता याने आपले लेखी उत्तर दाखल केले. त्याचे उत्तरा नुसार जर बियाण्याची उगवण झाली नाही तर त्या संबधीची तक्रार तक्रारदारानीं आठ ते दहा दिवसात करावयास हवी होती. बियाण्याची उगवण झाली नसेल तर बियाणे विक्रेता व बियाणे निर्माता कंपनी ही बियाणे खरेदीची किम्मत आणि पेरणीवरील खर्च हा संबधीत शेतक-याला देत असते, त्या प्रमाणे तक्रारदारांना बियाणे खरेदीचा खर्च रुपये-950/- आणि त्यावरील खर्च रुपये-1000/- असे एकूण रुपये-1950/- देण्यास ते तयार होते. तक्रारदारांच्या तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे प्रतिनिधी श्री भूषण वाघाडे आणि श्री रोकडे यांनी तडजोड करुन रुपये-1950/- ऐवजी रुपये-5000/- नुकसान भरपाई म्हणून देण्याची तयारी दर्शविली होती परंतु तक्रारदारांनी त्यास नकार दिला. तक्रारदारांनी तालुका कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी, तहसिलदार, तुमसर आणि तलाठी खरबी यांचेकडे लेखी तक्रारी केल्याची बाब मान्य केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. त्यांचे उत्तरा नुसार तक्रारदारांची खात्री पटल्या नंतरच त्यांनी बियाणे खरेदी केल्यामुळे विरुध्दपक्षाने कोणताही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही. तक्रारदारांनी कोणत्या गट क्रमांकात पेरणी केली, कशा पध्दतीने पेरणी केली याचा उल्लेख तक्रारीत केलेला नाही. मौजा खरबी येथील गट क्रं 101 मध्ये केलेल्या पेरणीशी त्यांचा कोणताही संबध नाही. तसेच तक्रारी मध्ये पेरणी कोणत्या तारखेला केली आणि पेरणी करताना काय काळजी घेतली याचा उल्लेख केलेला नाही तसेच बियाणे निर्माता कंपनीने दिलेल्या सुचनांचे पालन केले किंवा नाही याचा सुध्दा उल्लेख तक्रारीत केलेला नाही. त्याच बरोबर कोणताही पुरावा दाखल केलेला नाही त्यामुळे तक्रार बिनबुडाची व खोटी आहे. तक्रारदारांच्या बनावट नोटीसला त्यांनी दिनांक-23.07.2016 रोजी सविस्तर उत्तर दिलेले आहे. बियाणे खरेदी करणारे आणि शेतीचे मालक हे भिन्न आहेत. तक्रारदारांनी तक्रारी मध्ये विरुध्दपक्षांनी नोटीसला दिलेल्या उत्तराचा उल्लेख केलेला नाही. सबब तक्रारदारांची तक्रार ही खोटी, बिनबुडाची असल्याने खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनी तर्फे करण्यात आली.
05. तक्रारदारांनी तक्रारी सोबत बियाणे खरेदीचे बिल, कृषी अधिका-यांकडे केलेली तक्रार, बियाण्याच्या बॅगचे सिल, बियाण्याची बॅग, गाव नमुना 7/12 उतारा, उभय विरुध्दपक्षांना रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस, पोस्टाच्या पावत्या, पोच अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
06. विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनी तर्फे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे बियाणे तक्रार निवारण समिती संबधीचे परिपत्रकाची प्रत, तसेच त्यांनी तक्रारदारांच्या नोटीसला दिनांक-23.07.2016 रोजी दिलेले उत्तराची प्रत, त्यांचे व्दारे निर्मित बियाण्याच्या शुध्दते संबधीच्या अहवालाची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
07. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्त्याचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 हे मौखीक युक्तीवादाचे वेळी अनुपस्थित होते.
