-ःनिकालपत्रः द्वारा- मा.सदस्या, सौ.ज्योती अभय मांधळे , 1. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते बेलापूर, नवी मुंबई येथील रहिवासी आहेत, तसेच सामनेवाले हे मूव्हर्स अँड पॅकर्सचे काम करणारी कंपनी आहे. दि.28-5-10 रोजी सामनेवालेनी तक्रारदारांच्या दिलेल्या ऑर्डप्रमाणे त्यांच्या घरगुती वस्तू घेऊन बुडोन ते सी.बी.डी.बेलापूर येथे वहातूक करुन आणार होते, त्याप्रमाणे तक्रारदारानी सामनेवालेकडे वहातुकीचा खर्च रु.19,410 चा भरणा केला होता परंतु जेव्हा तक्रारदारानी त्यांच्या घरगुती वस्तूंची घरी जाऊन पहाणी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या घरातील खालील घरगुती वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यापैकी डायनिग टेबल, टी.व्ही, फ्रीज, ए.सी., गोदरेज कपाट व ए.सी.स्टॅबिलायझरचे पूर्ण नुकसान झाले आहे. सदर वस्तूंची एकूण रकमेची नुकसानभरपाई रु.62,500/- होती. वस्तूंची डिलीव्हरी घेतल्यावर तक्रारदारांनी सामनेवालेंच्या मजुराला नुकसान झालेल्या वस्तू दाखवल्या व ज्या ज्या वस्तूंचे नुकसान झाले आहे त्या त्या वस्तू त्यांच्याकडून अर्जावर लिहून घेतल्या. तक्रारीला कारण दि.28-5-10 रोजी घडले असल्यामुळे तक्रारदारांचे म्हणणे आहे की, सदरची तक्रार मुदतीत आहे. तक्रारदारांची विनंती की, मंचाने सामनेवाले 1 ते 3 यांना त्यांच्या वस्तूच्या नुकसानभरपाईची रक्कम रु.62,500/- दि.28-5-10 पासून 15 टक्के व्याजाने मिळावी तसेच त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रु.50,000/- मिळावा व तक्रारीचा खर्च रु.30,000/- मिळावा. 2. तक्रारदारानी तक्रारअर्जासोबत नि.2 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, नि.3 अन्वये कागदपत्राची यादी दाखल केली असून त्यात तक्रारदारानी सामनेवालेस वाहतूक खर्चाची रक्कम रु.19,410/- ची पावती, पॅकींग लिस्ट, लिस्टच्या मागे तक्रारदारानी सामनेवालेच्या मजुराकडून त्यांच्या वस्तूंची नुकसानी झाल्याची सविस्तर माहिती, वस्तूची छायाचित्रे, ऑक्ट्रॉयचा दाखला इ.कागदपत्रे दाखल केली आहेत. 3. नि.5 अन्वये मंचाने सामनेवालेना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. नि.8 अन्वये सामनेवालेनी आपला लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र व कागदपत्रासह दाखल केला. 4. सामनेवाले लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारदारानी तक्रारअर्जामध्ये योग्य व्यक्तीला पक्षकार केले नसल्यामुळे तक्रार मेंटेनेबल नसल्यामुळे ती फेटाळण्यात यावी. सामनेवाले पुढे म्हणतात की, ते मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीचे कर्मचारी आहेत. तक्रारदारानी कंपनीकडून सेवा घेतली आहे. तक्रारदारानी त्यांच्या ऑफिसात येऊन त्यांच्या जुन्या घरगुती वस्तू घेऊन जाणेसाठी विचारले तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिले की, ते पाठवत असलेला माल जुना व वापरलेला आहे. तक्रारदारासमोर व देखरेखीखाली त्यांचा सर्व माल पॅक करण्यात आला. दि.28-5-10 रोजी क्र.503046 ची कमिन्समेंट नोट तयार करण्यात आली त्याप्रमाणे ज्या वस्तू वाहतुकीस दिल्या त्याची यादी तयार करण्यात आली. तक्रारदारानी हे पण सांगितले की, सदरचा माल सेकंड हँड असून वापरलेला आहे. सदरचा माल विकण्यासाठी नाही व त्यांनी हे ही मान्य केले की, त्यांचे गोदरेज कपाट व डायनिंग टेबलला तडे गेले आहेत, तसेच त्यांच्या सोफा बेडला काहीही नुकसान झाले तरी त्यासाठी ते स्वतः जबाबदार रहातील. तक्रारदारानी त्यांच्या सोफा बेडमध्ये अनेक वस्तू ठेवल्या होत्या तेव्हा त्यांच्या कर्मचा-यांनी तक्रारदाराना सांगितले की, वस्तू बेडमध्ये ठेवू नका परंतु तक्रारदारानी ऐकले नाही. सदरची वहातूक काही अटी व शर्तीवर मंजूर करुन त्यावर तक्रारदारांची सही घेण्यात आली. तक्रारदाराच्या सर्व घरगुती वस्तू जुन्या होत्या. तक्रारदारानी अर्जामध्ये त्यांच्या वस्तुच्या नुकसानीची रक्कम पूर्णपणे चुकीची असल्याचे सामनेवालेनी म्हटले आहे. तक्रारदारानी कोणत्याही प्रकारच्या मालाची यादी किंमतीसह बनवली नव्हती. त्यांच्या वस्तूच्या झालेल्या नुकसानीच्या किंमतीची त्यानी मुद्दाम चुकीची घोषणा केली आहे. त्यांनी मंचापासून ब-याच बाबी लपवून ठेवल्या आहेत, त्यामुळे त्यांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी. 5. नि.10 अन्वये सामनेवालेनी दि.28-5-10 रोजीची गुडस् कन्साईन्मेंट नोट दाखल केली आहे. सदरच्या नोटवर खाली असे लिहीले आहे की, बेडबॉक्समध्ये जे सामान आहे ते तुटले तर त्याची जबाबदारी पार्टीवर राहील. त्यानंतर पॅकींग लिस्टची यादी दाखल करण्यात आली आहे. 6. दि.5-4-11 रोजी सदर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी आले असता उभय पक्षकारांचे वकील हजर होते. उभय पक्षकारांचे वकीलांनी मंचासमोर युक्तीवाद केले. मंचाने त्याचे युक्तीवाद ऐकून सदर प्रकरण अंतिम निकालासाठी निश्चित केले. तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार, प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे तसेच सामनेवालेनी दाखल केलेला लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे या सर्वांचा विचार करुन मंचाने खालील मुद्दे निश्चित केले- मुद्दा क्र.1- सामनेवाले हे तक्रारदाराना मिळालेल्या दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहेत काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.2- तक्रारदार सामनेवालेकडून त्यांच्या गृहोपयोगी वस्तूच्या झालेल्या नुकसानीची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.3 - तक्रारदार सामनेवालेकडून नुकसानभरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहेत काय? उत्तर - होय. विवेचन मुद्दा क्र.1 व 2- 7. या मुदृयांबाबत मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारदारानी सामनेवालेकडे त्यांच्या घरगुती वस्तू बुडोन ते सी.बी.डी.बेलापूर येथे वाहतुकीने नेण्याचे कॉंट्रॅक्ट दिले होते. त्याप्रमाणे दि.28-5-10 रोजी तक्रारदारानी सामनेवालेकडे सदर वाहतुकीचा येणारा खर्च रु.19,410/- चा भरणा केला. सामनेवालेनी त्यांचे सामान बेलापूर येथे पोच केल्यावर तक्रारदारानी सदर सामानाची पहाणी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या काही घरगुती वस्तुंचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सदर वस्तूंमध्ये डायनिंग टेबल, टी.व्ही, फ्रीज, गोदरेज कपाट, ए.सी., स्टॅबिलायझर, यांचे पूर्णपणे नुकसान झाले असून झालेल्या वस्तूच्या नुकसानभरपाईची किंमत रु.62,500/- पर्यंत जाईल. तक्रारदारानी तक्रारीसोबत त्यांच्या झालेल्या वस्तूच्या नुकसानीची छायाचित्रे दाखल केली आहेत. सदर छायाचित्रे पाहिली असता तक्रारदारांच्या काही घरगुती वस्तूंचे नुकसान झाले असल्याचे लक्षात येते. तक्रारदारानी आपल्या तक्रारीसोबत नि.3 अन्वये कागदपत्राची यादी दाखल केली आहे, त्यात नि.3/2 अन्वये पॅकींग लिस्ट दाखल केली आहे. सदर पॅकींग लिस्टमध्ये वस्तूबरोबर सदर वस्तूंची अंदाजे किंमत लिहीली आहे. सदरील वस्तूची मूळ स्थिती लिहीली आहे. तक्रारदाराच्या ज्या वस्तूंचे नुकसान झाले आहे त्या वस्तूच्या पॅकींग लिस्टप्रमाणे किंमती देण्यात आल्या आहेत. वस्तू स्थिती किंमत रु. 