श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 30 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून मोटोरोला हॅन्डसेट मॉडेल नं. MOTO A810 जाबदेणार क्र.2 यांच्याकडून दिनांक 22/6/2009 रोजी खरेदी केलेल्या मोबाईलमधील ब्लूटुथ कार्यरत नसल्यामुळे दुरुस्तीसाठी नेला असता DOA Certificate दिनांक 26/6/2009 इश्यु करण्यात आले व तक्रारदारांना नवीन हॅन्डसेट दिनांक 3/7/2009 रोजी देण्यात आला. सदरहू हॅन्डसेट दिनांक 15/3/2010 रोजी जॉयस्टीक बंद पडल्यामुळे दुरुस्तीसाठी दिला, दुरुस्तीसाठी 20 ते 25 दिवस लागले. परत दिनांक 9/4/2010 रोजी तीच समस्या उदभवली, दुरुस्तीसाठी एक महिना लागला. दिनांक 28/4/2010 रोजी बॅटरी ची समस्या निर्माण झाली. दिनांक 3/5/2010 रोजी बॅटरी शॉर्ट व टच स्क्रीन समस्या निर्माण झाली. वारंवार समस्या निर्माण झाल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 9/6/2010 रोजी नोटीस पाठवून रक्कम रुपये 7829/- चा परतावा मागितला. परंतू उपयोग झाला नाही. म्हणून सदरील तक्रार दाखल केली. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रक्कम रुपये 7829/- 12 टक्के व्याजासह परत मागतात, सेवेतील त्रुटी पोटी रक्कम रुपये 5000/-, नुकसान भरपाईपोटी रुपये 5000/-, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.2 व 3 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द दिनांक 4/1/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. जाबदेणार क्र.1 यांची पोहोच पावती/पोस्टल सर्टिफिकेट दिनांक 10/12/2010 मंचात दाखल करण्यात आले. जाबदेणार क्र.1 नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द दिनांक 6/4/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. मोटोरोला कंपनीचे Motorola Dead On Arrival Certificate दिनांक 26/6/2009 चे अवलोकन केले असता जाबदेणार कंपनीचा तक्रारदारांनी पहिल्यांदा खरेदी केलेला मोबाईल बंद पडल्याचे दिसून येते. तक्रारदारांना नवीन मोबाईल दिनांक 3/7/2009 रोजी देण्यात आल्यानंतर नवीन मोबाईल पहिल्यांदा दिनांक 15/3/2010 रोजी बंद पडल्याचे दिसून येते. Redington India Limited दिनांक 15/3/2010 जॉब शिट जॉब नं. 154 व दिनांक 09/4/2010 जॉब शिट जॉब नं. 00020 मध्ये “Problem code Main keypad – Joystick, Scroll key not working properly” नमूद केल्याचे निदर्शनास येते. जाबदेणार क्र.3 यांच्या दिनांक 28/4/2010 रोजीच्या जॉब शिट मध्ये जॉब नं. 396, “Batt short life” असे नमूद करण्यात आलेले आहे. Redington India Limited यांनी तक्रारदारांना दिनांक 3/5/2010 रोजीच्या जॉब शिट जॉब नं. 00072 मध्ये “Battery short life, Touch screen not working properly” असे नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी जाबदेणार कंपनीचे वॉरंटी कार्ड दाखल केलेले आहे. सदरहू वॉरंटी कार्ड मध्ये मेकॅनिकल/ऑपरेशनल अॅसेसरिज ज्यात हॅन्डसेट, ब्लूटुथ, वायरलेस अॅसेसरिज यांचा समावेश होता त्यास व बॅटरीला देखील मोबाईल खरेदी दिनांकापासून एक वर्षांची वॉरंटी असल्याचे दिसून येते. तक्रारदारांना बदलून दिलेल्या दुस-या मोबाईलमध्ये देखील वॉरंटी कालावधीतच वरीलप्रमाणे वारंवार समस्या निर्माण झाल्याचे दिसून येते. दुरुस्त्यांचे वारंवार निराकरण करुनही त्या परत उदभवत होत्या, यावरुन जाबदेणार यांनी तक्रारदारांना नवीन दिलेला मोबाईल सदोष असल्याचे दिसून येते. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना मोबाईल खरेदीची रक्कम रुपये 7829/- परत करावी असा आदेश देण्यात येत आहे. तक्रारदार पहिला मोबाईल खरेदी दिनांक 22/6/2009 पासून सतत समस्या निर्माण झाल्यामुळे वापरु शकले नाहीत, त्यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. म्हणून नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 1000/- दयावेत असा मंच आदेश देत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना रक्कम रुपये 7829/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी. तसेच तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 यांना मोटोरोला हॅन्डसेट आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावा.
3. जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या नुकसान भरपाईपोटी व तक्रारीच्या खर्चापोटी तक्रारदारांना रक्कम रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.