-ः आदेश ः- द्वारा- मा.सदस्या, सौ.ज्योती अभय मांधळे. 1. तक्रारदाराची तक्रार खालीलप्रमाणे- तक्रारदार हे कांदिवली मुंबई येथील रहिवासी असून ते फिल्म इंडस्ट्रीत काम करतात. सामनेवाले हे नेरुळ नवी मुंबई येथील रहिवसी आहेत. सामनेवाले व तक्रारदारांची भेट एका मालिकेच्या शुटींगमध्ये काम करताना झाली. त्यामध्ये सामनेवालेंची मुलगी ही मालिकेत काम करत होती. तक्रारदाराकडे मालिकेचे सर्व सभासद व आर्टीस्ट लोकांना पेमेंट करण्याचा चार्ज दिला होता. सामनेवालेच्या कुटुंबाची मालिकेच्या शुटींगच्या वेळी तक्रारदाराची ओळख झाली व तिने तक्रारदाराना विनंती केली की, तिच्या मुलीला मालिकेमध्ये काम करण्यासाठी एक चांगला रोल दयावा. त्यावेळी तक्रारदारानी सामनेवालेस आपला मोबाईल नंबर दिला, तसेच सामनेवालेशी ओळख करुन दिली. त्यानंतर सतत सामनेवाले तक्रारदाराना मोबाईलवर कॉल करुन त्यांच्या मुलीला काम करण्यासाठी एक संधी दयावी ही विनंती करत होते. अनेकदा कॉल केल्यानंतर तक्रारदारानी सामनेवालेस असे सांगितले की, ते त्यांच्या मुलीसाठी सेक्रेटरी म्हणून काम पहातील. त्यामुळे त्यांना अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये तसेच डायरेक्टरशी बोलता येईल. हे सर्व करण्यासाठी ते दरमहा रु.30,000/- आकारतील. सामनेवालेनी या गोष्टीला संमती दिल्यानंतर तक्रारदारानी सामनेवालेच्या मुलीसाठी काही प्रॉडक्शन हाऊस, डायरेक्टर यांचेशी भेट घेतली व त्यांना सामनेवालेच्या मुलीचा फोटोही दिला. कालांतराने सामनेवालनी तक्रारदारास धमकी देण्यास सुरुवात केली की, त्यांनी त्यांच्या मुलीला अदयाप काम दिलेले नाही व नंतर असे म्हणाले की, आम्ही तुम्हाला मारुन टाकू. नंतर अनेक वेळा त्यांनी फोन करुन धमकी देणे चालू ठेवले. त्यांना त्याचा खूप मानसिक त्रास होत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या वकीलातर्फे सामनेवालेस दि.21-3-11 रोजी नोटीस पाठवली. त्यांनी सर्व प्रकारे सदरची तक्रार सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु सामनेवालेकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना मंचाकडे तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सदरची तक्रार ही ग्राहक तक्रार असून व सामनेवालेनी त्याना जी सेवा दिली आहे ती दोषपूर्ण आहे, तसेच अनुचित व्यापारी प्रथेस जबाबदार आहे. तक्रारदारांची विनंती की, सामनेवालेच्या धमक्यांना तहकुबी मिळावी, तसेच सामनेवालेनी त्यांच्याकडून जी सेवा घेतली आहे त्याबाबत त्यांना त्याचे पेमेंट मिळावे व तक्रारखर्चही मिळावा. 2. तक्रारदारानी तक्रारअर्जासोबत नि.2 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, नि.4 अन्वये कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात त्यांनी सामनेवालेस पाठवलेली नोटीस दाखल केली आहे. 3. आज दि.7-6-11 रोजी सदर तक्रार अँडमिशनसाठी नेमण्यात आली होती. त्यावेळी तक्रारदाराचे वकीलांनी मंचासमोर युक्तीवाद केला व त्यात त्यांनी असे म्हटले की, तक्रारदार हा सामनेवालेंचा ग्राहक आहे. उभय पक्षकारांनी एकमेकाचे संमतीने सदरचा व्यवहार केला आहे. तक्रारदारानी सामनेवालेच्या मुलीसाठी सेक्रेटरी म्हणून काम केल्याने व त्यांच्यासाठी मालिकेमध्ये काम करण्यासाठी चांगला रोल मिळण्यासाठी सेक्रेटरी म्हणून काम करत होते त्यासाठी सामनेवालेनी तक्रारदाराना रु.30,000/-दिले. सदर व्यवहार हा दरमहा रु.30,000/-देण्यात येतील असा ठरला होता. त्यामुळे तक्रारदार सामनेवालेंचा ग्राहक होत असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार या मंचामध्ये तक्रार दाखल करता येते. 4. मंचाने सदरच्या तक्रारीची पहाणी केली व तक्रारदाराच्या वकीलांचे युक्तीवाद लक्षात घेऊन खालील मुद्दा निश्चित केला- मुद्दा क्र.1- तक्रारदार सामनेवालेंचा ग्राहक होतो काय? उत्तर - नाही. विवेचन मुद्दा क्र.1- 5. मंचाचे मते तक्रारदारानी सामनेवालेच्या मुलीसाठी सेक्रेटरी म्हणून काम पाहिले, त्यासाठी सामनेवालेनी त्यांना दरमहा काही रक्कम देण्याचे कबूल केले. सदरचा व्यवहार एकमेकांचे संमतीने झाला. तक्रारदारानी सामनेवालेच्या मुलीसाठी हा व्यवहार केला व तिला या तक्रारीत आवश्यक पक्षकार म्हणून सामील केल नाही, तसेच इथे मालक व नोकर या दोघांचा संबंध निर्माण होतो व त्यामुळे सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीमध्ये बसत नाही त्यामुळे तक्रारदार सामनेवालेंचा ग्राहक होत नाही. 6. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहेत- -ः आदेश ः- 1. सदरची तक्रार दाखल करुन घेण्यापूर्वीच फेटाळण्यात येत आहे व निकाली करण्यात येत आहे. 2. सदर आदेशाची सत्यप्रत तक्रारदाराना पाठवणेत यावी. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई दि.7-6-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |