(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 19 सप्टेंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे.
1. तक्रारकर्तीच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप अशाप्रकारे आहे की, तक्रारकर्ता हा शासकीय कंञाटदार असून छत्तीसगड येथे आहे. तसेच तक्रारकर्त्याचा परिवार हा नागपूर येथे राहतो. विरुध्दपक्ष ही एक संस्था असून कंट्री व्हॅकेशन या नावाने निरनिराळया लोकांना मेंबर करुन त्यांना कौटुंबिक सहल तसेच राहण्याची व्यवस्था रिसोर्ट व अन्य सुविधा मेंबर्सला पुरविण्याचे काम करणारी कंपनी आहे. तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र.1 यांनी दुरध्वनी व्दारे आपल्याला लकी ड्रा लागलेला असून तुम्हांला रुपये 25,000/- बक्षिस लागलेले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र.1 यांनी मेंबरशीप अॅग्रीमेंट करण्याकरीता प्रवृत्त केले व दिनांक 16.4.2013 रोजी असे सांगितले की, मेंबरशीप ऑफर ही आज पुरतीच उघडी असून तुम्हीं 11 वे मेंबर आहे, जर तुम्हीं आज मेंबरशीप केली तर वार्षीक मेंबरशीपचे फक्त रुपये 25,000/- भरावे लागतील. त्यानुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे मेंबरशीप नोंदविली व त्यानंतर तक्रारकर्ता यांनी दिनांक 16.4.2013 रोजी किंवा रुपये 20,000/- देवून मेंबरशीप पावती क्रमांक 0413 – CVNP प्राप्त केली. त्यानंतर तक्रारकर्ता असे नमूद करतो की, तक्रारकर्त्याला 6 दिवस हैद्राबाद येथे वेळ घालवायचा असल्या कारणाने दिनांक 9.6.2013 पासून तर दिनांक 15.6.2013 पर्यंत असे एकूण 6 दिवस हैद्राबादला जायचे होते, त्यानुसार त्याने रिजर्वेशन काढून आधीच म्हणजे दिनांक 18.4.2013 रोजी पक्के केले. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी आश्वासीत केले होते की, ते संस्थेचे मेंबर असल्यामुळे त्यांना हैद्राबाद येथे ‘स्टुडिओ युनीट रुम’ यांची सुविधा 7 दिवसांपर्यंत देण्यात येईल व त्यांची राहण्याची व्यवस्था हैद्राबाद येथे ‘अमृता कस्टल’ येथे करण्यात आली. तक्रारकर्ता व त्याचे कुटूंब हैद्राबाद येथे ‘अमृता कस्टल’ येथे पोहचल्यानंतर त्यांना हे माहित झाले की, तिथे ‘स्टुडिओ युनीट रुम’ ची सुविधा अस्तित्वात नाही व त्यांना तेथील मॅनेजर यांनी साधी डिलक्स रुमची सुविधा करुन दिली व तसेच त्यानंतर दिनांक 12.6.2013 ते 15.6.2013 च्या दरम्यान हॉटेल च्या परिसरात कर्फ्यु असल्याकारणाने कुणालाही हॉटेलच्या बाहेर पडता येत नव्हते व कुणालाही हॉटेलमध्ये येता येत नव्हते, त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.1 कडे तक्रार करुन त्यांचे स्थलांतरन दुस-या हॉटेलमध्ये करावे असे कळविले. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र.1 यांनी ‘मेडकल रिसोर्ट’ येथे दिनांक 12.6.2013 ते 15.6.2013 पर्यंत सुविधा करुन दिली, परंतु तक्रारकर्ता यांनी रुपये 2100/- अतिरिक्त खर्च करावे लागले तसेच टॅक्सी भाडे सुध्दा द्यावे लागले व अशाप्रकारे विरुध्दपक्ष यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, तसेच विरुध्दपक्षाच्या वर्तणूकीमुळे व निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याला अतिशय ञास सहन करावा लागला व अशाप्रकारे तक्रारकर्त्याचा हैद्राबाद येथील कौटुंबिक सहन निष्फळ झाली व त्याचा 6 दिवसाचा अमुल्य वेळ वाया लागला, या कारणास्तव तक्रारकर्त्याला व त्याच्या कुंटूंबाला अतिशय मानसिक, शारिरीक व आर्थिक ञास सहनक करावा लागला. तक्रारकर्त्याला या ञासामुळे रुपये 11,922/- अतिरिक्त खर्च आला व तसेच त्यानंतर तक्रारकर्ता यांनी दिनांक 13.4.2013 रोजी संस्थेची मेंबरशीप रद्द करुन मेंबरशीप रक्कम रुपये 20,000/- परत करण्याबाबत कळविले व त्या प्रकारचा ई-मेल सुध्दा तक्रारकर्त्याने पाठविला. परंतु, विरुध्दपक्ष क्र.1 यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही व दिनांक 20.9.2013 रोजी तक्रारकर्ता यांनी आपल्या अधिवक्ता मार्फत विरुध्दपक्ष यांना कायदेशिर नोटीस पाठविला त्याचे सुध्दा विरुध्दपक्ष यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1) विरुध्दपक्षाने यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे घोषीत करावे.
2) तसेच, विरुध्दपक्ष यांनी सेवेत ञुटी दिल्यामुळे तक्रारकर्ता यांची मेंबरशीप रद्द करुन मेंबरशीप रक्कम रुपये 20,000/- परत करावे. तसेच हैद्राबाद येथे आलेला अतिरिक्त खर्च परत करावा. तसेच मेंबरशीप करारनामा दिनांक 13.4.2013 रद्दबादल करावे. तसेच तक्रारकर्ता यांनी मेंबरशीप पोटी व हैद्राबाद येथे आलेला अतिरिक्त खर्च असे एकूण येणा-या रकमेवर 24 टक्के व्याज दराने दिनांक 13.4.2013 पासून तक्रारकर्त्याला रक्कम प्राप्त होईपर्यंत आदेशीत व्हावे. तसेच फ्री गिफ्ट व्हॉऊचर रक्कम रुपये 4000/- तक्रारकर्त्याने हॉटेल बुकींग करतेवेळी केले होते ती सुध्दा रक्कम परत करावी.
3) तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी रपये 15,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 10,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
2. तक्रारकर्तीचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस पाठविण्यात आली. त्यावर विरुध्दपक्ष यांनी उपस्थित होऊन तक्रारकर्त्याच्या तक्रारीला निशाणी क्र.7 वर आपले लेखीउत्तर सादर करुन त्यात प्रामुख्याने आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही बिनबुडाची तसेच तक्रारकर्त्याला सदरची तक्रार ही कलम -10 प्रमाणे कंपनी अॅक्टच्या 1956 प्रमाणे दाखल करावयास पाहिजे होती, परंतु त्याने सदर मंचात तक्रार दाखल केली आहे व ती मंचात चालू शकत नाही, तसेच तक्रारकर्ता हा कौटुंबिक सहन हैद्राबाद येथे सुट्टीच्या दिवसाचा आनंद उपभोग घेण्याकरीता हैद्राबाद येथे गेला होता, तसेच संस्थेने त्या दिवसाचा तक्रारकर्त्याकडून कोणताही मोबदला घेतला नाही म्हणून तक्रारकर्ता हा गैरअर्जदार किंवा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होत नाही. तक्रारकर्ता ही सहल हॉलिडे गिफ्ट व्हॉऊचर या माध्यमातून हैद्राबाद येथे उपभोग घेण्याकरीता गेला होता. विरुध्दपक्ष पुढे नमूद करतो की, तक्रारकर्त्याने हैद्राबाद येथे दिनांक 9.6.2013 ते दिनांक 15.6.2013 या दरम्यानच्या काळामध्ये हैद्राबाद येथे कौटुंबिक सहलीचा आनंद घेण्याकरीता स्वतः ‘अमृता कस्टल’ मध्ये राहण्याचे निवडले होते, तसेच त्याच्या फ्रि व्हॉऊचर क्रमांक CVG 00170132 दिनांक 18.4.2013 यामध्ये स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे तक्रारकर्ता जे आपल्या तक्रारीत हॉटेल निवडले होते ते अगदी हैद्राबाद सचिवालयाच्या विरुध्द दिशेला असल्यामुळे त्या दरम्यान ‘तेलंगना’ राज्य वेगळे करण्याचा संघर्ष चालु होता व त्यामुळे दिनांक 12.6.2013 ते 15.6.2013 या कालावधीत तेथील भागात करफ्यु लागल्यामुळे हॉटेलमधील लोकांना किंवा पाहुण्यांना बाहेर जाण्याची किंवा बाहेरुन आतमध्ये येण्याची परवानगी नव्हती. तसेच त्या दरम्यान विरुध्दपक्ष कोणतेच पाऊल उचलु शकत नव्हते व सदरचे हॉटेल हे तक्रारकर्ता यांनी स्वतः निवडले होते. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी स्वतःच दुसरा हॉटेलमध्ये थांबण्याचे कळविले, परंतु त्या दरम्यान ‘तेलंगना’ राज्य संपूर्ण बंद पुकारले होते. अशापरिस्थितीमध्ये तक्रारकर्त्याला तेथे मोकळे फिरणे किंवा बागळणे अशक्य होते, ही विरुध्दपक्षाची सेवेत ञुटी आहे किंवा अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला हे सिध्द होत नाही त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार संपूर्ण खोटी आहे. तसेच तक्रारकर्त्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक नुकसान झाले नाही, कारण त्या परिस्थितीमध्ये विरुध्दपक्ष सुध्दा हतबल होता तसेच तक्रारकर्त्याच्या विनंतीवरुन त्याचे स्थानंतरण ‘मेडकल रिसोर्ट’ येथे करण्यात आले, त्यामुळे त्याची गैरसोय झाली असे म्हणता येत नाही व तक्रारकर्ता यांना संस्थेचे मेंबरशीप झाल्यानंतर त्यांनी फ्री गिफ्ट व्हॉऊचर हॉलिडे पिकनिकचे दिले असल्यामुळे त्यांना मोबदला मागायचा अधिकार नाही. विरुध्दपक्ष पुढे तक्रारीत असे नमूद करतो की, तक्रारकर्ता यांनी संस्थेकडे रुपये 20,000/- रक्कम जमा केली होती, परंतु ती रक्कम मेंबरशीपची पूर्ण रक्कम नसून अर्धी रक्कम भरलेली होती व मेंबरशीपच्या करारनाम्या प्रमाणे उर्वरीत रक्कम भरावयाची होती, परंतु ती तक्रारकर्त्याने भरलेली नाही, करीता तक्रारकर्ता अर्धवट भरलेल्या रकमेची मागणी करण्यास पाञ नाही, कारण मेंबरशीप कराराच्या अनुषंगाने ते पूर्ण मेंबर होत नाही, तसेच ते अर्धवट भरलेल्या रकमेची मागणी सुध्दा करु शकत नाही. तसेच तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचेमध्ये मेंबरशीप अॅग्रीमेंट सुध्दा झाले नाही, फक्त तक्रारकर्ता यांनी फ्री गिफ्ट हॉलिडे व्हॉऊचर याचा उपभोग घेण्या पुरतेच होते. त्यामुळे अर्धवट रक्कम रुपये 20,000/- घेण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्ता यांनी सदर तक्रारीत संपूर्ण बाब खोटी नमूद केली आहे, तसेच विरुध्दपक्ष यांनी आपले उत्तरात सत्यता नमूद केली असून त्या दरम्यान हैद्राबाद येथील परिस्थितीचे वर्णन केलेले असल्यामुळे मंचाला योग्य निर्णय घेता येईल असे मला वाटते. तसेच, फ्री गिफ्ट व्हॉऊचरचा उपभोग घेतला त्याकरीता एक रुपयासुध्दा विरुध्दपक्ष यांनी घेतला नाही त्यामुळे तक्रारकर्त्याला सदरची तक्रार ग्राहक म्हणून चालविण्याचा कोणताही अधिकार नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे संपूर्ण दोषारोपन आपल्या उत्तरात खोडून काढले.
3. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत 1 ते 27 एवढे दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने तक्रारकर्तीने हॉलिडे गिफ्ट व्हॉऊचर दिनांक 16.4.2013, कॉपी ऑफ व्हॉऊचर दि.18.4.2013, पैसे भरल्याची पावती दि.16.4.2013, मेंबर करारनाम्याची प्रत, हॉटेलचे बिल, खाण्याचे बिल, तसेच विरुध्दपक्ष यांना पाठविलेले ई-मेल च्या प्रती व विरुध्दपक्ष यांना पाठविलेली नोटीस दाखल केली इत्यादी दस्ताऐवज दाखल केले आहे.
4. दोन्ही पक्षांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्याचे वकीलांनी पुरसीस दाखल केली. विरुध्दपक्षास संधी मिळूनही मौखीक युक्तीवाद केला नाही. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले. त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष कंपनीचा ग्राहक होतो काय ? : नाही
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्यास अनुचित व्यापार : नाही
प्रथेचा अवलंब व सेवेत ञुटी झाली आहे काय ?
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष कंट्री व्हॅकेशन या कंपनीचे मेंबरशीप करुन त्यांचे निरनिराळे हॉलिडे गिफ्ट व्हॉऊचर व्दारे कौटुंबिक सहल काढूल हैद्राबाद येथे फिरायला जाण्याचे ठरविले व त्याची बुकींग दिनांक 18.4.2013 रोजी घेवून त्याबाबतचे कंफरमेशन कंपनीला कळविले व कंपनीने सुध्दा फ्री व्हॉऊचर क्रमांक CVG 00170132 देण्यात आला. तक्रारकर्ता आपल्या तक्रारीत असे नमूद करतो की, सदरच्या काळात हैद्राबाद येथील ‘अमृता कस्टल’ नावाचे हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था विरुध्दपक्ष यांनी केली होती व मेंबरशीप करतेवेळी सांगितले की, हॉटेलची व्यवस्था ही ‘स्टुडिओ युनीट’ सारखी राहील, परंतु प्रत्यक्षात गेले असता तशा रुमची व्यवस्था नसून साध्या डिलक्स रुम मध्ये विरुध्दपक्ष यांनी त्यांची व्यवस्था केली. तसेच दिनांक 12.6.2013 ते 15.6.2013 या दरम्यानच्या काळात तक्रारकर्त्याला हैद्राबाद शहरात कुठेही फिरता आले नाही, त्याकरीता सुध्दा विरुध्दपक्ष हे जबाबदार आहे, त्यांना याबद्दलची माहिती होती. परंतु, विरुध्दपक्षाने आपल्या लेखीउत्तरात नमूद केले की, तक्रारकर्ता यांनी हॉटेलची निवड स्वतः केली होती आणि सदरचे हॉटेल हे हैद्राबाद सचिवालयाच्या अगदी जवळ व विरुध्द दिशेला होते, तसेच त्या दरम्यानच्या काळात तेलंगना राज्य वेगळा करण्याबाबतचा संघर्ष चालु होता, त्यामुळे राज्यात संचारबंदी लागलेली असून संपूर्ण हैद्राबाद बंद अवस्थेत होता, त्यामुळे तक्रारकर्त्याला हॉटेलच्या बाहेर पडण्याची व मोकळे फिरण्याची बंदी फक्त तक्रारक्तर्याला लावली नसून संपूर्ण लोकांना लावली होती. तरी अशापरिस्थितीत मध्ये तक्रारकर्त्याला दुस-या हॉटेलमध्ये विरुध्दपक्ष यांनी स्थलांतर करुन दिले. विशेष म्हणजे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला सदरची सेवा फ्री गिफ्ट व्हॉऊचर हॉलिडे पॅकेज कोणताही मोबदला घेऊन दिला नसल्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत बसत नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी लावलेले दोषारोपन खोटे व बिनबुडाचे आहे, कारण हैद्राबाद येथील त्या दरम्यानच्या परिस्थितीत विरुध्दपक्ष कोणत्याही प्रकारची सेवा देण्यात हतबल होता. तसेच तक्रारकर्ता यांनी दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांना मेंबरशीप रक्कम म्हणून रुपये 20,000/- चा भरणा केला. तसेच करारनाम्याचे वाचन केले असता असे दिसून येते की, सदरचा करारनामा हा इंडियन कंपनी अॅक्ट 1956 च्या अधिपत्याखाली करारनामा केलेला आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याला दाद मागण्याचा अधिकार या मंचाला नाही. तक्रारकर्त्याने योगय त्या न्यायालयात दाद मागावी व मेंबरशीपसाठी भरलेल्या रकमेची परतफेड करण्यास स्वतंञ योग्य त्या न्यायालयात दावा दाखल करावा असे मंचास वाटते. करीता, तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 19/09/2016