निकाल
पारीत दिनांकः- 30/06/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी जाबदेणारांच्या दुकानास दि. 15/9/2010 रोजी भेट देऊन त्यांच्या घरी वार्डरोब, बेड आणि सोफा कम बेड इ. फर्निचर करण्याचे ठरविले. त्यावेळी जाबदेणारांनी तक्रारदारास, ते फर्निचर तयार करुन विक्री करतात असे सांगितले होते. दि. 18/9/2010 रोजी जाबदेणारांचे प्रतिनिधी तक्रारदारांच्या घरी मापे घेण्यासाठी आले व दि. 19/9/2010 रोजी तक्रारदारांनी त्यांना वर्क ऑर्डर दिली व त्यावेळी सदर फर्निचरची किंमत रक्कम रु. 1,25,000/- इतकी ठरली. त्यापैकी तक्रारदारांनी जाबदेणारांना रक्कम रु. 2500/- दिली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार दोन वार्डरोब्स दि. 8/10/2010 रोजी देणार होते. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणारांना रक्कम रु. 75,000/- दिले, परंतु जाबदेणार ठरल्याप्रमाणे वार्डरोब्स देण्यास टाळाटाळ करु लागले. तक्रारदारांनी बराच पाठपुरावा केल्यानंतर दि. 10/11/2010 रोजी ऑर्डर दिलेल्या फर्निचरपैकी एक वार्डरोब दिला. तो ही मापापेक्षा मोठा तयार केला होता आणि तक्रारदाराच्या घराला शोभणारा नव्हता. फर्निचरची ऑर्डर देताना तक्रारदारांनी वार्डरोबची एक बाजू स्लाईडिंग़च्या दाराची आणि दुसरी बाजू पुढे उघडणार्या दाराची सांगितली होती.. परंतु जाबदेणारांनी वार्डरोबची दोन्ही दारे पुढील बाजूस उघडणारी केली. वॉर्डरोबसाठी वापरले गेलेले प्लायवुड हे योग्य नव्हते, त्यास हॅन्डल्स, कुलुप, ड्रेसेस अडकविण्यासाठीचा रॉड बसविलेला नव्हता. त्याचप्रमाणे तक्रारदारांची शेरवानी ठेवण्यासाठी जागा आणि लाईट्सची व्यवस्था केलेली नव्हती, वार्डरोबच्या सनमायकामध्ये छिद्र होते. तक्रारदारांनी ताबडतोब या गोष्टी दि. 10/11/2010 रोजी जाबदेणारांच्या लक्षात आणून दिल्या. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी तयार केलेल्या वार्डरोबचा दर्जा फारच निकृष्ट होता, त्यामुळे त्यांनी फर्निचरच्या इतर वस्तु व पुढील परचेस ऑर्डर रद्द करण्याचे ठरविले व रक्कम रु. 75,000/- मध्ये दोन वार्डरोब्स करण्याचे ठरले. त्या दिवशी जाबदेणार क्र. 1 घरी निघून गेले आणि त्यांनी वार्डरोबमधील सर्व दोष दूर करुन देतो असे आश्वासन तक्रारदारांना दिले. त्यानंतर जाबदेणार तक्रारदारांकडे आले नाहीत. जाबदेणारांनी तयार करुन दिलेला वार्डरोब हा भिंतीच्या आकारापेक्षा मोठा असल्यामुळे, बाहेर लॉबीमध्ये ठेवावा लागला. तक्रारदारांनी जाबदेणारांच्या दुकानामध्ये जाऊन वार्डरोब दुरुस्त करुन द्या असे सांगितले, परंतु तेथे त्यांची तक्रार ऐकुन घेण्यास कोणीही तयार नव्हते म्हणून त्यांनी दि. 11/11/2010 रोजी पत्र देण्याचा प्रयत्न केला, परंतु जाबदेणारांनी ते पत्र स्विकारलेही नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 21/11/2010 रोजी ई-मेल द्वारे जाबदेणारांना पत्र पाठविले. जाबदेणारांना ई-मेल मिळून त्यांनी त्याचे उत्तरही दिले नाही किंवा वार्डरोब दुरुस्तही करुन दिला नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांना दि. 25/11/2010 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने पत्र पाठविले, जाबदेणारांना हे पत्र मिळूनही त्यांने उत्तर दिले नाही, म्हणून तक्रारदारांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे तक्रार दाखल केली, त्यांनी दि. 18/1/2011 रोजी जाबदेणारांना रजिस्टर्ड पोस्टाने पत्र पाठविले, परंतु जाबदेणारांनी याही पत्रास काहीही प्रतिसाद दिला नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 75,000/- द.सा.द.शे. 12% व्याजदराने व त्यांनी तयार केलेला वार्डरोब परत घेऊन जावा किंवा घेतलेल्या मापाप्रमाणे दुसरा वार्डरोब द्यावा, नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 20,000/-, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र, कागदपत्रे व फोटोग्राफ्स दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते नोटीस मिळूनही गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला.
4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांना घरामध्ये हवे असलेले फर्निचर, म्हणजे वार्डरोब, बेड आणि सोफा कम बेड इ. तयार करण्याची वर्क ऑर्डर दिली व एकुण ठरलेल्या किंमतीपैकी रक्कम रु. 75,000/- दिले. तसेच सुरुवातीला रक्कम रु. 2,500/- ही जाबदेणारांना दिले होते. तक्रारदारांनी जाबदेणारांना रक्कम रु. 75,000/- दिले होते व ते जाबदेणारांना मिळाले होते हे तक्रारदारांनी दाखल केलेल्या दि. 19/9/2010 रोजीच्या वर्क ऑर्डरवरुन दिसून येते. जाबदेणारांनी तक्रारदारास दि. 8/10/2010 रोजी दोन वार्डरोब्स देतो असे सांगितले होते, परंतु दि. 10/11/2010 रोजी एकच वार्डरोब तयार करुन दिला. त्यामध्येही तक्रारदारांनी सांगितल्यानुसार/मापानुसार तयार केला नाही. तक्रारदारांनी वार्डरोबची एक बाजू स्लाईडिंग़च्या दाराची आणि दुसरी बाजू पुढे उघडणार्या दाराची सांगितली होती.. परंतु जाबदेणारांनी वार्डरोबची दोन्ही दारे पुढील बाजूस उघडणारी केली. वॉर्डरोबसाठी वापरले गेलेले प्लायवुड हे योग्य नव्हते, त्यास हॅन्डल्स, कुलुप, ड्रेसेस अडकविण्यासाठीचा रॉड बसविलेला नव्हता. त्याचप्रमाणे तक्रारदारांची शेरवानी ठेवण्यासाठी जागा आणि लाईट्सची व्यवस्था केलेली नव्हती, वार्डरोबच्या सन्माएकामध्ये छिद्र होते. या सर्व बाबी तक्रारदारांनी दाखल केलेल्या फोटोग्राफ्सवरुन दिसून येतात. यावरुन जाबदेणारांनी तक्रारदारास निकृष्ट दर्जाचे मटेरिअल वापरुन फर्निचर तयार करुन दिले, हे सिद्ध होते. जाबदेणारांनी तक्रारदारांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे फर्निचर तयार केले नाही, एकच वॉर्डरोब दिला तोही घेतलेल्या मापापेक्षा मोठा तयार केला आणि वेळेत दिला नाही. ही जाबदेणारांची सेवेतील त्रुटी ठरते. तक्रारदारांनी त्यांचा वार्डरोब दुरुस्त करुन मिळावा याकरीता बराच पाठपुरावा केला, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे तक्रार दाखल केली व शेवटी प्रस्तुतची तक्रार मंचामध्ये दाखल केली, परंतु जाबदेणारांनी कशाचीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 75,000/- व्याजासह मिळण्यास हक्कदार ठरतात, असे मंचाचे मत आहे.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास वैयक्तीक व
सयुक्तीकरित्या रक्कम रु. 75,000/- (रु. पंच्याहत्तर
हजार फक्त) द.सा.द.शे. 9% व्याजदराने दि. 19/09/10
पासून ते रक्कम अदा करेपर्यंत व रक्कम रु. 2,000/-
(दोन हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी, या आदेशाची
प्रत मिळाल्या पासून चार आठवड्यांच्या आंत द्यावी
व त्यानंतर तक्रारदारांनी लगेचच वार्डरोब जाबदेणारांना
परत करावा.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.