(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 05/03/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 19.06.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून स्पाईस कंपनीचा मोबाईल खरेदी केला, गैरअर्जदार क्र.1 व 3 यांचे गैरअर्जदार क्र.1 हे ऍथोराईज्ड डिलर असुन गैरअर्जदार क्र.2 चे सर्व्हीसीग सेंटर आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून विकत घेतलेल्या मोबाईल मॉडेल क्र.स्पाईस मोबाईल-डी-1111 असुन त्याचा सिरियल नं. आय.एम.ए. नं-एम 353053030000303 हा आहे व त्याची किंमत रु.16,130/- एवढी होती. 3. तक्रारकर्त्याने सदर मोबाईल खरेदी केल्यानंतर त्यामध्ये ब्ल्यूटूथ जुळत नव्हता व मोबाईल आपोआप बंद होत होता (Switch Off), त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दोष नाहीसा करण्या ऐवजी हात झटकून घेतले व गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे देण्यांस सांगितले. त्यानुसार तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे गेला, तेव्हा त्यांनी तीन दिवसात मोबाईल मधील दोषांचे निराकरण करुन देईल असे सांगितले होते. जर मोबाईल दुरुस्त झाला नाही तर बदली (Replace) करुन देऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दि.29.12.2010 रोजी मोबाईल दुरुस्त करुन देण्याकरीता दिला व गैरअर्जदार क्र.2 ने सर्व्हीस जॉबशिट दिली. तकारकर्त्यानुसार सदर मोबाईल हा वारंटी कालावधीत होता. गैरअर्जदार क्र.2 ने आश्वासन दिल्याप्रमाणे तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही व तो कंपनीकडे पाठवावा लागेल असे सांगितले. त्यानंतर तकारकर्ता गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे गेला असता त्याला गैरअर्जदार क्र.3 यांचेशी संपर्क साधावयास सांगितले व बरेच दिवस तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.04.02.2010 रोजी वकीलामार्फत नोटीस दिला, ती नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त झाली तरीपण त्यांनी मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही किंवा बदलवुन दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन ती व्दारे मोबाईलची किंमत रु.16,130/- द.सा.द.शे. 9% व्याजासह मिळावे, शारीरिक व मानसिक त्रासाचे क्षतिपूर्तीचे रु.30,000/-, नोटीस दिल्यावरही गैरअर्जदारांनी दुर्लक्ष केल्याबद्दल रु.30,000/-, ग्राहकांशी संपर्क न झाल्यामुळे झालेल्या आर्थीक नुकसानीबाबत रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.10,000/- मिळण्याबाबत मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता गैरअर्जदार क्र.2 व 3 हे मंचासमक्ष उपस्थित न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फी आदेश पारित करण्यांत आला. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर तक्रारीला आपले उत्तर दाखल केलेले आहे ते खालिल प्रमाणे ... 5. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याने त्याचेकडून मोबाईल मॉडेल क्र.स्पाईस मोबाईल-डी-1111, सिरियल नं. आय.एम.ए. नं-एम 353053030000303 हा खरेदी केला होता, ही बाब मान्य केलेली आहे. तसेच त्यांनी मोबाईलमध्ये काही दोष आढळल्यास वारंटी कार्डमधील मुद्दा क्र.2 नुसार ते दोष दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.2 ची असल्याचे नमुद केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 6. सदर तक्रार मंचासमक्ष मौखीक युक्तिवादाकरीता दि.28.02.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचे वकील हजर, गैरअर्जदारांचे वकील हजर मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलामार्फत ऐकला. तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून गैरअर्जदार क्र.3 व्दारा निर्मीत मॉडेल क्र. स्पाईस मोबाईल-डी-1111, सिरियल नं. आय.एम.ए. नं-एम 353053030000303 हा रु.16.130/- ला खरेदी केला होता व गैरअर्जदार क्र.2 यांचे सर्व्हीस स्टेशन असल्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्त्याचे मोबाईलमध्ये दोष निर्माण झाला व त्याकरीता तो गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे गेला असता त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे जाण्यांस सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे मोबाईल दुरुस्तीकरीता दिला होता. तसेच सदर मोबाईल हा वारंटी कालावधीमधे होता ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.2 वरुन स्पष्ट होते. 9. तक्रारकर्त्याने मोबाईल दि.29.12.2009 रोजीपासुन दुरुस्ती करीता गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे आहे व तो दुरुस्त करुन दिला नाही म्हणून तक्रारकर्त्याने दि.04.02.2010 रोजी गैरअर्जदारांवर नोटीस बजावला. सदर बाबींवरुन असे निष्पण्ण होते की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला सेवेत त्रुटी दिलेली आहे व मोबाईल वारंटी कालावधीत असुनही त्याची दुरुस्ती करुन दिलेली नाही. 10. गैरअर्जदारांचे सदर प्रकरणातील ग्राहकाशी वागणे हे गैरकायदेशिर व अनुचित आहे त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ता मोबाईलची किंमत रु.16,130/- मोबाईल दुरुस्ती करावयास दिल्याचा दिनांक 29.12.2009 पासुन द.सा.द.शे. 9% दराने रक्कम मिळण्यांस पात्र ठरतो. 11. तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेल्या इतर मागण्यांबद्दल कोणताही पुरावा दिलेला नाही परंतु तक्रारकर्त्याला सदर प्रकरणात गैरअर्जदारांची प्रवृत्तीमुळे शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे, त्याकरीता तो रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यांस पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिली असुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी संयुक्तरित्या किंवा एकलरित्या तक्रारकर्त्यास मोबाईलची किंमत रु.16,130/- द.सा.द.शे.9% दराने रक्कम अदा होईपर्यंत परत करावे. 4. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी संयुक्तरित्या किंवा एकलरित्या शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- अदा करावे. 5. गैरअर्जदारांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांका पासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |