द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
** निकालपत्र **
दिनांक 24 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
[1] तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे एक्सरसाईज सायकल खरेदी करण्यासाठी गेले असता जाबदेणार यांनी हिरो मेक सायकल दाखवून किंमत रुपये 5500/-सांगून, त्यास 10 वर्षापर्यन्त मेंटेनन्स लागणार नाही, सायकला चेन नसून पॅडेलला लागून चांगल्या प्रतीचा बेल्ट असतो, असे सांगण्यात आले. तक्रारदारांनी दिनांक 30/9/2011 रोजी सायकलसाठी ऑर्डर नोंदविली. रुपये 1500/- आगाऊ दिले. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 6188/- चे बिल दिले. तक्रारदारांना सायकल बघायची होती, परंतु ती पॅक करण्यात आलेली असल्यामुळे दाखविता येणार नाही असे जाबदेणार यांनी सांगितले. दिनांक 1/10/2011 रोजी सकाळी 9 वा. तक्रारदारांच्या घरी जाबदेणार यांचा कामगार असेंबल केलेली सायकल, प्लास्टीक शीट मध्ये गुंडाळून आणली. तक्रारदारांनी त्यांच्याकडे रुपये 4688/- चा चेक दिला. सकाळी 10 वा. तक्रारदारांनी प्लास्टीक शिट काढले असता अॅक्टीव्ह क्लासिकची सायकल असल्याचे तक्रारदारांना कळले. तक्रारदारांनी जाबदेणार यांना दुरध्वनीवरुन विचारणा केली असता सदरहू सायकल हिरो कंपनीचीच असल्याचे, हिरो कंपनीने त्यांचे नाव बदलल्याचे सांगण्यात आले. बेल्टच्या जागी चेन असल्याचे तक्रारदारांना कळले. तक्रारदारांनी नंतर इतरत्र चौकशी केली असता हिरो कंपनीने सायकल उत्पादन करण्याचे बंद केल्याचे, अॅक्टीव्ह सायकलची किंमत फ्री होम डिलीव्हरी व सर्व टॅक्स सह रुपये 4200/- असल्याचे तक्रारदारांना कळले. जाबदेणार यांनी तक्रारदारांना हिरो कंपनीची सायकल न देता दुस-याच कंपनीची दिली, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून जाबदेणार यांनी अॅक्टीव्ह क्लासिक सायकल परत घेऊन जावी व रुपये 6188/- परत करावे, नुकसान भरपाई पोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
[2] जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही. बेल्ट वर बोजा झेपणे शक्य नसल्यामुळे, चेन अधिक एक्सट्रा सपोर्टिव्ह बेल्ट सह सायकल देण्याचे सांगण्यात आले होते. हिरो कंपनीने सायकलचे उत्पादन बंद केलेले असल्यामुळे हिरो कंपनीची सायकल देत असल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आलेले नव्हते. एक्सट्रा सपोर्टिव्ह बेल्ट दिनांक 20/10/2011 रोजी नि:शुल्क देण्यात आलेला आहे. बिलावर हिरो कंपनीची सायकल हे चुकीने नमुद केलेले आहे. जाबदेणार यांनी पॉप्युलर सायकल एजन्सी मधून सदरहू सायकल आणून, ती तपासून मगच तक्रारदारांना दिलेली आहे. त्यासाठी जाबदेणारांना सायकलची किंमत रुपये 5040/- व डिलीव्हरीचा खर्च रुपये 300/- आला आहे. सायकल दिल्यानंतर आठ दिवसांनी तक्रारदारांनी पॅडल कव्हर काढून बघितले हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार अमान्य करतात. वरील कारणांवरुन तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
[3] तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब नाकारला. जाबदेणार यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
[4] उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार यांच्या पावती क्र. 138, दिनांक 30/09/2011 चे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदारांचे नाव, “Particulars – Exercise Cycle (Hero)”, रक्कम रुपये 5500/-, टॅक्स रुपये 687.50 एकूण रुपये 6188/- असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. यावरुन जाबदेणार यांनी तक्रारदारांना हिरो कंपनीची Exercise Cycle एकूण रक्कम रुपये 6188/- ला विकत दिली होती ही बाब स्पष्ट होते. तक्रारदारांना केवळ हिरो कंपनीचीच Exercise Cycle खरेदी करावयी होती. सायकल त्याच कंपनीची आहे असे तक्रारदारांना सांगून, तसे बिलावर नमूद करुन, तक्रारदारांकडून सायकलची संपुर्ण रक्कम स्विकारुन, प्रत्यक्षात जाबदेणार यांनी दुस-याच कंपनीची सायकल तक्रारदारांना दिली, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून सायकलची किंमत रुपये 6188/- दिनांक 30/09/2011 पासून 9 टक्के व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून अॅक्टीव्ह क्लासिक सायकल परत घ्यावी असाही मंच आदेश देत आहे. तक्रारदारांना व्याज देण्यात येत असल्यामुळे तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी मंच नामंजुर करीत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
** आदेश **
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 6188/- दिनांक 30/09/2011 पासून 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी व तक्रारदारांकडून अॅक्टीव्ह क्लासिक सायकल परत घ्यावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.