तक्रारदार तर्फे वकील श्री अजित वर्तक हजर.
तक्रार दाखलकामी आदेश
द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. वाय. मानकर
1. तक्रारदारांनी सामनेवाले यात्रा / सहल बाबत सेवा देणा-या कंपनी विरुध्द सेवेतील त्रुटीकरीता ही तक्रार दाखल केली व नुकसानभरपाईची मागणी केली.
2. तक्रारदार यांचे वकील श्री. वर्तक यांना अंशतः ऐकण्यात आले व त्यांचे लक्ष मा. राष्ट्रीय आयोगाने तक्रार क्र. 97/2016, अंब्रीश कुमार शुक्ला अधिक 21 विरुध्द फेरॉस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. निकाल दि. 07/10/2016 कडे वेधण्यात आले. त्यानंतर पुढील सुनावणीचे दिवशी वकील श्री. वर्तक यांनी उपरोक्त निर्णयाची प्रत सादर केली. त्यांचेनुसार सदरहू न्यायनिर्णय हा प्रातिनिधीक स्वरुपात दाखल करण्यात येणा-या तक्रारींबाबत आहे व या तक्रारीला तो लागू होणार नाही. वकीलांना तक्रारीबाबत सविस्तरपणे ऐकण्यात आले.
3. तक्रार व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे पहाण्यात आली. तक्रारदारांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र. 62 बी अनुसार रु. 19,91,742/- ची नुकसानभरपाईबाबत मागणी केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम 11 प्रमाणे या मंचाचे पिक्युनरी अधिकारक्षेत्र ठरवितांना वस्तू किंवा सेवेचे मूल्य व मागणी केलेली नुकसानभरपाईची रक्कम विचारात घेणे आवश्यक आहे. ही बाब उपरोक्त न्यायनिवाडयाच्या परिच्छेद क्र. 14 मध्ये उदाहरणासह स्पष्ट केलेली आहे. या तक्रारीमध्ये नुकसानभरपाईची मागणी केलेली रक्कम रु. 19,91,742/- आहे व परिच्छेद क्र. 15 मध्ये नमूद केल्यानुसार तक्रारदारांनी सामनेवाले यांचे सेवेकरीता रु. 2,88,964/- रक्कम अदा केलेली आहे. ही रक्कम व नुकसानभरपाईची रक्कम विचारात घेता, एकूण रक्कम रु. 22,80,000/- पेक्षा जास्त होते. सबब, आमच्या मते ही तक्रार या मंचात चालू शकत नाही. सबब, खालील आदेश,
आदेश
1. तक्रार क्र. 434/2017 पिक्युनरी क्षेत्राअभावी तक्रारदारांना परत करण्यात येते.
2. तक्रारदार यांना लिमिटेशनच्या तरतूदींच्या अधीन राहून योग्य त्या मा. आयोगात / मा. न्यायालयात तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात येते.
3. खर्चा बाबत आदेश नाही.
4. या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क टपालाने पाठविण्यात याव्यात.