Dated the 21 Dec 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असुन, तक्रारदाराचे मृत बंधू शिवशंकर बाबुनंदन सिंघ यांचे कायदेशीर वारस आहेत. सामनेवाले हे तक्रारदाराचे बंधू ज्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर (Lease) रहात होते. त्या मिळकतीचे मालक/विकासक असुन त्यांनी तक्रारदार यांची भाडेतत्वावरील सदनिका रिकामी करावयास सांगुन त्याच्या बदल्यात सदर मिळकतीच्या जागी बांधावयाच्या नियोजित इमारतीमध्ये तक्रारदार यांच्या बंधुला सदनिका क्रमांक-302, क्षेत्रफळ-359 चौरसफुट, तिसरा मजला, रक्कम रु.71,800/- या मोबदल्यात मालकी हक्काने विकत देण्याचे कबुल केले, त्यानुसार ता.10.10.1990 रोजी तक्रारदाराचे बंधुच्या लाभात करारनामा करुन दिला, त्यानुसार शिवशंकर सिंघ यांनी रु.5,000/- सामनेवाले यांना करारनामा करतांना अदा केले, उर्वरीत रक्कम रु.66,800/- सदर नियोजित इमारतीमध्ये सदनिका क्रमांक-302 चा ताबा घेतांना सामनेवाले यांना अदा करण्याचे उभयपक्षांत ठरले होते, परंतु सदनिकेचा ताबा घेण्यापुर्वी शिवशंकर सिंघ (तक्रारदार यांचे बंधु) यांचे निधन झाले. सामनेवाले यांचेकडे तक्रारदार यांच्या बंधुचे निधन झाल्याने तक्रारदार यांनी करारनाम्यानुसार सदनिकेचा व्यवहार पुर्ण करुन तक्रारदार यांना तिचा ताबा देण्याची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी वारस दाखल्याची मागणी केली त्यानुसार तक्रारदार यांनी “ कोर्ट ऑफ सिव्हिल जज,एस.डी,ठाणे ” यांचेकडून ते शिवशंकर सिंघ यांचे वारस असल्याबाबत कायदेशीर वारस दाखला सामनेवाले यांना सादर केला. सदनिकेची उर्वरीत रक्कम सामनेवाले यांना अदा करण्यास ते तयार असल्याचे सांगुन सामनेवाले यांचेकडून सदनिकेच्या ताब्याची मागणी केली, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर नियोजित इमारतीमधील सदनिकेचा ताबा देण्यास नकार दिला, त्यानंतर तक्रारदार यांनी अनेकवेळा सामनेवाले यांना सदनिकेचा व्यवहार पुर्ण करुन ताबा दयावा अशी मागणी केली, सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस बजावली, परंतु सामनेवाले यांनी इमारतीस ओ.सी. मिळाले नसल्याचे व अन्य कारणे देऊन तक्रारदार यांना नियोजित इमारतीमध्ये सदनिका क्रमांक-302 देण्यास टाळाटाळ केल्याने सामनेवाले विरुध्द तक्रारदार यांनी त्यांचे मुखत्यार सतिषकुमार आर.शर्मा यांचे मार्फत प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे, व तक्रारीत नमुद केल्यानुसार मागण्या सामनेवाले यांचेकडून केल्या आहेत. ता.09.05.2012 रोजी सामनेवाले यांनी सदर सदनिका क्रमांक-302, तिसरा मजला, 359 चौरसफुट यावर अन्य त्रयस्थ व्यक्तीचा हक्क प्रस्थापित करु नये असा अंतरिम आदेश तक्रारदाराच्या लाभात पारित करण्यात आला आहे.
2. सामनेवाले यांना प्रस्तुत प्रकरणाची नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले यांनी कैफीयत दाखल केली, त्यानंतर पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची तक्रार खोटी असुन त्यातील आरोप खोटे असल्याचे नमुद करुन फेटाळण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे बंधु व सामनेवाले यांच्यातील करार सामनेवाले यांना मान्य नाही. (Opponent has never accepted the validity of Agreement) व त्यामुळे सामनेवाले यांनी सदर करारनामा रद्द केला नाही असे म्हटले आहे, व सदर सदनिका क्रमांक-302 वर अन्य त्रयस्थ व्यक्तीचा हक्क सामनेवाले यांनी सन-1996 मध्ये प्रस्थापित केला असुन तक्रारदार यांनी त्या त्रयस्थ व्यक्तीस प्रस्तुत तक्रारीत पक्षकार केलेले नाही. त्यामुळे “Nonjoinder of party” या कारणास्तव प्रस्तुत तक्रार फेटाळण्यात यावी असा युक्तीवाद केला आहे, तसेच प्रस्तुत तक्रार मुदतबाहय असुन तक्रारदार यांनी सामनेवालेकडून मागणी केलेल्या क्लेमचा तपशिल (Break Up) दिलेला नाही असे नमुद केले आहे. त्यानंतर उभयपक्षांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. उभयपक्षांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकून प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले.
3. उभयपक्षांनी सादर केलेल्या आवश्यक कागदपत्रांचे अवलोकन करुन तक्रारीच्या निराकरणार्थ मंचाने खालील मुदयांचा विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
1.तक्रारदार सामनेवाले यांचेकडून सदनिका क्रमांक-302 चा
ताबा (ता.10.10.1990 च्या करारनाम्यात नमुद केल्या
नुसार) मिळण्यास पात्र आहेत का ?...................................................होय.
अथवा
2.सामनेवाले यांचेकडून सदनिका क्रमांक-302 चा ताबा
तक्रारदार यांना देणे शक्य नसल्यास तक्रारदार
सामनेवाले यांचेकडून सदनिकेच्या बदल्यात आर्थिक
स्वरुपाची नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत का ?..........................होय.
3.तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रास व
न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहेत का ?..........................................होय.
4.कारण मिमांसा
मुद्दा- क्र.1. तक्रारदार हे वयोवृध्द नागरिक असुन त्यांचे बंधू शिवशंकर बाबुनंदन सिंघ, सामनेवाले भारत रुपचंद जैन यांच्या 341 व 342 टिका नं.3, जांभळी नाका, नेताजी सुभाष रोड, ठाणे येथील मिळकतीवर असलेल्या बोरी बिल्डींग या इमारतीमध्ये भाडेतत्वावर दरमहा रु.20/- भाडे सामनेवाले यांना अदा करुन (On Lease) रहात होते. सन-1990 मध्ये सामनेवाले भारत रुपचंद जैन यांनी सदर मिळकतीवर असलेली जुनी इमारत पाहून त्याजागी नविन इमारत बांधण्यासाठी तक्रारदाराच्या भावाला सदर जुन्या बोरी बिल्डींग या इमारतीमधील त्यांची 359 चौरस फुटाची (कारपेट ऐरिया) सदनिका खाली करुन, तसेच सदनिकेबाबतचे भाडयाचे हक्क सामनेवाले यांचे लाभात करुन देऊन, जुन्या सदनिकेच्या बदल्यात तक्रारदाराच्या भावाला 359 चौरसफुट (कारपेट ऐरिया) क्षेत्रफळाची 302 क्रमांकाची सदनिका सदर मिळकतीवर बांधण्यात येणा-या नियोजित इमारतीमध्ये मालकी हक्काने रक्कम रु.71,800/- या मोबदल्यास विकण्याचे ठरविले, व त्याबाबत ता.06.10.1990 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या भावाच्या लाभात केलेले प्रतिज्ञापत्र तक्रारदार यांनी अभिलेखात पान क्रमांक-19 वर सादर केले आहे. तसेच त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे भाऊ श्री.शिवशंकर सिंघ यांचेशी ता.10.10.1990 रोजी करारनामा स्वाक्षरीत केला. सदर करारनाम्यामध्ये सामनेवाले भारत रुपचंद जैन यांनी ते सदर मिळकतीचे मालक/प्रमोटर असल्याचे नमुद केले आहे, व सदर करारनामा सामनेवाले श्री.भारत रुपचंद जैन यांनी वैयक्तिक पातळीवर सदर मिळकतीचे मालक/प्रमोटर म्हणून तक्रारदार यांचेशी बोरी बिल्डींगच्या जागी बांधावयाच्या नियोजित इमारतीमधील सदनिका क्रमांक-302 रु.71,800/- या किंमतीस विकण्यासाठी केला आहे. सदर करारनाम्यामध्ये केवळ सदनिका क्रमांक-302, तिसरा मजला, 359 चौरस फुट, कारपेट ऐरिया असा उल्लेख आहे. त्यामध्ये सदर सदनिका कोणत्या विंगमध्ये आहे याचा उल्लेख नाही. करारनाम्याच्या पान क्रमांक-7 वर तक्रारदार यांचे भाऊ श्री.शिवशंकर सिंघ त्यांच्या जुन्या सदनिकेचा ताबा सामनेवाले यांना सदर सदनिका खाली करुन देण्यास तयार असल्याचे नमुद केले आहे, व सामनेवाले सदर जुन्या इमारतीच्या जागी नविन इमारत बांधेपर्यंत श्री.शिवशंकर सिंघ यांना रहाण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करुन देतील असे म्हटले आहे. सदर करारनाम्याच्या पान क्रमांक-9 वर सामनेवाले यांना श्री.शिवशंकर सिंघ यांनी रु.5,000/- सदर करारनामा स्वाक्षरित करतांना अदा करावे, व उर्वरीत रक्कम रु.66,800/- सामनेवाले यांचेकडून सदर नियोजित इमारतीमधील 302 या सदनिकेचा ताबा श्री.शिवशंकर सिंघ यांना देतांना त्यांनी सामनेवाले यांना अदा करावे अशी अट आहे. सामनेवाले यांच्या सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही बोजा नाही असा उल्लेख सदर करारनाम्यात पान क्रमांक-9 वर आहे. त्यानुसार सदर करारनामा ता.10.10.1990 रोजी सामनेवाले यांचेशी स्वाक्षरित करतांना श्री.शिवशंकर सिंघ यांनी सामनेवाले यांना रु.5,000/- अदा केल्याबाबत करारनाम्याच्या शेवटी (पान क्रमांक-16) वर पावती दिसुन येते. त्यानुसार तक्रारदार यांचे भावाने सामनेवाले यांना जुन्या बोरी बिल्डींगमधील भाडे तत्वावरील सदनिका 359 चौरसफुट (कारपेट ऐरिया) त्याजागी सामनेवाले नविन इमारत बांधाणार असल्याने व तक्रारदार यांना नियोजित इमारतीमध्ये सदनिका क्रमांक-302, 359 चौरस फुट (कारपेट ऐरिया) क्षेत्रफळाची सदनिका रक्कम रु.71,800/- या मोबदल्यास देणार असल्याने सामनेवाले यांचेवर विश्वास ठेऊन व करारनामा ता.10.10.1990 स्वाक्षरित करुन सामनेवाले यांना खाली करुन दिला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे भावास नियोजित इमारतीमध्ये बांधण्यात येणारी सदनिका क्रमांक-302 चा ताबा तक्रारदार यांचे भावास दिला नाही, दरम्यान ता.10.01.1997 रोजी तक्रारदार यांचे भावाचे निधन झाले, त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे दिवंगत शिवशंकर सिंघ यांचे वारस म्हणून सदर नियोजित इमारतीमधील सदनिका क्रमांक-302 तक्रारदार यांना देणे विषयी मागणी केली, परंतु सामनेवाले यांनी सदर नविन इमारतीस ओ.सी. मिळाली नाही असे तक्रारदार यांना सांगुन ते शिवशंकर सिंघ यांचे सदर सदनिकेबाबत वारस असल्याचे सिध्द करणेसाठी लिगल हेअर सर्टिफीकेट आणावयास सांगितले, त्यानुसार तक्रारदार यांनी मे.दिवाणी न्यायालय,ठाणे सिनियर डिव्हीजन, यांचेकडून एमए-713/1998, ता.28.04.1999 रोजीचे लिगल हेअरशिप सर्टिफीकेट आणून सामनेवाले यांना दिले. सदर सर्टिफीकेट अभिलेखात उपल्ब्ध आहे. त्यानंतर पुन्हा तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडे सदनिकेची उर्वरीत रक्कम सामनेवाले यांना अदा करुन नियोजित इमारतीमधील सदनिकेचा ताबा मागितला, परंतु तो सामनेवाले यांनी तक्रारदार यांना न दिल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पाठविलेली ता.05.06.2006 रोजीची कायदेशीर नोटीस अभिलेखावर उपलब्ध आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना नविन सदनिकेचा ताबा न दिल्याने तक्रारदार यांना ठाणे म्युन्सीपल कार्पोरेशन यांना माहितीच्या अधिकारान्वये पत्र लिहून सामनेवाले यांच्या नविन इमारतीस ओ.सी. मिळाली किंवा कसे याची माहिती विचारली. परंतु ती त्यांना टी.एम.सी. यांचेकडून देण्यात आली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता.07.05.2011 रोजी नोटीस पाठविली, व सदर सदनिकेचा ताबा देण्याची मागणी केली. सदर नोटीस सामनेवाले यांना प्राप्त झाल्यावर सामनेवाले यांनी ता.23.06.2011 तक्रारदार यांना त्याबाबत उत्तर पाठविले, परंतु त्यामध्ये तक्रारदार यांच्या सदनिकेबाबतच्या मागणीबाबत कोणताही समाधानकारक खुलासा न देता केवळ सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे आरोप फेटाळले आहेत. सामनेवाले यांना सन-1994 मध्ये सदर नविन इमारतीबाबत (बोरी बिल्डींगच्या जागी उभारलेल्या) ओ.सी. प्राप्त झाल्याचे सामनेवाले यांनी कैफीयतीमध्ये नमुद केले आहे. परंतु तक्रारदार यांचे भाऊ शिवशंकर सिंघ सन-1997 पर्यंत हयात असतांना सामनेवाले यांनी त्यांना सदर इमारतीस ओ.सी. प्राप्त झाल्याचे व सामनेवाले पुढील व्यवहार पुर्ण करण्यास तयार असल्याचा अथवा तक्रारदार यांचे भावाकडून सदर सदनिकेच्या मोबदल्याबाबत उर्वरीत रकमेची मागणी करण्याबाबतचा सामनेवाले यांनी केलेला पत्रव्यवहार इत्यादि पुरावा त्याच्या पोचसह (acknowledgement) सामनेवाले यांनी दाखल केलेला नाही. सामनेवाले यांचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदार यांच्या भावाची सदनिका क्रमांक-302, सी-विंग, जांभळी नाका, नेताजी सुभाष रोड, ठाणे ही सामनेवाले यांनी श्री.जफर अहम्मद जुनिर शेख यांचेशी व्यवहार करुन त्यांना ता.09.07.1996 रोजी विकली, व ही बाब तक्रारदार यांना माहिती आहे, परंतु तरी देखील तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द सदर सदनिका क्रमांक-302 बाबत प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. परंतु कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सामनेवाले यांनी सदर सदनिका क्रमांक-302, श्री.जफर अहम्मद जुनिर शेख यांना विकल्याचे दिसुन येत नाही, तर ता.09.07.1996 रोजीच्या श्री.जफर अहम्मद जुनिर शेख यांचेशी मे.जैन एंटरप्रायझेस यांनी स्वाक्षरित केलेल्या करारनाम्यात सदनिका क्रमांक-302, सी-विंग, 359 चौरसफूट (कारपेट ऐरिया) विकल्याचे दिसुन येते. सदर करारनाम्यावर केवळ रु.20/- चा स्पेशल अधेसिव्ह स्टॅम्प लावलेला दिसुन येतो. सदर करारनामा साक्षांकित अथवा नोंदणीकृत नाही, तसेच शिवशंकर सिंघ यांचेशी सामनेवाले श्री.भारत रुपचंद जैन यांनी मे.जैन एंटरप्रायझेस या भागिदारी संस्थेतर्फे ता.10.10.1990 रोजी करारनामा स्वाक्षरित केलेला नसुन सदर नियोजित इमारतीचे प्रमोटर/सदर मिळकतीचे मालक म्हणून स्वाक्षरित केलेला आहे. तसेच सदर करारनामा करण्यापुर्वी सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे भावाला म्हणजेच शिवशंकर सिंघ यांना पत्राव्दारे अथवा नोटीसव्दारे आगाऊ कळविल्याचा कोणताही पुरावा सदर पत्राच्या अथवा नोटीसच्या पोचसह सामनेवाले यांनी सादर केलेला नाही. त्यामुळे सदर ता.09.07.1996 रोजीचा करारनामा सामनेवाले यांनी विचाराअंती केल्याचे दिसुन येते, व तो तक्रारदार यांचेवर बंधनकारक नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी श्री.जफर अहम्मद जुनिर शेख यांना प्रस्तुत तक्रारीमध्ये पक्षकरार केलेले नसल्याने प्रस्तुत तक्रार फेटाळण्यात यावी याबाबतचा सामनेवाले यांचा युक्तीवाद फेटाळण्यात येतो. सबब शिवशंकर सिंघ यांचेशी सामनेवाले यांनी प्रमोटर/करारनाम्यात मिळकतीचे मालक म्हणून केलेल्या ता.10.10.1990 च्या करारनाम्यात नमुद केलेल्या अटींनुसार सामनेवाले यांना तक्रारदार यांनी सदर सदनिकेची उर्वरीत रक्कम रु.66,800/- अदा करावी व तक्रारदार यांचेकडून सदर रक्कम सामनेवाले यांनी स्विकारुन ता.10.10.1990 च्या करारनाम्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे बोरी बिल्डींग या मिळकतीच्या जागी सामनेवाले यांनी बांधलेल्या नविन इमारतीमध्ये (रुप प्लाझा) सदनिका क्रमांक-302, 359 चौरस फुट (कारपेट ऐरिया) हिचा ताबा तक्रारदार यांचेशी त्याबाबतच्या सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यात दयावा, असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात. सामनेवाले यांना वर नमुद केल्याप्रमाणे नियोजित/रुप प्लाझा या इमारतीमध्ये सदनिका क्रमांक-302, 359 चौरस फूट (कारपेट ऐरिया) हिचा ताबा ता.10.10.1990 रोजीच्या करारनाम्याप्रमाणे तक्रारदार यांना देणे शक्य नसल्यास मे-1999 ते मे-2011 पर्यंतच्या एकूण-144 महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण रक्कम रु.12,00,000/- (अक्षरी रुपये बारा लाख) ही रक्कम आर्थिक नुकसानभरपाई म्हणून तक्रारदार यांच्या भावाची बोरी बिल्डींग मधील सदनिका ज्याचे तक्रारदार वारस आहेत. (359 चौरस फूट कारपेट ऐरिया) तीचे भाडयाबाबतचे हक्क व सदर बोरी बिल्डींगमधील भाडयाची जागा (On Lease) सामनेवाले यांना ता.10.10.1990 च्या करारनाम्याप्रमाणे प्रदान केले असल्याने सामनेवाले यांनी तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावे.
तक्रारदार यांचे दिवंगत भाऊ शिवशंकर सिंघ यांची बोरी बिल्डींगमधील भाडे तत्वावरील सदनिका 359 चौरस फूट (कारपेट ऐरिया) सामनेवाले यांनी खाली करुन घेतली, परंतु त्याबदल्यात सदर मिळकतीच्या जागी बांधण्यात येणा-या नियोजित इमारतीमध्ये/रुप प्लाझा या इमारतीमध्ये सदर सदनिकेबाबत तक्रारदार दिवंगत शिवशंकर सिंघ यांचे वारस असल्याच्या दाखला तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सादर करुनही व सदर इमारतीस सन-1994 मध्ये ओ.सी. प्राप्त झाली असुनही तक्रारदार यांना अथवा तक्रारदार यांचे भाऊ हयात असतांना त्यांना सामनेवाले यांनी दिला नाही, व त्यामुळे तक्रारदार यांना इतकी वर्षे सामनेवाले यांचेकडे त्याबाबत पाठ पुरावा करणे, वारस दाखला आणणे, वकीलामार्फत प्रस्तुत तक्रार दाखल करणे इत्यादिबाबत जो मानसिक त्रास झाला, व न्यायिक खर्च झाला त्याची नुकसानभरपाई म्हणून सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र), व न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावी.
याबाबत मंचाने खालील न्याय निवाडयाचा विचार केला.
NATIONAL CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
GHANSI RAM SHAH………………………………………………….PETITIONER
V/S
SUPRIYA SUHAS SARMALKAR AND OTHRS……………………RESPONDENT
(Revision petition No. 337 of 2011 from order dt.29.09.2011 FA No.A/10/1205 of State Consumer Dispute Redresal Commission, Maharashtra Decided on 06-09-2011)
Consumer protection act, 1986 sec 2(1) d, 2(1)g, 14(1)d and 21 (b) Petitioner contended that Respondents are not consumer as there was no consumer and buyer relationship between parties- Rejected- Petitioner/ builder entered into Development Agreement with respondent No.1 to develop entire Chawl and to allot said flat in newly constructed building in lieu of old tenanted premises- As per agreement, respondents vacated tenanted premises and shifted over to alternate accommodation provided by petitioner tenanted premise which is given for the development in lieu of monitory consideration amounts to consideration. After construction of building, petitioner failed to give vacant possession of flat in question to respondents Thus, petitioner is guilty of deficiency in service since he failed to carry out statutory obligation cast upon him, as per Development made between parties. Revision petition dismissed.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- अंतिम आदेश -
1. तक्रार क्रमांक-390/2011 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना करारनामा ता.10.10.1990 नुसार सदनिका क्रमांक-302 चा ताबा
न दिल्याने सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना श्री.शिवशंकर सिंघ यांचेशी ता.10.10.1990 रोजी स्वाक्षरीत
केलेल्या करारनाम्यात नमुद केल्यानुसार सदनिका क्रमांक-302, तिसरा मजला, 359 चौरस फुट
कारपेट ऐरिया, नियोजित इमारत/रुप प्लाझा, नेताजी सुभाष रोड, (पत्ता-करारनाम्याप्रमाणे, व
(Heirship Certificate प्रमाणे) जांभळी नाका, तालुका व जिल्हा-ठाणे हिचा ताबा तक्रारदाराकडून
सदर सदनिकेबाबतची उर्वरीत मोबदल्याची रक्कम रु.66,800/- (अक्षरी रक्कम रुपये सहासष्ट
हजार आठशे मात्र) तक्रारदाराकडून स्विकारुन, आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावा.
अथवा
सामनेवाले यांना सदर सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना विहीत मुदतीत देणे शक्य नसल्यास
सामनेवाले यांनी तक्रारदार यांना आर्थिक नुकसानापोटी रक्कम रु.12,00,000/- (अक्षरी रुपये बारा
लाख) (कारण मिमांसेमध्ये नमुद केल्यानुसार) आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावे.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/-
(अक्षरी रुपये दहा हजार मात्र) व न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार
मात्र) आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावे.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.21.12.2016
जरवा/