1. कपाट वापरलेले व जुने. 1,000/- 2. फ्रीज वापरलेला व जुना 2,000/- 3. टी.व्ही. वापरलेला व जुना 2,800/- 4. ए.सी. वापरलेला व जुना 5,000/- 5. डायनिंग टेबल. वापरलेले व जुने 1,500/- 6. ए.सी.स्टॅबिलायझर वापरलेला व जुना 500/- --------------- 12,800/- --------------- तक्रारदारानी सामनेवालेवर पूर्ण विश्वासाने त्यांचे सामान सामनेवालेच्या स्वाधीन केले होते. वस्तू नवीन असोत नाहीतर जुन्या, त्या व्यवस्थित पॅक करुन व्यवस्थितपणे पोचवण्याची जबाबदारी सामनेवालेंची आहे, परंतु सामनेवालेनी त्यांच्या काही घरगुती वस्तूंचे नुकसान केले ही त्यांनी तक्रारदाराना दिलेली दोषपूर्ण सेवा असल्याचे मंचाचे मत आहे. वरील पॅकींग लिस्टच्या यादीनुसार तक्रारदारानी त्यांच्या वस्तूच्या अंदाजित किंमती सांगितल्या आहेत त्यानुसार त्यांच्या वस्तूच्या त्यांनीच सांगितलल्या किंमतीनुसार रु.12,800/- चे नुकसान झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार सामनेवालेकडून त्यांच्या झालेल्या घरगुती वस्तूच्या नुकसानीची रक्कम रु.12,800/- सामनेवालेकडून मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले 1 ते 3 या कंपनी चालवणा-या जबाबदारी व्यक्ती आहेत, त्यामुळे नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. सबब सामनेवाले 1 ते 3 या सर्वांना या कामी जबाबदार धरण्यात येते. विवेचन मुद्दा क्र.3- 8. तक्रारदारानी सामनेवालेकडे पूर्ण विश्वासाने घरगुती वस्तूंची वाहतूक करुन त्यांच्या गावी बेलापूर येथे नेण्यासाठी दिल्या होत्या, परंतु सामनेवालेनी त्यांच्या काही घरगुती वस्तूचे नुकसान केल्याचा मानसिक त्रास तक्रारदाराना होणे अपरिहार्य आहे. सबब तक्रारदार सामनेवालेकडून नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.5,000/- मिळण्यास पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदारानी सामनेवालेविरुध्द मंचात तक्रार दाखल करावी लागली त्यासाठी तक्रारदार सामनेवालेकडून न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- मिळण्यास पात्र आहेत. 9. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो- -ः आदेश ः- 1. तक्रार क्र.160/10 मंजूर करण्यात येते. 2. आदेश पारित तारखेच्या 45 दिवसाचे आत सामनेवाले 1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदाराना खालीलप्रमाणे रकमा अदा कराव्यात- अ) तक्रारदाराच्या घरगुती वस्तुच्या नुकसानभरपाईची रक्कम रु.12,800/-(रु.बारा हजार आठशे मात्र) ब) मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) क) न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) उपरोक्त आदेशाचे पालन सामनेवालेनी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार सामनेवालेकडून वर कलम अ व ब मधील रकमा आदेश पारित तारखेपासून ते रक्कम मिळेपर्यंत 10 टक्के दराने वसूल करण्यास पात्र रहातील. 3. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना पाठवण्यात याव्यात. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि. 11-4-11. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |