Dated the 21 Mar 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार वर नमुद पत्यावर रहातात. सामनेवाले मे.सोनम बिल्डर्स नावाची इमारत बांधकामाचा व्यवसाय करणारी पार्टनरशिप फर्म असुन श्री.भरत जैन त्यांचे पार्टनर आहेत. तक्रारदार यांनी नमुद केल्याप्रमाणे तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.......
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून सदनिका क्रमांक-002,434.70 चौरस फुट गोल्डन नेस्ट,बिल्डींग नं.29, फेज-XII हया इमारतीत रु.8,28,800/- हया मोबदल्यास घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाले यांच्यात सदर सदनिकेचा करारनामा ता.20.10.2006 रोजी स्वाक्षरीत करुन दुय्यम निबंधक,ठाणे-7 यांचेकडे नोंदविण्यात आला. तक्रारदार यांना सामनेवाले यांनी सदर करारनाम्यानुसार ता.30.12.2006 पर्यंत सदर सदनिकेचा ताबा देण्याचे कबुल केले होते, व तक्रारदार यांनी सामनेवाले यांना बँकेकडून कर्ज घेऊन मोबदल्याच्या रकमेतील उर्वरित रक्कम देण्याचे कबुल केले होते. सामनेवाले यांचेकडून त्यासाठी तक्रारदार यांना सदनिका बँकेकडे तारण ठेवण्याबाबत नो ऑब्जेक्शन सर्टिफीकेटची मागणी करुनही सामनेवाले यांनी त्यांना ते न दिल्याने तक्रारदार यांना कर्ज मिळवण्यास अडथळे आले, परंतु तक्रारदार बँकेकडून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विकलेली सदनिका दुस-या व्यक्तीस विकली, त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेविरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे, व तक्रारीच्या प्रार्थना कलम-10 (a) ते 10 (e) मध्ये नमुद केल्यानुसार सामनेवाले यांचेकडून मागणी केली आहे.
3. सामनेवाले यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार खोटी असुन सामनेवाले यांना तक्रारदार यांनी सदनिकेच्या मोबदल्याची उर्वरीत रक्कम सामनेवाले यांनी अनेकवेळा मागणीपत्रे पाठवूनही न दिल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदाराशी केलेला करार रद्द करुन सदर सदनिका अन्य व्यक्तीस विकली असे नमुद करुन, तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्याची मागणी केली आहे.
4. तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र, रिजॉईंडर, लेखी युक्तीवाद इत्यादी दाखल केले आहे, परंतु सामनेवाले यांना पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल करण्याची संधी देऊनही सामनेवाले यांनी ते दाखल केले नाही. तक्रारदार यांचा तोंडी युक्तीवाद ऐकून प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले. उभयपक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करुन तक्रारीच्या निराकरणार्थ निराकरणार्थ मंचाने खालील मुदयांचा विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
अ.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली आहे
का ?.................................................................................................होय.
ब.तक्रारदार सामनेवाले यांचेकडून पुर्वीच्या दरात तक्रारदार व सामनेवाले
यांच्यात स्वाक्षरित करण्यात आलेल्या ता.20.10.2006 च्या
करारनाम्यानुसार उर्वरीत मोबदल्याची रक्कम सामनेवाले यांना
अदा केल्यावर त्याच क्षेत्रफळाची पर्यायी सदनिका त्याच परिसरात
मिळण्यास पात्र आहेत का ?.................................................................होय.
क.तक्रारीत काय आदेश ?..............................................................अंतिम आदेशाप्रमाणे.
5.कारण मिमांसा
अ. तक्रारदार व सामनेवाले यांच्यात सदनिका क्रमांक-002, 434.70 चौरसफुट, बिल्डींग नं.29, फेज- XII, गोल्डन नेस्ट ही सदनिका विक्री करण्याचा व्यवहार सन-2006 मध्ये करण्याचे ठरले. त्याचा एकूण मोबदला रक्कम रु.8,28,800/- एवढा उभयपक्षांत ठरला होता. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना एकूण मोबदल्याच्या रु.8,28,800/- या रकमेपैंकी रक्कम रु.2,49,320/- दिली, तसेच इतर चार्जेसबाबत रु.16,445/- सामनेवाले यांना दिले, व उर्वरीत रक्कम रु.6,99,480/- तक्रारदार सामनेवाले यांना ता.30.12.2006 पुर्वी कर्ज घेऊन देण्याचे उभयपक्षांत ठरले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर सदनिकेची उर्वरीत रक्कम कर्ज मिळाल्यावर देण्याचे मान्य केले, त्यानुसार तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून कर्ज घेण्याबाबत एन.ओ.सी. मागितली, परंतु तक्रारदार यांनी अनेकवेळा विनवणी करुनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कर्ज घेण्यासाठी एन.ओ.सी. दिली नाही. तक्रारदार यांनी त्यानंतर बँक ऑफ बडोदा या बँकेतुन कर्ज घेण्याचा प्रयत्न सुरु केला. बँक ऑफ बडोदा यांच्याकडे कर्ज मिळवण्यासाठी तक्रारदार प्रयत्न करत असल्याचे सामनेवाले यांना अवगत होते. ता.07.11.2007 रोजी बँक ऑफ बडोदा यांचेकडून तक्रारदार यांना रु.6,80,000/- कर्ज मंजुर करण्याबाबत प्रि-अप्रुव्हल लेटर देण्यात आले ते निशाणी-डी, पान क्रमांक-102 वर अभिलेखात उपलब्ध आहे. सदर पत्रानुसार एक महिन्याच्या कालावधीत बँकेने मागितलेली टायटल क्लिअरन्स रिपोर्ट व इतर आवश्यक कागदपत्रे तक्रारदारांशी बँकेस देणे आवश्यक असल्याने, सदर कागदपत्रे व फ्लॅट तारण ठेवण्याबाबतचे सामनेवाले यांचे एन.ओ.सी. इत्यादी बाबी पुर्ण करण्यासाठी तक्रारदारांनी सामनेवाले यांचे कार्यालयास भेटी दिल्या, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सहकार्य केले नाही, त्यामुळे कर्ज मिळवण्याची पुढील कार्यवाही तक्रारदार यांना करणे अशक्य झाले. ता.08.06.2008 रोजी तक्रारदार सामनेवाले यांचे चौकशीसाठी गेले असता, सामनेवाले यांनी सदर 002, गोल्डन नेस्टमधील तक्रारदार यांनी सामनेवालेकडे करारनामा स्वाक्षरीत करुन व नोंदणीकृत करुन खरेदी केलेली सदनिका सामनेवाले यांनी दुस-या व्यक्तीस विकल्याचे तक्रारदार यांना समजले.
सामनेवाले यांनी कैफीयतीत तक्रारदार यांना उर्वरीत मोबदल्याची रक्कम भरण्याबाबत मागणीपत्रे पाठवल्याचे व ती तक्रारदार यांना मिळूनही तक्रारदार यांनी सदर रक्कम न भरल्याने सदर 002 गोल्डन नेस्ट, बिल्डींग नं.29 ही सदनिका त्रयस्थ व्यक्तीस विकल्याचे युक्तीवाद केला आहे. परंतु सामनेवाले यांनी List of Documents मध्ये लावलेल्या मागणी पत्रांच्या प्रती सामनेवाले यांनी Under Certificate of Posting व्दारे पाठविल्याचे दिसुन येते, परंतु त्या तक्रारदार यांना मिळाल्याचा ठोस पुरावा सामनेवाले यांनी सादर केलेला नाही, तसेच तक्रारदार यांना एकही मागणीपत्र रजिस्टर ए.डी.ने पाठविल्याचे दिसुन येत नाही किंवा तशी पोच अभिलेखात सामनेवाले यांनी सादर केलेले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेशी सदर सदनिका 002, गोल्डन नेस्ट, बिल्डींग नं.29, फेज- XII बाबत ता.20.10.2006 रोजी स्वाक्षरीत व नोंदणीकृत केलेला विक्री करारनामा रद्दबातल करण्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना बोलावून पुर्वीचा तक्रारदार व सामनेवाले यांचेमधील करारनामा रितसर रद्द करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही, Deed of Cancellation स्वाक्षरीत केलेले नाही. त्यामुळे केवळ नोटीसच्या आधारे सामनेवाले यांनी परस्पर सदर सदनिका 002, गोल्डन नेस्ट, श्रीमती संगिता साळवी यांना विकल्याचे दिसुन येते. सामनेवाले यांनी प्रकरणांत तक्रारदार यांच्या मागणीवरुन श्रीमती संगिता साळवी यांच्याशी सदर सदनिकेबाबत ता.23.05.2008 रोजी स्वाक्षरीत व नोंदणीकृत केलेल्या करारनाम्याची प्रत ता.12.03.2014 रोजी मंचात सादर केली, ती अभिलेखावर उपलब्ध आहे. सामनेवाले व तक्रारदार यांच्यात झालेला व्यवहार रद्द करण्याबाबतची नोटीस व मागणीपत्रे तक्रारदार यांना मिळाली नसल्याचे व सदर पत्रे विचारअंती केल्याचे तक्रारदारांनी लेखी युक्तीवादात नमूद केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराशी केलेला व्यवहार रद्द करण्यापुर्वी पुर्वीचा करारनामा रद्दबातल करणेसाठी Deed of Cancellation न करता सदर सदनिका 002, गोल्डन नेस्ट,बिल्डींग नं.29, फेज- XII अन्य व्यक्तीस विकण्याची कार्यवाही केली असल्याने सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते. तक्रारदार सामनेवाले यांना उर्वरीत रक्कम देण्यास अजुनही तयार आहेत, असे तक्रारदार यांनी लेखी युक्तीवाद /तक्रारीत नमुद केले आहे. सबब तक्रारदार सामनेवाले यांचेकडून त्याच परिसरात त्याच क्षेत्रफळाची दुसरी सदनिका उभयपक्षांत सन-2006 मध्ये स्वाक्षरीत करण्यात आलेल्या करारनाम्यातील मोबदल्याच्या पुर्वीच्या व्यवहारातील उर्वरीत मोबदल्याची रक्कम सामनेवाले यांना अदा करुन मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी सदर इमारतीत सामनेवाले यांचेकडील काही सदनिका अदयाप विक्री केल्या नसल्याचे नमुद केले आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे.............
I. Golden Nest Phase XI-A, Bldg. 5 Flat No.201
II. Golden Nest Phase XI-D-Wing Flat No.004
III.Sonam Narmada Flat No.001 & 002
IV. Golden Nest Phase XI Bldg. 8 Flat No.404
सामनेवाले तक्रारदार यांना देण्याच्या पर्यायी सदनिकेबाबत वर नमुद सदनिकांपैंकी तेवढयाच क्षेत्रफळाची सदनिका उपलब्ध असल्यास त्याचा विचार करु शकतात. तक्रारदार यांनी तक्रारीत वर नमुद सदनिकांचे क्षेत्रफळ किती आहे याबाबतचा तपशील दिला नसल्याने त्याबाबत आदेश करणे संयुक्तीक नाही असे मंचाचे मत आहे.
ब. सामनेवाले यांनी डिड ऑफ कॅन्सलेशन स्वाक्षरीत न करता तक्रारदाराशी सदनिका 002, गोल्डन नेस्ट, बिल्डींग-29, फेज- XII बाबत केलेला व्यवहार परस्पर रद्द करुन तक्रारदाराची सदनिका अन्य त्रयस्थ व्यक्तीस विकल्याने तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी तक्रारदार सामनेवाले यांचेकडून रु.25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले यांचे विरुध्द तक्रारदार यांना ग्राहक मंचात वकीलाकरवी प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागल्याने झालेल्या तक्रार खर्चापोटी सामनेवाले यांचेकडून तक्रारदार रु.15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार) मिळण्यास पात्र आहेत.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-52/2009 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेशी स्वाक्षरीत केलेल्या सदनिका क्रमांक-002, गोल्डन नेस्ट, तबिल्डींग 29, फेज-II हिचा नोंदणीकृत केलेला करारनामा तक्रारदारांशी Deed of Cancellation स्वाक्षरीत न करता परस्पर त्रयस्थ व्यक्तीस सदर सदनिका विकल्याने तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदनिका क्रमांक-002, गोल्डन नेस्ट, बिल्डींग-29, फेज-
XII क्षेत्रफळ-434.70 चौरसफुट(Carpet) हया सदनिकेच्या क्षेत्रफळा ऐवढेच क्षेत्रफळ
असलेली दुसरी सदनिका त्याच परिसरात, त्याच दराने दयावी (सन-2006 चे करारनामा
दर) व तक्रारदार व सामनेवाले यांच्यात ता.20.10.2006 रोजी स्वाक्षरीत करण्यात
आलेल्या करारनाम्यात नमुद केलेली सदर सदनिकेची एकूण मोबदल्याची रक्कम
रु.8,28,800/- असल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांना अदा केलेली रक्कम
रु.2,49,320/- .सदर पर्यायी सदनिकेच्या व्यवहारात सामनेवाले यांनी वळती करुन घ्यावी
व तक्रारदार यांनी उर्वरीत मोबदल्याची रक्कम सामनेवाले यांना आदेश पारित
झाल्यापासुन दोन महिन्यात अदा करावी. सामनेवाले यांनी वरील रक्कम स्विकारुन
सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वर नमुद केल्याप्रमाणे पर्यायी सदनिकेचा रितसर
करारनामा साक्षरित करुन व नोंदवून तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा (क्षेत्रफळ 434.70
चौरस फुट) आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावा.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- (अक्षरी रुपये
पंचवीस हजार) व न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार)
आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावेत.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.21.03.2016
जरवा/