उपस्थित : तक्रारदारांतर्फे : प्रतिनिधी
जाबदारांतर्फे : अड. श्रीमती. कुलकर्णी
*****************************************************************
द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
//निकालपत्र//
(1) प्रस्तूतचे प्रकरण सन 2006 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/476/2006 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/305/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
(2) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांनी वॉटरप्रुफिंगचे काम योग्य पध्दतीने केले नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,
तक्रारदार डॉ. नारायण वेताळ यांनी त्यांच्या घराचे स्लॅब गळत असल्यामुळे सकाळ वर्तमानपत्रातील जाहिरातीमधून जाबदार श्री. राजेंद्र भोसले यांचा नंबर घेतला. जाबदारांनी आपल्या वॉटरप्रुफिंगच्या कामाची जाहिरात सकाळ वर्तमानपत्रामध्ये केली होती. तक्रारदारांनी आपले घर दाखविल्यानंतर जाबदारांनी वॉटरप्रुफिंगसाठी तक्रारदारांना रु.8,000/- एवढा खर्च सांगितला. अन्य आजूबाजूचा भाग वॉटरप्रुफिंग करायचा असल्यास त्यांनी यासाठी रु.3,000/- या जादा रकमेची मागणी केली. यानंतर जाबदारांनी वॉटरप्रुफिंगचे काम करायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा रक्कम वाढवून घेतली. अंतिमत: संपूर्ण वॉटरप्रुफिंगसाठी रु.15,000/- एवढी रक्कम उभयतांच्या मध्ये ठरली. तक्रारदारांनी जाबदारांना ठरल्याप्रमाणे संपूर्ण रक्कम अदा केली. मात्र जाबदारांनी अत्यंत दर्जाहीन काम केले अशी तक्रारदारांची तक्रार आहे. जाबदारांचे काम झाल्यानंतर सुध्दा स्लॅब गळायचे थांबले नव्हते. उलट आजूबाजूच्या न गळणा-या ज्या भागावर वॉटरप्रुफिंग करुन घेतले होते तो भागही गळण्यास सुरुवात झाली होती. जाबदारांनी त्यांच्या कामाची दहा वर्षांची गॅरंटी दिलेली असताना त्यांचे काम दहा दिवससुध्दा टिकले नाही यावरुन त्यांच्या कामाच्या दर्जाची कल्पना येते असे तक्रारदारांनी नमुद केले आहे. गळतीच्या संदर्भात जाबदारांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या तक्रारीचे निवारण करुन दिले नाही. हा तक्रार अर्ज दाखल करण्यापूर्वी आपण त्यांना एक रजिस्टर पत्र पाठविले. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे सदरहू तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे असे तक्रारदारांनी नमुद केले आहे. रक्कम स्विकारुनही जाबदारांनी आपल्याला योग्य दर्जाची सेवा दिली नाही याचा विचार करता आपण त्यांना अदा केलेली रक्कम व्याज व इतर अनुषंगिक रकमांसह देवविण्यात यावी अथवा कामाची दर्जेदार दुरुस्ती करुन देण्याबाबत त्यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पृष्टयर्थ व एकूण 4 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
(3) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांवरती मंचाच्या नोटीसीची बजावणी झाल्यानंतर त्यांनी विधिज्ञांमार्फत आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले. आपल्या म्हणण्यामध्ये जाबदारांनी तक्रारदारांच्या सर्व तक्रारी नाकारलेल्या असून दहा वर्षांच्या गॅरंटीचा मजकूर तक्रारदारांनी आपल्याकडून जबरदस्तीने लिहून घेतला असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांची टेरेस 2000 चौ.फुटाची असताना आपण काम केवळ 400 चौ. फुटाचे केलेले आहे व संपूर्ण टेरेसला भरपूर प्रमाणात तडे गेलेले आहेत असे जाबदारांचे म्हणणे आहे. आपण वॉटरप्रुफिंगचे काम हे तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार केलेले असून आपण त्यांना सर्व तडे भरावे लागतील असे सांगितले होते परंतु त्यांनी आपले ऐकले नाही असे जाबदारांनी नमुद केले आहे. आपण कामाची पाहणी करायला गेलो होतो तेव्हा त्यांनी आपल्याला फक्त एकच रुम दाखविली तसेच अंधार झाल्यानंतर खालूनच फक्त एका रुममधील लिकेज दाखविले व उद्याच्या उद्दा काम सुरु करा असे सांगितले. प्रत्यक्ष काम करायला आल्यानंतर संपूर्ण टेरेसला प्रॉब्लेम आहे हे लक्षात आल्यावर सगळीकडेच काम करावे लागेल असे आपण तक्रारदारांना सांगितले. मात्र त्यांनी आपले ऐकले नाही असे जाबदारांचे म्हणणे आहे. आपण काम केले त्याठिकाणी तक्रारदारांनी टॉवर उभारले असून टॉवर ठेवताना तोडफोड झालेली असून खूप वजनाची उपकरणे तेथे ठेवले गेल्यामुळे वॉटरप्रुफिंगचा काहीही उपयोग झाला नाही असे जाबदारांनी नमुद केले आहे. तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर आपण टेरेसची पाहणी केली असता आपण केलेल्या कामामध्ये काहीही दोष नाही हे आपल्या लक्षात आले असे जाबदारांचे म्हणणे आहे. जाबदारांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
(4) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांचे म्हणणे दाखल झाल्यानंतर तक्रारदारांनी निशाणी 17 अन्वये आपले पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व त्याच्या पृष्टयर्थ निशाणी 21 अन्वये 4 छायाचित्रे व एअरटेल कंपनीबरोबर झालेला करार मंचापुढे दाखल केला. यानंतर नेमलेल्या तारखेला जाबदार गैरहजर असल्याने तक्रारदारांच्या प्रतिनिधींचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
(5) प्रस्तूत प्रकरणातील तक्रार अर्ज, म्हणणे, दाखल कागदपत्रे व युक्तिवाद याचा विचार करता पुढील मुद्दे (points for consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात.
मंचाचे मुद्दे व त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे :-
मुद्दा क्र. 1 :- जाबदारांनी सदोष वॉटरप्रुफिंग केले ही बाब सिध्द
होते का ? ... होय.
मुद्दा क्र. 2 :- तक्रार अर्ज मंजूर होण्यास पात्र ठरतो का ? ... होय.
मुद्दा क्र. 3 :- काय आदेश ? ... अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 व 2 :- (i) हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी संलग्न असल्याने त्यांचे एकत्रित विवेचन करण्यात आले आहे. प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रारीचे अवलोकन केले असता जाबदारांनी दहा वर्षाची गॅरंटी देऊनसुध्दा दहा दिवसांमध्ये त्यांच्या घराचा स्लॅब गळायला लागला अशी त्यांची तक्रार असल्याचे लक्षात येते. तक्रारदारांच्या तक्रारीच्या अनुषंगे त्यांनी निशाणी 3 अन्वये दाखल केलेल्या दरपत्रकाचे अवलोकन केले असता या दरपत्रकाच्या मागे “ डॉ. वेताळ यांचे मी अनंत एंटरप्रायझेस राजेंद्र भोसलेनी स्लॅब वॉटरप्रुफिंग केले आहे दहा वर्षांमध्ये काही झाल्यास मी काहीही रक्कम न घेता विनामुल्य करुन देईन “ असे जाबदारांनी स्वत: लिहून दिलेले आढळते. तसेच स्लॅबची गळती दहा दिवसांतच सुरु झाली आहे अशा आशयाचे पत्र तक्रारदारांनी जाबदारांना पाठविलेले आढळते. हे पत्र जाबदारांना प्राप्त झाल्याची पोहोचपावतीही तक्रारदारांनी मंचापुढे हजर केली आहे. तसेच गळतीच्या संदर्भातील आपली तक्रार सिध्द करण्यासाठी त्यांनी काही छायाचित्रे मंचापुढे दाखल केली आहे. तक्रारदारांच्या वर नमुद तक्रारी व त्यांच्या पुराव्याला जाबदारांनी दिलेल्या उत्तराचे अवलोकन केले असता दहा वर्षांच्या गॅरंटीबाबतचा मजकूर तक्रारदारांनी आपल्याकडून जबरदस्तीने लिहून घेतला असे त्यांचे म्हणणे असून दि.14/1/2006 रोजीच्या पत्रानंतर आपल्याला तक्रारदारांकडे जाण्याची गरज वाटली नाही असे त्यांनी म्हणण्यामध्ये नमुद केलेले आढळते. जाबदार हे एक व्यावसायिक असून केलेल्या कामाची लेखी हमी देण्याचा अर्थ व परिणाम त्यांना संपूर्णपणे माहित असणे अपेक्षित आहे अशाप्रकारे तक्रारदारांनी जर जबरदस्तीने त्यांच्याकडून हमीबाबतचा मजकूर लिहून घेतला असेल तर हा मजकूर लिहील्यानंतर त्यांनी यासंदर्भात आपला आक्षेप तक्रारदारांना का कळविला नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो. तक्रारदारांना दि. 14/1/2006 रोजी जाबदारांनी दहा वर्षांच्या हमीबाबतचा मजकूर लिहून दिलेला आहे. यानंतर दि.29/6/2008 रोजी सुध्दा तक्रारदारांनी जाबदारांना पत्र पाठवून दहा वर्षांच्या गॅरंटीबाबतचा उल्लेख त्यांच्या पत्रामध्ये केलेला होता. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सुध्दा जाबदारांनी या संदर्भातील मजकूर नाकारलेला नाही. अर्थातच जाबदारांनी यासंदर्भात म्हणण्यामध्ये घेतलेली ही बचावाची भूमिका केवळ आपली जबाबदारी टाळण्याच्या हेतूने पश्चातबुध्दीने घेतली आहे असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब जाबदारांचा हा बचावाचा मुद्दा अमान्य करण्यात येत आहे.
(ii) तक्रारदारांच्या संपूर्ण गच्चीचे वॉटरप्रुफिंग करणे आवश्यक आहे असे आपण त्यांना सांगूनसुध्दा त्यांनी ते ऐकले नाही व वॉटरप्रुफिंगचे काम त्यांनी स्वत:च्या मर्जीनुसार आपल्याकडून करुन घेतले आहे असेही जाबदारांचे म्हणणे आहे. तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी जर जाबदारांना वॉटरप्रुफिंगच्या संदर्भातील काही सुचना दिल्या असतील व त्या सुचना योग्य नसतील त्या नाकारण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य जाबदारांना होते. तसेच जर संपूर्ण गच्चीचे वॉटरप्रुफिंग केल्याशिवाय गळती थांबणे शक्य नव्हते तर काम नाकारण्याचे स्वातंत्र्यही जाबदारांना होते. मात्र जाबदारांनी काम स्विकारले व ते पूर्ण केले व या कामाची दहा वर्षांची गॅरंटी दिली. अर्थात अशा परिस्थितीत जाबदारांना वर नमुद कारणास्तव आता आपली जबाबदारी नाकारता येणार नाही असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. तक्रारदारांच्या मुलाने अंधारामध्ये आपल्याला गळतीचा छोटासा भाग दाखविला व दुस-या दिवशीच काम सुरु करण्याचा आग्रह धरुन आपली फसवणूक केली असेही जाबदारांचे म्हणणे आहे. जाबदारांचे हे निवेदन अर्थातच तर्कहिन व अविश्वसनीय असल्याने मान्य करणे शक्य नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. तक्रारदारांनी त्यांच्या गच्चीमध्ये एअरटेलचे टॉवर उभारण्यासाठी खड्डे खणल्यामुळे ही गळती सुरु झाली आहे असा एक जाबदारांचा बचावाचा मुद्दा आहे. जाबदारांच्या या मुद्दाच्या अनुषंगे तक्रारदारांनी दाखल केलेल्या कराराचे अवलोकन केले असता त्यांनी एअरटेल कंपनीबरोबर हा करार दि.14/12/2006 रोजी केला आहे. तर जाबदारांनी गळतीचे काम दि. 14/1/2006 रोजी पूर्ण केलेले आहे ही बाब दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. अर्थातच टॉवरच्या खोदकामामुळे गळती सुरु झाली हा जाबदारांचा बचावाचा मुद्दाही वर नमुद वस्तुस्थितीच्या आधारे फेटाळण्यास पात्र ठरतो असा मंचाचा निष्कर्ष आहे. तक्रारदारांनी आपल्या पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रासोबत दि. 19/8/2006 रोजी गळतीची काढलेली छायाचित्रे मंचापुढे हजर केली आहेत. दरम्यानच्या काळामध्ये ही छायाचित्रे काढलेला फोटोस्टुडिओ बंद झालेला असल्यामुळे छायाचित्रकाराचे प्रतिज्ञापत्र दाखल करणे शक्य झाले नसले तरीही या छायाचित्रांवर छायाचित्रे काढल्याची तारीख नमुद केलेली आढळते. एकूणच या प्रकरणातील तक्रारदारांतर्फे दाखल सर्व पुराव्यांचे अवलोकन केले असता ज्या वॉटरप्रुफिंगची जाबदारांनी दहा वर्षांची गॅरंटी दिली होती ते वॉटरप्रुफिंग जाबदारांनी निकृष्ट दर्जाचे केले व काही दिवसांतच त्याची गळती सुरु झाली ही बाब सिध्द होते. तर याउलट जाबदारांतर्फे उपस्थित करण्यात आलेले बचावाचे सर्व मुद्दे फेटाळण्यास पात्र होतात ही बाब वर नमुद विवेचनांवरुन सिध्द होते. अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे वॉटरप्रुफिंग करुन जाबदारांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब तक्रारदारांनी जाबदारांना अदा केलेली रक्कम रु.15,000/- तक्रारदारांच्या विनंतीनुसार तक्रार अर्ज दाखल तारखेपासून म्हणजेच दि. 24/8/2006 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत 9% व्याजासह परत करण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात येत आहेत. तसेच तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रु.2,000/- व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु.500/- मात्र मंजूर करण्यात येत आहेत.
वर नमुद सर्व विवेचनावरुन जाबदारांनी सदोष वॉटरप्रुफिंग केले व त्यामुळे सदरहू तक्रार अर्ज मंजूर होण्यास पात्र ठरतो या बाबी सिध्द होतात. सबब त्याप्रमाणे मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
मुद्दा क्र. 3 :- वर नमुद सर्व निष्कर्ष व विवेचनाच्या आधारे प्रस्तूत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की,
// आदेश //
1. तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2. यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्कम रु.15,000/- मात्र दि. 24/8/2006 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत 9% व्याजासह अदा करावेत.
3. यातील जाबदारांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रु.2,000/- व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु.500/- अदा करावेत.
4. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून तीस दिवसांचे आत न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
5. निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना
नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.