ORDER | ( पारित दिनांक :28/10/2014) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये).) प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम-12 अन्वये विरुध्द पक्षाच्या विरुध्द दोषपूर्ण सेवा दिली असे जाहीर करण्याकरिता व नुकसानभरपाई रु.30,000/- मिळण्याकरिता दाखल करण्यात आलेली आहे. - थोडक्यात तक्रारकर्त्याची तक्रार अशी की, त.क.ने स्वतःच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाकरिता वि.प.क्रं. 3 कडून रु.1,20,375/- कर्ज घेऊन वि.प.क्रं.1 कडून कॉक्रीट मशिन विकत घेतली. वि.प.क्रं. 1 ने त्यासंबंधी पावती त.क.ला दिली. त्यावर मोरेश्वर तुळे, कॉक्रीट मिक्सर, विंच मशिन, व्हाब्रेटर चे निर्माता असे छापलेले होते. बिल व पावतीवर सी.एस.टी. व बी.एस.टी. नंबर नव्हता. सदरहू मशिन विकत घेते वेळी वि.प.क्रं.1 ने त्या मशिनची एक वर्षाची वॉरन्टी दिली होती व त.क.ला आश्वासन व वचन दिले की, जर सदरहू मशिन मध्ये एक वर्षात काही दोष आढळल्यास, तुटफुट झाल्यास व कुठल्याही प्रकारची खराबी आल्यास तो सदरहू मशिन मधील दोष, त्रृटी अथवा खराबी विनामुल्य दुरुस्त करुन देईल किंवा बदलवून नविन मशिन देईल. परंतु वि.प.क्रं. 1 ने जाणूनबुजून हेतुपुरस्सर वॉरन्टी कार्ड दिले नाही व आश्वासन दिले की, त्याचे शब्द म्हणजेच वॉरन्टी आहे.
- त.क.ने पुढे असे कथन केले की, त्यानी सदरहू मशिन बॅंक ऑफ बडोदा कडून कर्ज सुविधा घेऊन घेतली होती. त्यामुळे वि.प.क्रं. 3 ने त.क.चे खात्यातील रु.373/- वळती करुन सदरहू मशिनचा वि.प.क्रं. 2 कडून दि. 18.01.2011 ते 17.01.2012 या कालावधीकरिता विमा काढला होता व त्याचा पॉलिसी क्रं. 280501/44/10/52/00000012 असा आहे. त.क. सदरहू मशिन स्वतः चालवित होता. वायफड परिसरात त.क.च्या व्यतिरिक्त कोणाही जवळ कॉंक्रीट मशिन नसल्यामुळे त.क.कडे मुबलक काम उपलब्ध होते. परंतु दि. 8.4.2011 रोजी अचानक सदरहू मशिन काम करणे थांबविले व त्यात बिघाड झाला. त्यामुळे त.क.ने ताबडतोब वि.प.क्रं. 1 ला फोनवरुन कळविले व वि.प.क्रं.1 च्या सांगण्याप्रमाणे सदरहू मशिन रु.2000/- खर्च करुन नागपूर येथे पाठविली. वि.प.क्रं. 1 ने सदरहू मशिनची पाहणीकरुन तक्रारकर्त्यास सांगितले की, सदरहू मशिन दुरुस्तीकरिता अहमदाबाद येथे पाठवावी लागेल व वि.प.क्रं. 1 च्या सूचनेप्रमाणे दि. 09.04.2011 रोजी सावनी ट्रान्सपोर्ट प्रा.लि. मार्फत सदरहू मशिन अहमदाबाद येथे पाठविली व त्याकरिता रु.1200/- परिवहनाचा खर्च लागला.
- त.क. ने पुढे असे कथन केले की, दि. 24.04.2011 रोजी वि.प.क्रं. 1 ने तक्रारकर्त्यास फोनद्वारे कळविले की, मशिन दुरुस्त झालेली आहे व ती घेऊन जा. त्याप्रमाणे त.क. नागपूर येथे गेला त्यावेळेस वि.प.क्रं. 1 ने मशिनच्या दुरस्तीपोटी 8,800/-रुपयाचे बिल दिले. त.क. ने वि.प.क्रं. 1 ला वॉरन्टी विषयी म्हटले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला व जो पर्यंत 8800/-रुपये त.क. जमा करीत नाही, तोपर्यंत त्याला मशिन देणार नाही असे सांगितले. त.क.चे काम रेंगाळलेले असल्यामुळे त्याला नाईलाजास्तव वि.प.क्रं.1 ला 8800/-रुपये द्यावे लागले व 2000/-रुपये खर्च करुन मशिन वायफड येथे आणली. त्यानंतर त.क.ने वि.प.क्रं. 3 ला तोंडी कळविले की, त्यानी त.क.ला पॉलिसी काढून दिली असल्यामुळे विमा रक्कम मिळवून द्यावी. वि.प.क्रं. 3 ने सुध्दा आश्वासन दिले की, वि.प.क्रं. 2 कडून विम्याची रक्कम प्राप्त करुन देईल. सदरहू मशिनचा विमा अस्तित्वात असतांना मशिन खराब झाली होती. त्यामुळे त.क.ने वि.प.क्रं. 2 कडे जाऊन मशिन दुरुस्तीकरिता आलेल्या खर्चाची मागणी केली. परंतु वि.प.क्रं. 2 ने ती देण्यास स्पष्टपणे नकार दिला.
- त.क.ने पुढे असे कथन केले की, वि.प.क्रं. 1 ने एक वर्षाची वॉरन्टी देऊन सुध्दा जाणूनबुजून हेतुपुरस्सर 8800/-रुपयाचे बिल भूगतान करण्यास त.क.ला भाग पाडले. वि.प.क्रं. 3 ने सदर मशिनचा विमा काढून दिला होता, त्याला झालेल्या नुकसानभरपाईबाबत कळवून सुध्दा काही कारवाही केली नाही व वि.प. 2 ने विमा आश्वासित असतांना सुध्दा त.क.ला मशिनच्या खर्चापोटी लागलेला खर्च दिला नाही. त.क. हे वि.प.क्रं. 1 ते 3 चे ग्राहक असून वि.प.ने सेवा देण्यास कसूर केला व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. त.क.ला एकूण 30,000/-रुपये त्यासाठी खर्च आलेला आहे. त्यामुळे त.क.ने वकिलामार्फत वि.प. क्रं. 1 व 2 यांना नोटीस पाठवून सदर रक्कमेची मागणी केली. वि.प.क्रं. 1 व 2 यांना नोटीस प्राप्त होऊन सुध्दा पूर्तता केली नाही. म्हणून त.क. ने प्रस्तुत तक्रार दाखल करुन वि.प.ने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिली असे ठरविण्यात येऊन, 30,000/-रुपये वि.प.क्रं. 1 ते 3 कडून मिळण्यासाठी विनंती केली आहे.
- वि.प.क्रं. 1 यांना नोटीस मिळून सुध्दा ते हजर झाले नाही. म्हणून त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- वि.प.क्रं. 2 नॅशनल इन्श्युरन्स कंपनी यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 12 वर दाखल केला व कबूल केले की, बॅंक ऑफ बडोदा यांनी प्रिमियम स्विकार करुन त.क. जवळ असलेली मशिनबाबत दि. 18.01.2011 ते 17.01.2012 या कालावधीकरिता पॉलिसी देण्यात आली होती. परंतु इतर सर्व आक्षेप अमान्य केलेले आहे. वि.प.क्रं. 2 ने असे कथन केले की, विमा काढलेल्या मशिनचा विमा कालावधीत कोणत्याही प्रकारे बिघाड व नुकसान झाले तर मशिनच्या मालकाने दुर्घटना घडल्यापासून 14 दिवसाच्या आत लेखी, टेलिफोनद्वारे किंवा तोंडी विमा कंपनीला सूचित करणे बंधनकारक आहे. परंतु विमाकृत मशिन मध्ये दि. 08.04.2011 ला अचानक बिघाड झाला व त.क.ने ती मशिन दुरुस्तीकरिता वि.प.क्रं. 1 कडे दि. 09.04.2011 रोजी पाठविली. परंतु त.क.ने दि. 12.05.2011 रोजी नोटीसद्वारे पहिल्यादांच वि.प.क्रं. 2ला मशिन मधील बिघाडाबाबत सूचना दिली, त्यामुळे त.क. ने विमा पॉलिसीमधील नियम व अटी ठरवून दिलेल्या उत्तरदायित्वाचे ठरलेल्या अवधीमध्ये निर्वाहन केले नाही. त्यामुळे त.क.ला कोणत्याही प्रकारची मागणी वि.प.क्रं. 2 कडे करण्याचा अधिकार नाही. विमा पॉलिसीमध्ये स्पष्ट नमूद आहे की, विमाकृत मशिनचा बिघाड किंवा अपघात झाला त्यासंबंधी जर त.क.ने विमा कंपनीकडे तोंडी किंवा लेखी सूचविले तरी विमा कंपनी ताबडतोब त्याच्या अधिकृत अधिका-याची नेमणूक करुन संबंधित मशिनचे निरीक्षण करण्याकरिता पाठविणार व त्यासंबंधी मशिनचे निरीक्षण करुन तो अधिकृत अधिकारी शाखा अधिकारीला अहवाल द्वारे सूचित करणार की, विमा पॉलिसीच्या नियम व अटीनुसार किती नुकसान देणे योग्य होईल. अधिकृत अधिकारी यांचा अहवाल मिळाल्यानंतर शाखा अधिकारी पुढील कार्यवाही नियमानुसार करु शकतात. परंतु वादीत मशिन मध्ये दि.08.04.2011 रोजी बिघाड झाला व त्यासंबंधी मशिनचे दुरुस्तीचे काम दि. 24.04.2011 रोजी झाले . परंतु हया बाबत त.क.ने वि.प. ला किंवा बॅंकेला सूचित केले नाही. त्याप्रमाणे वि.प.क्रं. 2 ने त.क.च्या नोटीसला उत्तर दिले आहे. त.क.ने पॉलिसीमधील अटी, शर्ती व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त.क.ची मागणी वि.प. कंपनी देण्यास कोणत्याही नियमात बसत नाही. त्यामुळे शाखा अधिका-यांनी त.क.ची मागणी अमान्य केली. वि.प.क्रं. 1 ने नुकसान भरपाई दिली नाही म्हणून कोणतेही कारण नसतांना वि.प.क्रं. 2 विरुध्द खोटी तक्रार फक्त त्रास देण्याकरिता व दबाव टाकून पैसे मिळविण्याकरिता केलेली आहे. त्यामुळे त.क. ची तक्रार खारीज करण्याची विनंती वि.प.क्रं. 2 ने केलेली आहे.
- वि.प.क्रं.3 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं.22 वर दाखल केलेला आहे व मान्य केले की, वि.प.क्रं. 3 कडून कर्ज घेऊन त.क.ने वादीत मशिन खरेदी केली व वि.प. क्रं. 3 ने सदरील मशिनचा वि.प.क्रं. 2 कडून विमा उतरविला आहे. इतर सर्व आक्षेप अमान्य केले आहे. वि.प. 3 यांनी पुढे असे कथन केले की, त.क.ला वादीत मशिन खरेदी करण्याकरिता कर्ज दिले आहे. कॉक्रीट मशिन काम करीत नसल्याबाबत कोणत्याही प्रकारची लेखी किंवा तोंडी सूचना त.क.ने बॅंकेला दिलेली नाही. तशी सूचना दिली असती तर वि.प. 3 यांनी वि.प. 2 शी बोलणी करुन त.क.ला सुविधा मिळवून दिली असती. त्यामुळे जर काही नुकसान झाले असेल तर त्याकरिता त.क. स्वतः जबाबदार आहे. वि.प. 3 यांनी सेवेत कोणत्याही प्रकारे कसूर केला नाही. त्यामुळे खर्चासह त्याच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- त.क.ने स्वतःच्या कथनाच्या पृष्ठयर्थ कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा दाखल केला नाही. अर्जासोबत त्यांनी फक्त मशिन खरेदी केल्याची दि. 25.07.2010 रोजीची पावतीची झेरॉक्स प्रत व विमा पॉलिसीची झेरॉक्स प्रत व इतर कागदपत्रे निशाणी 3 सोबत दाखल केलेली आहे. तसेच कोटेशनची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. वि.प.क्रं. 2 ने कोणताही तोंडी पुरावा दाखल केलेला नाही. काही वर्णनयादी नि.क्रं. 14 प्रमाणे दस्ताऐवज दाखल केले आहे. तसेच वि.प.क्रं. 3 यांनी कुठलाही लेखी किंवा तोंडी पुरावा दाखल केलेला नाही.
- त.क. यांनी लेखी अथवा तोंडी युक्तिवाद ही केलेला नाही व युक्तिवादाच्या वेळी गैरहजर होते. वि.प. क्रं. 2 च्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
- वरील प्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्ष क्रं 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याची कॉंक्रीट मशिन दुरुस्तीची नुकसानभरपाई नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय ? | नाही | 2 | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही | 3 | अंतिम आदेश काय ? | आदेशानुसार |
-: कारणे व निष्कर्ष :- मुद्दा क्रं.1, 2 व 3 बाबत ः- त.क.नी वि.प.क्रं. 3 कडून कर्ज घेऊन वि.प.क्रं.1 कडून वादग्रस्त कॉंक्रीट मशिन विकत घेतली हे वादीत नाही. तसेच वि.प.क्रं. 3 ने त.क.ने विकत घेतलेल्या मशिनचा वि.प.क्रं. 2 कडे विमा उतरविला हे सुध्दा उभयतांना मान्य आहे. सदरील विमा दि. 18.01.2011 ते 17.01.2012 या कालावधीकरिता काढला होता हे सुध्दा उभयतांना मान्य आहे. त.क.ने असे कथन केले आहे की, सदरील मशिन विकत घेतांना वि.प.क्रं. 1 ने सदर मशिनची एक वर्षाची वॉरन्टी दिली होती व एक वर्षाच्या कालावधीत मशिनमध्ये काही दोष आढळल्यास, तुटफुट झाल्यास व कुठल्याही प्रकारचा बिघाड झाल्यास तो सदरहू मशिन मधील दोष, त्रृटी अथवा खराबी विनामुल्य दुरुस्त करुन देईल किंवा बदलवून नविन मशिन देईल असे आश्वासन दिले होते. परंतु त्यासंबंधी वॉरन्टी कार्ड देण्यात आले नाही. तसेच पॉलिसी कालावधीत जर मशिन मध्ये बिघाड किंवा खराबी झाल्यास ती नुकसानभरपाई वि.प.क्रं. 2 करुन देण्यास जबाबदार होते. सदर मशिनमध्ये दि. 08.04.2011 रोजी बिघाड झाला व सदरहू मशिनचे काम करणे थांबले व त.क.ने वि.प.क्रं.1 च्या आश्वासनाप्रमाणे सदर मशिन दुरुस्तीकरिता नागपूर येथे पाठविली व तसेच वि.प. 1 च्या सांगण्याप्रमाणे सदर मशिन अहमदाबाद येथे दुरुस्तीकरिता पाठविली. मशिन दुरुस्त होऊन आल्यानंतर वि.प.क्रं. 1 ने 8800/-रुपयाचे बिलाची मागणी केली. वॉरन्टी विषयी विचारले असता वि.प.क्रं. 1 ने स्पष्ट नकार दिला. त.क. ने वि.प.क्रं. 1 ला जेव्हा वॉरन्टी कार्ड मागितले असता त्यांनी दिले नाही व तोंडी आश्वासन दिले. या ठिकाणी असे नमूद करावयास वाटते की, त.क.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठार्थ कोणताही तोंडी पुरावा किंवा स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त.क. ने फक्त मशिन खरेदीची पावतीची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. पावतीच्या झेरॉक्स प्रतीचे अवलोकन केले असता कुठेही असे नमूद केले नाही की, वि.प.1 ने सदरहू मशिनची वॉरन्टी एक वर्षाची दिलेली आहे. जर मशिनची वॉरन्टी एक वर्षाची दिली असती तर निश्चितच तसे पावतीमध्ये नमूद केले असते किंवा वॉरन्टी कार्ड त.क.ला दिले असते. त.क.ने जेव्हा 1,20,357/-रुपयाची कॉंक्रीट मशिन वि.प.क्रं. 1 कडून वि.प.क्रं. 3 कडून कर्ज घेऊन विकत घेतली व वि.प. 1 ने त्याला एक वर्षाची वॉरन्टी दिली तर त.क.ची जबाबदारी होती की, त्याने लेखी वॉरन्टी वि.प. 1 कडून घ्यावयास पाहिजे होती. त्यामुळे सदर मशिनची वॉरन्टी एक वर्षाची होती असे दाखविण्याकरिता कुठलाही पुरावा त.क.ने मंचासमोर दाखल केलेला नाही. जरी वि.प.क्रं. 1 ने या प्रकरणात हजर झाले नाही किंवा लेखी जबाब दाखल केलेला नाही तरी देखील त.क. वर जबाबदारी येते की, वि.प.क्रं. 1 ने त्याला सदर मशिनची वॉरन्टी एक वर्षाकरिता दिली होती. परंतु मंचासमोर कुठलाही पुरावा नसल्यामुळे असे म्हणता येणार नाही की, वि.प.क्र.1 ने एक वर्षाची वॉरन्टी त.क.ला दिली होती व एक वर्षाच्या आत सदर मशिनमध्ये बिघाड झाल्यास विनामुल्य दुरुस्तीकरुन देण्याचे त्याने कबूल केले होते. त.क.ने दाखल केलेले दि. 25.04.2011 च्या पावतीवरुन असे सिध्द होते की, सदरील मशिन दुरुस्तीकरिता 22,200/-रुपये खर्च आला. त्यात वाहनाचा खर्च सुध्दा 1600/-रुपये समाविष्ट केलेला आहे. त्यातून 13400/-रुपये कॉस्टींग सिरप कमी करुन 8800/-रुपयाचे बिल त.क.ला देण्यात आलेले आहे. त.क.ने ती रक्कम वि.प. 1 कडे जमा केलेली आहे. परंतु वॉरन्टी संबंधी कुठलाही पुरावा मंचासमोर आलेला नसल्यामुळे वि.प.क्रं. 1 कडून त.क. सदरील रक्कम मिळण्यास हक्कदार नाही या निष्कर्षाप्रत मंच येत आहे. - वि.प.क्रं. 2 व 3 संबंधी विचार करावयाचा झाल्यास वि.प. 3 यांनी त.क.ला मशिन खरेदीकरिता कर्ज दिले होते व वि.प. 3 मार्फत वि.प. 2 कडून सदर मशिनचा विमा उतरविला होता. वि.प. 2 ने मुळ पॉलिसीचे दस्ताऐवज नि.क्रं. 14 सोबत दाखल केलेले आहे. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, जरी अशा मशिनचे नुकसान झाले असले तरी विमाधारकाने टेलीफोन किंवा तार द्वारे तात्काळ विमा कंपनीला सूचना द्यावी. सदरील सूचना ही 14 दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहे. त्यावर विमा कंपनीचे अधिकारी सदरील मशिनची तपासणी करुन अहवाल संबंधित शाखा अधिका-याकडे दाखल करील व नुकसानभरपाई किंवा नुकसान झालेले असेल ती विमा कंपनी देण्यास बांधिल राहील. परंतु प्रस्तुत प्रकरणात वादातीत मशिनमध्ये बिघाड झाल्याचे व सदरील मशिन वि.प.क्रं. 1 कडून दुरुस्तीकरुन घेण्यापूर्वी त.क.ने वि.प.क्रं. 2 कंपनी किंवा वि.प. 3 बँकेला कळविल्याचे आढळून येत नाही. त.क.च्या पूर्ण तक्रारीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, त.क.ने फक्त वि.प.क्रं. 1 ने वॉरन्टी दिल्यामुळे त्याच्याकडे मशिन दुरुस्तीकरिता पाठविली व मशिन दुरुस्तीकरुन दिली तेवहा वि.प.क्रं. 1 ने वॉरन्टीप्रमाणे नुकसानभरपाई देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी वि.प.क्रं. 2 ला नोटीस पाठवून वादातीत मशिनची दुरुस्तीकरिता लागलेल्या खर्चाची मागणी केली. त.क.च्या म्हणण्याप्रमाणे सदर मशिन मध्ये बिघाड हा दि. 08.04.2011 ला झाला व दि. 09.04.2011 ला ती मशीन वि.प.क्रं.1 कडे पाठविली व वि.प. क्रं. 1 कडून अहमदाबादकरिता दुरुस्तीकरिता पाठविली व दि. 24.04.2011 ला मशिन दुरुस्त करुन मिळाली. तो पर्यंत त.क.ने वि.प. 2 कंपनी किंवा वि.प. 3 बँकेला वादातीत मशिनच्या बिघाड संबंधी कळविले नाही. त्यामुळे वि.प.क्रं. 2 च्या अधिका-याला सदरील मशिनची तपासणी करता आली नाही व कोणत्या भागाचे किंवा कोणत्या पार्टमध्ये बिघाड झाला यासंबंधीचा अहवाल तयार करता आला नाही. पॉलिसीच्या शर्तीप्रमाणे 14 दिवसात त.क.ने तशी माहिती विमा कंपनीला द्यावयास पाहिजे होती परंतु तशी माहिती त्यांनी दिली नाही. वि.प.क्रं. 1 ने जेव्हा वॉरन्टी कालावधीत मशिन दुरुस्ती करुन देण्याचे नाकारले तेव्हा विमा कंपनीकडे विमा दावा संबंधी नोटीस पाठविली. विमा दावा देखील दाखल केला नाही. सर्व गोष्टी वि.प. 2 विमा कंपनीला अंधारात ठेवून करण्यात आल्या, त्यामुळे विमा कंपनी त.क.चा विमा दावा नाकारला व त.क.च्या नोटीसला दि. 06.06.2011 ला उत्तर देऊन तसे कळविले. त्यामुळे मंच या निष्कर्षा प्रत येते की, वि.प.क्रं. 2 ने कोणत्याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नाही व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे म्हणता येत नाही.
- वरील विविचनावरुन मंच या निष्कर्षा प्रत येते की, त.क. त्याच्या तक्रारीप्रमाणे क्लेम सिध्द करु शकला नाही. वि.प. क्रं. 1 ते 3 यांनी दोषपूर्ण सेवा दिली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे सिध्द केले नाही. म्हणून सर्व मुद्दयाचे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते. आदेश 1 तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे. 2 उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्वतः करावे. 3 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 4 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |