Maharashtra

Bhandara

CC/16/120

Vijay Mango Hatwar - Complainant(s)

Versus

Monsanto Holding Pvt Ltd through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv J.J.Bisen

19 Dec 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/16/120
( Date of Filing : 03 Oct 2016 )
 
1. Vijay Mango Hatwar
R/o Sahuli POst Pipari (Jawaharnagar)
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Monsanto Holding Pvt Ltd through Divisional Manager
Regd Office Ahura Centre, B wing, 5 th floor,96 Mahakali Caves Road,Andheri (East)
Mumbai 4000093
Maharashtra
2. M/s.Jay Bharat Krushi kendra through Prop.Pravin Vitthal Wanjari
R/o Ganeshpur
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv J.J.Bisen, Advocate
For the Opp. Party: Adv.Kothari, Advocate
Dated : 19 Dec 2018
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा मा.सदस्‍या श्रीमती वृषाली गौ.जागीरदार)

(पारीत दिनांक 19 डिसेंबर, 2018)

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-    

      तक्रारकर्ता उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून त्‍याचे मालकीची मौजा साहुली, येथे भूमापन क्रं- 153/1 आराजी 1.08 हे आर व गट क्रमांक 280 आराजी 0.98 अशी एकूण आराजी हे. आर. ही शेत जमीन आहे, तो सदर शेतजमीनीमध्‍ये नियमितपणे उत्‍पादन घेत होता.  विरुध्‍दपक्ष क्रं-1) मॉन्‍सान्‍टो होल्‍डींग प्रा.लि. ही फळभाजीचे बियाणे उत्‍पादन करणारी कंपनी असून अधिकृत विक्रेत्‍यामार्फत विक्री करण्‍याचा व्‍यवसाय करते. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी उत्‍पादीत केलेल्‍या फुलकोभीचे बी-बियाणे सेमीनीस हंसा या नावाने उत्‍पादीत करुन शेतक-यांना विक्रीस तयार केले. सदर कंपनीने जिल्‍हा व तालुका स्‍तरावर आपले अधिकृत कृषी केंद्राची नियुक्‍ती केली आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हे सदर कंपनीचे अधिकृत विक्रेता आहे.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने उत्‍पादीत केलेले फुलकोभीचे बी-बियाणे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांचेकडून दिनांक 04/12/2015 रोजी 20 पॅकीट प्रती 10 ग्रॅम वजनाचे रुपये 8,000/- किंमतीमध्‍ये खरेदी केले होते. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्‍याला बियाणे खरेदीच्‍या वेळी सदर कंपनीचे हंसा नावाचे बी-बियाणे भंडारा जिल्‍ह्यातील तापमानाकरीता योग्‍य प्रतीचे आहे असे सांगितले होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी सांगितल्‍याप्रमाणे सदर बियाणंची 45 X 45 से.मी. अंतरावर लागवड केली. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांचे अधिकृत प्रतिनिधी  श्री. दिपक डोहळे यांच्‍या सांगण्‍यावरुन तक्रारकर्त्‍याने दिनांक 02/03/2016, 09/03/2016 व दिनांक 14/03/2016  कोराजन व दिनांक 10/03/2016 व 14/03/2016 रोजी बोरान 0/52/34 हे किटकनाशके विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांचेकडून खरेदी केले होते. उपरोक्‍त कर्मचा-याच्‍या सांगण्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने किटकनाशकाची फवारणी सांगितलेल्‍या प्रमाणांत केली होती, तक्रारकर्त्‍याने लावलेल्‍या फुलकोभीच्‍या बियांचे वाढ झाली त्‍यामध्‍ये कोभीचे फुल तयार झाले परंतु तयार झालेले कोभीचे पीक हे निकृष्‍ट दर्जाचे व खाण्‍याकरीता अयोग्‍य व चवीला कडवट निघाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबत माहिती विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांना दिनांक 20 ते 25 मार्च ला दिली.  तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी त्‍यांचे अधिकृत प्रतिनिधी श्री. दिपक डोहळे यांनी मौका चौकशी करुन त्‍याबाबतची माहिती व सुचनेनुसार किटकनाशकाची फवारणी प्रती 4-4 दिवसानंतर करण्‍याचे सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने किटकनाशकाची फवारणी केली. परंतु सदोष बियाणांनमुळे फुलकोभीचे पीक निकृष्‍ट दर्जाचे निघाले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांना त्‍याबाबत माहिती दिली व उपविभागीय कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक 01/04/2016 रोजी तक्रार केली. सदर तक्रारीच्‍या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांनी दिनांक 22/04/2016 रोजी मोक्‍यावर पाहणी केली व त्‍यांनी आपल्‍या अहवालात फुलकोभीची पिवळसर, गुलाबी व मळकट रंग, कडवट चव व उग्र वास हा Browning  या Physiological disorder मुळे झाल्‍याचे निर्दशनाय आले असे नमुद केले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कंपनीने तयार केलेले हंसा बियाणे उच्‍च तापमानात व तापमान चढउतारमध्‍ये तग धरु न शकणारी असल्‍याचे आढळून आले त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे 100 टक्‍के आर्थिक नुकसान झाले आहे असा अहवाल दिला.

तक्रारकर्ता पुढे असे नमुद करतो की, तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या आर्थिक नुकसानीबाबत त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांना दिनांक 01/06/2016 रोजी पत्र पाठविले. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्त्‍याच्‍या पत्राला दिनांक 21/06/2016 रोजी उत्‍तर पाठविले ते खोटे व बनावटी असून खोटया माहितीच्‍या आधारे दिलेले आहे असे नमूद केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी उत्‍पादीत केलेले बियाणे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍यावर विश्‍वास ठेवून खरेदी केले. त्‍यामुळे बियाणाची लागवड तसेच उत्‍पादन होईपर्यंत बियाणे कंपनी किंवा त्‍यांच्‍या अधिकृत विक्रेत्‍याने ग्राहकांना सेवा व सवलती पुरविणे हे कायदेशीररित्‍या गरजेचे आहे, परंतु विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी सेवा पुरविली नसल्‍याने  तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिली आहे.  तक्रारकर्ता हा दरवर्षी फुलकोभीचे पीक नियमितपणे घेत असतो व त्‍याला एकरी 3 ते 4 लाख रुपयाचे उत्‍पादन होत असते. तक्रारकर्त्‍याला सदर फुलकोभीच्‍या पीकाचे उत्‍पादन घेत असताना बी लागवड, त्‍यांचे संगोपन, पिकाची तोडणी, जमीनीची मशागत, फवारणी इत्‍यादी कामाकरीता जवळपास 90 दिवस लागतात व त्‍याकरीता बियाणे खरेदी, रासायनिक खत व किटकनाशक खरेदीकरीता रुपये 40,000/- इतका खर्च आला.  तक्रारकर्त्‍याने रुपये 40,000/- खर्च करुन सुध्‍दा पीक हे निकृष्‍ट दर्जाचे निघाल्‍यामुळे त्‍याचे जवळपास 3 ते 4 लाखाचे पीक नुकसान झालेले असून विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 हे सदर नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार आहेत.

      तक्राकर्त्‍याला नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून त्‍याने आपले वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिनांक 16/08/2016 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांना पाठविली. सदर नोटीस ला उत्‍तर विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी दिलेले नाही व नुकसान भरपाई दिलेली नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी केलेल्‍या सेवेतील त्रृटीमुळे आर्थिक, मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला म्‍हणून त्‍याने नुकसान भरपाई रुपये 4,20,000/- आणि झालेल्‍या आर्थिक, मानसिक व शारीरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- अशी एकूण मिळून रुपये 5,45,000/- विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांचेकडून मिळण्‍याकरीता सदर तक्रार दाखल केली आहे.

03.    विरुध्‍दपक्ष क्रं-1) बियाणे उत्‍पादीत कंपनी तर्फे मंचासमक्ष दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीला सक्‍त विरोध केला आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी असा आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ही नुकसान भरपाईचे संबंधित असल्‍याने परिस्थितीचे योग्‍य मुल्‍यांकन होणे गरजेचे आहे. सदर प्रकरण हे विद्यमान न्‍यायमंचाचे अधिकार कक्षेबाहेरील बाब आहे व नुकसान भरपाई संबंधित वाद मिटविण्‍याचा अधिकार हा केवळ दिवाणी न्‍यायालयालाच आहे, म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी तसेच तक्रारकर्ता हा ग्राहक या सज्ञेत मोडत नाही, म्‍हणून सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी असे नमूद केले आहे. 

विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी पुढे असा आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे मालकीचे मौजा साहुली येथील गट क्रं. 153/1 या शेतात 80 आर. क्षेत्रफळात फुलकोभीच्‍या बियाणांची पेरणी केली असे नमुद केले आहे.  मु. साहुली येथील गट क्रं. 153/1 ही मिळकत तेजराम मांगो हटवार यांच्‍या मालकीची असुन अर्जासोबत संलग्‍नीत केलेले बियाणे खरेदी बील विजय मांगो हटवार यांच्‍या नावाने आहे. तक्रारकर्त्‍याने सदर शेती त्‍याचे नावाने ताब्‍यात असल्‍याबाबत कोणताही कायदेशीर दस्‍त अभिलेखावर दाखल केला नाही. त्‍यामुळे सदर तक्रार कायदेशीर नसल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी असा आक्षेप घेतला आहे.  

तक्रारकर्त्‍याने दिनांक 04/12/2015 रोजी फुलकोभी या फळभाजीचे बियाणे 20 पॅकीट प्रती 10 ग्रॅम वजनाचे रुपये 8,000/- किंमतीमध्‍ये खरेदी केले होते ही बाब मान्‍य केली आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक 01/06/2016 रोजी पाठविलेल्‍या नोटीसला कंपनीने उत्‍तर दिले ही बाब मान्‍य केली असून, सदर उत्‍तर खोटे असल्‍याबाबतची तक्रारकर्त्‍याचे विधान अमान्‍य केले आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील इतर परिच्‍छेद निहाय कथन व मागणी पुर्णपणे नाकबुल केली आहे.  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 त्‍याचे विशेष कथनात पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याची तक्रार ही उगवण शक्‍तीबाबत नसून गोबी फुलाच्‍या उत्‍पादनाबाबत आहे. त्‍यामुळे शासकीय निर्देशानुसार फिल्‍ड टेस्‍टची कारवाई करणे आवश्‍यक असून पाहणी अहवलात निष्‍कर्ष काढते वेळेस फिल्‍ड टेस्‍टबाबत कोणतीही कारवाई केल्‍याचे दिसून येत नाही.  त्‍याशिवाय तक्रारकर्त्‍याने घेतलेल्‍या लॉट चे बियाणे विकत घेऊन उत्‍पन्‍न घेणा-या इतर शेतक-यांचे शेताची पाहीणी केल्‍याचे दिसून येत नाही. त्‍यामुळे पाहीणी अहवालातील निष्‍कर्षास वैधानिक महत्‍व प्राप्‍त होवू शकत नाही.  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चे म्‍हणणेनुसार फुलगोबीचे पिक निकृष्‍ट दर्जाचे झाले याकरीता बियाणांची गुणवत्‍ता जबाबदार नसून त्‍यासाठी नैसर्गिक परिस्थिती हवामान, तापमान, पिकाचे व्‍यवस्‍थापन, लागवड त्‍याचप्रमाणे योग्‍य वेळी, योग्‍य प्रमाणांत, योग्‍य गुणवत्‍तेच्‍या खतांचा तसेच किटकनाशकांचा वापर जमीनीचा पोत, पिकाचे वय, लागवडीचा कालावधी रोपांच्‍या ओळीतील अंतर या सर्व बाबी महत्‍वाच्‍या असल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या पीकाचे व्‍यवस्‍थापन योग्‍यप्रकारे वरील बाबींचा विचार करुन न केल्‍यामुळे फुलगोबीचे पिक निकृष्‍ट दर्जाचे झाले, म्‍हणून त्‍यात बियाणांचा दोष असल्‍याचा निष्‍कर्ष काढता येणार नाही. तसेच त्‍यासाठी योग्‍य प्रयोग शाळेत शास्‍त्रशुध्‍द तपासणी, चाचणी या बाबी सुध्‍दा शास्‍त्रशुध्‍द निष्‍कर्षाकरीता अनिवार्य आहे. मात्र सदर प्रकरणांत ज्‍या वाणाचे बियाणे हे दोषपूर्ण आहेत असे नमूद केले आहेत त्‍या वाणाचे त्‍या लॉटमधील बियाणांचे सॅम्‍पल हे प्रयोग शाळेकडे पाठविण्‍यात आलेले नाही व तक्रारकर्त्‍याने अशाप्रकारच्‍या प्रयोग शाळेचा कुठलाही कागदोपत्री अहवाल सादर केलेला नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी उत्‍पादीत केलेले बियाणे केवळ तर्क वितर्कच्‍या आधारे दोषपूर्ण सिध्‍द होते असे म्‍हणता येणार नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या पंचानामा हा कायदेशीर बाबींची पुर्तता तसेच शासनाचे मार्गदर्शक निर्देशकाचे पालन केलेला नसून मौका पाहणीचे वेळी या सर्व बाबी विचारात घेतलेल्‍या नाही तसेच वियाणांचे गुणधर्म, वय,तापमान व कालावधी याही बाबी विचारात घेतलेल्‍या नाहीत. तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार सर्वप्रथम कृषी विभागाकडे दिनांक 01/04/2016 रोजी म्‍हणजे तब्‍बल 100 दिवसांचे वर झाल्‍यानंतर केलेली आहे. जेव्‍हा की, रोप लागवडीनंतर पिक हे 80 ते 90 दिवसात संपूर्ण कापणीकरीता तयार होते. या सर्व योग्‍य वेळी फुलगोबीच्‍या पिकाची कापणीकरुन तक्रारकर्त्‍याने अपेक्षीत उत्‍पन्‍न घेतले व सदर कालावधी संपल्‍यानंतर संपूर्ण पिकाचे वय झाल्‍यानंतर संबंधीत बियाणेबाबत तक्रार केली. त्‍यामुळे कथित पाहणीचे दिवशी संपूर्ण पिकाचे वय झालेले असतांना व पिक पाहणीकरीता योग्‍य वेळ नसतांनाही कथित पाहणी करण्‍यात आली.  सदर पाहणीमध्‍ये वस्‍तुस्थितीदर्शक निष्‍कर्ष अपेक्षीत नाही.  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कंपनीने उत्‍पादीत केलेले व विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी विक्री केलेले सदरचे बियाणे हे उत्‍तम प्रतिचे व गुणवत्‍तेचे आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कंपनी बियाणे बाजारात विक्रीकरीता आणण्‍यापूर्वी योग्‍य ती काळजी घेते तसेच बियाणांचे परिक्षण आपल्‍या अद्यावत प्रयोग शाळेत तज्ञांमार्फत केल्‍यानंतरच बियाणे विक्रीकरीता बाजारात आणण्‍यात येते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी उत्‍पादीत केलेल्‍या बियाणात कुठलाही दोष नाही. तक्रारकर्त्‍याला कुठल्‍याही प्रकारचे कथीत नुकसान झाले असेल तर ते त्‍याने केलेल्‍या अयोग्‍य पिक व्‍यवस्‍थापन, अयोग्‍य पेरणीची पध्‍दत, खातांची मात्रा, हवामान, तापमान, पेरणीची पध्‍दत याशिवाय अनेक नैसर्गिक बाबींचा परिणाम यामुळे झाले असेल  त्‍याकरीता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 जबाबदार नाही. तक्रारकर्त्‍याला फुलगोबी या बियाणाचे वापराने कोणतेही नुकसान झालेले नाही व त्‍याला योग्‍य प्रमाणात फुलगोबीचे पिक मिळाले आहे. तक्रारकर्त्‍याने विद्यमान न्‍यायमंचापासून वस्‍तुस्थिती लपवून अतिशोयक्‍तीपूर्ण, काल्‍पनिक व खोटया आधारावर तक्रार दाखल क्‍रुन नुकसान भरपाईची रक्‍कम मागीतलेली आहे. तक्रारकर्त्‍याला झालेले कथीत नुकसान विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कंपनीने उत्‍पादीत केलेल्‍या बियाण्‍यामुळे झालेले आहे ही बाब तक्रारकर्ता स्‍पष्‍टपणे पुराव्‍यानिशी सिध्‍द करु शकला नाही. त्‍याचप्रमाणे बियाणांतील दोष सिध्‍द करण्‍यासाठी तपशिलवार साक्ष पुराव्‍याची आवश्‍यक असल्‍याने सदर न्‍यायमंचाच्‍या कक्षेबाहेर असल्‍यानेप्रकरण खारीज करण्‍यावे तसेच तक्रारकर्त्‍याने खोटी तक्रार दाखल केल्‍यामुळे कंपनीची बदनामी झाल्‍यामुळे सदर तक्रार नुकसान भरपाईसह खारीज करण्‍याची विनंती केली आहे.   

04.    विरुध्‍दपक्ष क्रं-2) यांना मंचाद्वारे रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस मिळाल्‍यानंतर मंचासमक्ष हजर झाले, परंतु त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल केले नसल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द सदर तक्रार विना लेखी जबाब चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यांत आला.

05.   तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं-14 नुसार एकूण-17 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत. पृष्‍ट क्रं- 67 ते 69 वर त्‍याने शपथपत्र दाखल केले असून, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी पुराव्‍याचे शपथपत्र पृष्‍ट क्रं- 70 ते 78 वर दाखल केले.  तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलांनी लेखी युक्तिवाद पृष्‍ट क्रं- 194 ते 197 वर दाखल केला आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी त्‍याचे लेखी युक्तिवाद पृष्‍ट क्रं- 80 ते 88 वर दाखल केला आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने त्‍याचे कथनाचे पुष्‍टयर्थ एकूण 49 न्‍यायनिवाडयांच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत. 

06.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, शपथपत्र, विरुध्‍दपक्ष क्रं-1) कंपनी तर्फे लेखी उत्‍तर, शपथपत्र, व लेखी युक्तिवाद आणि उभय पक्षाने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन करण्‍यात आले. तसेच तक्रारकर्त्‍याचे वकील आणि विरुध्‍दपक्ष क्रं-1) कंपनी तर्फे वकील यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला,

07.   वरील प्रमाणे तक्रारकर्ता व विरुध्‍द यांचे परस्‍पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्‍यावरील निष्‍कर्ष पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.

मुद्दे

उत्‍तर

1

तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?

होय.

2

वि.प. ने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे ? व वि.प.चे सेवेतील त्रृटी दिसून येते काय?

होय

3

तक्रारकर्ता प्रार्थनेतील मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पात्र आहे काय ?

अंशतः स्‍वरुपात

4

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

                                                           :: निष्‍कर्ष ::

08.   मुद्या क्रमांकः- 1  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्ता हा ग्राहक या सज्ञेत मोडत नाही असा आक्षेप घेतला आहे,  परंतु विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी  त्‍यांचे लेखी उत्‍तरात विरुध्‍द पक्ष 2 कडून दिनांक दिनांक 04/12/2015 रोजी फुलकोबीचे बियाणे 20 पॅकीट प्रती 10 ग्रॅम वजनाचे रुपये 8,000/- किंमतीमध्‍ये बियाणे खरेदी केल्‍याची बाब मान्‍य केली आहे. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल केलेल्‍या बियाणे खरेदी बीलाच्‍या छायाकिंत प्रतीचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेले बियाणे कोबी हंसा ही जात लॉट क्रमांक 152/156/113 असे नमुद आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी हंसा जातीचे वाण उत्‍पादीत केले असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांचा ग्राहक आहे.  

विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी पुढे असा आक्षेप घेतला की, श्री. तेजराम मांगो हटवार यांच्‍या मालकीची गट क्रं. 153/1 ही शेतजमीन आहे आणि बियाणे खरेदी केलेले बील हे विजय मांगो हटवार यांच्‍या नावाने आहे व तक्रारकर्त्‍याचे नावाने शेती असल्‍याबाबतचा कोणतेही कायदेशीर दस्‍त अभिलेखावर दाखल केले नाही. त्‍यामुळे सदर तक्रार कायदेशीर नसल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी. अभिलेखाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, दाखल 7/12 हा तेजराम मांगो हटवार यांच्‍या नावाने आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. साधारणतः आपल्‍या देशात असे बघण्‍यात येते की, 7/12 हा कुटूंबांतील एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या नावाने असला तरीही त्‍याचे कुटूंबातील इतर सर्व सदस्‍य हे  शेती व्‍यवसायास हातभार लावतात आणि शेती व्‍यवसायातुन मिळणा-या उत्‍पन्‍नातून आपला उदरनिर्वाह भागवितात. अभिलेखावरील 7/12 वर तेजराम मांगो हटवार यांचे नाव दिसत आहे. तक्रारकर्त्‍याचे नाव विजय मांगो हटवार असे आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्ता व 7/12 व गाव नमुना आठ-अ वरील नाव बघता सदर दोन्‍ही व्‍यक्‍ती हे एकाच कुटूबांतील असल्‍याचे दिसून येते. तक्रारीत दाखल फुलकोभीचे बील व इतर बीलांवरील सदर बियाणे हे तक्रारकर्त्‍याने खरेदी केल्‍याचे दिसून येते. अभिलेखावरील कागदपत्रांवरुन तक्रारकर्त्‍याने बियाणांची तक्रार शासकीय अधिका-यांनकडे केल्‍याचे दिसून येते, सदर तक्रारीवरुन तालुका तक्रार समितीने तक्रारीत नमुद गट क्रं.153/1 ची मौका पाहणीकरुन अहवाल व पंचनामा केल्‍याचे दिसून येते.  अभिलेखावरील गाव नमुना आठ-अ वरुन तेजराम मांगो हटवार यांचे नावे असुन त्‍यानुसार गट क्रं. 280 आराजी 0.90 हे.आर. व गट क्रं. 153/1 आराजी 1.08 हे.आर. तेजराम मांगो हटवार यांचे नावाचे असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे वरील दोन्‍ही गट क्रं. हे तक्रारकर्ता वाहत होता असे स्‍पष्‍ट होते, म्‍हणून तक्रारकर्ता व तेजराम एकाच कुटूंबातील असल्‍यामुळे ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे, म्‍हणून मुद्या क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देत आहे.

09.  मुद्या क्रमांकः- 2  तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यानुसार त्‍याला विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी उत्‍पादीत निकृष्‍ट बियाणांमुळे योग्‍य कालावधीत योग्‍य ते पिक घेता आले नाही तसेच बियाणांची लागवड केल्‍यानंतर फुलकोभीच्‍या बियांची वाढ झाली त्‍यामध्‍ये कोभीचे फुल आले परंतु तयार झालेले कोभीचे पिक हे निकृष्‍ट दर्जाचे, खाण्‍याकरीता अयोग्‍य, तसेच कडवट चवीचे निघाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे आर्थिक नुकसान झालेले आहे.

अभिलेखाचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याने जिल्‍हा कृषी अधिकारी भंडारा यांचेकडे पीक नुकसानीबाबत व फसवणूक झाल्‍याबाबत लेखी तक्रार दिनांक 01/04/2016 रोजी केल्‍याचे दिसून येते. सदर अर्जाची छायाकिंत प्रत पृष्‍ठ क्रं. 23 वर दाखल केली आहे. त्‍या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने दिनांक 10/12/2015 रोजी बियाणे पेरले असुन त्‍यानंतर 21 ते 25 दिवसाचे 1.8 हेक्‍टर हंसा फुलकोभीची पुन्‍हा लागवड दिनांक 03/01/2016 रोजी केली तसेच त्‍यानंतर फुलकोभी बाजारात विक्रीकरीता पाठविली असता फुलकोभीचा रंग पिवळसर, गुलाबी व मळकट असल्‍यामुळे बाजारात विकल्‍या गेली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांचे प्रतिनिधींला फोन केला असता त्‍यांनी आज येऊ उद्या येऊ असे सांगून टाळाटाळ केली. त्‍यानंतर दिनांक 30/03/2016 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चे प्रतिनिधी शेतावर आले व त्‍यांनी वातावरणातील फरकामुळे फुलकाबीचे उत्‍पादन निकृष्‍ट दर्जाचे झाले असे सांगून स्‍वतःची जबाबदारी झटकली.  तक्रारकर्त्‍याने पृष्‍ठ क्रं. 31 वर विरुध्‍द पक्ष क्रं. 2 बियाणे विक्रेता यांने कृषी विकास अधिकारी भंडारा यांना दिलेल्‍या पत्राची छायाकिंत प्रत दाखल केली आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता त्‍याने तक्रारकर्ता विजय हटवार तसेच दिलीप पेशने दोन्‍ही रा. सावली व दवडीपार येथील इतर दोन शेतकरी राजेश राखडे व मनोज राखडे यांना विरुध्‍द पक्ष क्रं. 1 निर्मित हंसा सेमीनिस फुलकोभीचे बियाणे विकले असुन त्‍यांचे शेतावर जावून पाहणी केली असता पिवळी, मळकट व निकृष्‍ट दर्जाची होती व त्‍यामुळे शेतक-यांचे नुक‍सान झाले अशी कबूली दिली आहे.  तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीवरुन तालुका तक्रार निवारण समिती यांनी शेताची पीक पाहणी करुन अहवाल व पंचनामा केल्‍याचे पृष्‍ठ क्रमांक 22 ते 26 वर दाखल दस्‍ताऐवजावरुन दिसून येते. सदर पंचनामा हा तक्रार समितीने प्रत्‍यक्ष मौक्‍यावर जावून तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या माहिती व पीकाच्‍या प्रत्‍यक्ष परिस्‍थितीची पाहणी करुन दिलेला आहे. सदर अहवालात फुलकोभीच्‍या पीकाची पुर्ण वाढ झालेली असून फुलाचा रंग पिवळसर, गुलाबी व मळकट रंग, कडवट चव व उग्र वास तसेच पानावर DBM चा प्रादुर्भाव आढळून आला असे नमुद केले आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने कंपनीच्‍या प्रतिनिधी यांच्‍या सल्‍यानुसार रासायनिक व सुक्ष्‍म गुणद्रव्‍ये यांची फवारणी केली असुनही मालाची गुणवत्‍ता कमी झाल्‍याचे नमुद आहे. तालुका निरिक्षण समितीचे सदरचे निरिक्षण हे तक्रारकर्त्‍याने कंपनीप्रतिनिधी, कृषी केंद्र संचालक व बाजुचे शेतकरी यांचेशी चर्चा केल्‍यानंतर नोंदविल्‍याचे देखील अहवालात नमुद केले आहे. सदर अहवालावर विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 चे प्रतिनिधी यांची इतर समिती सदस्‍यांसोबत सही असल्‍याचे दिसून येते. सदरचे अहवालाचे निष्‍कर्षात उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा यांनी शेतकरी श्री. विजय मांगो हटवार रा. साहुली यांच्‍या शेतातील फुलकोभी पिक पिवळसर, गुलाबी व मळकट रंग, कडवट चव व उग्र वास हा Browning  या Physiological disorder मुळे झाल्‍याचे निर्दशनाश आले. “मोन्‍सॉन्‍टो होल्‍डींग प्रा.लि. अंधेरी, मुंबई” या कंपनीने बियाणे हंसा जात ही उच्‍च तापमानास व तापमान चढउतारमध्‍ये तग धरु न शकल्‍याचे आढळून आले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे 100 टक्‍के आर्थिक नुकसान झाले आहे असा निष्‍कर्ष तक्रार निवारण समितीने काढल्‍याचे दिसून येते.

विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांचे प्रतिनिधी हे पीक पाहणी व अहवालाचे वेळी उपस्थित होते व त्‍यावर त्‍यांची सही आहे. सदर प्रतिनिधीने अहवालावर पाहणीच्‍यावेळी व त्‍यानंतर कुठल्‍याही प्रकारचा आक्षेप घेतल्‍याचे दिसून येत नाही, यावरुन हे सिध्‍द होते की, सदर अहवाल हा विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांना मान्‍य आहे, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांच्‍या तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला अहवाल व पंचनामा हा कायदेशीर बाबींची पुर्तता तसेच शासनाचे मार्गदर्शक निर्देशनाचे पालन केलेला नसुन मौका पाहणीचे वेळी या सर्व बाबी विचारात घेतलेल्‍या नाही तसेच बियाणांचे गुणधर्म,वय तापमान व कालावधी याही बाबी विचारात घेतलेल्‍या नाही या आक्षेपात तथ्‍य नसल्‍याचे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तालुका तक्रार निवारण समितीने दिलेल्‍या अहवालात विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कंपनीने उत्‍पादीत केलेला सेमीनीस हंसा हे वाण उच्‍च तापमानात तग धरु शकत नाही असे नमुद केले आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी त्‍याबाबतची सखोल माहिती तक्रारकर्त्‍यास बियाणे खरेदीचे वेळी देणे आवश्‍यक होते. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चे वकीलांनी असा युक्तिवाद केला की, सदर माहिती ही बियाणाचे पॉकीटावर नमुद आहे. सदर माहिती पॉकीटवर नमुद असली तरीही ती पुर्णपणे समजणे हे तक्रारकर्त्‍यासारख्‍या शेतक-याला प्रत्‍येक वेळी शक्‍य असेल असे म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळेच पीकाची हमी देणा-या बियाणे उत्‍पादन कंपनी त्‍यांच्‍या प्रतिनिधीद्वारे सदर माहिती ही शेतक-यांना समजावून सांगणे व वेळोवेळी त्‍याबाबतचे मार्गदर्शन करणे ही बाब आवश्‍यक असते, परंतु विरुध्‍द पक्षानीं तसे केल्‍याचे दिसून येत नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कंपनीने उष्‍ण तापमानात तग धरु न सकणारे हंसा या जातीचे बियाणे दोषपूर्ण आहे हे सिध्‍द होते या निष्‍कर्षाप्रत मंच येते. सदर बियाणे विकून व त्‍याबाबत वेळोवेळी योग्‍य मार्गदर्शन न देऊन विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी केली आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

            विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरात असा आक्षेप घेतला की,  तक्रारकर्त्‍याला झालेले नुकसान हे केवळ दोषपुर्ण बियाणामुळे झाले ही बाबत सिध्‍द करण्‍याची जवाबदारी तक्रारकर्त्‍याची असुन वस्‍तु ही दोष पुर्ण आहे तर त्‍या सबंधी योग्‍य पृथ्‍थकरण व चाचणी केल्‍याशिवाय वस्‍तु मधे दोष सिध्‍द होऊ शकत नाही. अश्‍यावेळी अश्‍या वस्‍तुंचे सॅम्‍पल प्रयोग शाळेकडे पाठविण्‍यात येतात परंतु तक्रारकर्त्‍याने या वाणाचे सॅम्‍पल प्रयोग शाळेकडे पाठवले नसल्‍यामुळे बियाणात दोष आहे हे तक्रारकर्ता सिध्‍द करू शकला नाही. परंतु या संबंधी मा. राष्‍ट्रीय आयोगाने दिलेल्‍या खालील न्‍याय निवाडयामध्‍ये-

            Kanta kantha rao Vs Y. Surya narayan and others Revision petition no 1008 to 1010 of 2017 (CPR 2017(2) Desided on 03/05/2017

            मा. राष्‍ट्रीय आयोगाने न्‍यायनिर्णीत केले आहे की,  तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या पुर्ण बियाणांची पेरणी केली असेल आणि प्रयोग शाळेत पृथ्‍थकरण परिक्षणाकरिता ते बियाणे पाठविले नाही तर त्‍याचा असा कदापिही अर्थ होणार नाही की ते बियाणे सदोष नाहीत. संदर्भिय न्‍यायनिर्णयात विषद केलेल्‍या न्‍याय तत्‍वानुसार सदोष बियाणे सिध्‍द करण्‍यासाठी बियाणांची पेरणी करण्‍यापुर्वी प्रयोग शाळेत तपासणी करिता पाठविण्‍यासाठी काही बियाणाची पेरणी करू नये, पेरणी नंतर उगवण क्षमतेमधे दोष आढळल्‍यास राखीव बियाणाची तपासणी प्रयोग शाळेत करून घेऊन अहवालाप्रमाणे पुढिल कार्यवाही करावी असे मापदंड असले तरी केवळ वर नमुद प्रक्रीया पुर्ण केली नाही यामुळे सदोष बियाणे बाबतचा निष्‍कर्ष मंच काढु शकणार नाही ही बाब कायदेशीर नाही असे नमुद केले आहे.

वरील प्रमाणे विवेचन व न्‍यायनिवाड्याचा आधार घेत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी प्रयोग शाळेतील योग्‍य चाचणीशिवाय बियाण्‍यातील दोष तक्रारकर्ता सिध्‍द करुन शकत नाही या विधानाला तथ्‍य उरत नाही.

    वरील न्‍यायनिर्णयाचा आधार घेता मंच या निष्‍कर्षास येत आहे की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी निर्मित केलेले बियाणे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ने तक्रारकर्त्‍याला सदोष बियाणे विकून अर्जदाराप्रती सेवेत न्‍युनता तसेच अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केला आहे. विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी सिध्‍द होत असल्‍यामुळे मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नमुद करण्‍यात येत आहे.

10.  मुद्या क्रमांकः- 3  तक्रार निवारण समितीच्‍या अहवालात तक्रारकर्त्‍याच्‍या पीकाचे 100 टक्‍के नुकसान झाल्‍याचे नमुद आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार तो दरवर्षी फुलकोभीचे उत्‍पादन घेत होता. परंतु त्‍याला मागील वर्षामध्‍ये किती उत्‍पादन झाले याबाबतचा कागदोपत्री पुरावा तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या तक्रारीत त्‍याला एकूण 20,000 क्विटंल फुलकोभीचे उत्‍पादन अपेक्षीत होते व त्‍याची 20 रुपये प्रति किलो किंमत लावल्‍यास त्‍याला रुपये 4,00,000/- नुकसान झाले असल्‍यामुळे रुपये 4,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतु बाजार भावाबाबत कुठलाही दस्‍ताऐवज तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या योग्‍य पुराव्‍याअभावी रुपये 4,00,000/- नुकसान भरपाई देणे उचित होणार नाही, त्‍या ऐवजी मंचाला फुलकोभीचे पीक नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 2,00,000/- देणे योग्‍य वाटते. तसेच मशागतीकरीता लागलेला खर्च रुपये 50,000/- असे एकूण मिळूण रुपये 2,50,000/- विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 कडून बियाणे व किटकनाशके  खरेदी केले होते. त्‍यामुळे सदर बियाणे किटकनाशकाची किंमत रुपये 13,500/- विरुध्‍द पक्ष क्रं. 2 मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे.  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेमुळे निश्चितच तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरीक त्रास झालेला आहे.  त्‍या सदराखाली रुपये 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. त्‍यानुसार मुद्या क्रमांक 3 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

11.  मुद्या क्रमांकः- 3 वर नमूद मुद्यांचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                                          ::आदेश::

(01)  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला फुलकोभी पीकाचे नुकसान भरपाईपोटी एकूण रक्‍कम रुपये 2,50,00/- तक्रार दाखल दिनांक - 03/10/2016 पासून 6 टक्‍के द.सा.द.शे. व्‍याजासह 30 दिवसाचे आत प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो तक्रारकर्त्‍याला द्यावी.

(03) विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेले बियाणे व किटकनाशकाची किंमत रुपये 13,500/- तक्रार दाखल दिनांक - 03/10/2016 पासून 6 टक्‍के द.सा.द.शे. व्‍याजासह 30 दिवसाचे आत प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो तक्रारकर्त्‍याला द्यावी.

(04)  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व  2 च्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये- 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी तक्रारकर्त्‍याला वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्‍या द्यावेत.

(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी  निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकाराना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्त्‍याला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.