तक्रारदारांतर्फे अॅड. श्री ढोबळे हजर
जाबदेणारांतर्फे अॅड. श्री. मैंदर्गी हजर
********************************************************************
निकाल
पारीत दिनांकः- 30/05/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांची पत्नी व त्यांची मुलगी दिवाळी निमीत्त जाबदेणारांच्या दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेल्या, तेथे त्यांनी रक्कम रु. 1135/- किंमत असलेला काळ्या रंगाचा कुर्ता व रस्ट रंगाचे रक्कम रु. 240/- चे लेगींग खरेदी केले. दिवाळी असल्यामुळे जाबदेणारांच्या दुकानामध्ये गर्दी होती, त्यामुळे तक्रारदारांच्या मुलीस लेगींग तेथे घालून पहाता आले नाही. खरेदी करतेवेळी जाबदेणारांने तक्रारदारांच्या मुलीस, जर खरेदी केलेले कपडे त्यांना व्यवस्थित/फिट झाले नाही तर ते बदलून देतील किंवा त्याची रक्कम परत करतील असे सांगितले. तक्रारदारांच्या मुलीने घरी आल्यानंतर लेगींग घालून पाहिले, तेव्हा त्याचे माप योग्य नसल्यामुळे ते तिला व्यवस्थित बसले नाही. म्हणून तक्रारदारांची मुलगी व तिची मैत्रिण दि. 24/10/2011 रोजी जाबदेणारांच्या दुकानामध्ये लेगींग बदलण्यासाठी गेल्या असता जाबदेणारांनी ते बदलण्यास असमर्थता दर्शविली व इतर कपडे दाखविण्यास टाळाटाळ करु लागले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी तक्रारदाराच्या मुलीस दुसरे मटेरिअल घेण्यास सांगितले, परंतु त्यांना रस्ट रंगाचे लेगींग हवे होते व त्या रंगाचे व मापाचे लेगींग जाबदेणारांकडे नसल्यामुळे तक्रारदारांच्या मुलीने लेगींगची किंमत रक्कम रु. 240/- परत मागितली. त्यावेळी जाबदेणारांनी तक्रारदारांच्या मुलीस योग्य वर्तणुक दिली नाही व वाईट भाषा वापरली. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 240/- लेगींगची किंमत द.सा.द.शे. 24% व्याजदराने, रक्कम रु. 10,000/- मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई, रक्कम रु. 10,000/- इतर खर्च मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये ‘ग्राहक’ व ‘विक्रेता’ हे नाते नाही, त्यामुळे मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे अधिकार नाही. दि. 20/10/2010 रोजे तक्रारदारांची मुलगी आणि त्यांच्या पत्नी दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या व त्यांने कुर्ता आणि लेगींग खरेदी केले आणि जाबदेणारांनी त्यांना खरेदीची पावती दिली. सदरच्या पावतीवर स्पष्टपणे “एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाहे” असे लिहिलेले आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तक्रारदारांच्या मुलीस बिजनेस पॉलिसीनुसार जो स्टॉक उपलब्ध असेल त्यामधून लेगींग निवडण्यास सांगितले, परंतु त्यांना त्यामधील एकही लेगींग आवडल नाही. म्हणून जाबदेणारांनी तक्रारदारांच्या मुलीस नविन स्टॉक आल्यानंतर येण्याचा सल्ला दिला, परंतु त्यांनी जाबदेणारांना रकमेची मागणी योग्य त्या भाषेमध्ये केली नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी पाठविलेल्या नोटीशीस त्यांनी उत्तर दिले आणि लेगींग वापरले नसल्यास 10 दिवसांच्या आंत बदलून घेऊन जावे असे नमुद केले. परंतु त्यानंतर जाबदेणारांच्या दुकानामध्ये तक्रारदार किंवा त्यांची मुलगी, कोणीही आले नाही. तक्रारदारांचे इतर आरोप अमान्य करीत प्रस्तुतची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणारांच्या मते तक्रारदारांच्या मुलीने त्यांच्याकडे खरेदी केलेली आहे, तक्रारदारांनी नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये ‘ग्राहक’ व ‘विक्रेता’ हे नाते नाही, म्हणून तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. संयुक्त हिंदू कुटुंबामध्ये मुलांचे कपडे घेण्याकरीता वडीलच पैसे देतात. त्यानुसार प्रस्तुतचे तक्रारदार हे त्या मुलीचे वडील आहेत, त्यामुळे ते ग्राहक ठरतात.
तक्रारदारांच्या मुलीने जाबदेणारांच्या दुकानातून रक्कम रु. 1135/- किंमत असलेला काळ्या रंगाचा कुर्ता व रस्ट रंगाचे रक्कम रु. 240/- चे लेगींग खरेदी केले. त्यानंतर लेगींग तक्रारदारांच्या मुलीच्या मापाचे नसल्यान त्या जाबदेणारांच्या दुकानामध्ये लेगींग बदलून घेण्याकरीता गेल्या. परंतु जाबदेणारांनी तक्रारदारांच्या मुलीस हव असलेले लेगींग न देता दुसरे घेण्याविषयी सुचविले. दुसरे लेगींग हे त्यांना हवे त्या रंगाचे नसल्यामुळे व त्यांना हवे असलेला रंगाचे लेगींग उपलब्ध नसल्यामुळे तक्रारदारांच्या मुलीने रकमेचा परतावा मागितला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दिलेल्या पावतीवर “एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही” असे नमुद केलेले आहे. तसेच जाबदेणारांनी तक्रारदारांच्या मुलीस रक्कमही परत करण्यास नकार दिला. मंचाच्या मते पावतीवर अशा प्रकारची अट लिहिणे म्हणजे अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करणे होय. जर ग्राहकाने रक्कम/मोबदला देऊन एखादी वस्तु खरेदी केली, ती वस्तु त्या व्यक्तीच्या मापाची नसेल, तिला फिट बसत नसेल आणि दुकानदाराकडे जर ग्राहकास हवी त्या रंगाची, मापाची वस्तु नसेल, तर माल परत घेऊन ग्राहकास रक्कम परत करणे, हे दुकानदारांचे कर्तव्य असते व ग्राहकाचा अधिकार असतो, असे मंचाचे मत आहे. परंतु प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये जाबदेणारांनी तक्रारदारांच्या मुलीस त्यांना हव त्या रंगाचे, मापाचे लेगींग तर दिलेच नाही, परंतु रक्कमही परत केली नाही, ही जाबदेणारांची सेवेतेल त्रुटी टरते. तक्रारदार सदरची रक्कम परत मिळण्यास पात्र ठरतात. तसेच या सर्व बाबींमुळे तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांना साहजिकच त्रास झाला असेल म्हणून त्यांना प्रस्तुतची तक्रार मंचामध्ये दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारदार रक्कम रु. 1000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारदारांनी लेगींगची रक्कम त्यांना प्राप्त झाल्यानंतर लगेचच सदरची लेगींग जाबदेणारास परत करावी.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास एकुण रक्कम रु. 1,240/-
(रु. एक हजार दोनशे चाळीस फक्त) या आदेशाची
प्रत मिळाल्यापासून चार आठवड्यांच्या आंत द्यावेत
व तक्रारदारांनी लगेचच सदरची लेगींग जाबदेणारास
परत करावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.