विरुध्द पक्ष गैरहजर
एकतर्फा आदेश
द्वारा श्री.आर.बी.सोमानी - मा.अध्यक्ष
1. पावती क्र. 69/10-11 दि. 16/01/2011 नुसार रु. 10,000/- आगाऊ देऊन सामनेवाले यांचेकडे तक्रारदाराने मॉडयुलर किचन बनविण्यासाठी आदेश दिला आणि सामनेवाले यांनी तक्रारदाराचे घरी जाऊन ठरविल्याप्रमाणे मटेरियल देण्याचे कबूल केले. दि. 30/7/2011 रोजी तक्रारदाराने रु. 30,000/- नगदी दिले आणि रु. 30,000/- चा धनादेश आणि रक्कम मिळाल्याची पावती दुस-या दिवशी देतो असे सांगितले. परंतु रकमेची पावती दिली नाही. सामनेवाले यांनी कळविले की ठरविलेल्या मालानुसार किचन बनविण्यात येईल. परंतु सामनेवाले यांनी निकृष्ट दर्जाचे मटेरियलचे किचन बनवून आणले, ते तक्रारदारास मान्य नव्हते. योग्य मटेरियलचे किचन नसल्यामुळे संपूर्ण पैसे परत मागितले. सामनेवाले यांनी रक्कम घेऊन पावती दिलेली नाही. दिलेल्या रकमेपैकी फक्त रु. 60,000/- परत करण्यात येतील असे सामनेवाले यांनी कळविले. किचनचे काम योग्य नसल्याने तक्रारदारास रु. 60,000/- परत केले परंतु रु. 10,000/- दिले नाही आणि म्हणून सामनेवालेविरुध्द तक्रारदाराने पोलिस स्टेशनला तक्रार दिली. परंतु त्यांना अधिकार नाही म्हणून ते परत पाठविले. म्हणून रु. 10,000/- 10 महिन्यांचे 18% प्रमाणे व्याज, मानसिक त्रासापोटी रु. 30,000/-, तक्रारीचा खर्च रु. 300/- असे एकूण रु. 41,800/- तक्रारदारास मिळावे अशी त्यांनी विनंती केली.
2. तक्रारदाराने तक्रारीसोबत सामनेवालेबरोबर झालेल्या करारनाम्याची प्रत आणि सामनेवालेसोबत झालेला संपूर्ण पत्रव्यवहार व पावत्या प्रकरणात दाखल केलेल्या आहेत. सामनेवाले यांना मंचाद्वारे नोटीस काढण्यात आली असता सूचना देऊनही त्यांनी ती सोडविली नाही. म्हणून प्रकरण एकतर्फा निकालाकरीता काढण्यात आले.
3. तक्रारदाराचे शपथेवरील लेखी कथन, कागदोपत्री पुरावा तसेच प्रतिज्ञालेख यांचे सुक्ष्म वाचन केल्यानंतर मंच खालील निष्कर्षाप्रत पोहोचला आहे.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारास मॉडयुलर किचन बनवून देण्याचे कबूल केल्याचे दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते. तसेच त्यानंतर तक्रारदाराने सामनेवालेस पावती दिल्याचे दिसून येते तसेच रु. 60,000/- तक्रारदारास चेकद्वारे परत केल्याचे स्पष्ट होते आणि सामनेवाले यांनी रु. 10,000/- कन्सल्टेशन चार्जेस म्हणून राखून ठेवलेले आहत असे दिसून येते. परंतु दि. 16/1/2011 चे करारनाम्यानुसार कन्सल्टेशनची कोणतीही अट दिसून येत नाही आणि म्हणून सामनेवाले यांनी तक्रारदाराची रक्कम रोखून दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
5. तक्रारदाराने सामनेवालेकडे अनेकवेळा पाठपुरावा केलेला आहे. परंतु सामनेवाले यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही असे दिसून येते. तसेच मंचाचे नोटीसलासुध्दा सामनेवाले यांनी प्रतिसाद दिलेला नाही आणि तक्रारदारास हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तसेच कोर्टात चकरा माराव्या लागल्या आणि म्हणून मंचाचेमते सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषयुक्त सेवा दिलेली आहे. तसेच तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाकरीता नुकसान भरपाई देणे योग्य आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने केलेल्या मागणीनुसार त्याला मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देऊ शकत नाही. उपलब्ध दस्तऐवजावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेः
आ दे श
1. तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारास रक्कम रु. 10,000/- जमा तारखेपासून संपूर्ण रक्कम चुकती होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह देय करावे.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) देय करावे तसेच तक्रारीचे खर्चापोटी रु. 300/- (अक्षरी रुपये तीनशे) देय करावे.
5. उपरोक्त आदेशाचे पालन सामनेवाले यांनी आदेश प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे अन्यथा संपूर्ण आदेशीत रकमेवर देय व्याज द.सा.द.शे. 9% व्याज ऐवजी 12% राहील याची सामनेवाले यांनी नोंद घ्यावी.
6. सामनेवाले यांनी आदेशाचे पालन न केल्यास ते ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाईस पात्र राहतील याची सामनेवाले यांनी नोंद घ्यावी.