रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.16/2009. तक्रार दाखल दि.22-1-09. तक्रार निकाली दि.24-3-2009. श्री.शरद नामदेव घरत, रुम नं.301, प्रिया हाऊसिंग सोसायटी, लोखंडी पाडा, पनवेल, जि.रायगड. ... तक्रारदार.
विरुध्द श्री.मोहंमद नसीम मलिक, रुम नं.एल-69, सेक्टर 3, कळंबोली कॉलनी, पनवेल, जि.रायगड. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य. तक्रारदार – स्वतः सामनेवालें - एकतर्फा चौकशी. -निकालपत्र -
द्वारा- मा.सदस्य, श्री.बी.एम.कानिटकर. 1. तक्रारदार हे नवीन पनवेल येथे रहाणारे असून सामनेवाले हे पनवेल मध्येच मोटार हाऊस या नावाने दुचाकी व चारचाकी वाहनाची खरदी विक्री करुन देण्याचा व्यवसाय करतात. त्यांचे कार्यालय शॉप नं.6, हार्मनी इमारत, नेत्रज्योत हॉस्पिटलजवळ, सेक्टर-1 खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे आहे. तक्रारदारानी सामनेवालेकडून दि.4-2-06 रोजी बजाज कंपनीची डिस्कव्हर मॉडेलची मोटारसायकल खरेदी केली. त्यापोटी एकूण रक्कम रु.48,500/- सामनेवालेंना दिली. त्याच्या पावत्या अभिलेखात दाखल आहेत. या किमतीत सदर वाहन आर.टी.ओ.कडे नोंदणी करणे व विमा यासाठी लागणारी रक्कमही त्यात मिळवलेली आहे, परंतु वाहनाचा ताबा जरी दि.4-2-06 रोजी तक्रारदारास दिला असला तरी आजपर्यंत त्यासंबंधीची कागदपत्रे सामनेवालेनी तक्रारदारास दिलेली नाहीत. घेतलेल्या वाहनामध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे सामनेवालेनी तक्रारदाराना दि.26-2-06 रोजी वाहन बदलून दिले. काही दिवसातच गाडीची सर्व कागदपत्रे देण्याचे कबूल केले. सदर वाहनाचा विमा उतरविण्यासाठी तक्रारदारानी सामनेवालेना दिलेल्या रकमेतून इफको टोकियो कंपनीला तक्रारदाराच्या वतीने चेक देण्यात आला, परंतु तो चेक न वटता परत आल्यामुळे विमा कंपनीने त्यांच्या दि.24-2-06 चे पत्रान्वये विमा पॉलिसी रद्द केली. सदर वाहनाबरोबर सर्व्हीसिंग बुकलेट नसल्यामुळे सर्व्हीसिंग करुन घेता आले नाही. वारंवार विनंती करुनही सामनेवाले काहीच प्रतिसाद देत नसल्यामुळे तक्रारदारानी दि.5-11-08 रोजी सामनेवालेना नोटीस बजावली, परंतु त्यालाही सामनेवालेनी काही प्रतिसाद न दिल्यामुळे शेवटी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली. त्यांनी मंचाला खालीलप्रमाणे विनंती केली आहे- 1. सामनेवालेनी वाहनाचा विमा, आर.सी.बुक, विमा पॉलिसी, कर भरल्याच्या पावत्या, इ.कागदपत्रे तक्रारदारास देण्याचे आदेश व्हावेत. 2. गाडीबरोबर योग्य ती कागदपत्रे नसल्यामुळे तिला फ्री सर्व्हीसिंग करुन घेता न आल्यामुळे झालेल्या मनस्तापापोटी रु.10,000/- तक्रारदारास मिळावेत. 3. न्यायिक खर्चापोटी रु.3,000/- मिळावेत.
2. नि.1 अन्वये तक्रारदारानी तक्रारअर्ज दाखल केला असून नि.2 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.4 अन्वये मंचाने सामनेवालेना नोटीस पाठविली असून त्याची पोचपावती नि.5वर अभिलेखात दाखल आहे. 3. योग्य संधी देऊनही व नोटीस मिळूनही सामनेवाले सतत गैरहजर असल्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश दि.27-2-09 रोजी पारित करण्यात आला. तक्रारीची एकतर्फा सुनावणी दि.23-3-09 रोजी घेण्यात आली व सदर तक्रारीची सुनावणी अंतिम आदेशासाठी स्थगित ठेवण्यात आली. 4. तक्रारदारांची तक्रार व कागदपत्रे पाहिल्यानंतर व त्यांचे युक्तीवाद ऐकल्यावर सदर तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात- मुद्दा क्र.1 – तक्रारदारांचा अर्ज मुदतीत आहे काय? उत्तर - नाही. मुद्दा क्र.2 – तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे त्यांचा अर्ज मंजूर करणे योग्य होईल काय? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र.1 व 2 – 5. ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24(अ) नुसार कारण घडल्यापासून 2 वर्षाचे आत तक्रारदारानी तक्रार दाखल करणे आवश्यक होते. त्यास वाहनाचा ताबा दि.26-2-06 रोजी मिळाला आहे. दि.26-2-06 नंतर दि.26-2-08 अखेर तक्रारदारानी तक्रार दाखल का केली नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्याने सामनेवालेस लेखी विनंती केल्याचे कागदपत्रावरुन दिसते, परंतु तक्रार मात्र मंचाकडे वेळेत दाखल केलेली नाही. केवळ एकतर्फा पत्रव्यवहार केला म्हणून तक्रारदाराची तक्रार मुदतीत येणार नाही. तक्रारदारानी दि.5-11-08 रोजी चौथी नोटीस देऊन मागणी केली व सामनेवालेनी त्यास दाद दिली नाही म्हणून ही तक्रार त्यानंतर दाखल केली आहे. त्यास वाहनाचा ताबा घेतल्यापासून दोन वर्षाचे आत तक्रार देणे शक्य होते तशी ती त्याने दिलेली नाही. त्यामुळे ती मुदतीत येणार नाही. मुदतीची बाधा असेल तर विलंबमाफीचा अर्ज देण्याची तरतूद कायदयात आहे, परंतु तक्रारदारानी त्याच्या आधारे तक्रार दाखल केलेली नाही व विलंब माफ करुन घेतलेला नाही, त्यामुळे ही तक्रार मुदतीत नसल्याचे मंचाचे मत आहे त्यामुळे ती काढून टाकण्याच्या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 6. सबब पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे- -ः आदेश ः- 1. सदरची तक्रार कालमर्यादेत येत नसल्यामुळे काढून टाकण्यात येत आहे. 2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. 3. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड- अलिबाग. दिनांक- 24-3-2009. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |