१) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे :-
२) तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदारांविरुध्द प्रवासापोटी दिलेली रक्कम परत मिळणेकरिता व नुकसान भरपाईची रक्कम मिळणेकरिता दाखल केलेली आहे. जाबदार यांचा साक्षी यात्रा या नांवाने व्यवसाय असून सदरचा व्यवसाय प्रवाशांसाठी यात्रेचे नियोजन करण्याचा आहे. तक्रारदार यांना अंदमान-निकोबार येथे फिरावयास जावयाचे असल्याने त्यांनी जाबदार यांची भेट घेतली व चौकशीअंती जाबदार यांचेकडे अंदमान-निकाबार यात्रेचे ७ रात्रीचे नियोजन केले व सदर यात्रे दरम्यान जाबदार यांनी Covering Cellular Jail, Corbyns Cove, Sound and light island, Radhnagar beach, elephant beach इत्यादी स्थळे दाखविण्याचे आश्वासन दिले. सदरची यात्रा ही ११.११.२०१८ ते १९.११.२०१८ या कालावधी दरम्यान असून तक्रारदारांनी सदर यात्रेपोटी जाबदार यांना एकूण रक्कम रुपये ६८,०००/- दिली. ठरलेल्याप्रमाणे तक्रारदारांनी यात्रेस जाणेसाठी संपूर्ण तयारी जसे की, प्रवासासाठी लागणारे कपडे, गॉगल, कोट, स्विमींग कॉस्चुम इत्यादी सर्व वस्तुंची खरेदी केली. परंतु, अचानक सदर यात्रेपूर्वी २ तास अगोदर जाबदार यांनी तक्रारदार यांना असे कळविले की, अंदमान-निकोबार येथे हवामान खराब असल्याने सदरची यात्रा रद्द करणेत आलेली आहे. सदर बाब समजताच तक्रारदारांना प्रचंड मानसिक त्रास झाला. कारण त्यांनी यात्रेचे संपूर्ण नियोजन केले होते. त्यानंतर जाबदार यांनी तक्रारदार यांना सदरची यात्रा परत दि.०३.०२.२०१९ रोजी असल्याबाबत कळविले. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदार यांच्याकडून दिलेली रक्कम परत घेण्याऐवजी दि.०३.०२.२०१९ रोजीच्या यात्रेचे नियोजन स्विकारले. परंतु, याही वेळेस यात्रेपूर्वी ३ दिवस अगोदर जाबदार यांनी तक्रारदारांना असे कळविले की, त्यांच्याच संबंधित एजंटने त्यांची फसवणूक केली असून दिलेले विमानाचे तिकीट हे खोटे आहे. त्यामुळे सदरची यात्रा रद्द करावी लागेल असे सांगितले दोन वेळेस यात्रा रद्द झाल्याने तक्रारदारांना प्रचंड मानसिक त्रास झाला व तक्रारदार यांनी जाबदार यांना प्रत्यक्ष भेटून व व्हॉटसअपच्या माध्यमातून अनेक वेळेस दिलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. त्यानंतर जाबदार यांनी तक्रारदारांकडून स्विकारलेल्या संपूर्ण रक्कमेपैकी रक्कम रु.२,९००/- ची कपात करुन उर्वरीत रक्कम धनादेशाव्दारे परत केली. परंतु, सदरचा धनादेश सध्याच बँकेत जमा न करण्याची विनंती केली. कारण जाबदार यांच्या खात्यात पैसा नसल्याकारणाने सदरचा धनादेश कधी बँकेत जमा करायचा हे सांगतो असे कळविले. परंतु, जाबदारांनी तसे मुदतीत न कळविल्याने दिलेल्या धनादेशाची मुदत संपुष्टात आली. त्यानंतरही वारंवार विनंती करुन जाबदार यांनी तक्रारदारांना स्विकारलेली रक्कम परत न केल्याने तक्रारदारांनी दि.२४.१२.२०१९ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून दिलेली रक्कम व खर्चाची रक्कम मिळण्याची विनंती केली. परंतु, जाबदार यांना नोटीस मिळूनही ते तसे न वागल्याने तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल करुन अशी विनंती केली आहे की, जाबदार यांना प्रवासासाठी दिलेली रक्कम रुपये ६८,०००/- दसादशे १२ टक्के व्याजासह परत मिळावी, नुकसान भरपाईपोटी रुपये ५१,०००/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये ५०,०००/- ची मागणी केली आहे.
३) जाबदार यांना नोटीस मिळाल्यानंतर प्रकरणात हजर होवून लेखी जबाब दाखल करण्यासाठी मुदतीचे अर्ज दिले. सदरचे अर्ज मंजूर करण्यात आले. परंतु, वारंवार संधी देवूनही जाबदार यांनी कायद्यातील नमूद मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्याने सदरचे प्रकरण जाबदार यांच्या लेखी जबाबाशिवाय चालविणेत आले. तसेच, जाबदार यांना संधी देवूनही कायदेशीर मुद्दयाबाबत लेखी युक्तिवाद दाखल केला नाही.
४) तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार, शपथपत्रे, कागदपत्रे, लेखी युक्तिवाद इत्यांदीचे अवलोकन करण्यात आले.
कारणमिमांसा
५) तक्रारदारांनी जाबदार यांना अंदमान-निकोबार यात्रेचे नियोजन करण्यासाठी मोबदला दिल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होत असल्याने तक्रारदार व जाबदार यांच्यात ग्राहक सेवा संबंध निर्माण होवून तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या साक्षी यात्रा कंपनीच्या इर्टनरी नुसार असे दिसून येते की, तक्रारदार यांची यात्रा ही दि.११.११.२०१८ रोजी सुरवात होवून पुढील सात रात्रींकरिता होती. सदरची यात्रा दि.११.११.२०१८ रोजी निगडी येथून सकाळी १०.३० वाजता सुरु होणार होती. तसेच, सदर इर्टनरी मध्ये संपूर्ण प्रवासाविषयी माहिती असून कोणत्या दिवशी काय पहावयाचे आहे हेही नमूद केल्याचे दिसून येते. म्हणजेच, दि.१२.११.२०१८ रोजी एअरपोर्ट पिक-अप, दुपारी Cellular Jail, Corbyns Cove, Sound and light island, Radhnagar beach, elephant beach इत्यादी बाबी नमूद असून पुढील सर्व दिवसांचे नियोजन अशाच स्वरुपाचे असल्याचे दिसते. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे अंदमान-निकोबार यात्रेचे नियोजन केले होते ही बाब स्पष्ट होते. तसेच, तक्रारदारांनी दि.१३.०५.२०१९ रोजीचा एचडीएफसी बँकेचा धनादेश क्र. ००००५२ हा दाखल केला असून त्यानुसार असे स्पष्ट होते की, जाबदार यांनी तक्रारदार क्र.१ यांच्यानावे रक्कम रुपये ६८,०००/- चा धनादेश दिला. यावरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, तक्रारदार यांनी अंदमान-निकोबारच्या यात्रेचे नियोजन करण्याकरिता जाबदार यांना रक्कम रुपये ६८,०००/- दिले होते. परंतु, जाबदार हे सदरच्या यात्रेचे नियोजन ठरल्याप्रमाणे करण्यास असमर्थ ठरले त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदारांना स्विकारलेली रक्कम धनादेशाव्दारे परत करण्याचे निश्चित केले. परंतु, तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत, शपथपत्रात, लेखी युक्तिवादात असे स्पष्ट नमूद केले आहे की, जाबदार यांनी जरी धनादेशाव्दारे सदरची रक्कम परत केली असली तरी सदरचा धनादेश सध्याच बँकेत जमा न करता योग्य वेळी सुचना केल्यावर बँकेत जमा करण्याची विनंती केली होती. परंतु, जाबदार यांनी अनेक महिन्याचा कालावधी निघून गेला तरी धनादेश जमा करण्याविषयी सुचना न केल्याने सदरचा धनादेश मुदतबाहय झाला. वास्तविक, सदरची बाब जाबदार यांना मान्य नसल्यास सदर प्रकरणात हजर होवून सदरची बाब मान्य नसल्याचे सिध्द करणे गरजेचे होते. परंतु, संधी देवूनही जाबदार यांनी तसे केले नाही. जाबदार यांनी तक्रारदारांना अंदमान-निकोबार यात्रेसाठी स्वीकारलेली रक्कम धनादेशाव्दारे परत करण्याची तयारी दर्शवल्याची बाबही सिध्द होते.
६) उपरोक्त सर्व बाबींचा व परिस्थितीचा विचार करता, असे दिसून येते की, तक्रारदार यांनी जाबदार यांना अंदमान-निकोबार यात्रेसाठी रक्कम रुपये ६८,०००/- दिले होते. तक्रारदार यांनी ज्या कारणासाठी जाबदार यांना रक्कम दिली होती. त्या कारणाची पुर्तता न झाल्याने तक्रारदारांना मानसिक त्रास झाल्याचे स्पष्ट होते. तसेच, जाबदार यांनी मोबदला स्विकारुनही त्याची पुर्तता न करणे ही बाब त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे दर्शविते. त्यामुळे तक्रारादार हे दिलेली रक्कम सव्याज परत मिळण्यास व नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र असल्याचे या आयोगाचे मत आहे.
७) सबब, उपरोक्त विवेवचनावरुन आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- प्रस्तुतची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये ६८,०००/- (रुपये अडुसष्ट हजार फक्त) तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजेच दि. २२.०६.२०२० पासून द. सा. द. शे. १० टक्के व्याजासह आदेशाची प्रत मिळालेपासून ४५ दिवसांच्या आत अदा करावी. अन्यथा त्यावर द. सा. द. शे. १२ टक्के व्याज देय होईल.
- जाबदार यांनी एकत्रित नुकसान भरपाईपोटी तक्रारदारांना एकूण रक्कम रुपये २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये ३,०००/- (रुपये तीन हजार फक्त) आदेशाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांच्या आंत द्यावी.
- उभय पक्षकारांना सदर आदेशाच्या सत्यप्रती कार्यालयातर्फे निःशुल्क पुरवण्यात याव्यात.