निकालपत्र :- (दि.18.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 ही शिक्षण संस्था आहे व सामनेवाला क्र.2 ही मुक्त विद्यापीठ असून सामनेवाला क्र.3 व 4 हे सदर विद्यापीठाचे प्रशासकिय अधिकारी आहेत. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 विद्यापीठाशी सलग्न असलेले सामनेवाला क्र.1 या शिक्षण संस्थेत बी.एम्.एल्.टी. या कोर्सच्या तिस-या वर्षाकरिता प्रवेश अर्ज सादर केला. त्यावेळेस बी.एस्सी.एम्.एल्.टी. च्या पहिल्या व दुस-या वर्षाची मार्कशीट, प्रवेश अर्ज सादर केला. त्यावेळेस सामनेवाला क्र.1 शिक्षण संस्थेने तक्रारदारांकडून दि.28.03.2009 रोजी टयुशन फी रुपये 3,500/- स्विकारली. तसेच, दि.21.03.2008 रोजी रक्कम रुपये 3,400/- चा डिमांड ड्राफट सामनेवाला क्र.1 संस्थेकडे जमा केला. तक्रारदार हे शिक्षण घेत असताना त्यांनी बी.एस्सी.एम्.एल्.टी. तिस-या वर्षाकरिता अर्ज भरण्याची वेळ आली असता परिक्षा फॉर्म स्विकारला नाही व त्यांना सदर बी.एस्सी.एम्.एल्.टी. तिस-या वर्षाच्या क्लासला अटेंड करता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. याबाबत सामनेवाला क्र.2 यांना पत्र पाठविले, परंतु त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर सामेनवाला विद्यापीठाच्या कार्यालयातील अधिका-यांशी फोनवरती चर्चा केली असता त्यांना विद्यापीठावर कोणतीही केस करु नका, परिक्षेस बसण्याची संधी देणेत येईल असे सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांनी पत्र पाठवून लेखी उत्तर पाठविणेस सांगितले. (3) तक्रारदार पुढे सांगतात, सामनेवाला यांनी तक्रारदारांना प्रवेश अर्ज भरुन घेवून त्यांना परिक्षेचा फॉर्म भरुन दिला नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. सबब, सामनेवाला यांचेकडे भरलेली रक्कम रुपये 3,500/- व रुपये 4,300/-, तसेच पत्रव्यवहार खर्च रुपये 500/-, फोन व प्रवास खर्च रुपये 1,000/-, शैक्षणिक व मानसिक नुकसानापोटी रुपये 3 लाख व शारिरीक त्रासापोटी रुपये 1,50,000/- देणेबाबत आदेश व्हावा. तसेच, बी.एस्सी.एम्.एल्.टी. तिस-या वर्षाकरिता अॅडमिशन देवून परिक्षेस बसणेची परवागनी द्यावी व तक्रारीचा खर्च देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत बी.एम्.एल्.टी.पहिल्या वर्षाचे मार्क्सलिस्ट, सेमीस्टरचे मार्क्सलिस्ट, दि.27.05.09, दि.12.09.2009, दि.01.01.2010 रोजी सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेली पत्रे, टयुशन फी भरलेची पावती, अॅडमिशन फी भरलेबाबतचा डी.डी., माहितीपत्रक, तिस-या वर्षाचे प्रात्याक्षिक जर्नल इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. तक्रारदारांनी बी.एस्सी.एम्.एल्.टी. चे प्रथम व व्दितीय वर्ष अन्य विद्यापीठाअंतर्गत पूर्ण करुन तृतीय वर्षाकरिता सामनेवाला क्र.2 विद्यापीठाकडे प्रवेश अर्ज केला होता. तक्रारदारांनी प्रथव व व्दितीय वर्ष अन्य विद्यापीठाकडून पूर्ण करुन घेतले असल्याने प्रवेश देणेचा हक्क सामनेवाला क्र.2 विद्यापीठाने राखून ठेवला होता. यामध्ये सामनेवाला क्र.1 संस्थेची कोणतीही सेवा त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळून कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 20,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत प्रवेश घटना क्रम दर्शविणारा तक्ता, सदर तक्त्याप्रमाणे कागदपत्रे इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (7) सामनेवाला विद्यापीठाने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला यांचेविरुध्दचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. तसेच, प्रस्तुतचा वाद हा या मंचाच्या अधिकारक्षेत्रा बाहेरील आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही. तक्रारदारांनी बी.एस्सी.एम्.एल्.टी. च्या तिस-या वर्षाकरिता टयुशन फी सहीत प्रवेश अर्ज दिला, ते नियमाप्रमाणे योग्य नाही. तक्रारदारांनी बी.एस्सी.एम्.एल्.टी. प्रथम वर्ष परिक्षा अमान्यताप्राप्त विद्यापीठाची आहे. तसेच, व्दितीय वर्ष परिक्षा अमान्य डिम्ड् विद्यापीठाची आहे. त्यामुळे तक्रारदार हे बी.एस्सी.एम्.एल्.टी. तिस-या वर्षास प्रवेश घेण्यास पात्र नव्हते व तसे सामनेवाला क्र.1 मार्फत कळविले होते. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (8) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला यांनी प्रस्तुत तक्रारीत उपस्थित केलेला वाद हा ग्राहक वाद होत नाही. याबाबतचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु, तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी उपस्थित केलेला वाद हा बी.एस्सी.एम्.एल्.टी.च्या तिस-या वर्षाच्या प्रवेशाबाबत केलेला आहे. सामनेवाला क्र.1 ही शिक्षण संस्था आहे व त्या अनुषंगाने प्रवेशासंबंधी उपस्थित केलेला वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, सामनेवाला क्र.1 शिक्षण संस्था ही या मंचाचे कार्यक्षेत्रात येते. सबब, प्रस्तुत तक्रारीचे अंशत: कारण या मंचाच्या कार्यक्षेत्रात घडलेले आहे. सबब, प्रस्तुत तक्रार चालविणेची क्षेत्रिय अधिकारीता या मंचास येते. (9) तक्रारदारांनी बी.एस्सी.एम्.एल्.टी.प्रथम वर्ष हे डॉ.सी.व्ही.रामन, रायपूर या विद्यापीठातून परिक्षा दिलेली आहे. तसेच, व्दितीय वर्ष हे व्ही.एम्.आर.एफ्.डिम्ड् युनिव्हर्सिटी, सालेम, तामिळनाडू या विद्यापीठातून पूर्ण केलेचे दिसून येते. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता सदरची दोन्ही विद्यापीठे ही मान्यताप्राप्त नसलेल्या दिसून येत आहेत. केवळ प्रवेश फी/टयुशन फी देवून प्रवेश अर्ज सादर केलेला आहे या कारणावरुन प्रवेश अर्ज स्विकारणे अथवा परिक्षेस बसू देणे हे सामनेवाला विद्यापीठावर बंधनकारक नाही. तक्रारदारांनी बी.एस्सी.एम्.एल्.टी. च्या प्रथम व व्दितीय वर्षाच्या परिक्षा अमान्यप्राप्त विद्यापीठातून दिल्या असल्याने सामनेवाला विद्यापीठाने बी.एस्सी.एम्.एल्.टी.च्या तृतीय वर्षास प्रवेश नाकारुन परिक्षा फॉर्म दिलेला नाही यामध्ये सामनेवाला यांची कोणतीही सेवा त्रुटी दिसून येत नाही. सबब, तक्रारदारांच्या तक्रारीत कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |