(मंचाचे निर्णयान्वये – श्रीमती आश्लेषा दिघाडे, सदस्या ,)
-- आदेश --
(पारित दिनांक 22 मार्च 2005)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याच्या मार्केटिंग कंपनीला योग्य संगणक सेवा न दिल्यामुळे तक्रारकर्त्याला झालेले नुकसान रु.12 लाख व्याजासहित परत मिळणेकरिता दाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारर्त्याची सेफ मल्टी सर्व्हीसेस अन्ड मार्केटिंग नावाची कंपनी आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या मार्केटिंग कंपनीला आवश्यक असलेले मार्केटिंग सॉफटवेअर घेण्याचा गैरअर्जदारां सोबत तोंडी करार केला. गैरअर्जदाराने सन 2001 या वर्षाअखेर पर्यंत सेवा देण्याचे वचन सुध्दा दिले. याकरिता गैरअर्जदारांनी अर्जदाराला डायो-टेक कंपनी सोबत काम केल्याचा दाखला दिला. सदर करार तोंडी असल्यामुळे गैरअर्जदार संगळे आर्थिक व्यवहार सुध्दा तोंडीच करीत होते. यानंतर गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी दिनांक 20.11.2001 रोजी रु.1,44,310/- इतक्या रकमेचे देयक तक्रारदाराला दिले. या देयकांत ‘‘वेब पेज पॅकेज’’ व त्याच्या मेन्टेनन्सकरिता येणा-या खर्चाची रक्कम नमूद केली होती. गैरअर्जदारांनी पुरविलेलया वेब पेज पॅकेजच्या सेवेबद्दल तक्रारदाराने आक्षेप घेतला असता गैरअर्जदाराने तक्रारदाराला प्रत्येक पॅकेजसाठी आकारलेले रु.500/- न घेता रु.250/- याप्रमाणे दुसरे रु.31,000/- रकमेचे देयक दिले व यानंतर प्रत्येक पॅकेजकरिता रु.250/- इतकीच रक्कम स्विकारण्याचे वचन तक्रारदाराला दिले. परंतु तक्रारदाराने आक्षेप घेतल्यानंतर सुध्दा गैरअर्जदाराने दिनांक 30.12.2001 आणि 14.02.2002 रोजी तशाच प्रकारचे पॅकेज पुरविले व रु.250/- प्रत्येक पॅकेज करिता कमी करण्याचे दिलेले वचन सुध्दा पाळले नाही. दिनांक 20.11.2001 ते 16.02.2002 या कालावधीचे गैरअर्जदारांनी आतापर्यंत रु.6,21,11,000/- इतक्या रकमेचे चार देयक तक्रारदाराला दिले. या देयकानुसार तक्रारदाराने दिनांक 10.10.2001 ते 30.01.2002 या कालावधीत रु.3,49,910/- इतकी रक्कम गैरअर्जदार यांचेकडे जमा केली आहे.
यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदारांना संगणक तपासण्याची विनंती करुन सुध्दा गैरअर्जदारांनी तक्रारदाराच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले, तेव्हा तक्रारदाराने स्वतः सॉफटवेअर अभियंत्याला बोलाविले व त्याचेकडून संगणक तपासून घेतला. यावर सदर सॉफटवेअर अभियंत्याने तक्रारदाराला सांगितले की, कॉम्प्युटर वर्क फिडींग योग्य पध्दतीने केले गेले नाही व याच बाबीचा गैरअर्जदार फायदा घेत आहेत. तक्रारदाराने या प्रकाराची सूचना गैरअर्जदारांना दिली व त्यांना संगणकातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यास सुचविले. परंतु गैरअर्जदारांनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले. तेव्हा अर्जदाराने दिनांक 7.5.2003 रोजी कायदेशीर नोटीस गैरअर्जदारांना दिली. या कालावधीत गैरअर्जदारांच्या निष्काळजीपणामुळे रु.12.50 लाख इतके नुकसान झाले. सदर रक्कम गैरअर्जदारांकडून नुकसान भरपाई म्हणून मिळण्याकरिता तक्रारदाराने मंचासमोर तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराच्या तक्रारीची नोंद घेऊन गैरअर्जदारां विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार यांना नोटीस मिळून देखील ते मंचासमोर हजर झाले नाहीत. तेव्हा दिनांक 14.02.2005 रोजी सदर दावा गैरअर्जदारां विरुध्द एकतर्फा चालविण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश मंचाने पारित केला.
अर्जदाराला ब-याच संधी देऊन सुध्दा तक्रारदार सुनावणीकरिता मंचासमोर हजर झाले नाहीत. तेव्हा तक्रारदाराचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे विचारात घेऊन गुणवत्तेच्या आधारावर सदर तक्रार अर्ज निकाली काढण्याचा निर्णय मंचाने घेतला. यानुसार मंचाचे निकष खालीलप्रमाणे आहेत .-
तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत केलेल्या कथनावर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण होतो. तसेच तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गैरअर्जदारां सोबत झालेला सर्व व्यवहार तोंडी झाला होता. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत असेही नमूद केले आहे की, त्याने गैरअर्जदारांना दिनांक 30.01.2002 पर्यंत एकूण 10 लाख रुपये दिलेले आहेत. परंतु याकरिता तक्रारदाराकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे तक्रारदार मंचासमोर सदर पुरावा सादर करु शकला नाही. तक्रारदाराने तोंडी व्यवहार झाल्याबद्दल तक्रारीत म्हटले आहे. परंतु मंच तोंडी वक्तव्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तसेच तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, गैरअर्जदारांनी अयोग्य पॅकेज पुरविल्यामुळे तक्रारदाराच्या संगणकामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे असे तक्रारदाराने बोलाविलेल्या सॉफटवेअर अभियंत्याचे म्हणणे होते. परंतु याकरिता पुरावा म्हणून सॉफटवेअर अभियंत्याचे शपथपत्र जोडलेले हनाही. तेव्हा गैरअर्जदारांनी अयोग्य वेब पॅकेज पुरविल्यामुळे तक्रारदाराच्या संगणकामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला या तक्रारदाराच्या म्हणण्यावर मंच विश्वास ठेवू शकत नाही.
तक्रारदाराने आपल्या तक्रारीपृष्ठयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा किंवा शपथपत्र मंचासमोर दाखल केले नाही. याकरिता अर्जदाराला वारंवार संधी देऊन सुध्दा त्याने स्वतःचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तसेच सुनावणीकरिता सुध्दा हजर झाला नाही. यावरुन असे दिसून येते की, अर्जदाराला त्याच्या तक्रारीत कोणताही रस नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// अं ति म आ दे श //
1 अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2 खर्चाबद्दल कोणताही हुकूम नाही.