08. तक्रारदारांची सत्यापना वरील तक्रार, उभय विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे तसेच दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले, त्यावरुन ग्राहक मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
::निष्कर्ष::
09. तक्रारकर्ता क्रं-1) याने, त्याचे वडील तक्रारकर्ता क्रं-2) यांचे मालकीच्या शेती मध्ये गव्हाचे बियाणे लागवडीसाठी विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीव्दारे उत्पादीत महाराजा क्वॉलिटी सीडस क्रं-786415 लॉट क्रं-सप्टेंबर-2015 एम.जी.-702 चे गव्हाचे 20 किलो बियाणे रुपये-950/- एवढया किमतीत विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-16/11/2015 रोजी खरेदी केल्याची बाब उभय पक्षांना मान्य आहे.
10. तक्रारदारांच्या तक्रारी प्रमाणे त्यांनी खरेदी केलेले बियाणे मौजा खरबी येथील गट क्रं 101 या शेतामध्ये पेरले परंतु बियाणे पेरल्या नंतर काही दिवसांनी त्यांचे अंकुर निघाले नाही. या संदर्भात विरुध्दपक्ष क्रं 1) बियाणे विक्रेता यांची तक्रारकर्ता क्रं-1) यांनी भेट घेऊन आणि वेळोवेळी दुरध्वनीव्दारे तक्रारी केल्यात तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधी श्री भूषण वाघाडे व श्री रोकडे यांचेकडे वारंवार दुरध्वनी वरुन तक्रारी केल्यात. विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधी श्री भूषण वाघाडे आणि श्री रोकडे यांनी रुपये-5000/- मध्ये तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला परंतु तक्रारदारांना पेरणीसाठी मोठया प्रमाणावर खर्च आल्यामुळे त्यांनी सदर तडजोड प्रस्तावास नकार दिला. तक्रारदारांनी गव्हाचे बियाण्याची उगवण न झाल्यामुळे दिनांक-13 जानेवारी, 2016 रोजी कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी, तसेच तहसिलदार, तुमसर त्याच बरोबर तलाठी खरबी यांचेकडे लेखी तक्रारी केल्यात.
11. विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता यांचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनी कडून खरेदी केलेले गव्हाचे बियाणे हे दोषपूर्ण असल्याची बाब तसेच बियाणे खरेदी व पेरणीचा खर्च देण्यास ते तयार असल्याची बाब मान्य केलेली आहे फक्त विवाद हा नुकसान भरपाईच्या रकमे संबधीचा आहे.
12. विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनी तर्फे तक्रारदारांचे नोटीसला त्यांनी दिनांक-23/07/2016 रोजी दिलेल्या उत्तराची प्रत दाखल करण्यात आली, त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये नमुद केले की, दिनांक-16/11/2015 रोजी बियाणे खरेदी केल्या नंतर खरेदी दिनांका पासून 15 दिवसाचे आत पेरणी केली असे गृहीत धरल्यास खरेदी दिनांका पासून एक महिन्याचे आत बियाण्याच्या उगवणशक्ती संबधाने लेखी तक्रारी करावयास हव्या होत्या परंतु आठ महिन्या नंतर तक्रारी केलेल्या आहेत. प्रयोगशाळेच्या अहवाला प्रमाणे त्यांचे व्दारा निर्मित बियाण्याची उगवण शक्ती ही 87% एवढी आहे,याचे पुराव्यार्थ त्यांनी प्रयोगशाळेचे दिनांक-23/09/2016 रोजीचे प्रमाणपत्र दाखल केले, त्यामध्ये लॉट क्रं-एमजी-702 बियाण्याची उगवणशक्ती ही 87% एवढी असल्याचे नमुद आहे.
13. विरुध्दपक्ष क्रं-2) निर्माता कंपनी तर्फे जे बियाण्याच्या उगवणशक्ती संबधाने प्रमाणपत्र पुराव्या दाखल केलेले आहे, ते त्यांचेच प्रयोगशाळेचे आहे, ते त्रयस्थ सरकारी यंत्रणेव्दारे दिलेले नाही, त्यामुळे त्याचा फारसा उपयोग विरुध्दपक्ष क्रं 2 यांना होणार नाही. तसेच ज्या अर्थी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता यांना तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) कंपनीचे प्रतिनिधी यांना विरुध्दपक्ष क्रं 2 निर्मित बियाण्याची उगवण झाली नसल्याची बाब मान्य आहे, त्याअर्थी त्यांना या गोष्टीची कल्पना पूर्वी पासूनच असली पाहिजे की बियाणे हे दोषपूर्ण आहेत. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारी प्रमाणे बियाण्याची उगवण झालेली नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 1) बियाणे विक्रेता यांची तक्रारकर्ता क्रं-1) यांनी भेट घेऊन तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधी श्री भूषण वाघाडे व श्री रोकडे यांचेकडे वारंवार दुरध्वनी वरुन तक्रारी केल्यात. विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता यांनी, तक्रारकर्ता क्रं-1) यांचे जवळ तडजोड करण्यास तयार असल्याचे सांगितले तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधी श्री भूषण वाघाडे आणि श्री रोकडे यांनी रुपये-5000/- मध्ये तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला परंतु तक्रारदारांना बियाण्याची किम्मत, पेरणी, खते, पाणी, विद्दुत, मजूरी इत्यादी घटकां करीता मोठया प्रमाणावर खर्च आल्यामुळे त्यांनी सदर तडजोड प्रस्तावास नकार दिल्याचे नमुद केलेले आहे. विरुदपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनी व्दारे लेखी उत्तरात श्री भूषण वाघाडे आणि श्री रोकडे हे त्यांचे प्रतिनिधी नसल्याची बाब नाकबुल केलेली नाही.
14. विरुध्दपक्ष क्रं-1) श्री सुभाष गंगाराम राऊत बियाणे विक्रेता याने आपले लेखी उत्तरात जर बियाण्याची उगवण झाली नाही तर त्या संबधीची तक्रार तक्रारदारानीं आठ ते दहा दिवसात करावयास हवी होती असे जे नमुद केलेले आहे, त्या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्ष क्रं 1 च्याच उत्तरा नुसार नुकसान भरपाई रकमे संबधाने तक्रारदार व त्यांच्यात आणि विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे प्रतिनिधी यांच्या मध्ये तडजोड चालू होती ही बाब सिध्द झालेली आहे, त्यामुळे आज ना उद्दा नुकसान भरपाईची रक्कम मिळेल या आशेवर तक्रारदार होते म्हणून त्यांनी लेखी तक्रार लवकर केली नाही, असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही. तक्रारदारांनी दिनांक-13 जानेवारी, 2016 रोजी कृषी अधिकारी, तुमसर, खंडविकास अधिकारी, तुमसर तसेच तहसिलदार, तुमसर त्याच बरोबर तलाठी खरबी यांचेकडे लेखी तक्रारी केल्यात ही बाब सुध्दा विरुध्दपक्षांनी नाकारलेली नाही. तक्रारदारांनी कृषी अधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारीची प्रत पुराव्या दाखल सादर केली असून त्यावरुन त्यांनी दिनांक-13 जानेवारी 2016 रोजी तक्रार केल्याची बाब सिध्द होते. तक्रारदारांनी दिनांक-16/11/2015 रोजी बियाणे विकत घेतले त्यावरुन त्यांनी नोव्हेंबर, 2016 अखेर पेरणी केली हा कालावधी हिशोबात घेतला तर केवळ दिड महिन्यात कृषी अधिका-यांकडे लेखी तक्रार केल्याची बाब सिध्द होते त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) निर्माता यांनी त्यांचे लेखी उत्तरात आठ महिन्या नंतर तक्रारी केलेल्या आहेत, असे जे नमुद केले आहे ते चुकीचे असल्याचे सिध्द होते.
15. विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीने लेखी उत्तरात तक्रारदारांनी कोणत्या गट क्रमांकात पेरणी केली, कशा पध्दतीने परेणी केली, पेरणी कोणत्या तारखेला केली आणि पेरणी करताना काय काळजी घेतली याचा तक्रारीत उल्लेख केलेला नाही तसेच बियाणे निर्माता कंपनीने दिलेल्या सुचनांचे पालन केले किंवा नाही याचा सुध्दा उल्लेख केला नसल्याचे नमुद केले. या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की, ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी हे अज्ञानी असतात, यातील तक्रारदारांनी स्वतः तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे आणि त्यांचे तक्रारी मध्ये स्पष्टपणे नमुद केले आहे की, विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधीनीं तडजोडीपोटी सुचविलेली रक्कम अत्यल्प असल्याने तसेच तक्रारदारांना बियाण्याची किम्मत, पेरणी, खते, पाणी, विद्दुत, मजूरी इत्यादी घटकां करीता मोठया प्रमाणावर खर्च आल्यामुळे त्यांनी सदर तडजोड प्रस्तावास नकार दिला आणि त्यानंतर तक्रारी नोंदविल्यात.
16. तक्रारदारांनी 7/12 उतारा प्रत पुराव्यार्थ दाखल केली यावरुन त्यांची शेती मौजा खरबी, तलाठी साझा क्रं-31, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा येथे असून त्याचा भूमापन क्रं-101 असा आहे आणि एकूण क्षेत्रफळ 1 हेक्टर 34 आर एवढे आहे म्हणजेच 03 एकर 14 आर एवढी शेती त्यांचे मालकीची आहे. तक्रारदारांचे बिला प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीव्दारे उत्पादीत महाराजा क्वॉलिटी सीडस क्रं-786415 लॉट क्रं-सप्टेंबर-2015 एम.जी.-702 चे गव्हाचे 20 किलो बियाणे त्यांनी विकत घेतल्याची बाब सिध्द होते. परंतु विकत घेतलेले गव्हाचे बियाणे हे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवण न झाल्याने बियाणे खरेदीचा खर्च रुपये-950/- एवढा वाया गेल्याने तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता यांचे कडून तेवढी रक्कम परत मिळण्यास पात्र आहेत. गव्हाचा दर सर्वसाधारणपणे प्रती क्विंटल अंदाजे रुपये-1800/- एवढा आहे. तक्रारकर्त्याने 10 क्विंटल गव्हाचे झालेल्या नुकसानी पोटी रुपये-30,000/- नुकसान भरपाई मागितलेली आहे परंतु नमुद हिशोबा नुसार सदर नुकसान भरपाईची रक्कम ही रुपये-18,000/- एवढी येते आणि तेवढी नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत. यातील विरुध्दपक्ष क्रं-1) हा बियाणे विक्रेता आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता आहे, विरुध्दपक्ष क्रं-2) निर्मित दोषपूर्ण बियाण्यांमुळे तक्रारदारांचे नुकसान झालेले असल्यामुळे तक्रारदारांना अपेक्षीत पिकाचे नुकसानी बाबतचे मुद्दावर भरपाई देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्रं-2) निर्माता कंपनीची येते असे मंचाचे मत आहे. त्याच बरोबर तक्रारदार हे झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- दोन्ही विरुध्दपक्षां कडून वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
17. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) उभय तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता यांनी, उभय तक्रारदारांना त्यांचे कडून दोषपूर्ण बियाण्यापोटी स्विकारलेली रक्कम रुपये-950/- (अक्षरी रुपये नऊशे पन्नास फक्त) परत करावी.
3) विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी उभय तक्रारदारांना गव्हाचे दोषपूर्ण बियाण्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत रुपये-18,000/- (अक्षरी रुपये अठरा हजार फक्त) सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत द्दावी. विहित मुदतीत सदर नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास विरुध्दपक्ष क्रं-2) हे द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारदारांना सदर रक्कम देण्यास जबाबदार राहतील
4) तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-3000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना द्दावेत.
5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता यांनी निकालपत्राची प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
7) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.