द्वारा घोषित - श्रीमती ज्योती पत्की, सदस्य तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून जुलै 2007 मध्ये अपे ऑटो रिक्षा क्रमांक एमएच 20- एए- 4685 त्याच्या स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी खरेदी केला. त्याने रिक्षा खरेदी करण्यासाठी गैरअर्जदारास रक्कम रु 2,20,000/- चेकद्वारे दिले. त्यानंतर दिनांक 24/12/2007 रोजी रक्कम रु 15,000/- रोख दिले. अशा प्रकारे अपे रिक्षाची संपूर्ण किंमत रु 2,35,000/- गैरअर्जदारास दिली. अपे रिक्षा खरेदी करतेवेळेस गैरअर्जदाराने त्यास रिक्षाचे मूळ कागदपत्रे, विमा पॉलिसी व कराराचे कागदपत्रे दिले नाहीत. त्याऐवजी गैरअर्जदाराने त्याला दिनांक 24/12/2007 रोजी दिलेल्या पावतीवर रिक्षाचा क्रमांक लिहीला. तसेच गैरअर्जदाराने श्री नुरुल अन्सार कुरेशी याच्या नावाने रिक्षा चालविण्याचे परमिट दिले. गैरअर्जदार त्याच्याकडे जास्तीची रक्कम रु 1,50,000/- ची मागणी करत असून वाहन जप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याने अनेक वेळा मागणी करुनही गेरअज्रदार वाहनाचे मूळ कागदपत्र देत नाहीत अशा प्रकारे गैरअर्जदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असून तक्रारदारास त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून वाहन क्रमांक एमएच 20 – एए- 4685 चे मूळ कागदपत्र, व एनओसी मानसिक त्रास व नुकससान भरपाईसह द्यावेत अशी मागणी केली. गैरअर्जदाराने लेखी निवेदन दाखल करुन रिक्षा खरेदी करण्याचा करार रु 3,00,000/- मध्ये ठरलेला असून तक्रारदाराने त्यापैकी रु 1,35,000/- आणि दिनांक 24/12/2007 रोजी रु 15,000/- असे एकूण रु 1,50,000/- दिलेले आहेत आणि तक्रारदाराने रु 1,50,000/- देवडा फायनान्स कंपनीकडून फायनान्स घेतलेला आहे. तक्रारदाराने रु 1,50,000/- दिल्यामुळे त्यास रिक्षाचा ताबा देण्यात आला. तक्रारदाराने रक्कम रु 2,20,000/- चेकद्वारे दिले हे म्हणणे गैरअर्जदाराने अमान्य केले आहे. त्यांनी तक्रारदारास कागदपत्राच्या छायांकीत प्रती दिलेल्या असून त्यावर देवडा फायनान्स लिहीलेले आहे. तक्रारदार जोपर्यंत देवडा फायनान्सची रक्कम रु 1,50,000/- देत नाहीत तोपर्यंत वाहनाची मूळ कागदपत्रे त्यास देता येत नाहीत. तक्रारदाराने त्यांना रक्कम रु 2,35,000/- दिलेले नाहीत व देवडा फायनान्सचे हप्तेही दिलेले नाहीत. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. गैरअर्जदाराने कागदपत्राची यादी दाखल केली. दोन्ही पक्षाने दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार गैरहजर. तक्रारदाराने अपे ऑटो रिक्षा क्रमांक एमएच 20- एए- 4685 खरेदी करण्यासाठी गैरअर्जदार गायत्री अटो कन्सलटंटचे प्रोप्रा. लक्ष्मण विश्वनाथ पुदाट यांना दिनांक 30/6/2007 रोजी चेक क्रमांक 0286152 द्वारे रक्कम रु 2,20,000/- दिले आणि सदर रक्कम दिनांक 3/7/2007 रोजी गैरअर्जदारास मिळालेली आहे ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या बँकेच्या खाते उता-यावरुन स्पष्ट दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदाराने सदर रक्कम त्यास मिळाली नाही हया त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तसेच तक्रारदाराने दिनांक 24/12/2007 रोजी गैरअर्जदारास रोख रक्कम रु 15,000/- दिलेली आहे हे पावतीवरुन दिसून येते तसेच या पावतीवर तक्रारदाराने खरेदी केलेल्या रिक्षाचा क्रमांक एमएच 20 एए-4685 असा लिहीलेला आहे. त्यामुळे एकूण रक्कम रु 2,35,000/- तक्रारदाराने गैरअर्जदारास अपे ऑटोरिक्षा हे वाहन खरेदी करण्यासाठीच दिलेले आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून अपे रिक्षा जुलै 2007 मध्ये खरेदी केला त्यासाठी त्याने गैरअर्जदारास रोख रक्कम रु 2,20,000/- दिले हे पासबुकची प्रत आणि रु 15,000/- गैरअर्जदारास गायत्री ऑटोची प्रत यावरुन स्पष्ट होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार अपे रिक्षाची त्याने संपूर्ण रक्कम दिली परंतू गैरअर्जदार कागदपत्रे देत नाहीत. तक्रारदाराने गाडीची किंमत किती होती हे दाखवण्यासाठी कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गाडीची किंमत रु 3,00,000/- आहे. गैरअर्जदाराने त्यासाठी त्यांच्यामध्ये आणि गैरअर्जदारामध्ये झालेला दिनांक 12/10/2007 च्या करारनाम्याची प्रत दाखल केली. त्यामध्ये अपे रिक्षाची किंमत रु 3,00,000/- असून पैकी तक्रारदाराने रु 1,35,000/- आणि रु 15,000/- डिसेंबर 2007 पूर्वी देईल तसेच सदर गाडीवर ’’ देवडा फायनान्सचे रु 1,50,000/- कर्ज असून सदर कर्जाची परतफेड तक्रारदार करणार" त्या करारनाम्यावर तक्रारदार आणि गैरअर्जदाराने सहया केल्या आहेत. हा करारनामा पाहिल्यानंतर तक्रारदाराने दिनांक 3/7/2007 रोजी रक्कम रु 2,20,000/- आणि दिनांक 24/12/2007 पूर्वी रु 15,000/- असे एकूण रु 2,35,000/- गैरअर्जदारास दिलेले आहेत. उर्वरीत रु 65,000/- तक्रारदाराने गैरअर्जदारास दिल्याबद्दलची कुठलीही पावती मंचात दाखल केली नाही तसे त्यांचे म्हणणे नाही. करारनाम्यावरुन हे दिसून येते की, अपे रिक्षाची किंमत रु 3,00,000/- ठरलेली होती, त्यापैकी तक्रारदाराने रु 2,35,000/- दिले रु 65,000/- ची थकबाकी आहे हे सिध्द होते. म्हणून मंच तक्रारदाराने गैरअर्जदारास अपे रिक्षाची उर्वरीत किंमत रु 65,000/- दोन आठवडयात द्यावेत आणि गैरअर्जदाराने तक्रारदारास एनओसी व गाडीची मूळ कागदपत्रे निकाल प्राप्तीपासून दोन आठवडयात द्यावीत. तक्रारदाराने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतू तेच थकबाकीदार असल्यामुळे मंच याचा विचार करीत नाही. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. तक्रारदाराने गैरअर्जदारास अपे रिक्षाची उर्वरीत किंमत रु 65,000/- दोन आठवडयात द्यावी आणि गैरअर्जदाराने तक्रारदारास एनओसी व गाडीची मूळ कागदपत्रे निकाल प्राप्तीपासून दोन आठवडयात द्यावीत. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |